Saturday, December 02, 2023

काफिला

लहापणापासूनच आई बाबांमुळे सुट्टी म्हणले की कुठेतरी फिरायला जाणे, नवीन जागा बघणे, अनुभवणे हे गणित पक्क ठरलेले..

आता वयाची चाळीशी ओलांडताना सुटीचे नियोजन स्वतःहून करावे लागते..

धावत्या काळाने नेटच्या मदतीने वैयक्तिक बुंकिग किंवा केसरी, वीणा, सचिन यासारख्या अनेक प्रवास कंपन्याचे पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत, तेही मोबाईलच्या एका बटणावर..

यातून निवड करताना उत्तम सोयी सुविधा, तत्पर सेवा, सुरक्षितता आणि अनेकदा आधीच्यांचे अनुभव याचा विचार आपण करतो..

पण कधीतरी या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून नवीन अनुभव घेऊन बघण्यात अधिक गंमत असते..

म्हणूनच छोटीशी विश्रांती घेण्यासाठी काफिला ऍडवेंचर्स सोबत हंपी बदमीची अवघ्या तीन दिवसांची सफर अनुभवली..


शनिवारी शाळा करुन रात्रीच्या बसने प्रवास सुरु झालेल्या प्रवासापासून ते बुधवारी पहाटे परत येण्यापर्यंतची सर्व व्यवस्था काफिलाच्या आयोजकांनी केली होती..


हे आयोजक म्हणजे पंचविशीतली युवा मंडळी..

यातली काही नोकरी करतात तर काही अजूनही शिक्षण घेत आहेत..

मग अशा सहलींचे आयोजन हे का करतात..? पैसा, व्यवसाय..?

एकूण व्यवस्था आणि सहलीचे शुल्क बघता, या दोन्ही गोष्टी असतील, असे वाटले नाही..

इतर प्रवासी कंपन्या आणि काफिला यांच्यात हाच मुख्य फरक जाणवला..

एखादे नवीन ठिकाण बघताना, सर्व आधुनिक सोयींनी सुसज्ज हॉटेल निवडण्यापेक्षा काफिलाने घरगुती व्यवस्थेची निवड केली, त्यामुळे प्रेक्षणीय स्थळे बघताना तेथील स्थानिक लोकांशी संवाद साधता आला.. 

त्यांचे अनुभव, दिनक्रम जवळून बघता आले, पारंपरिक चवीच्या जेवणाचा आस्वाद घेतला..

याचा दुसरा फायदा म्हणजे कमी पैशात उत्तम सोय झाली आणि तेथील स्थानिक लोकांना व्यवसाय मिळाला..

इथे बचत करण्यापेक्षा अनावश्यक खर्च टाळणे जास्त होते..

कारण आपली संस्कृती, इतिहास हा नुसता बघून समजत नाही, तर सोबत त्याचे उत्तम ज्ञान, अभिमान असणारी मार्गदर्शक(गाईड) व्यक्ती हवी..

याची व्यवस्था सर्व ठिकाणी होती..

सोबत आलेला गट कमी जणांचा असल्यामुळे, दिलेल्या वेळपेक्षा कमी वेळात सर्व गोष्टी पूर्ण व्हायच्या..

नियोजन करणारी सारी मंडळी युवा असल्यामुळे, अर्थातच सोबत आलेली सुद्धा युवा, माझ्यापेक्षा निम्या वयाची, त्यामुळे मीही त्या दिवसात फिरुन आले..

त्यांच्यासोबत सानपुरा तलावात क्लिफ जंपिंग (चारी बाजूंनी निसर्गाने वेढलेल्या तलावात एका उंच दगडावरुन उडी मारणे), 

 

कोरॅकल राईड (टोपलीच्या आकाराची बोट) हे वेगळे भन्नाट अनुभव घेतले..

 

एकूणच बघता बघता तीन दिवस कसे संपले कळलेच नाही..

आजची युवापिढी आळशी, मोबाईलमध्ये व्यस्त, फास्ट फूडच्या आहारी गेलेली, सर्व गोष्टी आयत्या हवी असणारी अशा एक ना अनेक तक्रारी असणाऱ्या साऱ्यांनी कधीतरी वेळ काढून त्यांच्यासोबत रहायला हवे..

काफिला ऍडवेंचर्स सारख्या नव्या गोष्टी करणाऱ्यांना अनुभवायला हवे, त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे..

तरच दोन पिढीत वाढत जाणारी दरी कुठेतरी सांधता येईल..

एक वेगळा अनुभव देण्यासाठी काफिला ऍडवेंचर्सचे मनापासून आभार आणि त्यांच्या अशा मुशाफिरीसाठी खूप खूप शुभेच्छा..

2 comments:

suggestions most wlcome