गोष्ट किती जुनी आहे, याची काहीच कल्पना नाही. कोणी सांगितली, याचेही काही दाखले नाहीत. कानगोष्टींमधून आली असावी, असा कयास आहे..
आवडेल ना..!
आटपाट नगरात दामू अण्णा नावाचे गृहस्थ एक भोजनालय चालवायचे. त्यांच्यासोबत त्यांची मानलेली बहीण रुक्मिणी स्वयंपाक घर सांभाळायची. नामदेव पडेल ते काम करायचा, जो अण्णांना अगदी मुलासारखा होता. हरी आणि सखा हे दोघे काही महिन्यांपूर्वीच भोजनालयात काम करायला आले होते. हे चौघे अण्णांचे कुटुंब होते..
भोजनालयात आलेल्या भुकेल्या जीवांना घरासारखं अन्न द्यायचं, पैशांमागे न धावता दोन वेळची भाकरी मिळण्यापुरतं काम करायचं. इतकाच काय तो साऱ्यांचा दिनक्रम होता..
एसटी स्टँडच्या बाजूला असलेले हे भोजनालय बऱ्यापैकी नावाजलेले होते. थकले भागले, भुकेले प्रवासी इथे न्याहारी, जेवण करायचे. अगदी घरगुती सोय व्हायची, त्यामुळे मंडळी खुश असायची.
पण तो दिवस काहीतरी वेगळाच होता. सकाळपासून एकही गिऱ्हाईक आलं नव्हतं. नामू काळजीने अण्णांना म्हणाला, "अण्णांनू आजचं गणित चुकलयं बगा, सकाळ धरन कोनीबी हाटीलात आल नाय.."
त्यावर अण्णा, "आणि यानंतरही येतील, असे मला वाटत नाही. नाम्या आपल्या लक्षात यायला होतं, की आज गावच्या देवीचा उरूस आहे. बघ ना.. येणारी सगळी मंडळी, डोकं टेकवायला देवळाकडे जात आहेत. कदाचित तिथच काहीतरी खात असतील.."
"खरंच की हो अण्णा, आता आपण बनवलेला सारा नाश्ता, जेवण वाया जातंय बगा. त्यात आपल्याकडे ते शीतकपाट पण नाही. काय करायचं हो आता..?" नामू.
"आपण जाऊया का उरसाला..? आज तिथे थाटू आपलं दुकान.. " अण्णा
"अSSक्शी, माझ्या मनातलं बोलला. पण अण्णा, उरसात लोकांना काहीतरी खमंग खायला लागतं. हे रोजचं अन्न तिथे कसं चालायचं..?" नामू.
"त्यासाठी एक भन्नाट कल्पना आहे माझ्या डोक्यात. तू रोज उरलेलं सगळे पदार्थ एकत्र करत, त्यावर दही, नाहीतर आमटी घालून गोपाळकाला करतो, तसं काहीतरी बनवून देऊया..? नाश्त्यातले पोहे, त्यावर बटाट्याची भाजी मग उसळ सगळे एकत्र करून देऊ.." अण्णा
"हे भारी जमेल, पण अण्णा मी दही,आमटी घेऊन खातो. गिऱ्हाईक मंडळींना थोडी चालणारे ते.." नामू
"त्यांच्यासाठी बिना डाळीचा स्पेशल रस्सा बनवू, त्यावर तेलाचा मस्त तवंग सुटेल, असा तडका देऊ, एक नंबर झणझणीत बनवू बघ.." अण्णा
"अन् अण्णा या पदार्थाला म्हणायचे काय..? "नामू
"सगळ्या गोष्टी एकत्र मिसळल्या, मग मिसळ म्हणूया..?" अण्णा
" मिसळ..! एकच नंबर सुचले बघा तुम्हाला, चला आता उशीर नको करायला, निघूया लवकर" नामू
"अरे लेका आधी तयारी कर, त्या रुक्मिणीला रस्सा बनवायला सांग. एखादं बाकडं शोध, तिथे टेबल खुर्च्या मांडायला जागा मिळणार नाही. जा चट्दिशी सगळ्यांना तयारी करायला लाव.." अण्णा.
नाम्या स्वयंपाक घराकडे पळाला. आज चपाती, भाकरी, घावन काहीच करायचं नसल्यामुळे, निवांत बसलेल्या रुक्मिणीला सारा प्रकार सांगितला.
"आक्का, तुम्हाला काय मदत करू सांगा. आपल्याला घाई करायला हवी. उरूसात लवकर पोहोचायला हवं.आणि हो नुसता रस्सा नको बरं का..! आत्ताच दिवाळी झाली. त्यामुळे चिवडा, शेव आहे, ते पण सोबत घेऊ.." नामू.
"नाम्या आधी पटकन कांदा लसूण वाटून दे. थोडा टोमॅटो चिरून दे, त्या हरी आणि सखाला बोलावं.." आक्का.
बघता बघता मंडळी कामाला लागली. डबे भरले, टेबल वजा बाकडे घेऊन मंडळी गावच्या देवळाकडे रवाना झाली.
रितसर दुकान थाटले.अण्णांनी नामूला हाकाटी द्यायला सांगितली.
"चला या, मेजवानी करा, मिसळ नावाचा पदार्थ चाखा.. SSS चला या, मेजवानी करा, मिसळ नावाचा पदार्थ चाखा....!" नामू, सखा, हरी सगळेच गर्जू लागले.
'मिसळ'.. हे काय नवीन, हे बघायला दोन-चार मंडळी भोवती गोळा झाली.
"काय अण्णा, आज भोजनालय सोडून इथे काय करता राव..?" एकजण म्हणाला.
"तुम्ही आज तिकड आले नाही, म्हटलं की आपणच यावं. तसंही देवीचा उत्सव आहे. म्हटलं चला गिऱ्हाईक मंडळींना इथे सेवा देऊ. पण इथे त्या टेबलखुर्चीला जागा नाही, म्हणून हा नवीन पदार्थ घेऊन आलो.. " अण्णा.
"हे बाकी बेस्ट केलं, तुमच्या भोजनायाची चव एकदम घरच्यासारखी असते बघा. काय ते नवीन, मिसळ बघू तरी, द्या बरं मला.." नेहमीचा खास खवय्या शिवादादा.
आक्कांनी खोलगट बशीत आधी पोहे, त्याच्यावरती बटाट्याची भाजी मग उसळ, छान कुरकुरीत चिवडा आणि नंतर मसाल्याची आमटी वाढत पदार्थ छान सजवला. वरून थोडी दिवाळीची शेव ही भुरभुरली आणि दर्दी शिवादादा समोर धरली.
त्याने साशंक नजरेने बशीकडे पाहून, पहिला घास मुखात घेणार तसा नामू आरडला..
"थांबा साहेबानू..!, मिसळ हाय ती, साऱ्या गोष्टी आधी नीट मिसळून तर घ्या.." त्याने पुढे होऊन चमच्याने सारे पदार्थ छान एकत्र केले. थोडा अजून रस्सा हवा, म्हणून बशी आक्का समोर धरली. त्यांनी डावाने रस्सा वाढला.
मग ती तय्यार मिसळ शिवदादाने चाखली नि दाद मिळाली, "वाह क्या बात..! आक्का एक नंबर जमला बरं का नवा पदार्थ. थांबा आमच्या कुटुंबाला घेऊन येतो. दोन-तीन बशा तयार ठेवा."
त्या बाकड्या भोवती जमून हे सारं बघणारी बाकी मंडळी, "आम्हाला पण द्या, एकेक बशी.."
बघता सकाळी बनवलेल्या पदार्थांचे डबे रिकामे झाले. भुकेले जीव तृप्त झाले नि नवा पदार्थ मिसळ अन्नपूर्णा देवीच्या सेवेत रुजू झाला.
काहींना, आता संध्याकाळी या, असे सांगून परत पाठवावे लागले. त्यासाठी पुन्हा लगभग सुरू झाली.
"अण्णा मला काय वाटतंय मिसळी सोबत भाकरी, चपाती नाहीतर घावन असे काहीतरी देऊ या का..?" आक्कांनी सुचवले.
"काहीच हरकत नाही. असेही संध्याकाळी मंडळी आपापल्या गावी निघतील. पोटाची खळगी पुरेशी भरली, तरच घरी पोचेस्तोवर धीर धरवेल." आण्णा.
दोन-तीन तासात संध्याकाळची तयारी झाली. पन्नास साठ लोकांसाठी मिसळ भाकरी बनवून मंडळी गावाच्या देवळाकडे निघाली.
"अण्णांनू, देवीला नैवेद्य दाखवू या..?" नामू.
"हो.. हो चालतंय की, या बारीला सगळ्या गोष्टी खास बनवल्या आहेत. नव्या पदार्थावर देवीची कृपा हवी ना.." अण्णा
सकाळपासून गोडधोड खाऊन कंटाळलेली ग्रामदेवी मिसळीच्या स्वादाने अतिशय सुखावली. ते पाहून आनंदून गेलेल्या देवी अन्नपूर्णेने दामू अण्णांच्या या कुटुंबाची नकळत दृष्ट काढली. कडाकड बोटं मोडल्याचा सुमधूर नाद उमटला.
बघता बघता मिसळीची चर्चा गावोगावी गेली. अन्नपूर्णा देवीची सेवा करणारे, अनेक जण मिसळीचा आस्वाद घेण्यासाठी येऊन गेले. प्रत्येकाने आपल्या कल्पनांना भरारी देत, मिसळीच्या नवनवीन पद्धती शोधल्या.
मिसळ हळूहळू अनेकांच्या नित्य आहाराचा भाग बनली. भाकरी, चपाती, घावन यांची जागा पाव-ब्रेड यांनी घेतली. मसाल्याच्या आमटीला तर्री हे नवे नाव मिळाले.
अगदी आजच्या तारखेपर्यंत मिसळीचे अनेक प्रयोग सुरूच आहेत. नाना प्रकारची मिसळ खवय्यांच्या सेवेसाठी येत आहे.
गोष्ट खूपच जुनी होती. सांगोपांगी बदलत गेली.
पण कशी वाटली, हे सांगायला विसरू नका..!
तुमच्या प्रतिसादावर रंगबिरंगी मिसळीची कथा घेऊन येण्याचा मानस आहे..
प्रतिसादाच्या प्रतीक्षेत..
लेखनवेडी अभिगंधशाली..

