मराठीत व्याकरण शिकवताना, बाबा या शब्दासाठी कितीतरी समानार्थी शब्द आहेत..
जन्मदाते, जनक, पिता, तात, तीर्थरूप, बाप, वडील..
शब्दकोश अर्थ
एखाद्याच्या संदर्भात त्याला जन्म देणारा पुरुष..
वडिलांना उद्देशून वापरायचा आदरार्थी बहुवचन किंवा आता एकवचन..
वयस्कर व्यक्ती आदरसूचक संबोधन..
साधूसंत इत्यादींसाठी आदरार्थी संबोधन..
जेंव्हा मला माझ्या बाबांविषयी कोणी विचारते, तेंव्हा ही यादी अगदीच थिटी वाटते..
माझ्या आजवरच्या प्रवासात बाबा हा फक्त संबोधन, तेही एक आणि एकाच व्यक्तीसाठी अनुभवलेला शब्द आहे..
ज्याला दुसऱ्या कोणत्याही, एका शब्दात व्यक्त करताच येणार नाही..
माझे बाबा म्हणजे कोण हे सांगणारा दुसरा शब्द व्यंकटेश एकनाथ पांडे, राहणार - अ ६ प्रबोधन गृहरचना सेक्टर २६ निगडी पुणे ४११०४४ (पत्ता हवा कारण एक नाव, मधले नाव आणि आडनाव समान असणाऱ्या अजून व्यक्ती असू शकतात असा एक अनुभव ऐकला आहे)
तर व्यंकटेश एकनाथ पांडे हाच पर्यायी शब्द..
एका शब्दात सांगावे असे, कुणाचेही बाबा नसतात..
माझे तर नव्हतेच..
माझ्यासाठी ते आरसा होते, मला त्यांच्यात मी सापडत जावे असे कितीदा अनुभवले..
मी त्यांच्यासारखी दिसते का..? यापेक्षा गुणांनी मी त्यांच्यासारखी आहे का, हे अधिक महत्त्वाचे वाटते..
तर हो, मी खूप त्यांच्यासारखी आहे..
ते कसे होते, हे सांगणारे हे चित्र मी तीन वर्षांपूर्वी बनवले होते..
उत्तम गुणांची यादी संपेल, पण त्यापलिकडे जाऊन बाबांचा नवीनच गुण अनुभवलेले अनेक भेटतील..
असे गुण माझ्यात यायला हवे, यासाठी मी खूप धडपड करत होते, असते आणि राहील..
एकच सल आहे की हे सारे त्यांनी वाचावे, त्यावर मस्त प्रतिसाद द्यावा, जवळ बोलावून डोक्यावर हात ठेवावा यासाठी ते शरीराने आज नाहीत..
पण.. पण.. पण..
माझ्या प्रत्येक छोट्या मोठ्या दुःख, आनंद, यश, अपयश काहीही असले तरी आशीर्वाद, कृपा बनून ते नेहमी असतील ही खात्री आहे..
चुकत असेल, तर काहीतरी संकेत नक्की देतील, आनंदात पाय जमिनीवर ठेण्यासाठी मदत करतील..
कारण बाबा माझ्यात अनेक प्रकारे रुजले आहेत..
प्रसंग, परिस्थिती यांच्या गरजेनुसार ते नित्य नव्याने मला, त्यांच्या जवळ असणाऱ्या आप्तजनांना आणि इतर अनेक, सर्वांना भेटत राहतील..
आता असे वाटेल की आज या लेखनाचा काय प्रपंच..
तर १६ फेब्रुवारी १९५० हा त्यांचा वाढदिवस..
१६ फेब्रुवारी २०२३ या दिवशी त्यांनी स्वतःहून ठरवले, की व्यंकटेश एकनाथ पांडे म्हणून हा जन्म यश अपयश, सुख दुःख, सामाजिक कर्तव्य-सेवा, प्रवास एक ना अनेक प्रकारे उत्तम अनुभवला आहे, आता थांबू या..
आणि पुढच्या काही दिवसात म्हणजे ४ मार्च २०२३ ला त्यांनी आम्हा सर्वांचा निरोप घेतला..
त्यांची ही स्वेच्छा समजायला आणि स्वीकारायला मला पुरी तीन वर्षे लागली..
आज बाबांची पंचाहत्तरी आहे,
त्याबद्दल काव्य पंक्तीत सांगते,
माझ्या बाबांची तुम्हाला सांगू काय गोष्ट..
येथवर येण्यासाठी त्यांनी केले किती कष्ट..
असो प्रश्न, समस्या, अडचणी कितीही..
यांचा चेहरा असणार, हसराच तरीही..
भरल्या गोकुळासम घर आमचे असते..
कोणत्याही गोष्टींची तिथे कमी नसते..
आम्हा नातलगांना जोडणारा, बाबा धागा घट्ट..
झालो मोठे कितीही, तरी पुरवतात आमचे हट्ट..
आईसोबत सांभाळतात, संसाराचा गाडा..
मिळत राहतो सर्वांनाच, नित्य नवा धडा..
आर्थिक गणिते सदा, अचूक त्यांनी सांभाळली..
समाजातही आदर, मान, प्रतिष्ठा कमावली..
साजरी करण्या आज, बाबांची पंच्याहत्तरी..
किती शोधल तरी, शब्दसुमने पडतात अपुरी..
बाबा,
तुमच्या साऱ्या इच्छांसाठी, परमेश्वर असो दक्ष..
लक्ष चौऱ्याऐंशी फेरे संपून, आता लाभो तुम्हा मोक्ष..
आता लाभो तुम्हा मोक्ष..!
शुभं भवतु.. !
खूप सुंदर !! कविता तर अप्रतिम !!!
ReplyDeleteमनापासून आभार,
DeleteMast
ReplyDelete🌹🫰🏻
ReplyDeleteकविता खूप भावपूर्ण... डोळ्यासमोर त्यांची आकृती उभी राहिली
ReplyDeleteअतिशय कमी शब्दातले मनापासून आवडले तुमचे बाबा व त्यांच्या आठवनी
ReplyDelete