Stress च्या नावाने... चांगभलं !
मी आणि माझे Stress buster
दुःख, ताण, अस्वस्थता, प्रश्न, समस्या.... वगैरे खरे म्हणजे दैनंदिन आयुष्याचा भाग आहे. सुखदुःख नेहमी हातात हात घालून असावीत तर खरी मजा.
पण माझ्यासारख्या मर्त्य मानवाला नेहमी फक्त सुख हवे असते... हा अनुभव.
(मी ही अपवाद नसेल याला कदाचित)
आनंदाचा डोंगर मिळाला तरी तो क्षणात संपतो आणि खसखशीच्या दाण्याएवढ्या दुःखाचा सागर बनतो... हा तर पक्का स्वानुभव... मग सुरु होतात अनेक प्रकारचे आजार. कधी शरीराचे तर कधी मनाचे.
आजार आले की त्यांच्यामागून येतात त्यांचे वैद्य...शरीराच्या आजारांसाठी उपाय लागतात तसेच मग ते मनाच्या आजारांसाठीही लागतात. शरीर काय आणि मन काय दोन्ही जटील गुंताच...
तरी शरीर काही आकार, उकरांनी, नियमांनी बांधलेले आहे... त्याची एक सर्वसाधारण रचना, प्रणाली आहे...
पण मन... म्हणले तर अगदी निरागस, गोंडस बाळ, नाहीतर आक्राळ विक्राळ बागुलबुवा... खूप हवसे किंवा त्याच्यापासून भितीने दडून बसावे असे... अशाला बरे करणे चेष्टा थोडी ना असणार... हे काम करणाऱ्या सर्वांना कोटी प्रणाम...
असे म्हणतात Prevention is Better than Cure... थोडक्यात आजारी पडून धावपळ करण्यापेक्षा आधीच काळजी घ्या...
मग त्या गोजिरवाण्या मन नावाच्या बाळाला आंजरायला, गोंजारायला नवनवीन गोष्टीही रोज नव्याने येत आहेत. ताण व्यवस्थापन... संबंधीत वेगवेगळी व्याख्यान, कार्यशाळा... लेख... व्हिडीओ... त्यात सुचवलेले उपाय नक्कीच स्वागतार्ह...
शिवाय समुपदेशन... कधी कळत नकळत, तर कधी मुद्दाम... ही आताच्या काळाची गरज बनले आहे.
यापलीकडे... नाही म्हणायला, आपल्यावर अपार माया असणाऱ्यांना, आपली ही तगमग, धडपड हमखास लक्षात येतेच, तेही अनेकदा आपल्या मदतीला धावतात... त्यांच्या पद्धतीने, क्षमतेने काही ना काही करतात... जवळ घेतात... थोपटतात... गप्पा रंगवतात... आपल्या आवडीच्या गोष्टी करतात... फिरायला नेतात...
पण.....
या सगळ्याला आपलीही तितकीच साथ लागते... आपण स्वतःहून हे स्वीकारले नाही तर... आपले ताण दूर करण्याचे, टाळण्याचे काम... दुसरा कोणी कसा करु शकेल...? ते वाट दाखवतील... कदाचित बोट धरतील... घट्ट हात धरतील.. पण त्यावरुन चालावे तर आपल्यालाच लागेल ना ...?
मदत घ्यावी काहीच हरकत नाही, पण गोष्टी इतक्या टोकाला जाण्यापूर्वीच सावध का होऊ नये...? स्वतःच स्वतःला का समजवता येऊ नये... स्व संवाद का करु नये...?
आपल्या या बाळाला आपणच गोंजारावे, समजवावे, मायेची फुंकर घालून एका बंदिस्त कोंदणात सजवावे.... अगदी प्लॅटिनमच्या (सध्याचा सगळ्यात महाग ना हो तो) अंगठीत हिरा सजवतात तसे....
कुणालाही न सांगता सहज सगळ्या चिंता, काळजी, प्रश्न, भिती, न्यून यातून बाहेर पडावे... हे यायला हवे, जमायला हवे... आणि जमते हा माझा अनुभव आहे.
फक्त हे आपोआप होत नाही, करावे लागते... अस्वस्थ असताना मी काय करते...?
त्यातून स्वतःला, कसे बाहेर काढते याचा विचार करते, तेंव्हा मला जे सापडले ना, ते इतके छान आहे.... की वाटले, हे माझ्यापुरते मर्यादित राहू नये... हे मी लिहावे... इतरांना सांगावे...
यातून कुणाला मदत झाली, तर मला खूप आनंद वाटेल...

No comments:
Post a Comment
suggestions most wlcome