Saturday, March 21, 2026

गुढीपाडवा

 

 गुढीपाडवा हा ना हा फक्त हिंदू सण

ना हे फक्त मराठी नववर्ष..

कारण, अगदी आज कलियुगातही सर्वांच्या सहकार्यासाठी सुशक्ती होऊन आपल्या आराध्य देवाचे दूत असणारे श्री हनुमान, हे आवाहन साऱ्या विश्वाला करीत आहेत..

माझ्या हृदयात वास करणाऱ्या, प्रभू श्रीरामांचा वनवास संपवून स्वगृही वापसीचा गुढी पाडवा विजयोत्सव आहे..

हनुमान सांगतात, त्रेतायुगी श्रीराम अवतरले कारण, ज्याचा संहार आवश्यक होता, तो शत्रू रावण, असूर असला तरी वीर होता..

त्याच्याकडे  हिमालयासारखी अफाट ताकद, सोबत स्वत्यागाची भक्ती नि भल्या भल्या पंडितांना मात देणारी युक्ती होती.. 

लहान मोठ्या दुष्शक्ती हरणासाठी, अनेक सद् विचार नि आचार असणार्‍या, शक्ती सदैव नि सर्वत्र असतात..

पण जेंव्हा आदिदेव शिवशंभूंचा परम प्रिय भक्त, महातपस्वी दशग्रंथी ब्राह्मण, फक्त मी असूर आहे, असा अविचार अग्रस्थानी ठेवतो..

तेच प्रमाण मानून उन्मत्त हो मिळालेल्या वरदानाचा वापर करत, वर्तनाच्या सर्व पायऱ्या सोडून उन्माद माजवतो..

त्यावेळी त्याला विवेक देत, त्याच्यात असणारा पवित्र आत्मा पुन्हा जागृत करण्यासाठी प्रभू श्रीराम अवतरतात..

अति प्रचंड ताकदवान, असूर रावण या शरीर रूपाचा वध, सोबत अनेक अविचारी वृत्तींचा संहार करण्यासाठी फक्त श्रीविष्णु अवतरून पुरणार कसे..?

मग ब्रह्मा नि महेश यांचे सहकार्य मिळून सुशक्तीचा गुणाकार, सुविचारांची बेरीज होते..

त्यांच्याशिवाय स्वर्गलोक कल्पनाही शक्य नाही, मग साऱ्या देवी, देवता, आपल्या शक्ती आणि सामर्थ्यानुसार पृथ्वीवर आल्या..

तेही तिघांच्या आज्ञेनुसार दिलेले रूप धारण करून वजाबाकी, भागाकार अशी कार्यपूर्ती करण्यासाठी..

कारण पुन्हा तेच, असूर धर्म पालन करणारा रावण महातपस्वी, कधी त्याला नीती सांगणारे किंवा मूक साथ देणारे सर्व शक्तिशाली होते..

नि या साऱ्या दुर्वर्तनाला सुवर्तनात परिवर्तित होण्याची आवशकता होती..

हे महामुनी रावणा, जन्माने तू असुर असला, तरी तुझा अंतिम प्रवास माझ्यात एकरूप होण्यासाठी व्हावा लागेल, हे समजावून सांगण्यासाठी श्रीराम अवतार होता..

असा शत्रूवरही प्रेम करत, त्याला साऱ्या वंशासह मोक्ष देणारा प्रभू श्रीराम आपल्या सोबत सदैव हवा, त्याचे रामराज्य हवे असेल तर साऱ्या सृष्टीने गुढी  पाडवा जल्लोषात साजरा करावा लागेल..

आपण स्वतः असमंजस कैकयी होत, नको त्या मंथरेच्या नादी लागून, रोज नव्याने प्रभू रामांना वनवास पाठवतो..

मग आपल्यातल्या त्या असुरी शक्ती नामोहरम करण्यासाठी, राम नामाचा जप नाही, तर महायज्ञ करावा लागेल..

शत्रू महातपस्वी असावा लागतो, पण भक्त कितीही सामान्य चालतो

प्रभू श्रीराम कोणत्याही भक्ताला दुःखात पाहूच शकत नाहीत, भक्ताच्या अज्ञानाने मिळालेला वनवास, हवा तेंव्हा संपवून ते विश्वकल्याणासाठी भक्त सदनी येतात..

फक्त त्यांच्या स्वागतासाठी श्रीराम जय राम जय जय राम अशा नामजपाची गुढी दारोदारी उभी करावी लागेल..

रामप्रभुंच्या स्वागतासाठी नामजपरुपी पताका घराघरावर फडकत्या राहाव्या लागतील..

नि मग सहज आठव येईल, की संत चोखामेळा यांनी शब्दबद्ध केलेल्या अभंगाची..

टाळी वाजवावी गुढी उभारावी । वाट हे चालावी पंढरीची ॥१॥

पंढरीची हाट कऊलांची पेठ । मिळाले चतुष्‍ट वारकरी ॥२॥

पताकांचे भार मिळाले अपार । होतो जयजयकार भीमातिरीं ॥३॥

हरिनाम गर्जतां भय नाहीं चित्ता । ऐसे बोले गीता भागवत ॥४॥

खट नट यावें शुद्ध होउनी जावें । दवंडी पिटी भावें चोखामेळा ॥५॥

याचे सविस्तर निरुपण करावे लागेल..

तोवरी प्रत्येकाने सामान्य भक्त होऊन श्रीरामांच्या स्वागताची अखंड नामजप गुढी नित्यासाठी उभी करावी अशी आग्रह वजा विनंती करते..

यासाठी प्रेरणा देण्याचे विचार देण्याची संत रामदासांना विनंती नि आशीर्वाद देण्याची भक्त हनुमंतास प्रार्थना करते..

तुमच्या माझ्यातले प्रभू श्रीराम जागृत करण्याची सदिच्छा निराकार शक्तीला करून अभंगाचे विवेचन करण्यासाठी पुरेसा अभ्यास, मनन, चिंतन नि विश्रांती घेण्यासाठी थांबते..

विचार आवडले तर अनेकांना सांगावे, त्यावर कृती करत ती प्रेरणा मला देण्यासाठी प्रतिसाद द्यावा..

काही निसटले, चुकले असेल तर सुधारण्यासाठी जरूर माझ्यापर्यंत पोहोचवावे..

गुढी या शब्दाचे बोट धरून स्वर्गाला अनुभवू पाहणारी..

लेखनवेडी..अभिगंधशाली..

No comments:

Post a Comment

suggestions most wlcome