Friday, May 22, 2026

रंगीत मिसळ

नमस्कार, विनंती विशेष.. 


म्हणल्याप्रमाणे घेऊन आले आहे.. 


विषय - कथा रंगबिरंगी मिसळीची


मिसळ या पदार्थाच्या विविध पद्धती, प्रकार याचे बाजारात जणू पेव फुटले..


त्यात एकदा बाळकोबा आईला म्हणाले, " आई चौकात एक नवीन हॉटेल सुरू झालं आहे. जिथे पंचरंगी मिसळ मिळते. चल ना, खायला जाऊ.."


बाळकोबाची खवय्येगिरी घरातच रुजली असल्याने, सारे घर मिसळीचा आस्वाद घ्यायला निघाले..


पाच रंगांच्या तर्रीच्या नेत्रसुखापलीकडे, कोणतीही मजा मिळाली नाही. त्यामुळे सारी मंडळी काहीशी नाराज झाली..


आईसाहेब विचारात पडल्या. नेत्र आनंदले, पण रसना अतृप्त राहिली यासाठी काहीतरी करायला हवे..


'उदरभरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म..!'


लहानपणापासून म्हणलेल्या या श्लोकाने, रुंजी घालायला सुरुवात केली..


नुसता रंग नाही, तर त्या रंगाला साजेशी चव चाखायला मिळाली पाहिजे, यासाठी तिची नजर स्वयंपाक घरातील फडताळावर फिरू लागली..


काचेच्या बरण्यांमधून खुणावणाऱ्या एकेक गोष्टी, त्यांच्या जागेवरून ओट्यापर्यंत पोहोचल्या..


डोळे चमकले, पदर खोचला गेला नि पंचरंगी मिसळ अवतरण्यास सुरुवात झाली..


पहिला रंग लाल, त्याकरता टोमॅटो ओबडधोबड चिरून वाटून घेतला. पुरेशा तेलात बेडगी मिरची पावडर, मिसळ मसाला आणि वाटलेला टोमॅटो याला छान फोडणी दिली, त्यास तेल सुटेपर्यंत शिजवून घेतले, नंतर पुरेसे पाणी टाकून भरपूर उकळ्या येईपर्यंत तापवून घेतले.  लालभडक चविष्ट तर्री रस्सा तयार झाला..!


मग केशरी रंगासाठी कांदा नि इंदोरी मसाला..!


पुदिना, कोथिंबीर, बिन तिखटाची मिरची यांनी सुरेख हिरवीगार तर्री बनली..!


चॉकलेटी रंगासाठी गोडा मसाला आणि जवसाची चटणी यांची मैफिल जमली..


चार रंगांचं गणित जमवताना जीव इतका थकला की पिवळ्या रंगासाठी शीत कपाटात कैरीच्या दिवसात बनवलेला पन्ह्याचा गर बाहेर निघाला..!


मग नेहमीप्रमाणे छान मोड आलेले कडधान्य निवडून शिजवून घेतले..


आज पोह्यांमध्ये हळदीला जाणीवपूर्वक  सुट्टी मिळाली..


उकडलेल्या बटाट्याची कोरडी भाजी बनली..


बघता बघता सारे पदार्थ केंद्रस्थानी ठेवत बाजूने कुटुंब गोलाकार बसले..

प्रत्येकाने या रंगबिरंगी मिसळीचे दृष्टी सुख घेत मनोमिलन केले, मग एकेका पदार्थाची चव चाखली..


क्या बात..!  एक नंबर मस्त..!


जमलंय..! खूप भारी..! अफलातून..! नादSS खुळा..!


कौतुकाची चढाओढ करत, कधी स्वतःसाठी तर कधी इतरांसाठी एकामागून एक बशा भरल्या गेल्या आणि बघता बघता रंगबिरंगी मिसळ फस्त झाली..

जशी बाळकोबांच्या घरी उदरभरण यज्ञात, ही सर्व गुणसंपन्न रंगबिरंगी मिसळीची आहुती सफळ संपूर्ण झाली, तशी तुम्हांकडेही होवो, हीच सदिच्छा..


कळावे,लोभ असावा.. !

No comments:

Post a Comment

suggestions most wlcome