मुलाखत कशी घ्यावी
साधना ट्रस्ट संचलित ग. प्र. प्रधान संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आयोजित तिसरी कार्यशाळा मुलाखत कशी घ्यावी..? याची आज २६ जून २०२६ शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजता प्रख्यात निवेदक आणि मुलाखतकार सुधीरजी गाडगीळ यांच्या अतिशय अभ्यासपूर्ण आणि रंजक सत्राने बहारदार सुरुवात झाली.
ज्याची प्रस्तावना-परिचय संस्थेचे संपादक विनोद शिरसाठ तर कार्यशाळेची भूमिका अध्यक्ष सुरेशजी गोरे यांनी अगदी थोड्या व नेमक्या शब्दात करून दिला.
सुधीरजींनी वयाच्या ७६ वर्षीही अतिशय उत्साहाने आपला विषय सर्वांपर्यंत पोहचवताना, आम्हा प्रशिक्षणार्थींना वेगळाच उत्साह दिला.
सत्राच्या पूर्वार्धात मुलाखतीच्या तांत्रिक गोष्टी मांडताना, त्यांनी आपल्या अनुभवांची अशी सांगड घातली की अवघड असणारे मुद्देही सोपे झाले.
यात सुरुवात अगदी माईक तपासून घेण्यापासून ते सहज संवाद, वक्त्याविषयी आवश्यक आणि खात्रीची माहिती मिळवणे, भाषेत नेमकेपणा तरी विनम्रता असे अनेक बाबी पुन्हा पुन्हा सांगून पक्क्या करून घेतल्या.
मुलाखत ही फक्त नियोजित न राहता, ऐकणाऱ्यालाही अनुभवता येण्यासाठी या विषयाची आवड, कुतूहल स्वतःमध्ये रुजवा. त्यासाठी चौफेर निरीक्षण, वाचन करत रहा. नियमित दैनंदिनी लिहा. छोट्या मोठ्या गोष्टी त्यात नोंदवा, ज्या पुढील मुलाखतींसाठी नवनवीन विषय, प्रश्न तुम्हाला देत राहतील.
मुलाखत घेताना समोरच्या व्यक्तीला बोलते करताना गरज स्वतःकडे कमीपणा घ्या, आपल्यातल्या त्रुटी दाखवा, ज्यामुळे हसतेखेळते वातावरण निर्माण होऊन व्यक्ती मोकळेपणाने बोलू लागते.
श्रोत्यांना विषय नीट समजण्यासाठी अलंकारिक, जड, क्लिष्ट भाषेऐवजी सहज सोपी, दैनंदिन पद्धतीने संवाद साधावा.
प्रश्न विचारताना अति उत्साह, अगतिकता टाळावी, समोरच्याचे ऐकण्यावर भर द्यावा. काही विषय पटले नाही, तरी त्यावर अनावश्यक विवाद न केलेला उत्तम.
ऐकणारे फक्त कानांचा नाही तर डोळे, विचार, अनुभव या साऱ्याचा उपयोग करतात. त्यामुळे आपले हावभाव, देहबोली, पेहराव याही बाबतीत सजग असावे.
प्रश्नांचे स्वरूप नेमके, थेट आणि थोडक्यात असावे. वक्ता जेष्ठ श्रेष्ठ असला तरी त्याचा ताण वा दडपण घेऊ नये.
उगाच वेगळा आवाज, कोणाची नक्कल करण्यापेक्षा रोजच्या वापरातील सहज भाषा असावी.
असे एक ना अनेक तांत्रिक गोष्टी सांगताना सुधीर काकांनी दोन जणांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन दाखवल्या.
काका हे संबोधन सत्रामधील मोकळीक आणि भोजन यावेळी अनुभवलेल्या मोकळ्या चर्चेमधून आले.
काका अब्दुल कलाम, अमिताभ बच्चन, आशा भोसले अशा नामवंत मंडळींच्या एक ना अनेकदा मुलाखती घेऊनही आम्हा प्रशिक्षणार्थींमध्ये येऊन बसले.
समजते आहे का...? कंटाळा तर येत नाही ना..? असे पुन्हा पुन्हा विचारत होते. कोण काय करते तिथे या कार्यशाळेचा कसा उपयोग करू शकता हेही आवर्जून सांगितले. प्रत्येकाच्या शंकांना समाधान होईपर्यत उत्तरे देत होते.
सोबतच त्यांच्या आवडी निवडी, कौटुंबिक आठवणी यावरही गप्पा अशा रंगल्या की आयोजकांना सत्राची वेळ झाली याची आठवण करून द्यावी लागली. या साऱ्यातून कितीही प्रसिद्धी मिळाली, तरी पाय जमिनीवर कसे असतात हा अनुभव अधिक सुज्ञ करणारा ठरला.
कोणत्याही पूर्व तयारी शिवाय त्यांनी घेतलेल्या अपरिचित प्रशिक्षणार्थींच्या मुलाखतींचा अनुभव हा कायमस्वरूपी लक्षात राहणारा आणि आधी ऐकलेल्या सर्व बाबी कृतीतून कशा लवकर समजतात हे लक्षात आले.
त्यावेळी साधलेले निखळ विनोद, काय कसे सांभाळायचे, काय टाळायचे, कधी थेट तर कधी फिरवून प्रश्न विचारायचे याचे खरेखुरे प्रशिक्षण मिळाले.
सत्राच्या अधून मधून आलेल्या शंका, प्रश्न यांची उत्तरे प्रत्यक्ष कृती, घडलेल्या घटनांचे दाखले यातून दिली.
यातून एक शिक्षक म्हणून भाषा हाही फक्त पुस्तकातून नव्हे तर स्वानुभवातून शिकण्याचा विषय आहे, हे अधिक ठळकपणे जाणवले. आपणही आपल्या विद्यार्थ्यांना असे अनुभव दिले पाहिजेत यासाठी प्रेरणा मिळाली.
मुलाखत विषयात पन्नास वर्षाहून अधिक अनुभव असलेल्या प्रख्यात मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांचे साधारण अडीच तीन तासाचे हे पाहिले पुष्प खूप काही नव्याने सांगत, शिकवत अर्धविरामास आले.
यातून अनुभवलेल्या, समजलेल्या बाबी ज्या वेळेला प्रत्यक्ष कामात उपयोगात आणेन, त्याचवेळी त्यास पूर्णविराम देईन, हे जबाबदारीने नोंदवते आणि या कार्यशाळेत सहभागी डोळ्याची संधी लागली त्याचा मनापासून आनंद व्यक्त करते.
मला समजलेल्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहचवण्यासाठी हा लेखनप्रपंच.
आपला प्रतिसाद, सूचना, शंका याच पुढील लेखनाची प्रेरणा असतात, त्यामुळे त्याच्या प्रतिक्षेत..

No comments:
Post a Comment
suggestions most wlcome