मला पाणी व्हायचे आहे..
पाणी..जल..तोय..नीर.. उदक, जीवन, सलिल, अंबू, पय.. , सारे आयाम अनुभवायचे आहे..
पाणी बनून वाहत रहायचे, प्रवाह नेईल तिथे..
पंचतत्त्वात सर्वात जास्त सुखावणारे तत्त्व आहे..पाणी..!
म्हणून त्यास वाहून नेणाऱ्या सार्या नद्या माता आहेत..
त्या खळाळत जातात, तिथे प्रदेश फुलवतात, तहान भागवतात, रत्न उधळतात, मोक्ष देतात..
कधी नाले, गटार यांना आपलं म्हणातात, मग प्रदूषित होतात, अभिशाप भोगतात.. आटतात.. लुप्त होतात..!
तर कधी झरे, धबधबे, ओहळ यांच्या हाकेला साद देतात, नि गाठू शकतात खूप लांबचा पल्ला..
सागराला जाऊन मिळण्याचा..
त्याच्यात सामावून विलीन होतात..
पुन्हा नव्याने जन्म घेण्यास, वाफ बनून आकाश गाठतात..
मेघ बनून वाऱ्यासह प्रवास करतात..
जलधारा बनून पुन्हा बरसतात..
पुन्हा नदी बनण्याचा खेळ खेळतात..
हे अखंडीत चक्र निसर्ग जगवते, फुलवते..
म्हणून मला पाणी व्हायचे..
पाणी सप्त नद्यांचे..पण रौद्ररुप नको..!
त्यात सारे संपते, हे ज्ञात आहे..
पाणी सप्त सागराचे.. पण अतिक्षार नको..!
ते पिण्यास अयोग्य, ज्यास पर्याय नाही..
पाणी पर्जन्याचे, पण अवकाळी नको..!
त्यात वाताहात होते..
हवे विश्वकल्याण..
ज्ञानेश्वरांचे पसायदान, कबीरांचे दोहे, विनोबांची गीताई, तुकोबांचे पुष्पक..
पासून
ते सावरकरांचे जयोस्तुते, विवेकानंदाचे विचार, बाबा आमटेंची जनसेवा, अटलजींच्या कविता, कलामांचे अग्निपंख असे खूप काही गायन करणारे..
नीर व्हायचे आहे..!
हो मला उदक व्हायचे आहे..!
प्रवास माझा आहे, जमेल तशी तुमची सोबत आणि शुभेच्छा हव्या आहेत..
द्याल ना..!
No comments:
Post a Comment
suggestions most wlcome