Sunday, April 19, 2026

अक्षय तृतीया

 

मी वर्गात फळ्यावर काहीतरी लिहून देत होते, तेवढ्यात एका विद्यार्थ्याचा बाळबोध प्रश्न आला, "परवा अक्षय तृतीया आहे, असे आजी सांगत होती, काय असते अक्षय तृतीया..?"

 

आता आली का पंचाईत ?


आजच्या अभ्यासाच्या नियोजनात हा प्रश्न येणार, त्याचे उत्तर काय द्यायचे.. हे लिहिलं कुठे आहे..?


पण शिक्षण हे फक्त पुस्तक आणि नियोजनापुरते मर्यादीत राहिले, तर त्यासाठी शाळा आणि शिक्षकांची गरज आता फारशी राहिले नाही..


स्वतःच पुस्तके वाचून घरच्या घरी शिक्षित होण्यासाठी विद्यार्थी आणि  पालक दोघांकडे आंतरजालाची अनेक पर्याय उपलब्ध आहे.


आपले विद्यार्थी फक्त साक्षर नाही तर सुशिक्षित व्हायला हवे आणि त्यासाठी असे प्रश्न मुलांनी विचारायला हवेत.


नि आपण शिक्षक म्हणून त्याची समर्पक उत्तरे द्यायला हवी, हेच तर आपल्याला आई बाबा, आपली शाळा आणि गेल्या १६ वर्षांच्या अनुभवाने समजावले ना..!


आतून आलेल्या आवाजाने क्षणात साद दिली.


अक्षय तृतीया म्हणजे काय, हे मुलांना नेमके सांगण्यासाठी परिपूर्ण  माहिती हवी, मुलांना म्हणले, "मी शोधते,  तोपर्यंत तुम्ही फळ्यावर दिलेले लिहून घेता का..?" 


मुले लिहू लागली,..


वर्गात स्मार्ट बोर्ड होता, गुगल मय्याला विनवणी केली.


माहितीचा समुद्र समोर आला..

अक्षय्य तृतीया हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ आणि पवित्र सण आहे, जो वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो. 


'अक्षय' म्हणजे ज्याचा कधीही 'क्षय' (ऱ्हास) होत नाही असा, म्हणून या दिवशी केलेले शुभ कार्य, पूजा, दान आणि खरेदी अक्षय फळ देते.


हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त असल्याने, नवीन व्यवसाय, गृहप्रवेश, लग्न किंवा कोणताही मोठा निर्णय घेण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो.


या दिवशी सोने, चांदी, मौल्यवान वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते, ज्यामुळे घरात धन आणि समृद्धी येते.


भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी अन्न, वस्त्र किंवा अन्य वस्तूंचे दान करणे अक्षय पुण्य देते, अशी मान्यता आहे..


पौराणिक आधार याच दिवशी त्रेतायुगाची सुरुवात झाली असे मानले जाते. तसेच, भगवान परशुराम यांचा जन्मदिवस आणि श्रीकृष्णाने पांडवांना 'अक्षयपात्र' दिले होते, अशी मान्यता आहे.


धार्मिक विधीत, अनेक ठिकाणी चैत्रगौरीचे विसर्जन आणि सुवासिनींना कैरीची डाळ, पन्हे देऊन हळदीकुंकू साजरे करतात. 


हा दिवस नवीन सुरुवात करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जेसाठी विशेष मानला जातो. 


यातल्या शेवटच्या वाक्याने मन जिंकले, हे मुलांना सार्थ सांगू या..


की कोणत्याही नवीन गोष्टीची, कामाची सुरुवात करण्यासाठी हा दिवस उत्तम मानला जातो.


एक मन म्हणले, खरे तर चांगल्या गोष्टीसाठी मुहूर्त लागत नाही, फक्त इच्छा लागते.


लगेच दुसऱ्याने त्याला ऐकवले,  अनेकदा मानवातील षड्रिफू ती इच्छा होऊ दे नाहीत, म्हणूनच आपल्या ज्ञानी पूर्वजांनी अशा दिवसांची व्यवस्था करून ठेवली..


मग मी सविस्तर दिन विशेष माहिती थोडक्यात सांगितली आणि मुलांचे सारे लक्ष त्या वाक्यावर आणले, की..


"आपल्याला काहीतरी नवीन सुरू करायचे आहे, काय बरं कराल..?"


प्रत्येकाच्या मनात दडलेल्या अनेक इच्छा, आकांक्षा, स्वप्न पटापट व्यक्त होऊ लागली..


"खूप मस्त, यातले प्रत्येकाने त्याला जे आवडते, शक्य आहे, ते नक्की सुरू करा, लक्षात राहण्यासाठी कुठेतरी लिहून ठेवा..आईबाबा , मित्र कोणाला तरी, आठवण करण्यासाठी सांगून ठेवा..


पण हे झाले वैयक्तिक, आपला वर्ग आणि हा प्रश्न माझ्या तासाला विचारला म्हणून मराठी भाषा विषयाशी संबंधित काही नवीन सुरू करूया का?"


कोणताही प्रश्न विचारा, मुलांना त्यावर सुचत नाही, असे कधीच होत नाही, कारण विवेकानंद म्हणतात तसे..


मुले अजिबात मातीचा गोळा नाहीत, ती परमेश्वरीय शक्तीने बनवलेली एक रेखीव, अति सुंदर, स्वयंभू कलाकृती आहे, जिला तिच्या कलागुणांनी प्रकट होण्यासाठी वातावरण निर्माण करायचे असते..


त्यामुळे मराठी भाषा वाढवायला काय नवीन करायचे, याची भली मोठी यादी तयार झाली, त्यातले नेमके निवडणे गरजेचे होते..


मुले सांगत असताना एकेक गोष्ट फळ्यावर नोंदवत होते..


"तुम्ही सुचवलेल्या सगळ्या गोष्टी छान आहेत, पण शाळेचा वेळ, अभ्यास बघता, इतकं सगळं एकदम शक्य नाही, आपण यापैकी नक्की जमेल, असे मिळून ठरवू या.."


इयत्ता तिसरीच्या मुलांचे वय, त्यांना उपलब्ध होणारा वेळ, त्यांनी सुचलेल्या गोष्टींची गरज, अशी वेगवेगळी कात्री लागता, अनेक गोष्टी रद्द होत गेल्या..


आणि सर्वांच्या मताने, रोज मराठीमध्ये नवीन (अवांतर) एक पान वाचन करायचे ठरले..


याचे पुढच्या अक्षय तृतीयेपूर्वी मूल्यमापन करायचे, तर कसे करणार, शिक्षक म्हणून शंका डोकावली, तिचे निरसन होण्यासाठी लगेच पर्याय सुचला.


मराठीच्या वहीत शेवटच्या दोन-तीन पानांचा वापर करून, जे वाचले त्यातून एक खूप आवडलेला शब्द लिहायचा, आणि त्या सोबतच कोणते शब्द नाही समजले, तेही लिहायचे, ज्यांचे अर्थ न विसरता मला विचारायचे..


असा शब्द संपत्ती वाढविणारा, अक्षय कलश प्रत्येकाने आपला आपण मिळवायचा असे मुलांनी ठरवले..


मुलांना काम देऊन, स्वतः आराम करणारा शिक्षक, ना नव्याने वाढतो, ना घडतो.. असे मला चालणार नाही..


त्यासाठी आजच्या घटनेतून बोध घेत, यापुढे नित्य अभ्यासक्रमासोबत  तारीख, वार, तिथी याचे अंदाज घ्यायचे..


आपली समृद्ध, विचार आचरणाचे अधिष्ठान असणारी संस्कृती, पुढच्या पिढीला माहीत व्हावी, तिची कालसुसंगत जोड मुलांना सांगता येईल, यासाठी नित्य नियमाने वाचन, लेखन करायचे, हे मनोमन ठरवले..


तीच कास धरत आजचे लेखन पुष्प गुंफले.. योग्य शब्दात सजले का? वाचणाऱ्यांना रुचले का ?


सांगायला विसरू नका..


तुमचा प्रतिसाद, सूचना, बदल सर्वांचे स्वागत, आणि तीच खरी प्रेरणा..


लेखन वाचनाचा हा आपला प्रवास असाच अखंडित राहो याच, अक्षय  तृतीयेच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!

No comments:

Post a Comment

suggestions most wlcome