कार्यशाळा - ताण नव्हे
प्रेरणा
सिटी प्राईड शाळा, निगडी
येथे मंगळवार दि.२४ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते ३
या वेळेत तिन्ही शाखांच्या मराठी शिक्षकांची शब्दांच्या अलिकडले ही खास मराठी
भाषेसाठी आखलेली कार्यशाळा अतिशय गमती जमती, मजा करत,
उत्साहाने संपन्न झाली. विशेष उल्लेखनीय आणि कौतुकाची गोष्ट म्हणजे
संस्कृत व हिंदी विषयाच्या काही शिक्षिका यात स्वत:हून सहभागी झाल्या होत्या..
सुरुवात प्रस्तावना परिचय, विषयाला साजेशी वंदना गायनाने झाली. भाषेची गंमत, खेळातून शिक्षण, मुलांमध्ये लावलेली स्पर्धा, चुरस याचे अनुभव शिक्षकांनी स्वत: कृती करत घेतले..
म्हणी, कविता, शब्द कोडी ही
शिकवण्याचे नाही तर स्वत:हून, वेगवेगळ्या गोष्टी करत
शिकण्याचे भाषा प्रकार आहेत याची विशेष जाणीव झाली..
नित्य अध्यापनात अभ्यासक्रम हा मुलांसाठी शैक्षणिक जेवण
असेल, तर हे भाषिक खेळ हे गोड पक्वान्न आहे, ज्यामुळे
जेवणाची लज्जत वाढते, तृप्तता मिळते व उत्तम पोषण होते,
हा विचार सर्वाधिक आवडला..
असे खेळ घ्या, या कृती
करा, या गोष्टी अधिक उपयुक्त होतील, असे
नुसते शब्दात व गोष्टीत न सुचवता, चला आपण हे खेळून बघूया का,
असे म्हणत आम्हा शिक्षकांना खेळ खेळण्यास प्रवृत्त केले..
खेळ म्हटल्यावर शिक्षकांच्या आत लपलेला विद्यार्थी तितकाच
दंगा, गडबड करणारा असूनही कार्यशाळेतील तासिका कोठेही कंटाळवाण्या
झाल्या नाहीत, उलट पाच तास कसे संपले, समजलेच
नाही..
कोणत्याही भाषेची इमारत ही श्रवण, संभाषण,
वाचन, लेखन या चार कौशल्यांचा भक्कम पाया असेल
तरच बांधता येते, हे सोदाहरण सांगताना, ही कौशल्ये कधी, कशी, कुठे,
केंव्हा वापरता येतील हे छान लक्षात आले..
भाषेचा सतत वापर ही आणि हीच कृती, तिला
सर्वमान्य बनवू शकते, बाकी सरकार, धोरणे,
सक्ती याची वाट बघत बसण्याने, काहीच होणार
नाही, याचीही जाणीव तीव्रतेने झाली..
एकूणच काय, तर भावी पिढीला घडविणारे शिक्षक ही भूमिका मार्गदर्शकाची असली पाहिजे, ज्याला मुलांसोबत मूल होऊन विचार करता येतील, आधुनिक साधने - माध्यमे यांचा वापर करता येतील, वेळोवेळी स्वत: नवे शिकण्याची, बदलण्याची तयारी असेल अशा आधीही माहित असलेल्या गोष्टी खेळातून, मजा करत पुन्हा एकदा अधोरेखित झाल्या..
यासाठी कार्यशाळेच्या दोन्ही मार्गदर्शिका विद्या वाचस्पती
मृणाल धोंगडे आणि गौरी ब्रह्मे यांनी भरपूर मेहनत घेतली, त्यांचे
विषय ज्ञान, अभ्यास, पूर्वतयारी,
नावीन्य, अवांतर माहिती इ. गोष्टींनी साऱ्या
शिक्षकांना पाच तास अगदी संमोहित केले होते..
असे खेळीमेळीचे, नकळत कानपिचक्या देत, डोळ्यांवरील झापड दूर करणारे, स्वत:च्या कृतीतून प्रेरित करणारे, आमच्यातल्या सुप्त गुणांना जागे करणारे तज्ञ मार्गदर्शन वेळोवेळी मिळायला हवे आणि सर्वांच्या एकत्रित प्रयत्नात आपणच आपली भाषा, संस्कृती यांना जपायला, वाढवायला, फुलवायला हवे असे एकमताने ठरत कार्यशाळेची सांगता झाली..
अधिक भावलेल्या गोष्टी
- गट
तयार करण्यासाठी 🍬 चा वापर..
😍😋
- गटाचे
नाव ठरवताना त्या शब्दाचा अर्थ, भाव याचा
आपोआप झालेला भाषा अभ्यास..
- भाषिक
खेळांची यादी देण्यापेक्षा ती प्रत्यक्ष कृतीत राबवली, कारण शिक्षक म्हणून यादी तयार असते, पुस्तके,
आंतरजाल यावर ढीगभर सापडते, पण कमी पडते
ते उपयोजन पद्धत किंवा प्रेरणा. स्वतः केल्यामुळे
ती प्रेरणा आपोआप जागृत झाली..
- LSRW
( श्रवण, संभाषण, वाचन
आणि लेखन) या कोणत्याही भाषेच्या पायऱ्या असतात हेच इतके दिवस माहित होते पण
त्यांचा एकत्रित वापर कसा अधिक उपयुक्त आणि आनंदी होऊ शकतो हे नव्याने समजले,
उदाहरणार्थ अक्षर ओळख नसताना ही श्रवण + वाचन याचा एकत्रित
वापर - शिक्षिका पुस्तकातील पाठ, शब्द वाचतील
विद्यार्थी पुस्तकातील त्या शब्दांवर बोट फिरवत ऐकलेले पुन्हा ताला, सुरात म्हणतील, यातून विद्यार्थ्यांना नकळत
अक्षर, शब्द यांची दृश्य ओळख होत जाईल आणि लेखनासाठी
आवश्यक पहिली पायरी आपोआप चढली जाईल, म्हणूनच कदाचित
महाराष्ट्र शासनाने इंग्रजी माध्यमासाठी पुस्तक बनवताना इयत्ता तिसरी पर्यंत
लेखन नको हे जाणीवपूर्वक आखलेले बघायला मिळते..
- प्रभुत्व, अर्थार्जन दोन्ही जर्मन भाषा असूनही गौरीताईचे मातृभाषा प्रेम,
तळमळ, धडपड..
- आयआयटी, डॉक्टर अशा जीवघेण्या स्पर्धेत स्वतः हरवून बसण्यापेक्षा इयत्ता
आठवीत भाषांतर करणार असा संकल्प करून आज वीस वर्षाचा दांडगा अनुभव पाठीशी
मिरवत अनेकांना भाषेच्या माध्यमातून व्यवसाय मिळवून देणारी विद्या वाचस्पती
मृणालताईची नम्रता, विषय अभ्यास, कल्पकता,
सर्जनशीलता..
- कार्यशाळेची
अतिशय रोचक आणि मनोरंजक पण तरीही विषयाला चिकटून असणारी मांडणी..
- व्याख्यान
पद्धतीला दिलेली १००% विश्रांती, प्रयत्नपूर्वक
टाळलेला एकतर्फी संवाद, भाषण पद्धती इ. प्रकारच्या
प्रशिक्षणाचा साचलेपणा..
मूक मनाच्या कारागिरी, धुमसत
जी चिनगारी,
आग होऊन कोसळू द्या, ती
उद्धत अंधारी
त्या भस्मातून बहरून येईल, हिरवा
स्वर्ग उद्या
तुमच्या शुभकर सामर्थ्याची, आज
प्रचिती द्या
या गीतातील भावार्थ प्रमाणे आज लाभलेली ठिणगी, रोज
काहीतरी पेटत राहील, सुचत राहील, त्या ज्वाला,
भावी पिढीचा कामेश्ठी यज्ञ मांडतील, नवे विचार,
कल्पना, उपक्रमांची आहुती स्वीकारत पायसदान
तयार करतील, ज्यातून पुन्हा राम, लक्ष्मण,
भरत, शत्रुघ्न जन्म घेतील आणि या भरत भूमीचे
नंदनवन करतील असे दिवास्वप्न उरी निर्माण झाले..
अजूनही खूप काही सुचत राहील, सापडतच
राहील..
त्यासाठी असेच प्रफुल्लित करणारे उपक्रम वारंवार करण्यास
मिळावे ही स्वार्थ वजा विनंती..






झक्कास..
ReplyDeleteकुठेतरी आपण अशा कार्यशाळेला उपक्रमांना मुकतोय ही खंत जाणवून गेली..🙂↕️..कित्येकदा अनेक चांगल्या विषयांच्या कार्यशाळा आयोजित आणि attend केल्याही जातात पण पुढे practical करण्याची संधी मिळत नाही किंवा अनेकदा बंधन असतात..पण जे तू शिकली आहेस ते तुला मुलांसोबत खेळता यावं/ राबवता यावं यासाठी अनेक शुभेच्छा
मृणाल आणि गौरीचे खरचं कौतुक..
जेव्हा कधी भेटशील तेव्हा हे नवीन खेळ कार्यशाळेचे अनुभव प्रत्यक्ष ऐकायला नक्की आवडेल.🥰👍
नक्की
Deleteमृणाल ताई आपली माजी विद्यार्थिनी आहे.
बोलवा की तिला शाळेत..
खूप छान...अभ्यासपूर्ण आणि अनुभव संपन्न
ReplyDeleteअगदीच
ReplyDelete