Tuesday, October 01, 2024

कहानीघर


बाल गोष्टींचे नाटक

यात काय नवीन..?

सगळ्याच तर नाटकांना गोष्ट असते की, तर हो अगदी बरोबर..

पण ती गोष्ट नाटकाच्या संहितेमध्ये बदलते, कधी पात्र आधीपासून असतात, तर कधी नंतर ठरतात, त्यांचे संवाद, इतर बारकावे याचे अगदी सविस्तर ठरते..

हा जो एक वेगळाच अनुभव मी घेतला, त्यात सगळ्यात महत्त्वाचे गोष्ट ही काही ओळींची असते..

ती बाल किंवा कुमार साहित्यातून निवडलेली असते..

ती मराठी, हिंदी भाषेतून सादर होते, पण काही वेळा ती मूळ इतर वेगळ्या भाषेची पण असते.. (भाषांतरीत)

सादर होताना त्यात फारसे बदल केले जात नाहीत..

वाचन, अभिवाचन याची कास धरत, त्याला सादरीकरणाची जोड देत, ती हळूहळू आपल्या समोर उलगडत जाते..

त्यातली गंमत म्हणजे, बघताना आपल्याला मधेच वाटते की आपण गोष्टीचे वाचन बघत आहोत, तर मधेच वाटते गोष्ट घडताना बघत आहोत..

हळूहळू आपण त्या गोष्टीच्या काळात, त्या जागांवर आहोत असा आभास होतो..

मग त्या पात्रांमधले एक होऊन जातो आणि ती गोष्ट नकळत आपल्या आत आत झिरपत जाते..

आणि हाच तर ती गोष्ट लिहिण्याचा उद्देश असतो ना..? 

किमान, मी गोष्टी लिहिते तेंव्हा, मला तरी हे असेच व्हावे असे वाटते..

आधी सांगितल्याप्रमाणे, या सगळ्या बाल गोष्टी आहेत, त्यामुळे प्राधान्याने प्रेक्षक हे बालगोपाळ आहेत..

शिक्षण क्षेत्रात काम करत असताना, जी काही थोडाफार अनुभवांची पुंजी साठली आहे, त्यानुसार मला ही बच्चे कंपनी हे सगळ्यात मोठे आव्हान वाटते..

त्यांना कधी, काय आवडेल, काय हवे असेल, कोण आपलेसे वाटेल हे अजिबात सांगता येत नाही..

जे आवडत नाही त्याला विरोध करण्याची कमालीची ताकद त्यांच्यात असते, वर्गातून उठून निघून जाणे, मोठ्याने ओरडणे, आई बाबांच्या नावाने जोराने रडू लागणे एक ना हजार उपाय यांच्या खिशात असतात..

यासाठी बिरबल अकबराची ऊसाची, बालहट्ट ही गोष्ट आजही प्रमाण मानली जातेच की..

तर सांगायचा मुद्दा, या प्रेक्षक वर्गाला जर हे गोष्टीचे नाटक आवडले, तर ते सगळ्यांना 
आवडणार हे शंभरावर अजून दहा टक्के..

हेच बालवाटिका चमूने हे गोष्टीचे नाटक बघतना खळखळून हसत, कधी टाळ्या वाजवत तर, कधी नाटकाच्या मधे मधे असणाऱ्या गाण्यावर मनसोक्त नाचत, तर गंभीर, भयावह, दुःख असणाऱ्या प्रसंगात पूर्णतः शांत बसून तेही सक्तीने नाही तर स्वतःहून, अगदी मोठ्या माणसासारखी दाद देताना मी अनुभवले..

या नाटकांच्या यशाची, यापेक्षा अजून वेगळी पावती असूच शकत नाही..

मग राहून राहून एकच वाटते की ज्यांच्या सादरीकरणाला मोठा रंगमंच, साहित्य, वेशभूषा, ध्वनी यंत्रणा इ, फार काही लागत नाही, त्यांना जागोजागी सादर होण्याची संधी नक्की मिळायला हव्या..

अशा या गोष्टीचे नाटक बघण्याचा हा माझा सहावा अनुभव होता, प्रत्येक वेळी गोष्टी वेगळ्या आणि कलाकार मंडळी वेगळी असली तरी, ती कोणत्या ना कोणत्या समान धाग्यात गुंफलेल्या मोत्यांची एक सुंदर माळ आहे..

जिचा मुख्य उद्देश एकच आहे की लहान मुलांसाठी, त्यांना त्यांचे वाटेल, त्यांच्या भाव विश्वाशी जोडता येईल असे नाटक सादर करायचे..

शिवाय निखळ मनोरंजन करणे, गोष्टीतला सूचक संदेश देणे, उद्याचा जाणता प्रेक्षक वर्ग तयार करणे, कोणीतरी  यातून प्रेरित होऊन हा वारसा पुढे नेणारा कलाकार मिळणे हे नकळत सफल होणारे उद्देश ही त्यासोबत असणार..

पुन्हा तेच, या मंडळींना सादर व्हायला १० बाय २० जागा उपलब्ध व्हावी, म्हणून हा लेखप्रपंच..

अधून मधून येणाऱ्या छाया चित्रात दिसणाऱ्या नाटकाविषयी लिहिलेच नाही, असे वाटेल तर, ते मुद्दाम टाळले आहे..

कारण ते समजले तर त्या गोष्टीचे नाटक बघायला मजा कशी येणार..?

पण तरी थोडी उत्सुकता नक्की ताणून ठेवते..

गोष्टीचे नाव - लांडग्यांना दुष्ट का म्हणतात..

निर्मिती - कहानी घर आणि नाटक दहा बाय वीस

दिग्दर्शक : महेश खंदारे.

सादरकर्ते -  कृतार्थ 9823974400 
                 निखिल 77099 79197

थोडक्यात नाटकाबद्दल, 

ही अशी दंतकथा आहे, की जिचे मूळ पात्र तर माणूसच आहे, पण नाटकात आपल्याला दिसतात ती वेगवेगळ्या प्राण्यांची पात्रे..

ही पात्रे दाखवताना निखिल दादा, कृतार्थ दादा आणि पडद्यामागील साऱ्यांची जी खरी कमाल केली आहे ना, ती वाचण्यात नाही तर प्रत्यक्ष अनुभवण्यात आहे..

अगदी थोड्या साहित्यात, अफलातून होत जाणारे सादरीकरण, आपल्या डोळ्यांच्या पापण्यांना सुद्धा थांबवून ठेवते, न जाणो पापणी लवली तर काहीतरी निसटून जायचे..

असे एक निमिष बघत राहण्याची गंमत काही और आहे..

लांडगे दुष्ट आहेत का..? आहेत तर कसे.. ?हे मी सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः बघून ठरवा..

त्यासाठी दोन्ही कलाकार मंडळींचा संपर्क क्रमांक दिला आहेच..

या सगळ्या लिखाणात, कोणाच्याही नाटकाची जाहिरात करणे, हा माझा हेतू अजिबात नाही..

खेदाने सांगायचे तर, फार थोडी मंडळी माझ्या बालगोपालांसाठी धडपडता..

आणि म्हणूनच त्यांच्या कामात माझा इवलुसा खारीचा वाटा..

तुम्ही नाटक बघून झाल्यावर, मग त्यावर मनोसोक्त गप्पा मारायला, वादविवाद करायला मला नक्की आवडेल..

तुमचा प्रतिसाद, प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत..

तुमची अभिगंधशाली..








 

No comments:

Post a Comment

suggestions most wlcome