Tuesday, February 25, 2025

शिवस्तुती

 

आज महाशिवरात्र, आजची लेखनसेवा शिवशंभू चरणी..

त्यासाठी थोडे वाचन, अभ्यास करायला सुरुवात केली..


क्षणभरात जाणीव झाली, चराचर मान्य केलेले त्रिदेव.. ब्रह्मा, विष्णू, महेश..


त्यातील जो संहारक, लय तत्वाचा स्वामी, हलाहल पचविण्याची क्षमता, तांडव करत सकारात्मक व्यक्त होण्याची पद्धती.. 


असे अनंत प्रकारे गुणगान..


शिवरुपाची एक बाजू संहारक, रुद्र, जी साऱ्याचा नाश करू शकते..


नि दुसरी बाजू अत्यंत साधी, भोळी, दश दिशांचे वस्त्र पांघरलेले, खूप शांत, सर्व चुकांना क्षमा करणारी, मनापासून केलेल्या भक्तीने सहज प्रसन्न होऊन वरदान देणारी..


म्हणूनच कदाचित सगळे असूर या शिव शंकराची आराधना करत असे पुराण पुरावे सांगतात..


प्रत्येक समस्या, संकट याची उत्तर, उपाय हे देखील अनेकदा भगवान शिवाकडे असत..


इतके अवघड आणि गहन लेखन करण्यात आपण अगदी अपुरे आहोत..


मग आता..


संदर्भ शोधताना, भगवान शिवाची अनेक स्तोत्र, स्तुती, आख्यायिका, कथा वाचनात आल्या..


आणि अचानक आठवण झाली, शाळेत प्राथमिक गटात असताना, नित्य नियमाने करत असणाऱ्या उपासनेची..


चिदानंद रूप: शिव ssमी.. शिव ssमी 

चिदानंद रूप: शिवोहम.. शिवोहम


त्यावेळी ही उपासना का करतो, याचा अर्थ काय हे विचारावे इतकी परिपक्वता नव्हती आणि धाडस देखील नव्हते..


आपल्यापेक्षा वयाने, अनुभवाने जेष्ठ सांगतात मग ते ऐकायचे इतके गणित साधे, सोपे होते..


आज लेखनासाठी शोध घेतला, तेंव्हा समजले, याविषयी खूप छान गोष्टीरूप आणि सखोल माहिती मिळाली..


आद्य शंकराचार्य हे आपल्या गुरूंना पहिल्यांदा भेटले, तेंव्हा त्यांच्या गुरूंनी, तू कोण आहेस असा प्रश्न विचारला..


त्याला उत्तर म्हणून बाल शंकराचार्य यांनी निर्वाण षटकम् रचिले, त्यामधील प्रत्येक पदाची शेवटची ओळ आहे, 


चिदानन्द रूप: शिवोऽहम् शिवोऽहम्


ज्याचा अर्थ आहे..


 मी चैतन्य स्वरूप आहे, आनंद रुप आहे..


या निर्वाण षटकम् काय आहे, हे सांगण्या आधी काय काय नाही हे सांगितले आहे..


त्या साऱ्यातून शिव शक्ती नेमकी काय आहे हे नव्याने लक्षात आले..


संदर्भासाठी ती ब्लॉग लिंक देत आहे..

https://www.linkedin.com/pulse/%E0%A4%9A%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%A6-%E0%A4%B0%E0%A4%AA-%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A4%B9%E0%A4%AE-%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A3-%E0%A4%B7%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%AE-prashant-pandya


आता नकळत लहान वयात केलेल्या या उपासनेतून काय मिळाले..?


एक अनामिक शक्ती, विश्वास, प्रेरणा..


शाळेत असताना ज्या अनेक संस्कार, विचारांनी कायमस्वरूपी गारूड केले, त्याही पुढे जाऊन अधिक स्वस्थ बनवले त्यापैकी एक म्हणजे उपासना..


वयाच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या उपासना शिकलो, त्यापैकी सर्वात आधी ही उपासना..


या ओळींमध्ये अतिशय सुंदर नाद आहे, स्वतःला जागे करण्याची ताकद आहे..


'मी' या स्वरूपाला अधिक जबाबदार करणारी ही एक उपासना आहे..


वेदांमध्ये शिव याचा अर्थ सुंदर, उत्तम, शुभ असा अभिप्रेत आहे..


जेंव्हा या ओळींचा उच्चार करतो, की मी चित् म्हणजे सदैव आनंद रुप आहे, मी शिव रूप आहे..


आपोआप अत्यंत शांत, स्वस्थ वाटण्यास सुरुवात होते..


जर मी शिव म्हणजे शुभ आहे, तर माझ्या प्रत्येक कृतीतून चांगले व्हावे ही प्रेरणा मिळते..


आपण दिवसाची सुरुवात या दोन ओळींनी केला आणि त्या जबाबदारीने कृती करण्याचा प्रयत्न केला, तरी शिव शंकरांची आराधना होईल..


महाशिवरात्रीचे निमित्त साधून, इतके दिवस फक्त उपचार म्हणून उच्चारत असलेल्या ओळींचा अर्थ समजून घेण्याची संधी आज मिळाली..


त्यातील अर्थाची ताकद समजली, ते सामर्थ्य मला या पुढील प्रवासाला अधिक समृद्ध, स्वस्थ, शांत करत जावो हीच त्या सांभ शिवा चरणी प्रार्थना..


माझ्यासोबत तुम्हीही ही रचना समजून घेतली, याबद्दल मनापासून आनंद..


शिवशंकर सर्वांचे कल्याण करोत हीच सदिच्छा..


जय शिव शंभो.. जय जय महादेव..

No comments:

Post a Comment

suggestions most wlcome