Tuesday, February 10, 2026

उठा उठा चिऊताई

रोज पानभर लिहायचे असे ठरवले, तरी नेमके काय हे निश्चित नसते..

पण जिथे हे सारे माझे नाही, तर ही लेखनसेवा माझ्या माध्यमातून कोणती तरी शक्ती करून घेते असे मला वाटते..

तेंव्हा तिच्या मार्फत नकळत दिनक्रमात नवे विषय मिळतात..

असेच काहीसे घडले..

या आधीच्या एका लेखात कविता रसग्रहण या बद्दल मांडले, तशीच अजून एक नवी गंमत झाली आणि हा नवा विषय मिळाला..

झाले असे की, २७ फेब्रुवारी रोजी मराठी दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमासाठी, कवी कुसुमाग्रज यांची एक कविता तिसरीतील विद्यार्थ्याने म्हणावी असे ठरवले..

त्यासाठी त्याची तयारी करून घेण्यासाठी त्याच्या पालकांशी चर्चा करत होते..

विद्यार्थी प्राथमिक वर्गात असल्याने वयोगटाला आवडेल, समजेल अशी कविता निवडली..

उठा उठा चिऊताई..  सारीकडे उजाडले..

डोळे तरी मिटलेले ..अजूनही अजूनही..

कवितेचा छान ध्वनी चित्ररूपी  दुवा ( युट्यूब वरील ॲनिमेटेड गाण्याची लिंक) पालकांना पाठवली..

पण कदाचित, रिॲलिटी शोच्या युगात माझ्या चिमुकल्या मित्रांनी त्यांच्या वयानुसार काही सादर करणे पालक, समाज यांना आवडत नाही किंवा अपरिपक्व वाटते..

पालकांकडून आम्ही कणा कविता तयार करून घेऊ का..?, तुम्ही पाठवलेली फारच बाळबोध वाटते आहे, असा नम्र प्रस्ताव आला..

यावर सर्वप्रथम त्यांच्या नम्र विनवणीचे कौतुक वाटले..

तोच धागा पकडून म्हटले, सांगायचा एक मुद्दा असा आहे की कार्यक्रम ज्यांच्यासाठी आहे , ती पहिली ते तिसरीची म्हणजे लहान वयोगटाची मुले आहेत, त्यानुसार अगदीच छान आहे चिऊताईची कविता..

कणा कविता अनेकदा मोठ्यांनाही समजत नाही, मग उगाच सादरीकरण भारी होते, म्हणून तीच हवी हा अट्टाहास कशाला..?

याउलट वयानुरूप गाणी, गोष्टी समजून, उमजून अधिक छान मांडता येतात..

आणि दुसरे महत्त्वाचे म्हणजे मी तुम्हाला पाठवलेला दुवा ( गाण्याची ॲनिमेटेड लिंक) यामुळे चिऊताईची कविता जरी छोट्यांसाठीची वाटली, तरी त्यातल्या प्रत्येक शब्दामागे असणारा भावार्थ खूप मोठा आणि गहन आहे..

बघा हं, मला उमजला गर्भित अर्थ मांडते..

उठा उठा चिऊताई .. सारीकडे उजाडले 

डोळे तरी मिटलेले ..अजूनही अजूनही..

सूर्योदय होऊन न उठणारी चिऊताई निसर्गात सापडणे केवळ अशक्य..

ती सापडेल ती मानवी विश्वात..

मग इथे चिऊ.. चिमणी असेल किंवा चिमणा..

त्यांच्या न उठण्याचे कारण काय  बरं असेल..?

कंटाळा, आळस, हार की निराशा..?

थोडक्यात नित्याच्या भाषेत सांगायचे ताण तणाव.. डिप्रेशन..?

अशा मानसिक, भावनिक आंदोलनांना सामोरी जाणारी ही चिऊताई एक तर या त्रासाच्या ग्लानीत आहे किंवा झोपेचे सोंग घेत आहे..

सोनेरी हे दूत आले, घरट्याच्या दारापाशी,

डोळ्यांवर झोप कशी, अजूनही, अजूनही..?

आता लहान मुलांच्या कवितेत सोनेरी दूत म्हणजे रवी किरण, सूर्यप्रकाश..

पण अधिक खोलवर विचार केल्यास..

तणावाच्या अंधाराला दूर सारण्यासाठी मदत करणारे, पहिले स्वतःचे मन, नंतर नातलग, मित्रमंडळी, उत्तम वाचन, श्रवण आणि गरज पडल्यास वैद्यकीय मदत हे सारे सोनेरी दूत नाहीत का..?

इतके सगळे आले तरी चिऊताईची झोप संपत कशी नाही..?

लगबग पाखरे ही, गात गात गोड गाणे,

टिपतात बघा दाणे, चोहीकडे, चोहीकडे..!

इथे चिऊताईला नकळत सुचविले आहे, की तू स्वतःला कितीही त्रास करून घेतला तरीही त्याने इतरांना फार काही फरक पडणार नाही, त्याचे दिनक्रम चालू आहेत आणि राहतील, त्रासात फक्त तू आहेस..

झोपलेल्या अशा तुम्ही, आणायाचे मग कोणी,

बाळासाठी चारापाणी, चिमुकल्या, चिमुकल्या..?

चिऊताईला दिलेली ही हाक, तिच्या सोंगरुपी झोपेवर अंतिम वार आहे..

तू स्वतःचे प्रश्न, समस्या, दुःख इतकं मोठं करून बसली आहेस, की तुला तुझ्या जबाबदाऱ्या, कर्तव्य, प्रेमी आप्तजन या सगळ्याचा विसर पडला आहे, तुझ्या या वागण्याने त्यांना होणारा त्रास याला तू आणि तूच कारणीभूत आहेस..

समेला येताना..

बाळाचे घेता नांव, जागी झाली चिऊताई,

उडोनिया दूर जाई, भूर भूर, भूर भूर..!

आणि आधी म्हणल्याप्रमाणे वार शेवटचा असला तरी, तो नेमका वर्मी बसल्याने, दुःख.. चिंता.. अपयश एक ना अनेक प्रश्न समोर उभे ठाकले, तरी त्या साऱ्यांना चोख उत्तर देण्याची प्रेरणा चिऊताईला मिळाली आहे..

आणि सगळ्या गोष्टींवर आपली आपण उत्तरे शोधायला, ती घरट्यातून बाहेर पडली आहे..

आता सांगा बरे, वरवर सहज, सोपी शब्द रचना असणारी ही बाल कविता वेगळ्या प्रकारे समजून घेतली, तर मानवी जीवनाची मोठी लढाई सुचवून जाते की नाही..?

अर्थात हे सारे मला भाषेच्या उण्यापुऱ्या ज्ञानाने झालेले आकलन, अधिक अभ्यासू मंडळी यात नक्कीच भर टाकू शकतील..

पण यातली  गंमत इथे संपलेली नाही..

त्यानंतर  इयत्ता दुसरीच्या वर्गात दैनंदिन अभ्यास करून दहा मिनिटे वेळ शिल्लक होता..

अगदी सहज मी हे गाणे मधे मधे थांबवून नव्याने येणारे शब्द, जसे की  सोनेरी किरण, पाखरे, चहुकडे, लगबग, टिपणे इ. त्यांचे अर्थ, संदर्भ सांगत मुलांना दाखवले..

मुलांनी गाण्यासोबत गुणगुणत, डोलत मनसोक्त आनंद  घेतला,  त्यानंतर मी उगाच गमतीशीर प्रश्न विचारला..

ही चिऊताई कोण आहे माहिती आहे का.. ?

माझ्यासाठी झोपलेली चिऊताई म्हणजे तुम्ही सगळे आहात..!

जी शिक्षक शिकवत असताना, कुठेतरी वेगळ्याच गोष्टी करणारी झोप काढतात (पेन्सिलीला टोक कर, गप्पा मार, वेगळ्या वही पुस्तकात..वेगळेच काहीतरी कर..) आणि जसे शिक्षक स्टिकर स्टार देईल असे आमिष दाखवतात, तसे सगळ्यातून जागे होत तुम्ही चालू गोष्टींकडे लक्ष देता..

आई बाबा सांगतात की रोज अभ्यास कर, तेंव्हा कंटाळा, आळस, दुर्लक्ष अशी झोप घेणारे तुम्ही परीक्षा आली असे म्हणाल्या बरोबर जागे होता.. 

आहात ना मग तुम्ही म्हणजे ही चिऊताई..उगाच झोपेचे सोंग घेणारी..?

आश्चर्याची गोष्ट इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या, मराठी भाषेचे फार कमी शब्द भांडार असणाऱ्या माझ्या या बालमित्रांना मी जे बोलत होते ते सारं नुसतं समजत नव्हते, तर मनापासून पटत होते आणि त्याची गंमत वाटत होती, मनापासून हसत नाही नाही आम्ही असे नाही करत अशी दाद त्यांच्याकडून मिळत होती..

असे हे जेष्ठ, श्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या कवितेचे रसग्रहण मला एक वेगळा आनंद आणि उर्जा देऊन गेले..

त्यात तुम्हाला सामील करावे असे वाटले म्हणून आज हा लेखनाचा घाट घातला..

जमला का सांगायला विसरू नका..

No comments:

Post a Comment

suggestions most wlcome