चिंगी पुस्तके वाचू लागली
आज सगळीकडे घरात खूप
गडबड चालू होती. आई, आजी स्वयंपाक घरात
छान छान खाऊ बनवत होत्या . बाबा, दादा
आणि आजोबा हॉल सजवत होते. घर पाहुण्यांनी भरले होते. मामा-मामी, काका-काकू, मावशी, आत्या, ताई-दादा सगळे
आले होते.
का माहितीये ? आज चिंगीचा दहावा वाढदिवस होता म्हणून. चिंगी म्हणजेच सुरभी, मास्टर जिनियसची मावस बहिण बर का. थोडावेळानी सगळी तयारी झाली. चिंगीचे
मित्रमैत्रिणी शाळेच्या ताईसुद्धा आल्या. चिंगूताईला
ताईने सुंदर अगदी परीसारखं तयार केलं. मग तिला औक्षण केलं, श्लोक म्हणाला , सुदिनम सुदिनम जन्मदिनम तव भवतु मंगले जन्मदिनम । विजयी भव सर्वत्र सर्वदा – २ जगती
भवतु तव सुयशोगानम ।। मग
मेणबत्ती न लावता केक पण कापला कारण आपण दिवा विझवायचा नाही तर लावायचा. मग सगळ्यांनी
चिंगीला भेटवस्तू दिल्या.आईनी सगळ्यांना पोटभर छान खाऊ दिला. खाऊ खाऊन सगळे खूप वेळ खेळले. मजा केली .
सगळे घरी गेल्यावर
चिंगी भेटवस्तू बघू लागली. कुणी खेळणी, कुणी
कपडे, शाळेला बॅग, कार्टूनची पर्स सगळया वस्तू तिला खूप आवडल्या
फक्त एकच मास्टर जिनियस म्हणजे शौनक दादाने दिलेले सोडून. त्याने दोन पुस्तके दिली होती. त्याला माहित होते
की चिंगीला वाचनाचा खूप कंटाळा आहे. तिला वाटते, आधी शाळेचा अभ्यास कमी असतो का..त्यात अजून ही
पुस्तक. तिचा हा कंटाळा घालवायला आणि पुस्तकांची आवड निर्माण करायला तर जिनियसने
ही छान भेट आणली होती. चिंगीनी रागाने ती
पुस्तक टेबलखाली सरकवून टाकली. मास्टर जिनियस आणि तिच्या आईने ते बघितले पण काही
बोलले नाही. दोन दिवस गेले.
आता चिंगीला नवीन
खेळण्याचाही कंटाळा आला. ती आईजवळ आली आणि
म्हणाली,"मी काय करु? माझा अभ्यास झाला आहे. सगळे खेळही खेळून
झाले."
"अग ते टेबलखाली
ठेवलेलं पुस्तक बघ ,वाच ."आई
म्हणाली.
"ए काय गं , तुला कसं कळलं मी पुस्तके तिथे ठेवली आणि मला
अभ्यास नाही करायचा. मगाशी कितीवेळ शाळेची पुस्तक वाचली ना मी ." "पण ते अभ्यासाचे पुस्तक आहे हे कुणी सांगितलं
तुला? मी काल बघितलं आहे खूप छान आहे. तुला नक्की
आवडतील. तू एकदा बघ तर खरं. हवं तर शौनक दादासोबत वाच म्हणजे अजून मजा येईल."
मग चिंगीने एक
पुस्तक घेतले आणि बघू लागली. त्या पुस्तकात प्राण्यांची सुंदर चित्र होती अगदी खरी
वाटत होती, त्यांची छान माहिती पण होती. तर दुसऱ्या पुस्तकात
गोष्ट होती एका परीची. त्याची चित्र तर थ्रीडी होती बघताना खूप गंमत येत होती .
थोडावेळानी आईने
चिंगीला विचारले , " आवडली
का पुस्तक ?"
"हो खूप खूप आवडली.
अगं मी एक वाचलेसुद्धा. किती छान प्राण्यांची माहिती आहे त्यात. मला तर ते प्राणी
माहितीही नव्हते आणि दुसऱ्या पुस्तकात परीताईची गोष्ट आहे. तेही मी आता वाचणार
आहे. मला दोन्ही पुस्तकं खूप आवडली. मी शौनकदादाला फोन करुन सांगू का?" " नक्की सांग त्याला छान वाटेल.” चिंगीने दादाला फोन लावला. “मास्टर जिनियस आहेत का?” “बोला चिंगुताई, आज माझी आठवण कशी झाली.” “दादा, मी
आज तू मला वाढदिवसाला दिलेली पुस्तक पाहिली. एक वाचूनही झाले. मला पुस्तक खूप
आवडली हे सांगायला फोन केला.” “ हो
का, मस्तच. पण त्यादिवशी तर कुणीतरी रागाने टेबलखाली
सरकवली होती. शिवाय कोणाला तरी वाचायलाही आवडत नाही म्हणे.” “हो नव्हत आवडत मला वाचयला. पण तेव्हा मला
वाचनातही गंमत असते हे माहित नव्हत रे.” “बरं
का चिंगूताई पुस्तक पण खेळण्यांसारखी छानच असतात. सगळी काही अभ्यासाची नसतात.
गोष्टीची, गाण्यांची, चित्रांची वेगवेगळी असतात. त्यातून नवनवीन माहिती
समजते आणि मज्जापण येते. अशी पुस्तक वाचून तर मी इतका हुशार झालो आहे. उगाच नाही
सगळे मला मास्टर जिनियस म्हणत." “आता
मीही तुझ्यासारखी खूप खूप पुस्तक वाचणार आहे आणि जिनियस होणार आहे.” "मस्त मी तुला अजून खूप पुस्तक देईन. शिवाय तू
मावशीला सांगून पुस्तक लायब्ररी लाव." " हो चालेल... नाही पळेल . आता मी पुस्तकांचा
कंटाळा करणार नाही. खूप खूप वाचणार." असं म्हणत चिंगी पुन्हा प्राण्यांचे
पुस्तक बघण्यात रमून गेली. तेव्हापासून तिला पुस्तके आवडू लागली. मास्टर जिनियसने दिलेली ही वाढदिवसाची भेट
तुम्हाला सगळ्यांना पण मिळो. तुम्हालाही
वाचनाची आवड लागली तर लवकरच तुम्ही सगळेही जिनियस होणार हे नक्की.








No comments:
Post a Comment
suggestions most wlcome