Stress च्या नावाने... चांगभलं !
ऑफिसच्या दारापर्यंत जाऊनही, सुटी घेऊन ती घरी परतली...
कितीही झटापट केली, तरी कुलूप काही उघडेना.
"वैताग नुसता... याच्याही आजच अंगात यायचे होते वाटतं..."
मनातल्या मनात वैतागत, एकदा चावीकडे पाहिलं...
घराऐवजी गाडीची किल्ली कुलपात होती...
असे कोणत्याही किल्लीने थोडीच उघडणार आहे कुलूप...
झाली चूक लक्षात आल्यावर, वैताग काहीसा गमतीत बदलला आणि आपल्या वेंधळेपणावर हलकं हसू उमटलं.
पण....
अगदी एकच क्षण...
मनात भरुन राहिलेला त्रासाचा राक्षस इतका तीव्र होता की त्याने लगेच उठाव केला...
"तू कशाला वेंधळी...? प्रत्येक गोष्ट विरोधात असली तर होणारच ना असं...
मीच सगळं बरोबर-योग्य.... up to the mark करण्याचा ठेका थोडीच घेतलाय...."
विचारचक्र फिरत होत... इकडे बरोबर किल्ली लावून कुलूप तर उघडलं...
पण...
एरवी कुशीत घेऊ बघणार घर, आज एकदम अंगावर आल्यासारख झालं...
तिला जिथे तिथे, नसलेला पसारा दिसला...
आता समोर दोन पर्याय होते...
सगळ्याकडे दुर्लक्ष करुन बेडरुममध्ये जायचे... फ्रेश व्हायचे... आणि पांघरुण घेऊन गुडूप व्हायचे...
किंवा...
हा सगळा पसारा आवरायचा...
मगाशी घडलेली गोष्ट बघता...
शांत झोपायचं कितीही ठरवलं, तरी तो मनातला राक्षस थोडीच झोपू देणारे...
तो बंड करणारच...
शरीराला मिळेल कदाचित विश्रांती... पण त्याने फार बरं वाटणार नाही, कारण ते मस्तच आहे...
गरज आहे ते मनातल्या राक्षसाशी लढायची... तेही गनिमी कावा वापरुन...
तो राक्षस पुन्हा पुन्हा सांगत राहील... तू आणि तूच बरोबर आणि बाकी सगळं चूक, तुझ्या विरोधात...
असेलही अगदी तसंच...
पण त्याने परिस्थिती बदलता येणार नसेल, तर काय उपयोग?...
अगदी कुलूपासारखी फजिती होईल...
त्यामुळे चुकीची चावी लावून चालणारच नाही, हे तीने स्वतःला बजावले आणि पसारा आवरायचा नक्की केलं...
त्याआधी फ्रेश झाली... सढळ हाताने आलं घालून केलेला, आवडीचा फक्कड चहा घेतला आणि मग लागली कामाला...
म्हणावं तर काही पसारा नव्हताच...
म्हणजे पसारा करायला, घरात असायचे तरी कोण ना...
कामवाल्या मावशींचे कामही ठीकच होते. बघता क्षणी तरी सगळ नीटनेटकेच दिसायचे...
त्या नीट दिसणाऱ्या हॉलकडे तीने नजर फिरवली...
मनातली अस्वस्थता तिला सगळीकडे दिसत होती...
तीच तर आवरायची होती...
तीने सगळे सामान हलवले. सोफ्याची रचना बदलली. त्यावरचे कुशन कव्हर बदलले. खिडकीचे पडदे बदलले. मोजक्या पण आवडीने जमवलेल्या, शोपीसची जागा बदलली...
बाळाला जशी चोळून मोळून, पण तरी मायेने अंघोळ घालतात ना... अगदी तशीच सारी खोली आवरुन लख्ख केली.
मग मोर्चा बेडरुमकडे वळवला, त्याचाही चेहरामोहरा बदलला...
मनातला राक्षस अधूनमधून डोकं वर काढत होता...
गरज आहे का या सगळ्याची...?
कुणी दखल पण घेणार नाही....
मग अजून त्रास होणार....
पण हलकासा दुसरा आवाज पण यायचा ...
मी कुठे कुणासाठी करते आहे...
कुठे हवंय कुणाचं कौतुक...
मला बरं वाटतं म्हणून करतीये...
विचार धावत होते आणि कामाने शरीर थकत होते...
इतक्यात बेल वाजली, ही वेळ खरं तर कुणाच्याही येण्याची नव्हती....
आता तिला कोणी यायलाही नको होतं...
नाराजीने ती दाराकडे वळली...
तिचा तो दारात... अनपेक्षित...
तो आत आला... त्यालाही तीच घरात असणं अनपेक्षितच होतं...
पण गेले काही दिवस तिची अस्वस्थता जाणवत होती... त्याचा परिणाम नाही म्हणलं तरी सगळ्यावर होतच होता...
त्यावर काहीतरी उपाय शोधण्यासाठी तर तो लवकर आला होता...
घराचं बदलेल रुप बघून, गडी जाम खूश झाला...
कारण आधीच्या अनुभवावरून तिची बिनसलेली गाडी रूळावर येण्याच्या या खुणा होत्या...
तीने अशी आवराआवर केल्यावर, खरं म्हणजे त्याला खूप जड जायचं, हव्या त्या गोष्टी सापडायच्या नाही, निवांत बसण्याच्या जागाही नव्याने शोधायला लागायच्या...
पण अगदी सुरुवातीला हे त्याने जेंव्हा तिला सांगितले होते...
तो प्रसंग त्याला आठवला...
त्याने अगदी सहजच सांगितले होते, की तू आवराआवर म्हणून जे काही करतेस ना... त्यानंतर मला काहीच नीट सापडत नाही...
त्याच वाक्यही पूर्ण होऊ न देता ...
हो का...? म्हणजे इथेही बदल करण्याचे अधिकार मला नाहीतच का...? ( अजूनही खूप काही बोलत राहिली)
त्याला आपलं नेमके काय चुकलं तेच कळत नव्हतं...
पण तरी त्याने शांत रहाण्याचा पवित्रा घेतला...
भरुन आलेलं आभाळ जसं धो धो बरसल्यावर, अगदी निरभ्र होतं तसेच काहीस तीचही झालं...
बडबड करुन मोकळं झाल्यावर, तीने मनापासून कबूल केलं की चूकलं माझं...
म्हणजे हा सगळा त्रागा फक्त तुझ्यावरचा नव्हता, पण निमित्त मात्र नक्की झालास...
माझ्या आवरण्याचा त्रास होत असेल तुला...
पण उगाच सतत असं करत राहणं, हा माझा तरी स्वभाव कुठे आहे...
नित्य दिनक्रमात काही ना काही मनाविरुद्ध होत असतं, पण त्यासोबतच काहीतरी मनासारखं ही होत असतं त्यामुळे गोळाबेरीज जमते...
पण कधीतरी फक्त विरोधाची बाजू जड होते...
काहीही करायला गेलो, तरी चुकत किंवा चुकलं आहे असाच आविर्भाव अनुभावायला मिळतो...
यावर उपाय नसतात...
वेळ जाऊ द्यावा ठरवलं, तर मनातला मी नावाचा राक्षस बंड करतो...
गणित अजून बिघडवतो...
अशावेळी गरज असते, काहीतरी मनासारखं घडण्याची...
यावर ही आवराआवर एक उपाय समज... बदल हवा असतो काहीतरी...
परिस्थिती बदलता येत नाही...
पण तिच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन नक्कीच बदलता येतो...
मग असे छोटे छोटे बदल त्याला मदत करतात...
काहीतरी बदलण्याचा अधिकार आपल्याला आहे, हेच मुळात स्वस्थता देणार असतं...
या बदलांमुळे जशी तुझी अडचण होते, तशी माझीही होते...
मग त्यातूनच बदल हवाच किंवा आपलंच बरोबर ही भूमिका ही जरा सुधारता येते...
थोडक्यात आवराआवर ही मनाची अस्वस्थता, घालमेल दूर करण्यासाठी आहे...
हे सगळं समजून घेतल्यावर तिच्या या आवराआवर प्रकरणा विषयी, नाराजी व्यक्त करण्याऐवजी, कौतुक करायला त्याने सुरुवात केली...
परिणामी अनेकदा इंद्रधनुष्य ही अनुभवलं....
आजही ते सगळं आठवून, तो म्हणला...
मस्त दिसतंय आज घर, पण दमली असशील..
आज तुला स्वयंपाकाला सुटी, मी मस्तपैकी खिचडी करेन...
तू हवं तर डुलकी काढ एखादी...
त्यावर तिच्याकडून मिळालेली खट्याळ हास्याची पावती, फुलपाखरे बनून त्याच्याभोवती नाचू लागली...
.....
.....
....
....
....
काहीतरी कमी,
काहीतरी जास्त...
याचा स्वीकार आहे...
जे आहे ते आहे...
नाही ते नाही...
यातही खूप मजा आहे....
***********************

वाचतांना मी माझ्या विश्वात गेले. मनातल्या राक्षसाशी दोन हात करता आले पाहिजे मग सर्व सोपं होतं
ReplyDeleteमनापासून आभार💝🎉
Deleteखूप छान संसारात घडलेल्या अनेक प्रसंगाच्या आठवणी जाग्या झाल्या आणि हसुपण आले मस्त आहे ना
ReplyDeleteमनापासून आभार💝🎉
ReplyDelete