Monday, May 03, 2021

पांढरे फूल !

एक खूप सुंदर बाग होती.बागेत खूप रंगीबेरंगी फुले होती. त्या फुलांमधला मधुरस गोळा करायलाफुलांशी खेळायला बागेत फुलपाखरे,मधमाशी,भूंगे आणि चिमुकले पक्षी पण यायचे.

या बागेत एकच पांढरीशुभ्र फुल होत. ते सगळ्यांशी खूप गोड बोलायचं,वागायचं. फुलपाखरे,भुंगे सगळ्यांना आपला मध घेऊ द्यायचं उलट म्हणायचं हळू नाहीतर काटे टोचतील.चिमुकल्या पक्ष्यांची गाणी आवडीने ऐकायचं,म्हणूनच ते सगळ्यांचं लाडकं होत.
एकदा त्या फुलाला बाग बघून लक्षात आलं की ही सगळी बाग किती रंगीबेरंगी आहे. बाकी फुलं रंगीतझाड गवत पण हिरवगार,फुलपाखरं,पक्षी पण छान छान रंगाचे फक्त आपला रंग पांढरा. त्याला खूप वाईट वाटू लागलं म्हणून त्यानी देवबाप्पाची मनापासून प्रार्थना केली.
"देवबाप्पा या रंगीबेरंगी बागेत मी एकटाच पांढरा आहे मलापण छान रंग हवा."
देवबाप्पा म्हणाला," अरे रंग नसला म्हणून काय झालं,तुझ्या छान वागण्यामुळे तू सगळ्यांचा लाडका आहेस."
"नाही पण मलाही रंग हवा मलाही छान दिसायचं आहे ."
बरं जशी तुझी इच्छा असं म्हणत देवबाप्पानी त्याला वेगळंच रंगीबेरंगी फूल बनवलं .पण बागेत त्याला कोणी ओळखलचं नाही .
नव्या रंगामुळे फुलाला आपण सगळ्यात छान दिसतोय आपल्यासारखा कोणीच नाही असं वाटू लागले. हळूहळू त्याचे वागणे बदलले. कोणी जवळ आले की ते ओरडू लागले,रंग खराब होईल म्हणून भांडू लागले. त्यामुळे थोड्याच दिवसात ते एकटे पडले.कोणीच त्याच्याशी बोलेना की खेळेना. हे सगळं एक लाल फूल बघत होते.

मग मात्र फुलाला रडू लागले. ते बघून लाल फूल म्हणाले,"काय झालं तुला,का रडतो आहेस ?"

"आधी मी एकटा पांढरा होतो तरी सगळे माझ्याशी छान बोलायचे,खेळायचे आता मला सगळ्यात छान रंग मिळाले पण कोणीच बोलत नाही,मला खूप एकटे वाटते "

"अरे तुझा रंग बदलल्यामुळे तू ओळखूच येत नाही आणि बोलणं त्यांनी नाही तू बंद केलं आधी तू सगळ्यांशी गोड बोलायचा,काळजीपूर्वक वागायचा. पण रंग मिळाल्यापासून तू सगळ्यांवर ओरडू लागला,म्हणून सगळे तुझ्यापासून लांब राहतात."
विचार केल्यावर फुलाला आपली चूक कळली आणि देवबाप्पाचे बोलणे आठवले की रंग नसला तरी छान वागण्यामुळे तू सगळ्यांचा लाडका आहेस. त्याला वाटले ज्या रंगामुळे आपले वागणे बदलले,मित्र आपल्यापासून दूर गेले तो रंग नकोच .

मग त्याने परत मनापासून देवबाप्पाला सांगितलं की मला आधीसारखा पांढरा रंग दे आणि छान वागणारा बनव. मला माझी चूक समजली माझा रंग नाहीतर वागणच माझी खरी ओळख आहे. देवबाप्पानी फुलाला परत पहिल्यासारखं बनवलं आणि छान वागण्यामुळे पांढर फूल पुन्हा सगळ्याच लाडकं बनलं.
























No comments:

Post a Comment

suggestions most wlcome