(चिंकू आणि पिंकू शहरात राहणारे.सुट्टीमध्ये मामाच्या गावाला जातात. मामाचं भलंमोठं शेत असतं.शेतात फळझाडे,भाज्या आणि खूप वेगवेगळी पिके असतात.)
चिंकू आणि पिंकू पहिल्यांदा अशी गंमत बघत असतात.इतके दिवस भाजी दुकानातच तयार करतात असं त्यांना वाटत होत त्यामुळे घरी जायच्या ऐवजी दोघे खूप वेळ मामाबरोबर शेतात रेंगाळतात.पोटात कावळे ओरडू लागल्यावरच त्यांना घराची आठवण होते.मग तडक घरी जातात,घरी आजी- मामी दोघांची वाटच बघत असतात)
दोघे :- आजी $$ मामी $$ आम्ही आलो.
आजी :- अरे इतका का उशीर झाला ? कुठे होता इतका वेळ ?
चिंकू :- अगं आम्ही आपलं शेत बघितलं .कसली मज्जा आली !
पिंकी :- आम्ही झाडाला लागलेले टोमॅटो,मिरची,पेरू पहिल्यांदा पहिले.खूप भारी होते !
चिंकू :- इतके फिरलो..इतके फिरलो की खूप भूक लागली आहे. खायला दे ना काहीतरी.काय देतेस?पिझ्झा,बर्गर की वडापाव.
आजी :- अरे ,इकडे यातलं काही मिळत नाही.भाजी,भाकरी,पोळी , भात,पिठलं की हुरडा देऊ ?
मामी :- फार तर पराठा करुन देते.
पिंकू :- मामी पण मला आलू पराठा हवा
(मुलांची शेतामधली गंमत आठवून मामला एक कल्पना सुचते तो आजी आणि मामीला हळूच काहीतरी सांगतो.दोघी आनंदाने तयार होतात)
मामी :- मिळेल हो आलू पराठा पण त्यासाठी तुम्हाला थोडी मदत करावी लागेल.घरात बटाटे,कांदा,आलं,लसूण काहीच नाही.आणून द्यावे लागेलं.
दोघे :- इतकंच ना पैसे दे पिशवी दे दुकान कुठे आहे सांग पाच मिनिटात आणून देतो.
आजी :- दुकानात कशाला आपल्या शेतात आहेत की,पटकन जा आणि घेऊन या.
मामी :- आणि हो तोंडी लावायला कोशिंबीर पण करेन त्यासाठी शेतात गाजर , मुळा आणि बीटपण आहे ते पण घेऊन या.हे सगळं करायला थोडा वेळ लागेल बरं का,म्हणून थोडं खाऊन जा.मस्त तयार पेरु आहेत ,दोघांनी घ्या एकेक आणि खा जाता जाता.
(पेरु खात उड्या मारत दोघे शेतात जातात . सगळीकडे शोधतात पण कुठल्याही झाडावर बटाटा दिसत नाही की गाजर की आलं की लसूण वैतागून दोघे घरी येतात)
चिंकू :- काय गं आजी , तू तर म्हणली की शेतात मिळतील भाज्या पण ना बटाटा सापडला ना कांदा ना गाजर.
आजी :- नीट पाहिलं का तुम्ही ?
पिंकू :- हो सगळीकडे फिरलो.टोमॅटो दिसला,मिरची दिसली कोबीपण दिसला पण तुम्ही सांगितलेली एक पण भाजी सापडली नाही.
मामी :- असं झालं का ! मग एक काम करा. परत जा ,यावेळी जाताना आपल्या मोती कुत्र्याला घेऊन जा. तो मामाबरोबर रोज शेतात जातो तो करेल तुम्हाला मदत .
( दोघे मोतीला घेऊन पुन्हा शेतात जातात )
चिंकू :- मोती सांग रे लवकर कुठे आहे बटाटा,कांदा,लसूण?
(मोती नाकाने वास घेऊ लागतो,एका झुडपापाशी थांबतो आणि पायाने माती उकरु लागतो)
पिंकू :- अरे मोती काय करतोस?माती नको उकरु,आजी रागवेल ना ..
(मातीतून आवाज येतो)
भाज्या :- नाही रागवणार आम्ही इथेच लपलो आहोत मातीत.जमिनीच्या खाली.
(दोघे मोतीला जमीन उकरायला मदत करतात आणि काय गंमत त्यांना बटाटे सापडतात)
बटाटे :- मस्त,तुम्ही आम्हाला शोधून काढले.आमचे बाकी मित्र पण असेच लपले आहेत त्यांनाही शोधा बरं.
(मोती नाकाने वास घेऊन वेगवेगळ्या वासाच्या भाज्यापाशी थांबतो.चिंकू पिंकू नीट बघतात पानाचे आकार,रंग यात फरक दिसतो तिघे मिळून जमीन उकरुन सगळ्या भाज्या शोधून काढतात.)
दोघे :- ए सापडली अजून एक भाजी.
कांदे :- आलो आम्ही आलो.
लाल तांबूस रंगाचे,
जरा उग्र वासाचे
थोडेसे रडवणारे
पण थंड ठेवणारे ,
छान छान कांदे !
आम्ही पांढऱ्या रंगाचे ,
जरा तिखट चवीचे
पाकळ्या पाकळ्यांनी बनलेले,
पदार्थ चवदार बनवणारे ,
छोटे छोटे लसूण !
गाजर :- कोशिंबिरीला झालो हजर,
नाव आमचं आहे गाजर ,
रंग आमचा असतो कधी केशरी कधी लाल ,
बीट :- कोशिंबिरीच्या यादीत आम्हीपण आहोत बरं का !
असलो जरी लहान तरी आहोत धीट ,
मुळा :- जरी आहे आमचा शेवटचा नंबर ,
गोरा आमचा रंग आम्हीही सुंदर
विसरू नको मला बाळा ,
चिंकू :- नाही म्हणता म्हणता सगळ्या भाज्या सापडल्या.
पिंकू :- हो चल भाज्या पिशवीत भरु.
(भाज्या घेऊन चिंकू पिंकू नाचतच घरी आले.)
दोघे :- आजी $$ आजी आम्ही आलो आणि सगळ्या भाज्यापण सापडल्या.
मामी :- हो का.. सापडल्या का एकदाच्या.कोणत्या कोणत्या झाडावर सापडल्या.
चिंकू :- ए काहीपण काय त्या काही झाडावर नाही तर जमिनीच्या खाली लपल्या होत्या.
पिंकू :-बघ मामा,मामी आजी हसतायेत म्हणजे त्यांना माहित होत.हो ना?
आजी :- हे तुझ्या मामाचं काम. त्यानी सांगितलं आम्हाला असं करायला.
दोघे :- ए काय रे मामा आमची फ करायची होती का तुला.
मामा :- नाही उलट तुम्हाला शेतामधली अजून गंमत दाखवायची होती.घरी येताना नुसतं शेत बघून तुम्ही हरवून गेला होता . म्हणलं तुम्हाला मजा करु द्यावी.
मामी :- पण खरचं मजा आली का कंटाळा आला ?
(काय मित्रांनो तुम्हाला पण आली ना मजा.
अशी मजा अनुभवायला कधीतरी शेतात जरुर जा आणि हो तुम्ही काय काय नवीन बघितलं ते आम्हाला सांगायला विसरु नका बरं का )
No comments:
Post a Comment
suggestions most wlcome