Monday, May 03, 2021

चिनुली

म्हण - कोल्ह्याला द्राक्षे आंबट



सुंदरबन नावाप्रमाणेच खूप खूप सुंदर होत. मोठी मोठी झाडेवेली यांनी नटलेले होते. बनात सिंहवाघकोल्हाअस्वल,  लांडगा हरीण चित्तामाकड झेब्रा जिराफ असे वेगवेगळे प्राणी आणि चिमणीकावळा साळुंखी मैना पोपट घार कबुतर बुलबुल असे विविध पक्षी आनंदाने एकत्र राहायचे. दिवसभर इकडे तिकडे फिरावेपोटासाठी खाऊ मिळवावापिल्लांसाठी घरी घेऊन जावाएकमेकांना मदत करावी, असे सगळे छान होते.



या सुंदरबनात चिनुली नावाची, एक खारोटी राहायची. तिला बागकाम करायला खूप आवडायचे, म्हणून सुंदरबनाच्या फळबागेचे काम, तिच्याकडे दिले होते. तिथे तिने आंबापेरु,  सिताफळ चिकू संत्रीमोसंबी अशा वेगवेगळ्या फळांची झाडे लावली होती. तिच्याबरोबर बागकाम आवडणारा चिकू ससागप्पी माकडगोलू अस्वल हे देखील या बागेची काळजी घ्यायचे. ही फळे सगळ्यांना खायला मिळायची, फक्त एकच नियम होता की ठरवून दिलेल्या वेळेत यायचे आणि एका दिवशी एकच फळ घ्यायचेसाठवणूक करायची नाही.


चिनुली नवनवीन फळांची माहिती मिळवण्यासाठी खूप फिरायची. इतर वनातील प्राण्यांनापक्ष्यांना भेटायचीवेगवेगळ्या बागा बघून यायची, सेच एकदा तिला द्राक्षाविषयी माहिती मिळाली. आपल्या मित्रांच्या मदतीने तिने सुंदरबनात द्राक्षे लावायची ठरवली.



लवकरच काम सुरु झाले. जमीन नांगरण्यात आलीवाफे तयार केले. त्यात बियाणे लावलेखत-पाणी देण्यात आले हळूहळू बी रुजलेवेली पसरु लागल्या, मग त्यांना काठ्यांनी तयार केलेल्या मांडवाचा आधार देण्यात आलात्यावर वेली जोमाने फोफावल्याफुले फुलली आणि बघता बघता द्राक्षाचे घोस आकार घेऊ लागले. थोड्याच दिवसात द्राक्षे खाण्यासाठी तयार झाली.

नेहमीप्रमाणे आठवड्याची सभा भरली होती. त्यात चिनुली आणि तिच्या मित्रांनी द्राक्षाची माहिती सांगितली. सगळ्यांना द्राक्ष खाण्यासाठी आमंत्रण दिले. हे फळ नवे असल्याने अन्नमंत्री जितू कोल्हा, याने सर्वात आधी त्याचे परीक्षण करावे, आणि त्यावेळी चिनुलीने तिथे जाऊ नये असे सर्वानुमते ठरले.


त्यानुसार जितू एकटाच बागेत गेला. द्राक्षांच्या वेलिंचा मांडव खूप उंच होता. त्याने उडी मारली


परत थोडी अजून उंच उडी मारली


अशा खूप उड्या मारल्या, पण त्याला द्राक्षपर्यंत पोहचताच येईना. हे सारे बागेची काळजी घेण्यासाठी थांबलेले गप्पी माकड पहात होते.


आता काय करावे या विचारात असलेल्या जितूला, आपल्याला उंच उडी मारता आली नाही, हे सांगण्यात कमीपणा वाटलात्याने मनात काहीतरी ठरवले आणि सभेत परत आला. त्याचा बदलेला चेहरा बघून गप्पी देखील त्याच्यामागून सभेत आला.


इकडे सगळेच त्याची आतुरतेने वाट बघत होते. चिनुली आणि तिचे मित्र तर खूपच उत्सुक होते.

सिंह महाराज :- मग जितू काय मत आहे तुझे?  सगळ्यांनी द्राक्षांचा आस्वाद घ्यायला जावे का?

जितू :- माफी असावी महाराजमाझे म्हणणे ऐकून सगळे नाराज होतील, पण हे सांगताना मलाही खूप वाईट वाटत आहे, की ही फळे खूपच आंबट आहेत. मी तरी ही फळे खाऊ नये असेच सांगेन.

जितूचे बोलणे ऐकून, चिनुली आणि तिच्या मित्रांना खूप वाईट वाटले. इतक्यात गप्पीने चिनुलीच्या कानात काहीतरी सांगितले. ते ऐकून ती खूप चिडली, पण तिने वेगळाच विचार करुन, सिंह महाराजांना एक विनंती केली.

चिनुली :- महाराजअन्नमंत्री जीतू यांचे म्हणणे आपण सगळ्यांनी ऐकले आहे, पण आम्ही सगळ्यांनी खूप मेहनत करुन या फळाची बाग फुलवली आहे. आम्हाला एक शेवटची संधी द्यावी.

सिंह महाराज :- नक्कीच. मी तुमचे कष्ट बघितले आहेत. त्यामुळे तुम्ही तुमचे म्हणणे मांडू शकता.

चिनुली :- मंत्री जितू यांनी पुन्हा एकदा द्राक्षे खाऊन बघावी आणि यावेळी आपण सर्वांनी त्यांच्यासोबत जावे.

हे ऐकल्यावर आपण खोटे बोलत आहोत आणि आता हे बागेत गेल्यावर सगळ्यांना समजणार हे लक्षात आल्यावर जितू मनातून घाबरला. आता काय करावे ते त्याला  सुचेना, तसाच तो सगळ्यांबरोबर बागेत गेला.


चिंगुलीने द्राक्षांचे घोस तोडूनस्वच्छ धुवून आणले. जितू आणि सिंह महाराजांसमोर ठेवले.

इतके वेगळे आणि छान फळ दोघांनीही यापूर्वी खाल्ले नव्हते. द्राक्षे आंबट नाहीत, हे लक्षात आल्यावर महाराजांनी जितूकडे पाहिले. आपली चूक लक्षात येऊन तो म्हणाला,

जितू :- मला माफ करा महाराज, मी आपल्याशी खोटे बोललो. खरं म्हणजे द्राक्षाच्या वेलीचा मांडव खूपच उंच असल्यामुळे मला ती खाता आली नाहीत. मला इतकी उंच उडी मारता आली नाही. हे ऐकून सगळे मला हसतील, असे वाटून मी द्राक्षे आंबट असल्याचे खोटे सांगितले.

हे ऐकून सिंह महाराज खूप चिडले. ते जितूला शिक्षा करणार होते इतक्यात..,

चिनुली :- महाराज थांबा, हे सगळे मला बागेची काळजी घेण्यासाठी थांबलेल्या गप्पीने आधीच सांगितले होते, पण हे मंत्री जितू यांनी स्वतः कबूल करावे असे मला वाटले. मी आपल्याला परत बागेत येण्याची विनंती केली. यावेळी द्राक्षे मी स्वतः तोडून आणली. त्यांनी स्वतःची चूक कबूल केली आहे, त्यामुळे त्यांना माफ करावे अशी मी विनंती करते.

सिंह महाराज :- शाब्बास !  चिनुली. तुझे आणि तुझ्या मित्रांचे कौतुक करावे तितके कमीच आहे. तुझ्यामुळे आज द्राक्षे गोड झाली किंवा ती गोडच होती, हे सगळ्यांना कळले, तरीही जितूच्या खोटारडेपणा दुर्लक्षित करुन चालणार नाही. मी त्याचे मंत्रीपद काढून घेतो. यापुढे हे काम राघू पोपट बघेल. तो कामात प्रामाणिक राहील अशी अपेक्षा करतो.

जितूला त्याच्या खोटेपणाची चांगलीच शिक्षा झाली. 

त्यामुळे उगाच कशालाही खोटी नावे ठेवू नये, वाईट बोलू नये, याचा धडा सगळ्यांनाच मिळाला. 

सगळ्यांनी चिनुलीच्या आणि तिच्या मित्रांच्या नावाचा जयजयकार केला. 

आणि मग मनापासून गोड गोड द्राक्षांचा आस्वाद घेतला.
आणि बरं का बालमित्रांनो तेंव्हापासून एक म्हण रूढ झाली, ' कोल्ह्याला द्राक्षे आंबट !'


काही संदर्भ आपण पूर्वापार ऐकत असतो, पण त्यात काळानुसार थोडे बदल करायला हवे..  

तरच ते मुलांना पटतात किंवा योग्य संदेश मुलांपर्यंत जातो, असे वाटते म्हणूनच हा प्रयत्न.. 


जुनी म्हण - कोल्ह्याला द्राक्षे आंबट

ही म्हण न जमलेल्या गोष्टींना नावे ठेवा, असे काहीसे रुजवते असे वाटून, गोष्ट थोडी वाढवली आहे आणि वेगळा विचार देण्याचा प्रयत्न केला आहे.

नवे रुप - कोल्ह्याची आंबट द्राक्षे, चिनुलीने केली गोड..!

No comments:

Post a Comment

suggestions most wlcome