चंपक वनात आज सगळीकडे आनंदीआनंद होता. दूर देशाच्या जंगलातून एक नवा मित्र आला होता. तसा बाकी प्राण्यांसारखाच पण थोडा वेगळा दिसत होता. मागच्या दोन पायांवरच उभा राहायचा आणि ना चालायचा ना पळायचा, टणाटण उड्या मारायचा. त्यांचे नाव होते कांगो-कांगारु. त्याला भेटायला सगळे एकत्र जमले होते. त्याच्या स्वागतासाठी सिंह महाराजांनी मोठी मेजवानी ठेवली होती.
कार्यक्रमाची सुरुवात कुहू कोकिळेनी गोड गाणे म्हणून केली. कांगोनी सगळ्यांना आपली ओळख करुन दिली. चंपक वनातील प्राण्यांनीही त्याला आपली ओळख करुन दिली. थोडावेळ गप्पागोष्टी झाल्या. मग सगळ्यांना खेळ खेळावेसे वाटू लागले.
काय खेळू या...काय खेळू या....म्हणत लपाछपी खेळायचे ठरले. कांगोला सगळा परिसर नवीन असल्याने फार दूर जायचे नाही, जवळच्याच झाडांमागे लपायचे ठरले. सगळ्यात महत्वाचे म्हणजे काही झाले तरी आंब्याच्या झाडापलीकडे अजिबात जायचे नाही असे बजावण्यात आले.
सर्वात आधी भोलू अस्वलाने राज्य घेतले. भोलू दिसायला कितीही गोलूमोलू असला तरी त्याची नजर तेज होती. त्याने सोनू हरणाला लगेच शोधले आणि एकामागोमाग सगळ्यांनाच शोधून काढले.
आता सोनूवर राज्य आले. त्याला भोलू इतके पटकन जमले नाही तरी त्यानेही सगळ्यांना शोधून काढले पण सगळ्यात आधी कांगो सापडला होता, त्यामुळे आता कांगोवर राज्य आले.
आता सोनूवर राज्य आले. त्याला भोलू इतके पटकन जमले नाही तरी त्यानेही सगळ्यांना शोधून काढले पण सगळ्यात आधी कांगो सापडला होता, त्यामुळे आता कांगोवर राज्य आले.
कांगोला हा खेळ भारीच आवडला होता. त्यामुळे त्याने अजिबात चिडचिड न करता दहा-वीस म्हणायला सुरुवात केली. सगळे प्राणी पटापट नव्या जागा शोधून लपले. झंपू माकडाला मात्र कांगोची गंमत करायची लहर आली.
तो एका झाडाच्या उंचावर जाऊन लपला. दाट पानांमुळे तो जराही दिसत नव्हता. तेथून त्याने वेगवेगळे आवाज काढायला सुरुवात केली.
सगळे प्राणी लपलेले असल्याने झंपूची खोडी कुणाच्याही लक्षात आली नाही. कांगो मात्र आवाजाच्या दिशेने जाऊ लागला.
झंपू पानांच्या आडून एका झाडावरुन दुसऱ्या झाडावर जाऊ लागला असे करता करता तो त्या आंब्याच्या झाडावर पोहचला हे त्याच्या लक्षातही आले नाही. आवाजाच्या मागे जाणारा कांगोही उड्या मारत तिथे आला आणि नकळत झाडापलीकडे गेला आणि तिथे असलेल्या दलदलीत फसला.
त्याला काय होते आहे हेच समजेना. कितीही हालचाल करायचा प्रयत्न केला तरी जमेचना. तो अधिकच आत आत जाऊ लागला. घाबरुन त्याने ओरडायला सुरुवात केली. बाकी प्राणी तर जवळपास नव्हते पण झंपुने मात्र त्याचा आवाज ऐकला आणि तो पटकन दाट पानांमधून बाहेर आला.
समोरचे दृश्य बघून चांगलाच घाबरला पण त्याने वेळ न घालवता सगळ्यांना मदतीला बोलावले. झंपूचा आवाज ऐकून सगळे धावतच तिथे पोहचले. कांगोला दलदलीत फसलेले पाहून सगळेच काळजीत पडले. सिंह महाराजांनी कांगोला धीर दिला आणि अजिबात हालचाल करु नकोस असे सांगितले.
चिनू खारुताई सरसर सरसर जवळच्या झाडावर चढली. झाडाला वेढलेली वेल पटपट सोडवली आणि खाली घेऊन आली. वीरू हत्तीदादाने वेलीचे टोक कांगोकडे फेकले आणि त्याला घट्ट धरुन ठेवायला सांगितले. वीरुदादा हळूहळू वेल ओढू लागला. थोड्याच वेळात कांगो दलदलीतून बाहेर आला पण तो खूप घाबरला होता.
सोनूने त्याला शांत केले. जरावेळाने कांगो सावरला आहे बघून सिंह महाराजांनी त्याला या भागात येऊ नको असे सांगूनही येण्याचे कारण विचारले. “लपलेल्या प्राण्यांपैकी कोणीतरी वेगवेगळे आवाज काढत होते आणि त्या आवाजच्या मागे मागे इकडे आलो आणि काही समजायच्या आतच यात फसलो.” कांगोने खुलासा केला.
आपल्यामुळे चंपकवनात नवीन असलेला कांगो संकटात सापडला होता याचे वाईट वाटून झंपूने आपणच ते आवाज काढत होतो हे सांगितले. गंमत करता करता इकडे कधी आलो हे लक्षातही आले नाही. कांगोला मुद्दाम इथे आणले नाही असे म्हणून तो रडत त्याची माफी मागू लागला.
झंपूच्या खोड्या माहित असलेले सिंह महाराज खूप चिडले आणि त्याला चांगलेच ओरडू लागले. रडणाऱ्या झंपूला आपली चूक समजली हे बघून कांगो मधे पडला म्हणला, "यात एकटया झंपूची नाहीतर माझी पण चूक आहे. मी खेळाच्या नादात इकडे यायचे नाही हे विसरुन गेलो. नव्या जागेत काळजीपूर्वक वागायला हवे हे माझ्याही लक्षात यायला हवे होते.”


No comments:
Post a Comment
suggestions most wlcome