आधी काम मग आराम

एक खूप सुंदर बाग होती. बागेत वेगवेगळ्या प्रकारची फळझाडे आणि फुलझाडे होती. एका आंब्याच्या झाडावर एका ढोलीत खारुताई रहात होती,पेरूच्या झाडावर मधमाश्यांचं पोळं होत. फणसाच्या झाडाखाली मुंग्यांचं वारुळ होतं.तर बोराच्या झाडावर कोळ्यांचे जाळे होते.खारुताई,मधमाश्या,कोळीदादा आणि मुंग्या सतत काहीतरी काम करत असतं. एकमेकांसमोर आले की त्यांच्या थोडावेळ गप्पा व्हायच्या,विचारपूस व्हायची पण लगेच पुन्हा कामही सुरु व्हायचे.
एकदा त्या बागेत एक फुलपाखरु येते. रंगीबेरंगी फुलांवरुन उडते , फुलातील मधुरस पिते.
मग बागेत फिरताना त्याला मुंगीताई,कोळीदादा,खारुताई व मधमाशी असे एकेक जण दिसतात. बघावं तर सगळे सतत कामात जरा आराम नाही. फुलपाखरु नीट बघते तर प्रत्येक जण खाऊ जमा करण्याचे काम करतअसतात. खाऊ शोधून आणायचा आणि आपल्या घरात नेऊन ठेवायचा.
फुलपाखरु मुंगीताईजवळ जाते आणि म्हणते," अगं मुंगीताई, किती काम करतेस चल आपण खेळू या."
"मला आता वेळ नाही. लवकरच पावसाळा येईल ,त्याआधी मला पुरेसा खाऊ जमा करायला हवा."
"तू तर इतकी लहान इतका खाऊ कशाला हवा? "
"अरे पाऊस चार महिने पडतो तेव्हा खाऊ मिळतही नाही ,आता जमा करायचं आणि नंतर आराम करायचा ,चल मी जाते गप्पा मारायला मला वेळ नाही"
मुंगीताई नाही म्हणल्यावर फुलपाखरु मधमाशीकडे जाते .
"मधुताई तू तरी चल माझ्याशी खेळायला ."
"अरे मलाही आता खूप काम आहे , पावसळयाआधी मधुरस जमा झाला तर त्याचा मध करता येईल ."
"तू तर इतकी लहान इतका मध कशाला हवा ?"
" अरे पाऊस चार महिने पडतो तेव्हा खाऊ मिळतही नाही ,आता जमा करायचं आणि नंतर आराम करायचा ,चल मी जाते गप्पा मारायला मला वेळ नाही"
मधुताई नाही म्हणल्यावर फुलपाखरु खारुताई जाते ."खारुताई तू चल , आपण खेळू या मज्जा करूया "
मला वेळ नाही, आता पावसाळा येईल ,त्याआधी मला पुरेसा खाऊ जमा करायला हवा
"तू तर इतकी लहान इतका खाऊ कशाला हवा ?"
"अरे पाऊस चार महिने पडतो तेव्हा खाऊ मिळतही नाही ,आता जमा करायचं आणि नंतर आराम करायचा ,चल मी जाते गप्पा मारायला मला वेळ नाही"
खारुताई नाही म्हणल्यावर फुलपाखरु कोळीदादा जाते ." कोळीदादा तू तरी खेळशील का माझ्याशी ?"
"मला आता वेळ नाही , आता लवकरच पावसाळा येईल ,त्याआधी मला पुरेसा खाऊ जमा करायला हवा."
"तू तर नुसती जाळी विणतो आहेस , खाऊ कुठे आहे? "
"या जाळ्यात छोटे किडे अडकतात तोच माझा खाऊ , तू जा बरं मला काम करु दे."
कोणीच खेळायला येत नाही हे समजल्यावर फुलपाखरु दुसरीकडे निघून जाते.
थोडयाच दिवसात पाऊस सुरु होतो. कधी थोडा तर कधी खूप ,कधी भुरभुर तर कधी मुसळधार पण बागेतले आपले मित्र मजेत असतात त्यांच्याकडे भरपूर खाऊ असतो.
पावसाळ्यात ते आराम करतात,खेळतात, मजा करतात कारण आधी त्यांनी खूप काम केले असते ना !
आणि फुलपाखरु?
त्याची गंमतच होते. आधी भुरभुर पावसात ते छान भिजते मग झाडांच्या पानाआड लपून बसते . पण पाऊस थांबतच नाही मग मात्र त्याला कंटाळा येतो,भूक लागते पण करणार काय? तेव्हा त्याला मुंगीताई ,खारुताई ,मधमाशी आणि कोळीदादाची त्यांच्या कामाची आठवण होते.
बऱ्याच वेळानी पाऊस थांबतो तसं फुलपाखरु बागेत जाते . सगळ्यात आधी भेटतो कोळीदादा, " काय रे फुलपाखरा पावसात का फिरतो आहेस ,भिजला तर आजारी पडशील ."
"कोळीदादा माझं चुकलं मी तुमच्यासारखी पावसाळ्याची तयारी केली नाही. आता मला राहायला घर,खायला खाऊ पण नाही."
"अरेरे, मी तुला मदत केली असती पण माझा खाऊ तुला उपयोगी नाही आणि माझ्या जाळ्यात तुला रहाता पण येणार नाही ,पण मुंगीताई तुला नक्की मदत करेल तू तिच्याकडे जा."
फुलपाखरु मुंगीताईकडे जाते.
"मुंगीताई माझं चुकलं मी तुमच्यासारखी पावसाळ्याची तयारी केली नाही , आता मला राहायला घर आणि खायला खाऊ पण नाही."
"माझ्या वारुळात तू येऊ शकणार नाही पण मी तुला थोडा खाऊ देते."
मुंगीताईने दिलेला खाऊ खाऊन फुलपाखराला जरा तरतरी येते मग ते मधमाशीकडे जाते.
"मधुताई, माझं चुकलं मी तुमच्यासारखी पावसाळ्याची तयारी केली नाही, आता मला राहायला घर,खायला खाऊ नाही."
"मी तुला तेंव्हाच सांगितलं होत. आता काम नंतर आराम,तू ऐकलं नाहीस,मी तुला थोडा मध देईन पण तुला राहायला दुसरी जागा शोधावी लागेल."
जवळच ढोलीमध्ये खारुताई हे सगळं ऐकत असते.
ती म्हणते," या पावसाळ्यात तू माझ्या ढोलीत रहा पण यापुढे लक्षात ठेवायचं, आधी काम मग आराम."
फुलपाखराला खूप आनंद होतो. त्या पावसाळ्यात मुंगीताई, मधमाशी,खारुताई आणि कोळीदादा सगळे त्याला मदत करतात. आता मात्र पावसाळयाआधी फुलपाखरु पण खाऊ जमावतो. पानांच्या आड आडोसा तयार करतो.
त्याला आता छान समजलं आधी काम मग आराम !
***********************************************











No comments:
Post a Comment
suggestions most wlcome