आनंदवनातले सगळे प्राणी वेगवेगळे होते.प्रत्येकाची गंमत वेगळी. कुणाचा खाऊ वेगळा तर कुणाचे घर,कुणाचा आवाज तर कुणाचा आकार.
अशीच गंमत अस्वलाची.थंडीचे चार महिने सगळी अस्वल आपल्या गुहेमधे झोपून जायची.अगदी पूर्ण थंडी. हळूहळू थंडी कमी होऊन ऊन वाढू लागले की मग उठायची, पण इतके दिवस झोपून राहिल्यामुळे त्यांना खूप भूक लागायची.भुकेमुळे अस्वस्थ व्हायचे म्हणून सगळी अस्वल थंडी पडण्यापूर्वी पुरेसा खाऊ गुहेमधे जमवून ठेवायची आणि मगच निवांत झोपी जायची.
गोलू अस्वल आनंदवनात सगळ्यांचे लाडके होते.सगळ्यांशी खेळायचे,सगळ्यांना मदत करायचे.
एकदा काय झाले सगळ्या प्राण्यांनी मिळून आनंदवनात लहान पिल्लांना खेळायला एक छान बाग बनवायची ठरवली.तिथे पारंब्यांचे झोके,फांद्यांची घरसगुंडी,पोहायला तलाव अशा खूप गमतीजमती करण्याचे ठरले.
झंपू माकड,गजू हत्ती,लालू तरस,लंबू जिराफ,सोनू हरीण आणि गोलू अस्वल असे सगळे प्राणी मिळून तिथे काम करत होते.बाकी प्राणी त्यांच्यासाठी जेवण,पाणी याची व्यवस्था करायचे.बागेचे काम जोरात सुरु होते.सगळ्यांच्या मदतीने छान बाग तयार होत होती.
या कामाच्या नादात गोलू थंडीसाठी खाऊ जमा करायचा विसरुनच गेला.हळूहळू थंडी पडू लागली.कामामुळे गोलू खूप दमलाच होता आणि थंडीमुळे आता त्याला झोप अनावर होऊ लागली.
बागेच काम पटापट पूर्ण करुन गोलू जवळच असलेल्या एका वेगळ्याच गुहेत जाऊन झोपला.त्याला इतकी झोप आली होती की अस्वलांच्या गुहेपर्यंत जाणेही त्याला अशक्य झाले.
बघता बघता थंडीचे दिवस संपून गेले आणि ऊन वाढू लागले.गुहेत गरम होऊ लागल्याने नेहमीच्या गुहेतील एकेक अस्वले झोपेतून जागी होऊ लागली.जमवलेला खाऊ खाऊन गुहेतून बाहेर येऊ लागली.
इकडे गोलूही गरमीमुळे जागा झाला.इतके दिवस झोपल्यामुळे त्याला खूप भूक लागली होती पण त्या गुहेत खाऊच नव्हता.बाहेर पडून खाऊ शोधू असा विचार करुन गोलू गुहेबाहेर आला जरा वेळ फिरला पण त्याला काहीच मिळाले नाही.
भुकेमुळे त्याला अस्वस्थ वाटू लागले.त्याची चिडचिड होऊ लागली.तो वाटेतल्या झाडांवर हातापायने मारु लागला. झाड जोरजोराने हलवू लागला. त्यामुळे झाडावरची घरटी हलू लागली,असं का होतय बघायला पक्षी,खारुताई घाबरुन बाहेर आले, बघतात तर गोलू झाडं हलवत होता, जोरजोराने ओरडत होता.त्याला असा त्रास देताना कुणीच बघितले नव्हते त्यामुळे सगळे घाबरुन गेले.
चुटकी खारुताई घाबरतच पुढे आली आणि गोलूला आवाज देत म्हणाली,"अरे गोलूदादा काय झालंय तुला ? तू नेहमी सगळ्यांशी छान वागतो, सगळ्यांना मदत करतो मग आज असं का करतो आहे."
चिमू चिऊताई :- अशी जोराने झाड हलवली तर आमची घरटी खाली पडतील, पिल्लांना लागेल.
गोलू :- मला माफ करा मला तुम्हाला त्रास द्यायचा नाही पण मला खूप भूक लागली आहे.बागेच काम करताना दमल्यामुळे थंडीत मी वेगळ्याच गुहेत गेलो. उठल्यावर खायला खाऊही जमा करायचा विसरुन गेलो.दमल्यामुळे तेव्हा लक्षातच आलं नाही आणि आता भूक सहन होत नाहीये.
झंपू माकड :- इतकंच ना मग आम्ही कशासाठी आहोत.एरवी तू आम्हाला मदत करतो आज आम्हाला संधी मिळाली. थांब आम्ही सगळे मिळून तुला आमच्याकडे असलेला खाऊ देतो.
सगळे प्राणी पक्षी आपल्या घरात जाऊन जमा केलेला थोडा थोडा खाऊ घेऊन आले. थोड्याच वेळात शेंगा,फळे, सुकामेवा,कंदमुळे यांचा ढीग झाला.
गोलूने पोटभर खाऊ खाल्ला,नदीवर जाऊन पाणी प्यायला आणि परत आपल्या कामाला लागला.
सगळ्यांना मदत करणाऱ्या गोलूच्या मदतीला सगळे जण आनंदाने आले.पण तरीसुद्धा तेव्हापासून गोलू कितीही काम असलं तरी थंडीसाठी गुहेमधे भरपूर खाऊ आहे ना याची खात्री करतो आणि मगच शांतपणे झोपतो.






No comments:
Post a Comment
suggestions most wlcome