मैत्री स्वतःशी, तरच इतरांशी...
तर बघा हं, सगळ्यात आधी..
आरशासमोर उभे राहावे, समोर दिसणाऱ्या प्रतिबिंबाकडे एकटक बघत रहावे... काही वेळाने त्याच्या पलीकडे जाऊन, एरवी कुणालाही न दिसलेले, कशातच कैद न करता आलेले हे खोडकर, व्रात्य..,
तरी हवहवसं असणारं, आपलेच मन आपल्याला दिसते..
त्याचे डोळे अश्रूंनी गच्च भरलेले असतात..
वाहायचे असते त्यांना, पण गुरुत्वाकर्षणाचे सारे नियम धुडकावून ते अश्रू तिथेच राहतात..
जणू स्थितप्रज्ञ योगीच..
त्यांना खूप काही सांगायचे असते..
पण अजिबात सांगत नाही..
कारण आपण ओळखायला हवे, हा बालहट्ट..
साहजिकच ना..
सुरु असते धडपड, सगळे छान सुरळीत आहे सांगण्याची..
उगाच आनंदी दाखवण्याची..
खोटं, अगदी साफ खोटं हसण्याची..
आपण अजिबात भुलायचे नाही..
बिनधास्त विचारायचे..
काय होते आहे, मला सांग..
हवे तर मोठ्याने, हे गाणे लावायचे..
तुम इतना जो मुस्कुरा रहे हो...
क्या गम है जिसको छुपा रहे हो..
आँखों में नमी, हँसी लबों पर
क्या हाल है, क्या दिखा रहे हो..?
...
...
क्या गम है जिसको छुपा रहे हो?
तुम इतना जो मुस्कुरा रहे हो
बन जायेंगे ज़हर पीते-पीते
ये अश्क़ जो पीते जा रहे हो
...
...
जिन ज़ख्मों को वक़्त भर चला है
तुम क्यों उन्हें छेड़े जा रहे हो?
...
...
क्या गम है जिसको छुपा रहे हो
...
...
गाणं चालू असताना त्याच्याशी, डोळ्यांनीच मनापासून संवाद साधायचा..
अजिबात नजर हलवायची नाही..
मग ते हट्टी अश्रू, बांध तोडून वहायला लागतात..
सुरुवातीला याचा त्रास होतो..
आपण रडतो म्हणजे, कमजोर आहोत, असे न्यूनत्व येते, येऊ द्यावे..
काहीवेळाने तर अश्रू आवरता येत नाही, याचा संताप होतो..
खूप राग येतो, तो दाह शरीराला जाणवतो..
त्यापासून पळू नये, सहन करावा..
पण अश्रूंना थांबवू नये, ते वाहूच द्यावे..
या मागून मग भिती येते, जी मगरमिठी मारुन सांगते, असंच वाहत ठेवलंस तर तूच वाहून यात जाशील..
आपणही त्या भीतीला घट्ट उराशी घेऊन म्हणावे...
जायचेच आहे मला वाहून, तुला थोडी सांगते आहे आधार द्यायला..
मी आहे माझ्यासाठी..
ती भिती खोचक हसून, मोकळं करते आपल्याला..
पण उभी राहते कोपऱ्यात, गंमत बघायला..
पण तिला अजिबात घाबरु नये..
क्षणात सवय होते, तीच्या असण्याची..
आपण फक्त अश्रूंना वाहू द्यावे..
काही वेळाने जसे दाटून आलेले मळभ, रिते रिते होऊन स्वच्छ निळेशार आकाश उरते, तसेच काहीसे, त्या मन नावाच्या बाळाचे होते..
त्याच्या साऱ्या चिंता, प्रश्न, व्देष, इर्षा, चेष्टा काही वेळा अति आनंद, जो अस्वस्थ करत असतो, तो त्या अश्रूंसोबत वाहून जातो आणि उरते ते..
नवजात बालक..
आता त्याचे बोलके डोळे, फक्त बघत असतात..
जणू पुन्हा नव्याने सगळ्याकडे, बघायला उत्सुक असतात..
मग आपणही त्यासाठी तयार व्हावं..
त्याला दिलासा देऊन, एक हसरा कटाक्ष द्यावा-घ्यावा..
हा सारा संवाद शब्दांशिवायच होत असतो...
आता त्या नजरेत दिसू लागतात, नवी स्वप्न, नवी उमेद..
आणि पुन्हा नव्याने धडपडण्याची, ठेचकाळण्याची जिद्द..
इथे मात्र आपण, नाही म्हणू नये..
मनापासून होकार द्यावा..
कर हवं ते, होऊ दे पुन्हा काहीही..
सर्वात आधी मी आहे, तुझ्यासाठी..
हे विश्वासाने, त्याही पलीकडे जाऊन, हक्काने सांगावे..
मायेच्या नजरेतून..
त्यानंतर पुढे होऊन, कृतीतून..
त्यासाठी मग...
बंद करावे डोळे..
मनाला बोलवावे पुन्हा परत, आपल्या आत..
माहिती नसलेल्या, त्याच्या या शरीरातल्या जागी..
त्या जाणीवेने, स्पर्शाने व्यापून जावे, अनुभवत राहावे, त्याचे श्वासासोबत शरीरभर फिरणे..
आपलेच हात, आपल्याभोवती गुरफटून घट्ट मिठीत घ्यावे स्वतःला..
अगदी मायेने, प्रेमाने शब्दातूनही म्हणावे..
मी आहे तुझ्यासाठी, आणि मलाही फक्त तूच आहेस..
तुझ्याशिवाय मी किंवा माझ्याशिवाय तू असूच शकत नाही..
म्हणूनच आपण असायचे आहे, एकमेकांसाठी..
अगदी नेहमीच..
हाडाचा दुभाषी, जो शांततेची कथा निरागस हास्यात उलगडू शकतो..
तो दुसरा - तिसरा कोणी नसून आपणच असतो आपल्यासाठी..!
.....
.....
.....
....
खराखुरा अनुभव सांगते, असे जेंव्हा जेंव्हा माझ्यासोबत होते, त्यानंतर आधी मीच माझ्या प्रेमात पडते..
नंतर बघणाऱ्या कुणालाही हेवा वाटेल, इतकी सुंदर दिसते..
ऐकणाऱ्याला, मी बोलतच रहावे असे वाटते..
लिहायला बसले तर..
हे मी नाही लिहिलेले, असे वाटावे इतके काहीतरी भारी शब्दातून कागदावर उतरते..
थोडक्यात सगळी अस्वस्थता दूर होऊन, हरवलेली माझी मी, मला सापडते..
बघा, तुम्हीही अनुभव घेऊन...
नाहीच झाला फायदा तर चिंता नाही, असे अजूनही खूप उपाय आहेत माझ्याकडे..
सांगणार आहे एकेक करुन..
आवडेल ना वाचायला..
समजून घ्यायला..
मुख्य म्हणजे, स्वतःची मदत करुन स्वतःला सावरायला, स्वतः वरच प्रेम करायला..
स्वतःशी मैत्री करायला..
कारण मैत्री स्वतःशी, तरच इतरांशी...!



खूप छान मांडणी केली. नक्कीच उपयोगी आहे.👌👌
ReplyDeleteमनःपूर्वक आभार 🤩🌟❣️
Deleteखुप छान लेख. खरं आहे. सहमत.
ReplyDeleteमनःपूर्वक आभार 🤩🌟❣️
Deleteअंगावर काटा उभा राहीला.
ReplyDeleteआपलं मन हा एक वेड्याचाच एक भाग असतं. आपलं मन हे एक अनाकलनीय विश्वाचाच भाग असतं. ते गाईचं टणाटण उडया मारत फिरणारं नवजात अर्भक असतं. पण ते आपलं आपलंच असतं. अन तेच तर आपलं जगाला न कळु शकणारं विश्व असतं। त्याला आपणच समजवायचं असतं. त्याला आपणच समजुन घ्यायचं असतं.
खुप मस्त लेख.
मनःपूर्वक आभार 🤩🌟❣️
ReplyDeleteअगदी खरे.. मैत्री स्वतःशी तरच ईतरांशी👍👌
ReplyDeleteखूपच सुंदर,मनाला ओळखले
ReplyDeleteखूपच सुंदर
ReplyDelete