बायकोचा......मित्र...!
मोबाईलची मेसेज रिंग सारखी वाजत होती...
स्वातीने वैतागून बघितले आणि दुर्लक्ष करत हातातले काम उरकले...
जरावेळाने एकेक करत, तिची घरातली बऱ्यापैकी कामे उरकली...
आता फ्रेश होऊन, तिला वर्क फ्रॉम होम असं म्हणत.... काम सुरु करायचं होतं...
सुरुवातीला काहीतरी नवीन, आजूबाजूला होणाऱ्या परिस्थितीचा स्वीकार म्हणून छान वाटत होतं...
पण आता मात्र ती खूप कंटाळली, वैतागली होती...
या घरुन काम करण्यात, तिची सोय कमी आणि गैरसोयच जास्त.... सतत काही ना काही मागण्या, कधी खाण्याचे पदार्थ, वस्तू न सापडणं, इतर कामात मदत..
हे ती कधी मनापासून, तर कधी मनाविरुद्ध पूर्णही करत होती...असं वर्षभर सुरु होतं...
तिला अगदी कैद झाल्यासारखे वाटत होते...म्हणूनच आज तीने पक्क ठरवले...
काहीही झालं तरी, सकाळीच मोबाईल हातात घेऊन, स्वतःची अजून चार काम ओढवून घ्यायची नाहीत...
बाकीच्यांसारखी निवांत टाळायची...आपणच काय तो, प्रामाणिकपणाचा मक्ता घेतलाय....
तितकेच तातडीचे काम, तर फोन येईल...तिचा मनाशीच संवाद सुरु होता...
ठरवल्याप्रमाणे सगळं झाल्यावरच, तीने मोबाईल हातात घेतला...
इनबॉक्स गच्च भरला होता...
त्यातले बरेचसे फॉरवर्ड, काही काळजी वाहू, काही सवयीने येणारे ...
त्यावरुन एक धावती नजर टाकत, आवश्यक तिथे प्रतिसादही दिला...
त्यानंतर कामाचे गृपही बघितले... ठरवलं होतं, त्यानुसार दोन-तीन कामे परस्पर दुसऱ्यांकडे गेली होती...
काहीस बरं वाटून ती राहिलेले मेसेज बघत होती... तसा तिच्याकडे अजून थोडावेळ होता...
इतक्यात एका मेसेजने तीचे लक्ष वेधून घेतले...
"काय करतेस...?"... आज इतक्या दिवसांनी नीरजचा मेसेज कसा..?
मधे दोन-तीनदा मी पाठवलेल्या मेसेजला बिझी आहे..., म्हणून रिप्लाय दिला...
आणि आज सकाळीच मेसेज करतो... "काय करतेस...?"
मनात वैतागून ... , "काय करणार सकाळी सकाळी..." असं टाईप केलं...
पण आपणही त्याने केले तसेच केले, तर त्याच्यात आणि आपल्यात काय फरक....आणि असेलही तेंव्हा तो कामात.... आता आपणही आहोतच..,
पण तरी थोडावेळ आहे म्हणून..... लिहिलेले खोडलं आणि... काय पाठवू..... विचार करु लागली...
सध्याचा वैताग जरा बाजूला ठेवला, तर काय बरं म्हणलो असतो आपण....?
"तू सांग...काय करु...? 🤔" (टाईप करुन पाठवून दिले)
त्याचा मेसेज किमान तासापूर्वीचा असूनही, तिच्या प्रतिसादाला लगेच पुन्हा प्रतिसाद आला....
जणू तो वाटच बघत असावा....
"गप्पा मार माझ्याशी....🤩"
"अरे आता, ऑफिस सुरु होईल दहा मिनिटांत...तू बिझी आणि मी काय रिकामटेकडी....?😠"
"सॉरी ग, त्यासाठी😫....पण आज सुटी घे ना, माझ्यासाठी...🙏🏻"
"आणि का म्हणे, कारण काय सांगू...?"
"काहीही सांग.... आजारी आहेस...🤕 तू.... घरातले कुणीतरी...."
"😁... आणि घरात काय सांगू....?"
"ऑफिसचे काम करतेय, असंच दाखव...👩🏻💻 नाहीतर तुला हवं ते.... ते मी नाही सांगणार... तुझ्या सोयीने...😎"
"पण आज काय झालंय, असं अचानक....🤨"
"खरं सांगू....?"
"अरे, मस्करी करायची वेळ आहे का ही....😡?"
"मी मस्करी नाही करत.... पण मला ना खूप रेस्टलेस वाटतंय....😔"
"काय होतंय.... डॉ. कडे गेला का...?घरी कुणी नाही का?..."
"ऐक ना... ते सगळं सांगतो पण तू आधी सुटीच बघ ... उगाच नंतर गोंधळ नको... म्हणून तर मी लवकर मेसेज केला होता ना....पण तू आज एकदम गायब..."
"बरं थांब, फोन करते... आणि कळवते तुला...."
एकीकडे तिची अस्वस्थता वाढली ... काय होत असेल.... त्याला काही मदत हवी असेल का?...कोणाला सांगता येईल.... ?
दुसरीकडे सुटीसाठी फोन लावला... आणि आश्चर्य म्हणजे सुटी मिळालीही...
पण त्याचा आनंद ...आश्चर्य यापेक्षा आता तिला नीरजची काळजीच जास्त होती...
तीने लगेच त्याला फोन लावला... एकदा.... दोनदा.... ३...४...८..
रींग जात होती, पण तो फोन उचलत नव्हता...
आता तर ती प्रचंड अस्वस्थ झाली... काय झालं असेल...?
अजून एकदा प्रयत्न करू, नाहीतर.... परत फोन लावला, पण यावेळी कट झाला....
आणि मेसेज आला...
"अग हो ....हो... इतकी पॅनिक नको होवू... अंघोळीला गेलो होतो... तेवढ्यात इतके फोन... आणि हो फोनवर बोलणार नाहीये मी..."
"काय चाललंय तुझं...?, इथे मला अँटॅक येणं बाकी होत... फोन नको काय... खेळ वाटतोय का?"
"म्हणलं तर हो... खेळच खेळायचा आहे गप्पांचा....मी मगाशी म्हणलं गप्पा मार माझ्याशी... तू कारण विचारलं.... मी सरळ सांगितलं असतं... उगाच, असंच, काही कारण नाही ... तर हजार कारण दिली असतीस... म्हणून म्हणलं जरा अस्वस्थ आहे...मग घेतलीस की नाही सुटी...!"
"अशक्य आहेस रे.... 🤦♀️"
"😎हम तो ऐसें ही हैं.... तुला आज कळलं असेल...😜"
"😏आज कशाला, मला चांगलाच माहितीये तू....फक्त आज जरा अंदाज चुकला... आधीच लक्षात यायला हवं होतं माझ्या..."
"मग काय सुटी कॅन्सल करतेस...🤔?"
"सारख्या थापा मारायला मी म्हणजे काय तू ...😟"
"मग...? घरातली काम करणारेस..."
"त्यांना अंत असतो का...?😭"
"अग, मग....?😇"
"गप्पा मारायच्या ना... तुझ्याशी 💛"
"आता कस्स.....🤎🧡💚💙🤍"
".....😁......"
".....👊🏻......"
".....🌷..."
".......🦚....."
"....💕..."
"......💝.."
"....💔..."
"......😭."
( विषय नसलेल्या गप्पांना ऊत आला होता, स्वातीचा मूड एकदम बदलला होता..सकळचा वैताग एकदम पळून गेला होता.. )
"साहेब, माहिती म्हणून सांगते... दोन तास मेसेज, मेसेज खेळतोय, आपण....😱"
"कंटाळली का...😭.?"
"ही काय पहिली वेळ आहे का...?"
"नाही, पण आज खूप दिवसांनी बोलतोय ना... ना विषय, ना कारण..."
"विषय... कारण....?, एरवी तरी कुठे असतात..! "
"आज काल मला वेळ कुठे असतो......मी बिझी नसेल तेंव्हा तू बिझी....?"
"खेचssच हं.... मीच सापडले आहे ना सकाळपासून....."
"म्हणलं तर हो.... फक्त तुझ्यासोबतच बोलतोय आज...."
"सत्कार करु....?"
"तो मी करायला हवा, तू स्पेशल सुटी घेतलीस... पण प्रश्नाच उत्तर राहील ते दे आधी...कंटाळलीस का...?"
"शक्य आहे का....? आपल्या गप्पा मला नेहमीच फ्रेश करतात... खूप रिलॅक्स वाटतं... मनातलं वादळ, अस्वस्थता, वैताग पळून जातो तेही त्याविषयी न सांगता....💙💚💛🧡"
"मॅडम इतकी तारीफ नका करु हो... विरघळून जाईल ... माझ्या एकुलत्या एक बायकोचा एकुलता एक नवरा, लेकीचा एकच बाबा आहे....🥴"
"झाला फालतुपणा...😡"
"😜सुरुवात तू केली.... फक्त कंटाळली का....विचारलं....?"
"नाही रे, पण जेवणाची वेळ झालीये....मोबाईलची बॅटरी पण संपत आलीये..."
"ओके...मोबाईल रिचार्ज कर......जेवण,आवराआवरी करुन, मग कर परत मेसेज..."
"आज तुमच्या सौ, लेक नाहीत वाटतं घरी ? "
"हे आत्ता आठवलं तुम्हाला... आहेत, दोघीही पण मी सांगितले की, आज मला अजिबात त्रास नाही द्यायचा.... तेही मी सांगेपर्यत...🙃"
"वा .... कौतुक करायला हवं ऐकतात म्हणून..."
"कसल्या ऐकतात... येत रहातात मधून मधून,🧐 मीच नाही लक्ष देत...तुला बरं एकट सोडलंय घरच्यांनी...."
"याचं मलाही आश्चर्य वाटतंय, कारण रोज ऑफिस चालू असलं, तरी हजारदा मध्ये मध्ये येतात... काही ना काही हवंच असतं "
"जा आणि बघ नाहीतर तुला घरात, बंद करुन गेले असतील सगळे फिरायला...😬😂"
"एरवी असंही करायला कमी करणार नाहीत पण सध्या त्यालाही स्कोप नाही...पण तरी आता आपण जरा ब्रेक घेऊयात...🙃"
"मॅडम तुम्ही म्हणाल तसं..."
ती उठून स्वयंपाक घराकडे जाणार, इतक्यात हातात ताट मिळालं... सकाळच्या स्वयंपाकात सुयशने ( स्वातीचा नवरा) पापड, कोशिंबीरची न सांगता भरही घातली होती....
ती खूप दिवसांनी मनापासून जेवत होती... कारण खुश होती... आज सगळंच मनासारख होत होतं....
जेवणानंतर थोडावेळ पुन्हा नीरजसोबत मेसेज गप्पा झाल्या, पण नकळत केंव्हा डोळा लागला ते तिला समजलं पण नाही...🥱😴😴😴
सुयश चहा घेऊन आला आणि उठवलं तेंव्हा स्वाती उठली...
आयता चहा... पुन्हा एक धक्का... मनापासून एकेक घोट चहा पिताना... मेसेज रिंग दोनदा वाजली...
चहा पूर्ण संपवून, मगच तीने बघितले....
"मॅडम इंडिया .........👻... कुठे गायब...? झोपलात ना नेहमीसारख्या, मला इथे चक्क्यासारखं टांगत ठेवून..."
"ओय नौटंकी.... मी ढीग टांगेन तुला, चक्का म्हणून..... पण तू बरं तसं करून घेशील... गेले दोन तास अजिबात मेसेज नाहीत तुझे.... बापरे, म्हणजे मी इतका वेळ झोपले... पण तुला कसं कळलं मी उठले ते..."
"बेटा,हमें सिद्धी प्राप्त हैं ...🙌🏻 .."
"राहू दे महाराज, स्वतःची झोप झाली असेल, म्हणून खडा मारला नि लागला... हीच तुमची सिद्धी...🙄"
"हा... हा... तुम्ही म्हणाल तसं.... मग आता काय...?"
"राजे.... आता काही नाही.... उठणार... मस्तपैकी काहीतरी स्पेशल खायला बनवणार...सगळ्यांसोबत बसून चापणार... उद्यापासून आहेच परत रुटीन...."
"म्हणजे आता तू मला असंच, अस्वस्थ सोडून निघून जाणार....😭😭😭?"
"तू अस्वस्थ.... ची टांग..... इतक्या वेळात इतकं तर नक्कीच कळलं आहे मला, की तू अस्वस्थ🤨 रेस्टलेस असलं काही नाहीस....कदाचित मीच होते....आणि तू हे सगळं मुद्दाम केले...हो ना...? अगदी ठरवून.... एकदम खरं - खरं सांग.....तेही फार न लांबवता.... ते अंतर्ज्ञान, दिव्यशक्ती.... फालतूपणा काहीही न करता..."
"जो हुकूम मेरे आका.... मला अंतर्ज्ञानाने नाही आंतरजालाने सांगितले...📲💻"
"आंतरजाल....?🙄सरळ बोलणार का....?"
"मॅडम तुमच्या सतत बदलणाऱ्या स्टेटसने....📲... त्यात एक प्रकारचा वैताग... त्रस्तता...निगेटिव्हिटी होती, ती वाढत चालली होती...आणि....."
"आणि काय.... आणि....😡......"
"ती वाढली तर तू वेडी होऊन घरातल्यांना...😈👹...."
"ए हॅलो.... मार खायचाय तुला ....😠 "
"बघ... बघ ...झाली की नाही व्हायलंट....पण तू मला कशी मारशील..... मी बंगलोरमध्ये एकदम सुखरुप आहे...तू ठरवलं तरी नाही येऊ शकत...😂😉"
"मी येऊ नाही शकले तरी तुझी बायको... लेक यांना नक्कीच सांगू शकते, तुला बडवायला.... आणि तुला चांगलं माहितीये की त्या हे नक्की करतील....😛"
"😱 घाबरलो.... शब्द मागे..."
"जाओ बच्चा माफ कर दिया..... जिलो अपनी जिंदगी...🙃...!"
"वा क्या बात... याचा अर्थ आता आपण, मूळ स्वभावात आल्या आहात तर 💜🤍🧡💛"
"हो... मला ना आता खूप रिलॅक्स वाटतंय.... आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी हातात नाहीत.... वैतागायच नाही, हे सगळं ठरवलं तरी... सलग इतका काळ जमवण अवघड झालं आहे...."
"येस आय नो...."
"आम्ही बायका ना मनापासून घर, संसार, मुलं, नोकरी सांभाळत असतो... मला तर घरचेही खूप मदत करतात .... कामाचा ताण नसतो... पण सध्या ना बहिणाबाईंचे वढाय मन सांभाळण अवघड झालंय... एरवी घरातून थोडावेळ बाहेर पडल तरी फ्रेश होत... आपल्यापेक्षा मोठे प्रश्न असणारे दिसतात.... विनाकारण हसण, चिडणं... कधीतरी दुसऱ्यांच्या दुःखात सहभाग घेताना अगदी रडणंही होत.. यातून सगळ्या भावनांचा निचरा होतो...."
"आणि आता घरात बसून.... रोज तेच तेच... सगळं चौकोनात अडकून गेलंय.... म्हणून तर हा🧞♂️ जिनी तुमच्या सेवेला हाजीर झाला..."
"म्हणे सेवेला हाजीर झाला... मी मेसेज केला तर बिझी आहे म्हणला आता म्हणतो सेवेला हाजीर....😏😫"
"त्यासाठी किती वेळा माफी मागू.... हवं तर शिक्षा सांग.... हुकूम कर....पण चिडू नको बाई..."
"तो जिनी 🧞♂️तुम्हे हुकूम हैं... अपने दिये में वापस जाओ... अपनी बिवी, बेटी को वक्त दो.... मुझे सतना बंद करो...."
"मैं सता रहा हूँ...🥵 .....याला म्हणतात चोराचा उलट्या बोंबा...😫"
"नाही....गरज सरो वैद्य मरो😝..."
"या अल्ला मुझे बचा इस....😭"
"ए नौटंकी... खरंच किमान आज पुरते तरी बास करु.... मला चहा घेऊनही, दोन तास झालेत... आणि..."
"आणि काय.... आता खरचं कंटाळा आला मेसेज करायचा....🥱"
"🙈....हो "
"जा सिमरन जा... राज तुम्हारी..."
"पिताजी ये एहसान...🥴.."
"🙄.... पिताजी.... नको, आता आपण खरचं थांबू या..."
"🤣🤣🤣....."
"माते,🙏🏻यापुढे असा वैताग वाढला... तर उगाच फालतू स्टेटस अपडेट करण्यापेक्षा माझी गरीबाची आठवण काढा... तुमच्या सेवेला हजर होऊ.... नाही झालो तर जबरदस्तीने डोक्यावर बसा, पण .... कृपा करुन वैतागू नका... कारण मला तुमच्यापेक्षा तुमच्या घरच्यांची जास्त काळजी वाटते...😝😝😝"
"हो रे, बाळा... लक्षात ठेवेन हं...🙌🏻.. तुझं कल्याण असो....😇.... आता नो मेसेज .... फायनल बाय बाय.....टाटा... शब्बा खेर....."
"👋🏻👋🏻👋🏻👋🏻...."
आता काही तास तरी मोबाईल नको होता.... म्हणून तीने तो स्विच ऑफच करुन टाकला....
सकाळची वैतागलेली स्वाती... एखादया लहान मुलीसारखी नाचत, गुणगुणत रुम बाहेर आली...
तिचा मुलगा बघतच राहिला.... त्याने थोडेसे चिंतेने...बाबाकडे बघितले....
बाबाने हसत डोळा मारला...मुलाला अजून एक धक्का...
बाबा हळूच.... डोन्ट वरी.... गंमत बघ म्हणला....
तसंही, मुलाला सकाळपासून घरात काय चाललंय कळतच नव्हतं...
स्वातीने दोघांना विचारलं, "आज खायला काय करु...?"
"अग आई....बाबाने मगाशीच मस्त मिसळ बनवली, ब्रेड पण आणलाय.... तुला कळायला नको म्हणून फार आवाज न करता केलं सगळं आणि मला पण सांगू नको..... सरप्राईज देऊ..! म्हणला...."
"अरे मस्तच.... ओss अहो आज काय स्पेशल.... सूर्य पश्चिमेला तर नाही ना उगवला.... सकाळी हातात जेवण, तेही पापड, कोशिंबीरीसहित... नंतर चहा आणि आता मिसळ...."
"काही नाही... आज जरा मोकळा वेळ होता.... फार काम नव्हतं....त्यात तू सकाळपासून खूपच कामात दिसलीस... मग मी हाफ डे सुटी घेतली...."
"कायsss तू पण सुटी घेतली....."
"मी पण म्हणजे....?"
"म्हणजे काही नाही, नंतर सांगते..."
"आता ना, मी मस्त फ्रेश होऊन तयारी करते...आपण घरातल्या घरातच पावरी (पार्टी) करु... तुम्ही दोघे पण तुमचं आटपून तयार व्हा... मस्त फोटो पण काढू..."
आईला खूप दिवसांनी इतकं खुश बघून लेक उडालाच... कारण रोज तिची सगळ्यात जास्त चिडचिड त्याच्यावरच व्हायची....
इकडे सुयशने नीरजला मेसेज केला....
"थँक्स... तुझी मात्रा लागू पडली... मला माहिती नाही, तुम्हा मित्र-मैत्रिणीत काय ट्यूनींग आहे ते.... पण तुमच्या गप्पा झाल्या ना की ती एकदम बदलून जाते... खूप खुश होते... एरवी फिरायला जाण, मित्र मैत्रिणीना भेटण, कामावरचे इव्हेंटही असतात रिलॅक्स व्हायला.... पण आता वर्ष झालं, हे सगळं थांबल आहे.... ऑनलाइन होतात बऱ्याच गोष्टी....पण त्याला तो जिवंतपणा नाही.... आम्ही आमच्या पद्धतीने होईल ती मदत करतोच.... पण सतत येणारे निगेटिव्ह मेसेज.... बातम्या यातून वाढलेल्या निगेटिव्हिटीवर... उपाय ज्याचे त्यालाच शोधावे लागतात.... तिला तेच जमत नव्हतं... आणि मला काय करु समजत नव्हतं म्हणून तुला मदत मागितली...."
"बस्स का आता तूही सत्कार समारंभ करणार काय... खरं तर तीने मला मध्ये मेसेज केले होते रे, पण मी खरंच बिझी होतो... तिच्या स्टेटसवरुन कळलचं असतं... पण खरं सांगतो पण सध्या तोही वेळ नाही होत... हे ऑनलाइन खूप हेक्टिक आहे रे सगळ्यांनाच.... म्हणून तर बरेच दिवसात विशेष मेसेज, गप्पा नव्हत्या आमच्या....मला हे सगळं तिच्या स्टेट्सवरुन कळलं, असं सांग.... ही तुझी आयडिया मात्र परफेक्ट लागू झाली, नाहीतर मी तिला सांगितलच असत.... की हे सगळं मला तुझ्या नवऱ्याने सांगितले म्हणून...."
"नशीब नाही सांगितलेस.... काही वेळा आपला नवरा आपल्याला विशेष ओळखत नाही... त्याला आपल्या मनातलं कळत नाही याचा एक वेगळाच आनंद असतो या बायकांना....😉"
"😜 एकदम बरोबर .... मानलं पाहिजे तुला.... खूप छान ओळखतोस बायकोला आणि जपतोस पण.... नाहीतर हे असं कोण, खुपवून घेईल का.... बायकोचा मित्र.... गप्पा.... भेटी...."
"त्याबाबतीत तिच्यावर पूर्ण विश्वास आहे... आणि तुझ्यावरही... मलाही भरपूर मैत्रिणी आहेतच की... सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक नात्याचे एक स्वतंत्र अस्तित्व असतते... त्यातल्या गरजा... फायदे... आनंद.... मोकळीक असते आणि मर्यादा सुद्धा....नवरा चांगला मित्र असला, तरी त्याच्याशी काही गोष्टी नाही बोलता येत किंवा दोघांच्या सगळ्या आवडी जुळतातच असंही नाही... स्पेशली गप्पांचे विषय.... त्यासाठी बायकोला मैत्रिणीच किंवा नवऱ्याला मित्रच हवा.... असं थोडंच आहे... बायकोचा एखादा मित्र असला, तर तो काही लगेच पळवून नाही नेत तिला.... आणि नेलच तर....😜"
"😝 नाही रे बाबा.... नको अजिबात😉..... तुझी बायको तुलाच लखलाभ....आम्ही गप्पा मारणं, जमून आलं तर कधीतरी भेटणं... तेही गप्पा मारायलाच...😉"
"मी शंका घेतली का कधी..? की विरोध केला ....?"
"म्हणूनच तर म्हणलं... मानायला हवं तुला आणि शिकायलाही हवं तुझ्याकडून...."
"याचं ट्रेंनिग परत कधीतरी नक्की देईन.... स्वाती येईल इतक्यात... तिला फोन बंद करणार म्हणून सांगितले आहे.... तुला परत एकदा मनापासून थँक्स... अजून एक रिक्वेस्ट, मी सांगितले नाही, तरी अधून मधून न विसरता तिला मेसेज करत रहा..... आणि हो गरज असेल तर असा एखादा हटके उपाय तुझ्या बायकोला किंवा लेकीला हवा असेल, तर त्याचा शोध घे...... हॅव व ग्रेट डे.... एव्हीनींग... नाईट जे असेल ते🤣....."
"😃 सेम टू यू ऑल.... एन्जॉय युअर पावरी (पार्टी).... मॅडमने स्टेट्स अपडेट केलाय😉 आणि तुझी रिक्वेस्ट, सल्ला सगळं लक्षात ठेवेन....पुन्हा एकदा तुला आणि तुझ्या बायकोवरच्या प्रेमाला, विश्वासाला सलाम... "
इकडे स्वाती अगदी मस्त तयार झाली होती....जेवणाचे टेबलही छान सजवले होते.... खूप दिवसांनी मस्त आनंदी वातावरण होते.... फोटो झाले.... गप्पा-विनोद.... एकदम फुल्ल ऑन....
रात्री सुयशच्या कुशीत शिरुन स्वातीने... सवयीनुसार.... नीरजचा अचानक आलेला मेसेज, सुटी, टाईमपास-गप्पा वगैरे सगळं सुयशला मोकळेपणाने सांगूनही टाकलं.... त्याने यातल काहीही माहिती नाही, याचे हुबेहूब नाटकही केलं.... आणि तिला लहान बाळासारखं थोपटत त्याच आनंदात झोपू दिलं....
या सगळ्यात तिची चिडचिड ज्यामुळे वाढत होती, ते प्रश्न कदाचित सुटले नसले तरी.....
त्याकडे नव्याने बघण्याची एक वेगळीच ताकद, मानसिक शांतता तिला आता मिळाली आहे, याचा सगळ्यात जास्त आनंद सुयशला होता....
आणि म्हणूनच सुयशला, स्वाती-नीरजच्या निखळ, निकोप मैत्रीचा आदर... त्याहीपेक्षा खूप मोठा आधार वाटायचा...
म्हणूनच मनोमन अशी निखळ मैत्री प्रत्येकाला लाभू दे असे पसायदान मागत... त्यानेही स्वतःला निद्रादेवीच्या स्वाधीन केले.
*******************************

जबरदस्त 👌🏼😍😍
ReplyDeleteकिती गोड लिहिलंयस ❤️❤️ खूप आवडलं
आणि ते शेवटचं वाक्य " आदर पेक्षा आधार जास्त वाटायचा" हे अगदी मनातलं
अशी मैत्री सगळ्यांना लाभो 🌈
मनापासून आभार !
Deleteसुंदर लिखाण
ReplyDeleteमनापासून आभार !
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete