संत जनाबाईंचे अभंग
मला सतत अध्यात्म वाचायला, लिहायला किंवा बोलायला आवडते असं काही नाही,
पण आपली संस्कृती, परंपरा सांगणारा या विषयांमध्ये येणारा संत साहित्याचा ठेवा, इतका अफाट सुंदर आणि सहज, सोपा आहे. त्यातील विचार आपण दैनंदिन कृतीत आणू शकतो.
आणि म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, "एक तरी ओवी अनुभवावी."
अशीच मनाला अतिशय भावलेली एक ओवी म्हणजेच, संत जनाबाई यांचा हा अभंग..
जनी जाय पाणियासि, मागे धावे हृषिकेशी,
पाय भिजों नेदी हात , माथा घागरी वहात,
पाणी रांजणांत भरी, सडासारवण करी,
धुणें धुऊनिया आणी, ह्मणे नामयाची जनी
आता यातून मला नेमका काय अनुभव येतो, हे थोडक्यात मांडायचा प्रयत्न करते...
संत जनाबाई, या समाजाने लादले होते म्हणून शूद्र वर्णाच्या (श्रमजीवी)..
(ब्राह्मण, वैश्य, वाणी, शूद्र या वर्णांचे खरे स्वरुप अनेकांना माहीत नसल्याने, समाजाने लादलेल्या असा उल्लेख जाणीव पूर्वक केला आहे, लवकरच या विषयावर लेखन करेन)
जनाबाई संत नामदेवांच्या घरी, दासी म्हणून काम करत होत्या.
त्या काळाचा एकूणच जाती व्यवस्थेचा पगडा बघता, त्यांना नामदेवांच्या घरात, विठ्ठल मंदिरात, कोणत्याही कार्यक्रम किंवा समारंभामध्ये प्रवेश नव्हता.
एवढेच नाहीतर, त्यांच्या वाट्याला सतत कष्टाची कामे, हीन दर्जाची वागणूक, हेच जास्तीत जास्त यायचे...
तरीही या अभंगात दिसणाऱ्या त्यांच्या, कल्पनाशक्तीला केवळ सलाम..
स्वतःच्या कष्टदायी कामाचे, काय सुंदर वर्णन अनुभवता येते, ते एकेक ओळ घेऊन मांडते..
त्या काळामध्ये आजच्या सारखे नळ, चोवीस तास पाणी, घरात पाण्याच्या भरपूर टाक्या भरलेल्या अशा सोयी नव्हत्या...
खूप दूरवर जाऊन, नदीतून, विहिरीतून पाणी आणावे लागायचे...
तर असं पाणी आणण्याचे, काम करताना जनाबाई म्हणतात,
जनी जाय पाणियासि, मागे धावे हृषिकेशी
पाणी आणायला लागते, याचे कष्ट त्यांना जाणवत नाहीत, कारण त्यात त्यांना मदत करायला,
ऋषिकेश म्हणजेच भगवान श्रीकृष्ण येतात...
जनाबईंचे कृष्णावर अतिशय प्रेम होते..
त्याला देव म्हणून बघण्यापेक्षा, एक मित्र, सखा, प्रियकर म्हणायला त्यांना आवडायचे, हे अनेक अभंगात बघायला मिळते...
तर जनाबाईंना वाटते की कष्ट होऊ नयेत, म्हणून कृष्णच त्यांच्यामागे धावतोय,
पाय भिजों नेदी हात , माथा घागरी वहात
कृष्ण फक्त त्यांच्यासोबत येत नाही, तर तो प्रत्यक्ष त्या पाण्याने भरलेल्या घागरी वाहण्याचे, डोक्यावर उचलून नेण्याचे कामही करत आहे...
पाणी रांजणांत भरी, सडा सारवण करी
रांजण म्हणजे, पाणी साठवण्याचे खूप मोठे मातीचे भांडे...माठ...
तो पूर्ण भरण्यासाठी जेवढं पाणी आणायला लागेल, असे अनेक रांजण पाणी त्यांना रोज भरावे लागते..
ते सारे पाणी कृष्ण जनाबाईंसोबत, डोक्यावर वाहून आणत आहे...
पाणी आणून झाल्यानंतर, सडा-सारवण म्हणजे पूर्वीच्या काळी अंगण हे मातीचे असायचे, त्याला शेणाने सारवले जायचे...
तर, तेही काम कृष्ण त्यांच्यासाठी करतो आहे..
धुणें धुऊनिया आणी, ह्मणे नामयाची जनी
इतक, करून कृष्ण थांबत नाही तर नामदेवांच्या या दासीला,
जनीला कपडे धुवावे लागतात, त्यातही मदत करण्यासाठी कृष्ण येतो..
थोडक्यात काय तर जनाबाई,स्वतःमध्ये कृष्णाचे अस्तित्व शोधतात..
आपला देह हा माध्यम आहे, ज्याच्यात कृष्णच वास करतो..
तोच सगळे कष्ट करतो..
त्याच्यामुळे त्यांना काहीच त्रास होत नाही..
असा त्यांचा स्वतःच्या वाईट, क्लेशदायक जगण्याकडे बघण्याचा, सकारात्मक दृष्टिकोन मला तर खूप काही सांगून, शिकवून जातो...
हा अभंग...मला वारंवार सांगत रहातो..
किती छोट्या छोट्या गोष्टींसाठी तू वैतागते..
कटकट, त्रागा, दुःख करते..
त्यात अनेकदा जे चांगलं आहे तेही हरवून जाते..
आपण जे करतो, तो फक्त देहकर्म आहे..
आणि ते आपण नाही, तर एक अज्ञात शक्तीच करते आहे..
त्यामुळे त्याने होणारा आनंद असो वा दुःख हाही देहभोग आहे, तोही त्याच शक्तीचा आहे,
असा जर विचार रोजच्या व्यवहारात केला, तर सगळीच कामे सहज-सोपी होतील..
आणि त्याचा विशेष त्रास होणार नाही अशी प्रेरणा हा अभंग वाचताना मिळते..
आणि अनेकदा प्रत्यक्ष अनुभवही येतो..
यात पूर्णपणे निरपेक्ष भाव असावा, याकडे प्रवास सुरु आहे..
तसा अनुभव एकदा तरी यावा, हीच इच्छा आहे..
कृष्णाची माया, प्रेम, विश्वास, भक्ती थोडक्यात सर्वस्व सांगणारे, जनाबाईंचे अजूनही खूप अभंग आहेत...
ते आपण जितके समजून घेऊन, कृतीत आणू,
तितके आपण आनंदी राहू..
त्याचाही भावार्थ मांडायला नक्कीच आवडेल, पण त्याहीपेक्षा ज्याचा त्याला, सापडला तर अधिक रुजेल..
म्हणून सोबत अजून काही अभंग जोडत आहे..
(१)
जनी उकलिते वेणी । तुळशीचे बनी ॥१॥
हाती घेऊनिया लोणी । डोई चोळी चक्रपाणि ॥२॥
माझे जनीला नाही कोणी । म्हणुनी देव घाली पाणी ॥३॥
जनी सांगे सर्व लोका । न्हाऊ घाली माझा पिता ॥४॥
(२)
अहो ब्रह्मांड पाळका । ऐकें रुक्मिणीच्या कुंका ॥१॥
देवा घेतलें पदरीं । तें तूं टाकूं नको दुरी ॥२॥
होतें लोकांमध्यें निंद्य । तें त्वां जगांत केलें वंद्य ॥३॥
विनवीतसे दासी जनी । परिसावी माझी विनवणी ॥४॥
(३)
अहो यशोदेचा हरी । गोपिकांसी कृपा करी ॥१॥
वेणु वाजवितो हरी । सर्व देवांचा साह्यकारी ॥२॥
धांवे धांवे गाई पाठीं । जनी ह्मणे जगजेठा ॥३॥
(४)
स्मरतांचि पावसी । तरी भक्तांसी लाधसी ॥१॥
ऐसा नाहीं न घडे देवा । वांयां कोण करी सेवा ॥२॥
न पुरतां आस । मग कोण पुसे देवास ॥३॥
कोठें चक्रपाणी । तुज आधीं लाही जनी ॥४॥
(५)
जन्म खातां उष्टावळी । सदा राखी चंदावळी ॥१॥
राहीरुक्मिणीचा कांत । भक्तिसाठीं कण्या खात ॥२॥
देव भुलले पांडुरंग । ऐसा जाणावा श्रीरंग ॥३॥
जनी ह्मणे देवराज । करी भक्ताचें हो काज ॥४॥
(६)
तुझे पाय रुप डोळा । नाहीं देखिलें गोपाळा ॥१॥
काय करुं या कर्मासी । नाश होतो आयुष्यासी ॥२॥
जन्मा येऊनियां दुःख । नाहीं पाहिलें श्रीमुख ॥३॥
लळे पुरविसी आमुचे । ह्मणे जनी ब्रिद साचें ॥४॥
जनाबाईंचा देव, सखा, प्रियकर, सोबती असे सर्व काही असणारा कृष्ण, प्रत्येकाला मिळावा हीच प्रार्थना..


खूप छान लिखाण!! 👍👍
ReplyDeleteमनःपूर्वक आभार 🌹🏵️🌷💐
DeleteChan👌👌
ReplyDeleteमनःपूर्वक आभार 🌹🏵️🌷💐
Deleteअप्रतिम
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
Deleteमनःपूर्वक आभार 🌹🏵️🌷💐
ReplyDeleteअप्रतिम, सुंदर लिखाण
ReplyDeleteमनःपूर्वक आभार 🌹🏵️🌷💐
DeleteChan
ReplyDeleteKhup chaan...tumcha lekhan nehami prerana denar aasta....
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteवा !!!! काय भक्तीभाव 👌👌छानच लेखन.
ReplyDelete