तसे ते दोघे सगळ्यांपेक्षा खूपच निराळे,एका रेषेची दोन टोकं...
चोवीस तासाच्या कालावधीत खूपच कमी वेळ भेटणारे..
एकमेकांपासून पूर्णतः भिन्न तरीही एकमेकात मिसळलेले..
एकाने दुसऱ्याची जागा घ्यावी, अशी तसूभरही शक्यता नसलेले..
असे असूनही दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम, एकमेकांशिवाय अपूर्ण..
त्यांच्या मिलनाचे सोहळे रोज साऱ्या सृष्टीत साजरे होतात..
ते भेटतात तेंव्हा, आकाशात रंगांची उधळण होते, पिवळसर केशरी लाली सर्वत्र पसरते, मंद वारे वाहू लागतात..
एक अनामिक हुरहूर दाटून येते..कविता-गाणी स्फुरू लागतात..अशा मोहमयी वातावरणात, ते दोघे...
काही काळ एकमेकांना घट्ट बिलगतात..आणि पुन्हा आपल्या कामाला लागतात..
पण आज..
आज निश्चित काहीतरी बिनसले होते..
ती नेहमी सारखी प्रसन्न नव्हती.. तिचा उत्साह विरला होता..काहीतरी बोच मनाला सलत होती..
तिला असे बघून त्याच्या काळजाचे पाणी पाणी झाले..
"काय बरं झाले माझ्या सखीला?" त्याने आर्त साद घातली.
"मी तुझ्या योग्यतेची नाही." ती मुसमुसून बोलली.
" हे काय आता नवीन? कोण असे म्हणाले?"
" कुणी कशाला म्हणायला हवे. मला माझेच उमगले..
तू म्हणजे तेज.. तू म्हणजे चैतन्य.. तू म्हणजे नवं जीवन..
तू म्हणजे आशा.. तू म्हणजे आनंद.. तू म्हणजे ऊर्जा.. तू म्हणजे प्रकाश.."
" हो का..? बरं इतकं सगळं म्हणजे मी, आणि मग तू कोण...?"
"मी म्हणजे शेवट.. दिसायला कुट्टकाळी.. मी म्हणजे निराशा.. मी म्हणजे आळस.. मी म्हणजे भिती.. मी म्हणजे अंधार.."
"वेडी गं वेडी.. अशी कशी माझी सखी, बाह्यरुपाला भुलली?"
"बाह्यरुप ? कोणाचे ? माझे ? ते कसे ?"
"तू म्हणजे काळी चंद्रकळा ल्यालेली, माझी सखी..
तू साऱ्या सृष्टीला लाभलेले वरदान आहे, तुझ्यामुळेच तर सगळ्यांना विश्रांती मिळते, आज जरी काही चुकले, दुखले, हुकले असेल, तरी त्यावर मायेचे पांघरुण टाकते, माझ्या सुस्वरूप उद्याची स्वप्ने दाखवते,थकलेल्या, हरलेल्या जीवांना अंगाई गाऊन आश्वस्थ करतेस, रात्र हीच तुझी ओळख, प्रेमाचे प्रतिक असणारा चंद्रमा तुझ्याच कुशीत सुखावतो..
आणि सगळ्यात महत्त्वाचे,
तुझ्याशिवाय मी अपूर्ण आणि निरुपयोगी आहे..
तुझ्यामुळेच तर, माझ्या येण्याची वाट बघितली जाते..
त्यामुळे उगाच काहीतरी विचार करत बसू नकोस..
मनी आलेले सारे विचार झटकून टाक बरं लवकर..
काही दिवसांनी सारे जग, काय तो म्हणे,
व्हॅलेंटाईन दिवस साजरा करणार आहे..
चल, आपणही त्यांच्यात सामील होऊ, आपल्या प्रेमाची मुक्त उधळण करु, प्रेमाच्या या सोहळ्यात आपणही सहभागी होऊ या."
लटक्या रागाने त्याच्याकडे बघत हसून ती म्हणाली,
"अगदी माझ्या मनातले बोलला, हे सारे मला माहित आहे,
पण कधीतरी हे सारं तू मला सांगावे,कधीतरी प्रेमाची कबूली द्यावी, म्हणून मी आज रुसण्याचा बहाणा केला..."
"अस्स का..! बरं, म्हणजे तुला माझे प्रेम बघायचे आहे...?"
असे म्हणत, त्याने तिला आपल्या घट्ट मिठीत घेतले...
दोघे काही क्षण एकमेकांना बिलगले..
आणि मग सारी सृष्टीच प्रेमात न्हाली, नभी पहाट पसरली, त्या नयनरम्य वातावरणात सर्वत्र एक वेगळी धुंदी चढली..
दोघे मिळून येणारा व्हॅलेंटाईन दिवस साजरा करण्याच्या कल्पना रंगवू लागले..
अशी ती खोडकर रात्र, तो तेजस्वी दिवस रोज संध्याकाळी आणि पहाटे एकमेकांना भेटतात..
त्यांची ही भेट आपल्यासाठी कधी सोनेरी पहाट..!
तर कधी रम्य संध्याकाळ घेऊन येते..!
आपल्या जोड्याही त्यांच्यासारखाच असतील कदचित..
एकमेकांपेक्षा खूपशा वेगळ्या, आवडी वेगळ्या, कामाच्या पद्धती वेगळ्या..
दिवसभरात एकत्र येण्याची, संवाद साधण्याची वेळही कमी असेल..
पण लक्षात यायला हवे, त्यातच तर अधिक मजा आहे..
एकसारखे असण्याची गरज नाही, तर एकमेकांना पूरक असले पाहिजे..
चला, सृष्टीने दिलेल्या या आदर्श व्हॅलेंटाईन जोडीकडून नवा विचार घेऊन येणारा प्रेम दिवस साजरा करू या..
🌥️
****************************************

No comments:
Post a Comment
suggestions most wlcome