दोघे एकाच चक्राचा अविभाज्य भाग..!
दोघात काही समान, नि खूप सारं भिन्न.. एक अनामिक नातं... एक हुरहूर.. एक ओढ.. एक धडपड.. कसली बरं..?
सृष्टीचक्र चालू ठेवण्याची..!
त्याने सतत व्यस्त असावे.. प्रखर तेजाने तळपावे..
त्याची ती कार्यासक्ती.. तगमग.. बघून.. तीने त्याच्याकडे धाव घ्यावी..!
त्याला विश्रांती मिळावी म्हणून, तिने स्वतःचे द्रवरुप बदलून हलके हलके वायुरूप धारण करत त्यांच्यापर्यंत जावे..तिचा प्रवास अनिमिष नजरेने बघणाऱ्या त्याने..काही काळ का होईना,
त्याने तिच्या घट्ट मिठीत विरघळावे..!
प्रेमात आकंठ हरवून जावे..!
आणि मग त्यांची ही प्रीत जलधारा बनून धरतीवर बरसावी, हे युगानुयुगे चालत रहावे..
ती शीतल अन् जीवनदायिनी व्हावे,
तो प्रखर पण उर्जास्त्रोत असावे..
दोघे एकमेकांपासून अगणित मैल दूर, तरी आगळ्या प्रेमबंधनात बांधलेले..
तेही स्वैर.. स्वच्छंद..
त्यांची प्रीत जुळावी, ती इतरांसाठी.. सर्वस्व देण्यासाठी.. आनंद वाटण्यासाठी.. तृप्ती, शांत, स्वस्थ करण्यासाठी.., जीवन फुलविण्यासाठी💕
कोणाविषयी चालू आहे हे आख्यान..
रवी, भास्कर, दिनकर, दिवाकर, प्रभाकर, आदित्य, भानू.. अनेक नावांनी ज्ञात.., तप्त.. प्रखर.. नियमित.. स्थितप्रज्ञ नानाविध गुणांचा स्वामी..!!
असा तो.. सूर्य,
आणि सरिता तारिणी, तटिनी, तरंगिणी,आपगा, जलवाहिनी,तटी.. म्हणून ओळख असणारी, जीवन फुलविणारी, शीतल.. अवखळ.. प्रवाही..!
एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणावे, असे दोघे..
निसर्गातले निस्पृह, निर्व्याज प्रेमरूप ..!
No comments:
Post a Comment
suggestions most wlcome