Showing posts with label स्फुट. Show all posts
Showing posts with label स्फुट. Show all posts

Saturday, April 29, 2023

एक धागा सुखाचा

मी आणि गाणी..

 

सध्या फेसबुक, इंस्टा यांच्या  रिलं प्रकाराने सर्वांना वेड लावले आहे, मलाही कधीतरी आवडतात बघायला..


असेच परवा एक बघण्यात आले, ज्यात एक मानसशास्त्रीय विचार मांडला होता..


की माणसे उदास, दुःखी, त्रस्त असताना, तशीच गाणी ऐकतात आणि अजून प्रश्नात गुरफटत जातात..


त्यातले वाक्य, ' तुमचे दुःख तुम्ही लहान बाळाप्रमाणे सांभाळता, त्याला खाऊ पिऊ घालून वाढवत रहाता' ..


आधी पटले, पण नंतर विचार केला तर जाणवले की मीही आनंदात आनंदी आणि प्रश्नात शांत, कधीतरी उदास गाणीच निवडते, पण त्यामुळे अजून दुःखी होत नाही किंवा प्रश्नात अडकत नाही..


मग मी अपवाद आहे त्याला, की त्या म्हणण्याला पक्का शास्त्रीय आधारच नाही..


त्याचा पाठपुरावा करण्याऐवजी, मी माझी पद्धत तपासली..


आणि मला काहीतरी वेगळे सापडले..


अर्थात इथे स्वानुभव इतकाच आधार आहे, आणि तो नेहमी ज्याचा त्यानेच घ्यायचा असतो..


मला समजले की 


मी गाणी ही चाल, संगीत याहीपेक्षा अर्थ, गर्भित अर्थ (वेगवेगळ्या पद्धतीने विचार करायला लावणारा), भावार्थ (शब्द, अर्थ आणि आपल्या भावना यांची एकत्रित सांगड) याने जास्त ऐकत असते, अनुभवत असते, त्याच्याशी एकरुप होत असते..

त्यामुळे शब्द, चाल, संगीत उदास असेल पण त्यांची बांधणी नेहमीच निराशा, दुःख देणारी नसतात..

त्याही पलीकडे विचार केला तर,  आपण त्यातून काय घेतो, यावरुन ती कशी आहेत हे ठरते..


उदाहरण देऊन स्पष्ट न केल्यास, काहीतरी अपूर्णता वाटते म्हणून एका गाण्याची मांडणी करते..


बघा पटते का..?


गाणे माझ्या अत्यंत जवळचे, शिवाय माय मराठीचे शिरोमणी, गदिमा आणि बाबूजी (सुधीर फडके) यांनी अजरामर केलेले आहे..


एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे

जरतारी हे वस्‍त्र माणसा तुझिया आयुष्याचे


पांघरसी जरी असला कपडा

येसी उघडा, जासी उघडा

कपड्यासाठी करिसी नाटक तीन प्रवेशांचे


मुकी अंगडी बालपणाची

रंगीत वसने तारुण्याची

जीर्ण शाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्याचे


या वस्‍त्रांते विणतो कोण?

एकसारखी नसती दोन

कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकर्‍याचे


आता माझा हे गाणे ऐकताना नकळत होणारा प्रवास..


एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे

जरतारी हे वस्‍त्र माणसा, तुझिया आयुष्याचे


वस्त्र ही आपण प्राथमिक गरज मानतो, की जी प्रत्येकाची पूर्ण झालीच पाहिजे..


मग तसे मानवी आयुष्य जे प्रत्येकाला मिळालेच पाहिजे, त्याचे उत्तम बांधणी

ही एक धागा सुखाचा आणि शंभर दुःखाचे अशाच गुणोत्तराची असते..


किंवा तशीच असली पाहिजे..


यातला जरतारी हा शब्द, सुखाला सोनं, रत्नजडीत याची उपमा देत आहे..


हे समजायला पूर्वी जेंव्हा वस्त्र बनवताना, खरोखर सोन्याचा धागा बनवून वापरला जायचा, अशी जीर्ण वस्त्र जाळण्यास ते सोनं मिळायचे हे माहीत असायला हवे..


मी बघितले नसले तरी ऐकले आहे, आजीच्या आजीला, तिच्या आजीच्या साडीतून इतकं ग्रॅम सोनं मिळालं होत वगैरे..


दुसरं म्हणजे ग्रॅम हे अत्यंत कमी परिमाण असले तरी, सोनं मोजताना नक्कीच कमी नाही..


त्याचे वजन (धागे) वाढवत गेलो तर, त्याचे दिसणे आणि ज्या शरीराने ते परिधान करायचे त्याची ते पेलण्याची, सांभाळण्याची ताकद याचा विचार असणारच, किंवा बनवणारा करणारच ना..?


आणि असे उच्चवस्त्र कोणीही, अगदी राजा असला तरी, रोज आणि दिवसाचे सगळे प्रहर घालू शकेल का..?


याचा विचार केला, तर आपले आयुष्य असेच तर आहे, रोज मी किलोभर सोनं असणारी साडी (आवडीचे कपडे) घालून चोवीस तास वावरु शकणार आहे का..? 


नाही ना..!


अगदी तसेच सतत प्रचंड आनंद, सुख असणार नाही किंवा सहन होणार नाही..


ते वस्त्र अतिशय तलम, शरीराला छान वाटणारे, हलके, मऊसूत होण्यासाठी शंभर साधे धागे आणि एकच जरीचे असे असल्यास ते उत्तम बनेल, टिकाऊ असेल आणि तरीही आकर्षकही असेल..


तसेच दुःख जास्त असली तरी आपण नेहमीच त्यात हरवून जात नाही, तर त्यातून नवे मार्ग शोधतो, स्वतःच्या शक्तीचा, गुणाचा वापर करुन त्यावर मात करतो, स्वतःला शोधत, आजमावत रहातो..


पांघरसी जरी असला कपडा, येसी उघडा, जासी उघडा


आता हा सुख दुःखाचा जरतारी कपडा पांघरला, म्हणजेच असे जीवनात सगळे अनुभव घेतलेस, तरी ते तुझ्यासोबत येणार नाहीत..


जसा रिक्त आलास, तसाच जाणार आहेस, मग कशात काय कमी, काय जास्त याचा हिशोब करुन काहीच उपयोग नाही..


कपड्यासाठी करिसी नाटक तीन प्रवेशांचे

मुकी अंगडी बालपणाची

रंगीत वसने तारुण्याची

जीर्ण शाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्याचे


मानवाने कपडे म्हणजेच सुख-दुःख वाट्याला यावे किंवा न यावे, हे आपणच ठरवू शकतो, अशी वेडी समजूत करुन घेतली आहे..


गदिमांनी जीवनास नाटकाची उपमा दिली आहे, आणि त्याचे तीन अंक म्हणजे बालपण, तारुण्य आणि वार्धक्य, ते पूर्ण करणारा मानव एक पात्र आहे, 


बालपण हे न कळते परावलंबी असल्याने त्यास मुके..


तारुण्यात धाडस, प्रेम, शौर्य, महत्वाकांक्षा एक न अनेक पदर असल्याने त्यास रंगीत..


आणि वार्धक्य अनुभवांनी समृद्ध असल्याने शालीप्रमाणे उबदार असले तरी त्यानंतर अनंताचा प्रवास करण्यासाठी निसर्गतः शारीरिक, भावनिक, आणि अनेकदा मानसिकही जीर्ण होत जाणारे असे सुरेख शब्दबद्ध केले आहे..


या वस्‍त्रांते विणतो कोण? एकसारखी नसती दोन


ही वस्त्रे कोण विणतो हे सांगायचे झाले, तर आपण त्यास सगुण वा निर्गुण देवत्व मानतो..


ती शक्ती इतकी सर्जनशील आहे की, कोणाचेही आयुष्य, त्याचे दिसणे, वागणे दुसऱ्यासारखे नाही..


एवढेच कशाला त्याची निसर्गातली  कोणतीच निर्मिती एकसारखी नाही, काही ना काही फरक आहेच..


म्हणूनच सगळ्यांना जे मिळायला हवे, ते शंभर दुःख त्यास एक सुख असे गुणोत्तर, प्रत्येकाचे गणित वेगळे मांडणारा तो अजब विणकर आहे.. 


प्रत्येकासाठी वेगळे वस्त्र विणताना कुणाचे अधिक भरजरी, कुणाचे त्यामानाने कमी  हे ओझे स्वतःला नको म्हणून, कर्मबंध रुपी धागे आपल्याकडूनच मिळतील अशी व्यवस्थाही करतो आणि ती एकाच जन्मासाठी नाही असेही सुचवतो..


चांगले कर्म अधिक जरीचे धागे, चुकीचे कर्म दुःखाच्या धाग्यात वाढ..


आणि हे असले तरी..,


कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकर्‍याचे


त्या शक्तीला आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी बघू शकतच नाही, ही आपली मर्यादा आहे..


आणि ती मर्यादा ओलांडायची असेल तर, सुख असो वा दुःख, ते आपण फक्त परिधान करतो आहे..


त्याच्या निर्मात्याने ते खास आपल्यासाठी बनवले आहे.. 


त्याचा तो क्षण, प्रसंग, परिस्थिती पुरता स्वीकार करुन, त्या अज्ञात शक्तीला अनुभवण्याचा प्रयत्न करायला नको का..?


असे चाल, संगीत, गायकी, शब्द, अर्थ, भावार्थ सगळेच गाणे एकरुप होऊन ऐकताना होते..


आणि संपता संपता मनात स्वीकार भावना येत जाऊन, उदासीनता आपोआप गळून पडते आणि स्वच्छ नजरेने आहे त्यात समाधान, मजा शोधण्याची प्रेरणा मिळते..


तेही अगदी नकळत, सहज.. 


नाही का..? 

तुमचा अनुभव, असा प्रवास सांगायला विसरु नका..





Saturday, May 28, 2022

आईपण


 

आई, तुला काही सांगायचं आहे...

आई यावर प्रत्येक भाषेत, साहित्यप्रकारात आणि बहुतांश सिधहस्त लेखक कवींनी इतके लिहून ठेवले आहे, की त्यापुढे मी काय जाणार...

पण तरी मला आज काहीतरी वेगळेच सांगायचे आहे, कारण तुझी लेक असणे, हे माझे पूर्वसंचित आहे......

मनातलं सांगण्यासाठी आजचा दिवस खास, तुझा जन्मदिवस...

वाढदिवस मुद्दाम म्हणले नाही, कारण प्रत्येक जण शारीरिक, मानसिक, वैचारिक इतकच नाहीतर आत्मिक रोज वाढतच असतो, हे तू शब्दातून नाही तर कृतीतून माझ्यात रुजवलं आहेस...

कोणाचाही जन्मदिवस साजरा करणे म्हणजे आनंद, मजा आणि आठवणीच्या खजिन्यात भर...

त्यात तो आईचा म्हणल्यावर तर, अजूनच भारी हवा ना...!

कळायला लागल्यापासून, हा दिवस तुला विशेष लक्षात रहावा म्हणून धडपड असायची...

जेंव्हा स्वतः कमवत नव्हते, तेंव्हा बाबांकडून आर्थिक मदत आणि जास्तीत जास्त स्वतःची कला वापरण्याकडे कल होता...

नंतर आर्थिक सक्षम झाल्यावर, त्यात वेगवेगळ्या गोष्टीची भर पडत गेली...

पण अध्यात्मिक अभ्यास आणि इतर अनेक कारणांमळे तुझा या सगळ्याकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलत गेला...

आणि हेच माझ्यासाठी दिवसेंदिवस आव्हानात्मक होत आहे...

कशातच अडकायचे नाही, विरक्त होत जायचे हा तुझा प्रवास आणि तुला काहीतरी खास भेट देऊन चकित करायचे माझी धडपड यात अनेकदा तूच जिंकतेस...

संसारात राहून निर्मोही होण्याची तुझी साधना मला नेहमीच प्रेरणा देते, पण तरी पुन्हा नव्याने तुला मोहात पाडण्याची धडपड करावीशी वाटतेच कारण कदाचित मी अजून त्या टप्प्यावर आले नाही...

मग यावर्षी मी ठरवले की, नुसती मेजवानी, भेटवस्तू इतकं तांत्रिक न होता, शब्दात व्यक्त होण्याचा प्रयत्न करायचा...

मुद्दाम जुने चाऱ्हाट लावले, कारण त्याशिवाय आज का अचानक असा प्रश्न पडणार नाही...

तर तुझा जन्मदिवस साजरा करण्यामागे तुला खुश करण्यापेक्षा मला माझ्या भाग्याचा आनंद व्यक्त करायचा असतो...

तू आमच्यासाठी रोजच अन्नपूर्णा असतेस, पण ते कौशल्य मीही आत्मसात केले आहे, हे दाखवायला मेजवानीचा घाट असतो...

भेटवस्तू, ही फक्त वस्तू नाही तर  त्यातूनही काही ना काही सांगायचे असते...

जसे यावेळी आणलेली दुलई...!


(एक खंत की ही मी माझ्या हाताने बनवलेली नाही.)

(इंग्रजीत म्हणे त्याला क्वील्ट म्हणतात, म्हणो बापडे त्यात ना माझ्या भाषेचा गोडवा आहे ना ते भाव, आणि उच्चारताना बोबडी वळते ते तर अजूनच वेगळे)

दुलई, जिच्यात ती ऊब सामावली आहे, जी मी वेळोवेळी तुझ्यासोबत असताना, तसेच तुझ्या विचारात, संस्कारात, आणि कृतीत अनुभवली आहे...

ही दुलई, गोधडीसारखी तुकडे तुकडे जोडून बनवलेली आहे, त्याचे कापड जरी नवीन असेल तरी त्यांचे सांगणे तेच आहे...

प्रत्येक तुकडा प्रतीक आहे, तुझ्या माझ्यातल्या एकेका क्षणाचा, अनुभवांचा, प्रवासाचा...

त्याचे रंगही सांगतात बघ खूप काही...

गडद छटा म्हणजे तुझे रागावणे, अबोला धरणे, कधीतरीच पण शिक्षाही करणे...

तर आकर्षित - उल्हासित करणाऱ्या छटा म्हणजे तुझे प्रेम, माया काळजी, माझ्याविषयी असलेला विश्वास, माझ्या क्षमतांची जाणीव...

या तुकड्यांना जोडणारा एकेक धागा म्हणजे, आपल्याला एकमेकांशी बांधून ठेवणारी ओढ...

जरी तू आणि मी दोन वेगळ्या व्यक्ती असलो, तरी नऊ महिने तुझ्यात असण्याचे भाग्य मला मिळाले आहे...

बाळाला स्वयंपूर्ण, आत्मनिर्भर करण्यासाठी नाळ कापण्याचा, पहिला शारीरिक आघात आई आनंदाने मिरवते, म्हणूनच समान पातळीवरचे वडीलांचे नाते कांकणभर कमी रहाते...

दुलईचा प्रत्येक धागा ती नाळ आहे, जीने मला स्वत्त्व दिले, पण पांगळे केले नाही...

तो एक विश्वास आहे, जो मला कोणत्याही क्षणी एकटं वाटू देत नाही...

मला जेंव्हाही तुझी सोबत हवी असते, तू असतेच... 

कधी प्रत्यक्ष, कधी संस्कार, तर कधी विचार, कधी स्वप्न, कधी जिद्द, कधी प्रेरणा तर कधी विरक्ती बनून...

अजूनही खूप लिहिता येईल, पण सगळ्याच भावना शब्दांनी फिक्या करु नये असं म्हणतात...

मग असं करतेस...!

ती दुलई घट्ट कवटाळून घे स्वतःभोवती, आणि बघ काय जाणवते...


वयाच्या प्रत्येक टप्प्यावरची मी आतुर आहे तुला मिठी मारायला, ते सारे जुने नव्याने अनुभवायला, राहिलं असेल काही तर, आज पूर्ण करायला...

आणि अजून एक हट्ट...

ही दुलई म्हणजे, एक मागणी आहे...

मला तुझी आणि बाबांची, आई होण्याची संधी हवी आहे...

संदीप खरेच्या एका गाण्यात हे अचूक शब्दबध्द आहे, (त्यात थोडेसे बदल करते)

घट्ट मिटा डोळे, तुम्हा कुशीमध्ये घेते

पांघरायाला मऊ मऊ, पांघरूण देते

झाले मी मोठी सांग, छळेल तुम्हां कोण

आईबाबा व्हा, माझी मुले गुणी दोन

पाहू नका असे आता, नाते शोधू नवे

मायाप्रेम, काळजीचे मज आईपण हवे


आईपण...

आई होणे सोप्पे नाही, याची मला पूर्ण जाणीव आहे, पण त्यातही तुझ्या शुभेच्छा, आशीर्वाद आणि मार्गदर्शन मिळेल ही खात्री आहे...

शब्दात व्यक्त केलेले सारे, तुला दुलईच्या स्पर्शात रोज नव्याने अनुभवायला मिळो हीच परमेश्वराला प्रार्थना करते आणि खूप लांबलेले माझे सांगणे थांबवते...

तुझा जन्मदिवस तुझ्यासाठी दीर्घायू, आरोग्य, स्वास्थ्य आणि आत्मिक आनंद घेऊन येत राहो याच शुभेच्छा...

तुझी लेक...२८ मे २०२२ 

 

Thursday, September 30, 2021

अनुवाद



आज जागतिक भाषांतर (अनुवाद) दिवस...


सध्या, रोज कोणता ना कोणता दिवस विशेष कारणाने साजरा होताना दिसतो...


त्यामुळे प्रत्येक विषयावर लिहायला हवे असे नाही...


पण आजच्या दिन विशेषाने काही आठवणी जाग्या झाल्या, म्हणून थोडं मनातलं मांडावेस वाटलं इतकेच...


मागे एकदा क्ष व्यक्तीने (वय, अधिकार, अनुभव सर्वच बाजूने वरिष्ठ असणाऱ्या)...


"तू फार अनुवादित पुस्तके वाचतेस का...?"


मी, "असं काही नाही उत्तम विषय आणि आशय असणारी सर्व पुस्तके मला आवडतात...


कदाचित सध्या वाचनात येणारी अनेक अनुवादीत आहेत..."


पुन्हा प्रश्न, " आपल्या भाषेत(मराठी म्हणायचे असेल कदाचित) पुस्तकं नाहीत का...?"


त्यावरचे उत्तर वा इतर चर्चा महत्त्वाची नाही...


पण मला वय, अनुभव, पद, अधिकार हे सगळं काही क्षणासाठी संकुचित वाटलं...


मी जे वाचत होते, किंवा मला आवडले होते ते मराठीच होते...


माझ्या मातृभाषेमधले...


मला आपलेसे वाटणारे...


वाचताना माझ्या मनाला,


कधी साद देणारे, कधी जोजवणारे...


कधी रागावणारे, कधी उभारी देणारे...


तर कधी निखळ मनोरंजन करणारे...


मग ते भाषांतरीत - अनुवादित आहे, याने काय फरक पडतो...?


त्याने माझ्या मातृभाषेचा आदर, सन्मान कमी होतो...?


माझ्या मातृभाषेच्या मूळ वा अभिजात साहित्याकडे दुर्लक्ष होते...?


अनेक प्रश्न, शंका, गोंधळ.... 


इतरांना असेल, मला अजिबात नाही...


पहिले म्हणजे भाषांतर असे नकोच म्हणूया...


माझ्या माय मराठीत यासाठी अतिशय चपखल आणि देखणा शब्द आहे...


अनुवाद_अनुवादित...!


एका भाषेतील शब्दाला दुसऱ्या भाषेचा फक्त पर्यायी शब्द न देता__ त्यामागील विचार, भावना या योग्य आणि नेमक्या शब्दात मांडणे म्हणजे अनुवादन..


कारण प्रत्येक भाषेला स्वतःचे अभिजात सौंदर्य असते आणि ते जपणे म्हणजे अनुवाद..


ही एक कला आहे...


भाषिक आविष्कार आहे...


लेखन वा भाषेविषयी प्रचंड प्रेम असणारी मंडळीच हे करु शकतात...


त्यांचा अनेक भाषांचा  दांडगा अभ्यास असतो...


ते राजहंसाप्रमाणे नीरक्षीर विवेक बुद्धीने दोन्ही भाषेतील उत्तमतेची सुरेख गुंफण करतात...


शेवटी भाषा असते काय...?


आपले विचार, भावना मांडण्याचे साधन...


मग ती मराठी, हिंदी, इतर राज्य भाषा वा परदेशी असल्याने काही फरक पडतो...?


अनेकदा ही भाषा सांकेतिक, कलेची, चित्रांचीसुध्दा असतेच की...


मग ही माझी, ही चांगली असे कसे होईल...?


उलट प्रत्येकामधले उत्तम साहित्य माझ्या मातृभाषेत समाविष्ट व्हायला हवे...


माझ्या भाषिक बांधवांना, उत्तम साहित्य त्यांच्या आवडत्या भाषेत उपलब्ध व्हायला पाहिजे...


हा विचारच किती समृद्ध करणारा आहे...


ही अनुवाद कला माझ्या मातृभाषेला अधिक समृद्ध करते...


आपलेसे वाटणाऱ्या शब्दात, इतर भाषा, प्रांत, संस्कृती याचे विचारधन मला मिळते...


आणि अजून एक...


जसे इतरांचे आपल्याला उपलब्ध होते...


तसेच माझ्या मराठी भाषेतील उत्तमतेचा अनुवाद इतर अनेक भाषांमध्ये करण्याचे कामही ही मंडळी करतच असतातच, बरं का...


म्हणूनच या कलेचा आणि या कलाकार मंडळींचा नक्कीच आदर वाटायला हवा...


यांनी असेच भरपूर काम करत राहावे...


भाषा हा अडसर न बनता, ती देणगी व्हावी...


 याच शुभेच्छा देऊन थांबते...


मी वाचलेली आणि सर्वांनी किमान एकदा नक्कीच वाचावी, 

अशी काही अनुवादित पुस्तकांची नावे... (उदाहरणादाखल)

बालपण समृद्ध करणारे.. 

देनिसच्या गोष्टी

शिक्षणशास्त्राचा मूलमंत्र सांगणारे.. 

तोत्तोचान

टू सर, विथ लव्ह 

अग्ली

वन फूट राँग 

चिपर बाय द डझन

इतर

टॉक्सिन

क्रायसिस

ब्लॅक ब्युटी

चिकन सूप (अनेक भाग)

आता पूरते इतकेच पुरे...

 


Wednesday, May 05, 2021

प्रेमरूप निसर्ग

 


दोघे एकाच चक्राचा अविभाज्य भाग..!


दोघात काही समान, नि खूप सारं भिन्न.. एक अनामिक नातं... एक हुरहूर.. एक ओढ.. एक धडपड.. कसली बरं..?


सृष्टीचक्र चालू ठेवण्याची..!


त्याने सतत व्यस्त असावे.. प्रखर तेजाने तळपावे.. 


त्याची ती कार्यासक्ती.. तगमग.. बघून.. तीने त्याच्याकडे धाव घ्यावी..!


त्याला विश्रांती मिळावी म्हणून, तिने स्वतःचे द्रवरुप बदलून हलके हलके वायुरूप धारण करत त्यांच्यापर्यंत जावे..तिचा प्रवास अनिमिष नजरेने बघणाऱ्या त्याने..काही काळ का होईना, 

त्याने तिच्या घट्ट मिठीत विरघळावे..! 

प्रेमात आकंठ हरवून जावे..!

आणि मग त्यांची ही प्रीत जलधारा बनून धरतीवर बरसावी, हे युगानुयुगे चालत रहावे..

ती शीतल अन् जीवनदायिनी व्हावे, 

तो प्रखर पण उर्जास्त्रोत असावे.. 


दोघे एकमेकांपासून अगणित मैल दूर, तरी आगळ्या प्रेमबंधनात बांधलेले.. 

तेही स्वैर.. स्वच्छंद.. 


त्यांची प्रीत जुळावी, ती इतरांसाठी.. सर्वस्व देण्यासाठी.. आनंद वाटण्यासाठी.. तृप्ती, शांत, स्वस्थ करण्यासाठी.., जीवन फुलविण्यासाठी💕

कोणाविषयी चालू आहे हे आख्यान.. 

रवी, भास्कर, दिनकर, दिवाकर, प्रभाकर, आदित्य, भानू.. अनेक नावांनी ज्ञात.., तप्त.. प्रखर.. नियमित.. स्थितप्रज्ञ नानाविध गुणांचा स्वामी..!!

असा तो.. सूर्य, 

आणि सरिता तारिणी, तटिनी, तरंगिणी,आपगा, जलवाहिनी,तटी.. म्हणून ओळख असणारी, जीवन फुलविणारी, शीतल.. अवखळ.. प्रवाही..!

अशी ती.. नदी !

 एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणावे, असे दोघे..

निसर्गातले निस्पृह, निर्व्याज प्रेमरूप ..! 

Saturday, May 09, 2020

नाती


नाती आणि चवी




स्वयंपाक हा आवडीचा असला तरी कर्तव्य आणि छंद याची छान सांगड घालता येणारा विषय. थोडक्यात फार वेळ तिथेच न रमणारा पण तरीही आवडीचा. त्यामुळे पदार्थ कोणताही करता येईल, शिकता शिकवता येईल पण चूक होणार नाही असे मात्र नाही.

तर असेच गंमत म्हणून. ग्रॅम आणि इंचाच्या भाषेत पदार्थ वापराची मुळात सवयच नसल्याने अंदाजे त्यापेक्षाही आवडीप्रमाणे सगळे एकत्र केले. दोनचार दिवस छान मुरवले आणि चवीला घेतले. तसे आवडले सगळ्यांना मलाच अंमळ खट्ट लागले.

जरा मीठ चालेल इति सासूबाई, तिखट हवं आहे लेक तर मुरेल तस भारी लागेल अहोंची पावती. मग मीठ, मसाला वाढवला चांगल दहा दिवस मुरवले, तरी मनास उतरेच ना ! मनात म्हणल जाऊ दे नसेलच जमणार यावेळी भट्टी.

शाळेत मैत्रिणींना घेऊन गेले. सगळ्यांनी मनापासून नावाजले पण माझे एकच नेहमीसारखे नाही, जरा खट्टच आहे. केलेले उपायही सांगितले. एकीने सहज विचारले गूळ-साखर घातली ना?

घालतात का इति मी. हो मग.

मग चवीला गूळ मिसळला आणि हालवून दोन दिवस ठेवले.

आज पुन्हा चव घेताना थोडी धाकधूकच पण यावेळी मात्र चव जीभेवर रेंगाळत राहिली. चमचा बाजूला ठेऊन हातावर घेऊन बोटाने चव घेताना मनात वेगळेच चक्र घुमू लागले.

हे लोणचे म्हणजे मी तर नाही ना?
मी आणि सासू म्हणजे मीठाच नात योग्य विश्वास हाच आधार जास्त वा कमी चव बिघडणार.

मी आणि लेक थोड चमचमीतपणा जपला तर मजा रहाणार नाहीतर दुरावे वाढणार.

अहो आणि मी किती काळ लोटला तरी मुरत जाईल तसे अधिक घट्ट होत जाणार.

आणि मैत्रिणी म्हणजे चवीचा गूळ विसरला तर कितीही प्रयत्न केला तरी त्याशिवाय काहीच मनास नाही उतरणार.

तुम्ही काय म्हणाल?

बालदिन

भेट बालदिनाची 





१४ नोव्हेंबर २०१७ 
मंगळवार 

मी ज्या मुलांना शिकवते ती मुले घरी येणार होती म्हणून गेले महिनाभर दिवाळीचा किल्ला छान सांभाळून ठेवला होता. रोज पाणी घालणे, स्वछता इ चालू होते.

आज रांगोळी आणि मावळ्यांनी सजलेल्या या किल्ल्याने मुलांचे छान स्वागत केले. बराच वेळ मुले त्याभोवती रमली होती,गप्पा रंगल्या होत्या.

माझा लेक शाळेतून घरी आला, हातपाय धुवून दूध पिऊन माझ्याकडे आला आणि ते सगळं आवरु का म्हणाला. माझे नेहमीप्रमाणे काहीतरी अगाध लेखन कार्य चालू होते. त्याच विचारात मी त्याला हो म्हणाले.

माझं काम झाल्यावर खाली येऊन बघते तर सकाळी रांगोळी, मावळे आणि किल्ल्याने सजलेले अंगण एकदम चकाचक. अचानक अंगण केवढं तरी मोठ्ठ दिसायला लागलं. त्याच्या कामच खूप कौतुक वाटलं आणि का आवरलं इतके लगेच असेही वाटले.

त्याला विचारल्यावर म्हणाला की तू हो म्हणाली होतीस ना आणि झालं ना त्याच काम मग कशाला ठेवायचा? हा काढला तर पुढच्या वर्षी नवीन करु ना. आणि बघ ना किती छान दिसत आहे आता. माझी सायकल ठेवेन. 

भरुन आलं ते त्याने सहज मांडलेले विचार ऐकून. त्याच्या उगाच न गुंतण्याच्या वृत्तीची गंमत ही वाटली.

खरचं काम झालं तर त्या गोष्टीतून बाहेर पडावे. आनंद असो वा दुःख उगाच कुरवाळून मोठे का करावे. त्यापेक्षा त्यातून शक्य तितक्या लवकर बाहेर पडलो तर नवीन वाट दिसू लागते, नवे विचार सुचू लागतात, नवी क्षितिजे खुणावू लागतात.

हे सारे त्याच्याकडून इतके सहज झाले ते त्याच्या वयामुळे कारण मोठेपणाचे ओझे घ्यायला त्याने अजून सुरुवात केलेली नाही.

लहान मुलांचे असे अनुभव आपण एरवीही अनुभवत असतो.  खेळणे तुटले-हरवले तरी दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ रडत नाही, आपण रागावलो तरी ते आपल्यावर फार रुसत नाहीत, कशासाठी हट्ट केला तर त्याऐवजी दिलेल्या दुसऱ्या गोष्टीतही समाधान मानतात. 

हे सगळे तोपर्यंत होते जोपर्यंत ते स्वतःला मोठे झालो असे समजत नाहीत.

एकदम ओळी आठवल्या,
लहानपण देगा देवा
मुंगी साखरेचा रवा

खरचं या बालमनाकडून कशातच फार न गुंतण्याचा नवा विचार मला आज बालदिनाच्या निमित्याने भेट स्वरुपात मिळाला.