भेट बालदिनाची
१४ नोव्हेंबर २०१७
मंगळवार
मी ज्या मुलांना शिकवते ती मुले घरी येणार होती म्हणून गेले महिनाभर
दिवाळीचा किल्ला छान सांभाळून ठेवला होता. रोज पाणी घालणे, स्वछता इ चालू होते.
आज रांगोळी आणि मावळ्यांनी सजलेल्या या किल्ल्याने मुलांचे छान स्वागत
केले. बराच वेळ मुले त्याभोवती रमली होती,गप्पा रंगल्या
होत्या.
माझा लेक शाळेतून घरी आला, हातपाय धुवून दूध
पिऊन माझ्याकडे आला आणि ते सगळं आवरु का म्हणाला. माझे नेहमीप्रमाणे काहीतरी अगाध
लेखन कार्य चालू होते. त्याच विचारात मी त्याला हो म्हणाले.
माझं काम झाल्यावर खाली येऊन बघते तर सकाळी रांगोळी, मावळे आणि
किल्ल्याने सजलेले अंगण एकदम चकाचक. अचानक अंगण केवढं तरी मोठ्ठ दिसायला लागलं.
त्याच्या कामच खूप कौतुक वाटलं आणि का आवरलं इतके लगेच असेही वाटले.
त्याला विचारल्यावर म्हणाला की तू हो म्हणाली होतीस ना आणि झालं ना
त्याच काम मग कशाला ठेवायचा? हा काढला तर पुढच्या वर्षी नवीन करु ना. आणि बघ
ना किती छान दिसत आहे आता. माझी सायकल ठेवेन.
भरुन आलं ते त्याने सहज मांडलेले विचार ऐकून. त्याच्या उगाच न
गुंतण्याच्या वृत्तीची गंमत ही वाटली.
खरचं काम झालं तर त्या गोष्टीतून बाहेर पडावे. आनंद असो वा दुःख उगाच
कुरवाळून मोठे का करावे. त्यापेक्षा त्यातून शक्य तितक्या लवकर बाहेर पडलो तर नवीन
वाट दिसू लागते, नवे विचार सुचू लागतात, नवी क्षितिजे खुणावू
लागतात.
हे सारे त्याच्याकडून इतके सहज झाले ते त्याच्या वयामुळे कारण
मोठेपणाचे ओझे घ्यायला त्याने अजून सुरुवात केलेली नाही.
लहान मुलांचे असे अनुभव आपण एरवीही अनुभवत असतो. खेळणे तुटले-हरवले
तरी दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ रडत नाही, आपण रागावलो तरी ते
आपल्यावर फार रुसत नाहीत, कशासाठी हट्ट केला तर त्याऐवजी दिलेल्या दुसऱ्या
गोष्टीतही समाधान मानतात.
हे सगळे तोपर्यंत होते जोपर्यंत ते स्वतःला मोठे झालो असे समजत नाहीत.
एकदम ओळी आठवल्या,
लहानपण देगा देवा
मुंगी साखरेचा रवा
खरचं या बालमनाकडून कशातच फार न गुंतण्याचा नवा विचार मला आज
बालदिनाच्या निमित्याने भेट स्वरुपात मिळाला.


No comments:
Post a Comment
suggestions most wlcome