नाती आणि चवी
स्वयंपाक हा आवडीचा असला तरी कर्तव्य आणि छंद
याची छान सांगड घालता येणारा विषय. थोडक्यात फार वेळ तिथेच न रमणारा पण तरीही
आवडीचा. त्यामुळे पदार्थ कोणताही करता येईल, शिकता शिकवता येईल पण चूक होणार नाही असे मात्र नाही.
तर असेच गंमत म्हणून. ग्रॅम आणि इंचाच्या
भाषेत पदार्थ वापराची मुळात सवयच नसल्याने अंदाजे त्यापेक्षाही आवडीप्रमाणे सगळे
एकत्र केले. दोनचार दिवस छान मुरवले आणि चवीला घेतले. तसे आवडले सगळ्यांना मलाच
अंमळ खट्ट लागले.
जरा मीठ चालेल इति सासूबाई, तिखट हवं आहे लेक तर
मुरेल तस भारी लागेल अहोंची पावती. मग मीठ, मसाला वाढवला चांगल
दहा दिवस मुरवले, तरी मनास उतरेच ना ! मनात म्हणल जाऊ दे नसेलच
जमणार यावेळी भट्टी.
शाळेत मैत्रिणींना घेऊन गेले. सगळ्यांनी मनापासून नावाजले पण माझे एकच
नेहमीसारखे नाही, जरा खट्टच आहे. केलेले उपायही सांगितले. एकीने
सहज विचारले गूळ-साखर घातली ना?
घालतात का इति मी. हो मग.
मग चवीला गूळ मिसळला आणि हालवून दोन दिवस ठेवले.
आज पुन्हा चव घेताना थोडी धाकधूकच पण यावेळी मात्र चव जीभेवर रेंगाळत
राहिली. चमचा बाजूला ठेऊन हातावर घेऊन बोटाने चव घेताना मनात वेगळेच चक्र घुमू
लागले.
हे लोणचे म्हणजे मी तर नाही ना?
मी आणि सासू म्हणजे मीठाच नात योग्य विश्वास हाच आधार जास्त वा कमी चव
बिघडणार.
मी आणि लेक थोड चमचमीतपणा जपला तर मजा रहाणार नाहीतर दुरावे वाढणार.
अहो आणि मी किती काळ लोटला तरी मुरत जाईल तसे अधिक घट्ट होत जाणार.
आणि मैत्रिणी म्हणजे चवीचा गूळ विसरला तर कितीही प्रयत्न केला तरी
त्याशिवाय काहीच मनास नाही उतरणार.
तुम्ही काय म्हणाल?

No comments:
Post a Comment
suggestions most wlcome