Showing posts with label पोतडी. Show all posts
Showing posts with label पोतडी. Show all posts

Tuesday, November 21, 2023

हुप्प्या



मुळातच माकडाचे वंशज असणाऱ्या मानवाने चार बंदिस्त चार भिंतीत शिकणे म्हणजे पंख छाटून पक्ष्याला उडायला सांगणे..

सध्याची आधुनिक शिक्षण पद्धती अशाच काहीशा साचेबद्धतेत अडकली आहे..

या चौकटीला तोडून, मुलांना मुक्तपणे स्वानुभवातून शिकण्याचा आनंद देण्यासाठी, निसर्ग शाळा धडपडते..

यामध्ये सहभागी होण्याची संधी या दिवाळीच्या सुट्टीत मिळाली..

खरं म्हणजे सुट्टी संपण्याचे शेवटचे तीन दिवस इथल्या शिबिरात जायचे होते, त्यामुळे सुरुवातीला हो-नाही चालले होते..

पण सुट्टी घालवायची नाही मिळवायची असते, ही प्रबोधिनीची सवय मला तिथे घेऊन गेली..

तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या एका निसर्गरम्य गावात ही निसर्ग शाळा आहे..

याचा परिसर भरपूर मोठा असला तरी काँक्रीटचे बांधकाम नाही म्हणावे, इतके नगण्य आहे..

साधारण दोन-तीन खोल्यांची वास्तू असेल..

सुमारे पन्नास बालगोपाळ आणि दहा मोठे, एवढे सगळे राहणार कुठे..? हा प्रश्न बसमधून उतरताना मनात आला..

तेवढ्यात जवळपास पंधरा आधुनिक पद्धतीचे तंबू दिसले..

आजूबाजूला असणारे डोंगर, बऱ्यापैकी घनदाट झाडी, दूरवर पाहिल्यास नजरेस दिसणारा फक्त मोकळा परिसर आणि त्याच्या मधोमध ही राहण्याची व्यवस्था..

ही कल्पनाच एका वेळी रम्य तर दुसऱ्या क्षणी काहीशी घाबरवते..

पण ही कल्पना नसून याचा पण एक भाग असणार आहोत याने या शिबिराची सुरुवात झाली..

शिबिराचे आयोजन नियोजन हे पूर्णतः झालेले होते, माझी भूमिका फक्त मदतनीस म्हणून होती..

थोडक्यात आपणही शिबिराचा पुरेपूर आनंद घ्यायचा आहे, फक्त त्याबरोबर मुलांसोबत त्यांची एक ताई म्हणून राहायचे आहे..

अडीच दिवस दोन रात्री इतक्या कमी कालावधीच्या या शिबिरात निसर्गाची ओळख, झाडझुडूपांची माहिती, निरीक्षण, संघ बांधणी खेळ, धाडसी खेळ (रिव्हर क्रॉसिंग, रिव्हर ड्राफ्टींग, रॅप्लिंग), शास्त्रीय संगीताची ओळख, बाल चित्रपट, चुलीवर स्वयंपाक, आकाश निरीक्षण, प्रथमोपचार कृतीसह माहिती, किल्ला बनवणे असे खूप काही मुलांनी येता जाता दंगा करत हसत खेळत अनुभवले, शिकले..

गेल्या पंधरा वर्षात शिक्षण क्षेत्रामध्ये काम करताना, इतका सहज आणि मोकळा अनुभव मी पहिल्यांदाच घेतला..

कुठेही मुलांच्या मागे लागणे नाही, त्यांना सततच्या सूचना नाही..




त्यांना वाटणाऱ्या भीतीवर मात करण्यासाठी उगाच मागे लागणे नाही किंवा कोणत्याही गोष्टीची जबरदस्ती नाही..


आयोजक मुलांशी छान संवाद साधत, काही वेळेला तो विषय त्यावेळी सोडून देऊन, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेरणा देऊन, प्रत्येक गोष्ट करून बघण्याचा अनुभवण्याचा विचार त्यांच्यामध्ये नकळत रुजवत होते..


अधून मधून घराची आठवण येते म्हणून हिरमुसली होणारी मुले, काही वेळातच पुन्हा फुलपाखरासारखी बागडताना दिसले..

एरवी दहा मिनिटात कोणत्याही गोष्टीला कंटाळणारी, वर्गांमध्ये पाच मिनिटं ही स्वस्थ न बसणारी हे बालचमू अडीच दिवसात अजिबात दमले किंवा वैतागले नाही..



घरी आवडीची भाजी खाताना, नवीन काहीतरी हवे, म्हणून गाणं गाणाऱ्या या वानरसेनेने, ग्रामीण परिसरात मिळणाऱ्या रुचकर पण साध्या चवीच्या जेवणाचा मनसोक्त आनंद घेतला..

या जेवणामध्ये मुलांना विविध भाज्या, कडधान्ये माहिती होतील, पूर्ण आहार म्हणजे काय हे समजेल याची विशेष दखल घेतली होती..

सकाळ संध्याकाळच्या न्याहारीमध्ये मुलांच्या आवडत्या गोष्टींना प्राधान्य होते, पण सोबत आरोग्याचा विचार समोर ठेवून दूध, सरबत याची जोड दिली होती..

तंबू मध्ये राहायचे ही कल्पना विस्मयीत करणारी असली तरी, प्रत्यक्षात मनात थोडीशी भीती  असल्याने पहिली पूर्ण रात्र मुलांनी एकमेकांना चिडवण्यात घाबरवण्यात आणि दंगा करण्यात घालवली..



दुसऱ्या रात्री मात्र एकूणच परिसराला सरावलेली ही मंडळी, घराप्रमाणे निवांत निजली..

चुलीवरच्या स्वयंपाकात चूल पेटवण्यापासून ते पदार्थ शिजला का  हे त्यांनी एकमेकांच्या मदतीने गटकार्य करत अनुभवले, यातील स्पर्धेचा ताई दादांनी दिलेला निर्णय किती खर आहे हे पाहण्यासाठी एकमेकांचे पदार्थ चाखूनही पाहिले..

भल्या पहाटे न उठवता जागी होऊन ही मंडळी मनसोक्त खेळ खेळली यासाठी त्यांना कोणत्याही ताई, दादांची मदत लागली नाही..

शिबीराचे सर्वात शेवटचे सत्र अधिक चित्त थरारक होते, कारण त्यामध्ये मुलांनी सापांविषयी फक्त माहितीच घेतली नाही, तर प्रत्यक्ष विषारी बिनविषारी साप बघितले, काहींना हातही लावला..

एकमेकांशी पूर्णतः अनोळखी असणाऱ्या या साऱ्यांची शिबीर संपेपर्यंत घट्ट मैत्री झाली..


इतक्या वेळ ज्या शिबीराबद्दल सांगत आहे, त्याचे नाव निसर्ग शाळेचे हुप्प्या शिबीर..

सह्याद्रीच्या परिसरात हुप्प्या जातीची वानरे दिसतात..

ती जशी मनमुराद निसर्गात हुंदडत असतात, तसाच अनुभव बालगोपळांनी घ्यावा म्हणून हेमंतदादा, संजयदादा, यशदीपदादा आणि त्यांचे सहकारी हे गेले अनेक वर्ष,आपले सगळे व्याप सांभाळून या शिबिरांचे आयोजन करत आहेत..


शाळेत प्रत्येक विषयाबरोबर ओढून ताणून बसवलेल्या प्रकल्प, उपक्रमांमध्ये शिक्षण बाजूला राहून, नुसते दाखवण्यासाठीच्या गोष्टीची यादी तयार होते..

पण गदिमा म्हणतात ना,

बिन भिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु,

झाडे, वेली, पशुपाखरे,  यांशी दोस्ती करू

असे सहज शिक्षण मिळते, ते अशा स्वानुभवांमधूनच..

मुलांसोबत या साऱ्याचा आनंद जसा मी मिळवला, तसाच तो आपण सर्वांनी जरूर घ्यावा म्हणून केलेला हा लेखन प्रपंच..

संपर्कासाठी.. फेसबुक पेज लिंक देत आहे..

https://www.facebook.com/Nisargshala?mibextid=ZbWKwL





Sunday, October 15, 2023

शांतता

अनुभव ते अनुभूती

मुलांसाठीच्या उपक्रमात आम्ही शिक्षक नव्याने काही ना काही शिकत असतो, स्वतःला घडवत असतो, शोधत असतो.. 


यातून दैनंदिन कामात थोडी विश्रांती, थोडा बदल तर मिळतो, पण त्याचबरोबर आपल्या कामाकडे मागे फिरुन बघण्याची संधी मिळते..


असाच काहीसा अनुभव आय ऑफ सी (Initiative of Change) पाचगणी यांच्या एका प्रशिक्षणात मिळाला..

गुरुवार १२ शुक्रवार १३ ऑक्टोंबर २०२३ हे दोन दिवस हे प्रशिक्षण होते..

शाळेतील सहशिक्षिका आदिती, सायली तसेच पाषाण येथील स्वधा शाळेचे प्रिया, संदीप हे दोन शिक्षक यांच्यासोबत काराने नियोजित वेळेत पाचगणी येथे पोहचलो..

सहभागी इतर शिक्षक येण्यास वेळ असल्यामुळे आम्ही परिसरात फिरलो..

आपण तारे जमींन पर या चित्रपटात जशी बोर्डिंग शाळा बघितली होती, तसाच काहीसा हा सारा परिसर होता..

त्यानंतर आम्ही आमच्या निवासाची व्यवस्था समजून घेतली, तिथे आमचे सामान नेऊन ठेवले, तोवर इतर सदस्य आले..

प्रशिक्षणाची सुरुवात ऑस्ट्रेलिया नावाच्या सभागृहात आय ऑफ सी संस्थेची माहिती चल चित्रफीत बघून घेतली..

या संस्थेची स्थापना १९६७ झाली, ज्यावेळी हा परिसर संपूर्ण ओसाड होता, जिथे फक्त एक ओक वृक्ष होता, हे ऐकून आश्चर्य वाटले..

अवघ्या पंचावन्न वर्षात ओसाड माळरानावर गर्द झाडी काही पट्टे, घनदाट अरण्ये वाटतील असे तयार करण्यात, नुसते काम नाही तर तितकाच प्रेरक विचार असणार हे जाणवले..


माणसा माणसामध्ये वाढत जाणारी असूया, द्वेष, तंटा, स्पर्धा, क्रोध, अहंकार, लोभ असे एक ना अनेक विकार दूर व्हायला हवे..

एकमेकांविषयी सहृदयता निर्माण व्हायला हवी, तरच शांतता नांदेल या उद्देशाने या संस्थेचे काम फक्त पाचगणी वा भारत नाही तर विविध देशांमध्ये चालू आहे..

अपेक्षित बदल घडण्यासाठी विविध स्तरातील लोकांसाठी विविध उपक्रम येथे चालतात..

त्यासाठी संस्थेचे वेगवेगळे विभाग आहेत, ज्यात प्रत्यक्ष कृतीयुक्त तर काही प्रबोधनपर काम चालते..

याद्वारे मंत्री, सरकारी ऑफिसर, कर्मचारी, स्वायत्त संस्था सदस्य अशा सर्वांसाठी शिबीर, सत्रे चालू असतात..

आम्ही अनुभवलेले प्रशिक्षण हे मुख्यत्वे शहरी ग्रामीण विद्यार्थ्यांमधील गैरसमज, वैचारिक तफावत दूर करण्यासाठीच्या उपक्रमाची सुरुवात होती..

यात सदर उपक्रमासाठी शाळेत परत गेल्यावर मुलांकडून काय तयारी करुन घ्यायची याबद्दल काहीही नव्हते..

तर संस्थेचा मूळ हेतू समाजात शांतता, स्वस्थता यायला हवी यासाठी काय करता, कसे करता येईल आणि त्याची मुळात गरज काय हेच प्रत्येक सत्रातून मांडले..

प्रश्न, समस्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक किंवा अगदी राजकीय कोणत्याही असल्या तरी त्याचे निर्मूलन, निराकरण करण्यासाठी स्वतः पासून सुरुवात करायला हवी हेच पुन्हा पुन्हा मांडून बिंबवले गेले, जे अगदी योग्य आणि पटण्यासारखे होते..

दोन दिवसाच्या या प्रशिक्षणात सुमारे बारा ते पंधरा सत्रे झाली, परंतु कोणत्याही सत्रात नुसती व्याख्यान पद्धती नव्हती..

नवीन प्रकारानुसार पीपीटी दाखवा, समजावून द्या असेही नव्हते..

इतकेच नाहीतर कोणत्याही सत्राची पद्धत एकसारखी नव्हती आणि सत्र घेणारे सुद्धा एक नव्हते..

सर्व प्रशिक्षक हे उच्च शिक्षित, स्थानिक (पाचगणीच्या आसपास रहाणारे) आणि मराठी भाषिक होते, शिवाय त्यांना हिंदी, इंग्रजी येत असले तरी गरजेनुसार त्याचा वापर होता..

संस्थेचे क्रेंद कितीही अद्यावत असले, त्याचे काम आंतरराष्ट्रीय स्तरावर चालू असले तरीही कुठेच अनावश्यक इंग्रजी समावेश नव्हता..

स्थानिक भाषांचा अभिमान, आदर, वापर, उपयोगिता याचे उत्तम उदाहरण  यानिमित्ताने बघायला मिळाले..

यात सहभागी होणाऱ्या शहरी शाळा मुख्यत्त्वे इंग्रजी माध्यमाच्या असणार, ज्यांच्यावर नकळत जास्तीत जास्त इंग्रजी बोला, लिहा असेच बिंबवले जाते, या उपक्रमातून स्थानिक भाषांची गरज आणि मजा मुलांना नक्कीच अनुभवायला मिळेल..

आधी सांगितल्यानुसार बहुतांश सत्रे ही समस्या निराकरण याची सुरुवात स्वतः करायला हवी हे सांगणारी होती..

पहिल्या सत्रात प्रशिक्षणाला आलेल्या सर्वांची ओळख ही नाव, शाळेचे नाव व आपण शिकलो त्या शाळेची एक आठवण सांगून झाली..

प्रत्येकाचे ऐकताना लहानपण, शाळा याविषयी सर्वांच्या आठवणी चांगल्याच असतात असे नाही हे समजले, कदाचित यातून आपल्या घडणीत शाळा, शिक्षक किती महत्त्वाचे असतात हे यातून सुचवायचे असेल..

पुढचे सत्र इमारतीच्या बाहेरील मोकळ्या व्हरांड्यात, निसर्गरम्य वातावरण व जोडी पद्धतीने झाले..

साधारण आठ जोड्या झाल्या, त्यात चार प्रश्न होते, प्रत्येक प्रश्न वेगळ्या खुर्चीवर असल्याने बैठक व्यवस्था साधारण पाच मिनिटांनी बदलली जात होती, चारी प्रश्न झाल्यावर एकत्रित चर्चा झाली..


सर्व प्रश्नांच्या उत्तरांचे केंद्रस्थान विश्वास (ट्रस्ट) होता, तो आपला इतरांवर, इतरांचा आपल्यावर, परिस्थितीवर असे मुद्दे मांडले गेले, ज्यामुळे काहीही झाले तरी आपण सकारात्मक कसे राहू शकतो याची प्रेरणा मिळाली..

मग आम्ही एक कोल्हा दुष्ट का असतो अशी गोष्ट बघितली याचा सारांश गैरसमज कसे पसरतात, त्यामुळे असंतोष, द्वेष कसे निर्माण होतात हा होता, ज्याद्वारे कोणी सांगितले म्हणून परंपरा आहे म्हणून कशावरही विश्वास न ठेवता अनुभव घेऊन मत व्यक्त करावे हे लक्षात आले..

त्यानंतर पाच जणांच्या गटात एकमेकांच्या पाठीला फळा समजून  अपेक्षित चित्र काढण्याचे सत्र होते, यात दुसऱ्याचे म्हणणे समजून घेण्यासाठी किती प्रकारे आपल्याला सजग राहावे लागते हे लक्षात आले..

प्रत्येक सत्राची वेगळी मांडणी, जागा बदल, अतिशय रुचकर भोजन यामुळे कुठेही थकवा, कंटाळा जाणवला नाही..

एका सत्रात सर्वांना एका सरळ आडव्या ओळीत उभे केले, मग काही प्रश्न विचारले, ज्याचे उत्तर हो असल्यास एक पाऊल पुढे यायचे, नाही असेल तर आहे त्याच जागी उभे रहायचे..

प्रश्न हे आपल्याला मिळणाऱ्या सोयीसुविधा, येणाऱ्या अडचणी यावर होते, ज्यात प्रत्येक जण वेगवेगळ्या टप्प्यावर होते..

त्यावर चर्चा करताना कोण, कधी पुढे गेला, कोण मागे राहिला यावर मनात काय विचार आले, स्वतः बद्दल काय वाटले या आधारे झाली, ज्यातून स्वीकार फक्त स्वतःविषयी पुरेसा नसून इतरांबद्दल, परिस्थितीचा पण असायला हवा हे लक्षात आले..

पंचावन्न वर्षात ओसाड ते निसर्गरम्य परिसर कसा तयार झाला, हे समजून घेण्यासाठी आम्ही चालत सर्वत्र फिरलो, तेथील वास्तू, अगदी १९६७ पासूनच प्रत्येक इमारतीत केले जाणारे पर्जन्य जल संवर्धन, त्याचबरोबर सांडपाण्याचा सुयोग्य पुनर्वापर, या पूर्ण प्रवासाची साक्ष असणारा ओक वृक्ष, सर्व सदस्य, कामाची पद्धत या साऱ्याची माहिती घेतली..

निसर्ग नियमानुसार भोजन आनंद सात वाजता घेतला, त्यानंतर वॉशअप म्हणजेच भांडी घासणे, टेबल पुसणे या कामात मदत करण्याचा स्वेच्छेने आनंद घेतला, हेही एक सत्र होते..

ज्यातून कोणतेही काम विशिष्ट लोकांनीच करावे असा गैरसमज तयार न होण्यासाठी मदत होते, प्रत्येक कामाची ओळख, जाणीव व आनंद अनुभवता येतो..

 

प्रथम दिवसाचे सत्र फारच वेगळे व छान होते, ज्यात सोयीसाठी पुन्हा पाच जणांचा गट केला..

प्रत्येकाला एक कार्ड दिले, ज्यात एक विचार व त्याला अनुसरून एक विषय होता त्या विषयाला अधिक स्पष्ट करणारे तीन प्रश्न होते..

प्रत्येकाने आपला विचार वाचून दाखवायचा त्या संघाने येणारा विषय सांगायचा व कोणत्याही एका प्रश्नावर आपले अनुभव सांगायचे..

तेच कार्ड तोच विचार विषय व प्रश्न यावर प्रत्येकाने बोलायचे अशी एक वेडी झाल्यावर दुसऱ्या कार्डची सुरुवात करायची..

यामध्ये माझ्यातील कमजोरी, जमेच्या बाजू, आदर्श, अडचणी, विनोदी प्रसंग असे अनेक विषय होते..

साधारण दीड तास चाललेल्या या सत्रात प्रत्येकाच्या कार्डमधील एकच प्रश्न व त्यावरील मांडणी ऐकून झाली..

पाच जणांच्या गटातही प्रत्येकाचे ऐकताना असे वाटले की, आपण आपल्या आत किती गोष्टी साठवून ठेवत असतो..

ज्या अनेकदा आपल्याला आतून त्रस्त करुन, नकारात्मक विचार येण्यास कारणीभूत होतात..

 

दुसऱ्या दिवसाची सुरुवात सकाळी सात वाजता निसर्ग रम्य परिसरात, कोणाशीही न बोलता, मोबाईल हातात न घेता, शांतपणे फेरफटका मारा..

परिसरातील वास्तूशी, झाडांशी बोला, त्यांचे स्पर्श अनुभवा व त्यातून जे सुचेल ते नोंदवून ठेवा अशा वेगळ्याच सत्राने झाली..

पंधरा मिनिटानंतर प्रत्येकाने आपला अनुभव थोडक्यात सांगितला, त्यावर संवाद झाला..

शिक्षण म्हणजे फक्त नियोजित पाठ्यपुस्तक इतके मर्यादित नसून, स्वतःहून स्वतःला निरीक्षण, स्पर्श, अनुभव यातून शिकता येते, याचे हे उत्तम उदाहरण होते..

यानंतर ग्रामीण विकासासाठी कार्यरत असणाऱ्या ग्रामपरी विभागास भेट देऊन तेथील काम समजून घेतले..

मुलांची सत्रे व व्यवस्था याच ठिकाणी होणार आहेत, त्याबद्दल माहिती घेतली..

त्याच्या सुरुवातीला एक गमतीशीर खेळ खेळलो, ज्यात एकमेकांना अभिवादन म्हणजेच नमस्कार करायचा व लगेच आळस द्यायचा..

हे दहा वेळा हा विविध पद्धतीने करायचे होते..

नमस्कार करण्याच्या दहा पद्धती सुचल्या, पण आळस देण्याच्या दहा पद्धती आठवणे हे काहीसे अवघड गेले..

प्रशिक्षकांनी त्याविषयी मांडताना सांगितले की, नमस्कार यांच्या पद्धतीत जास्त करुन जाती धर्म डोकावला किंवा जुने नवे याचा प्रभाव दिसला..

पण कोणालाही ग्रामीण, आदिवासी पद्धतीची आठवण झाली नाही याचाच अर्थ आपल्याला एकमेकांविषयी विशेष ज्ञान नाही..

दुसरे म्हणजे प्रत्येकाला अभिवादन करुन पुढे जाण्याच्या गोंधळात, कोणीही समोरच्याला प्रतिसाद देत नव्हते, असेच काहीसे दैनंदिन कामात होते आपण स्वतःमध्येच इतके मग्न असतो की, इतरांना काही सांगायचे आहे त्याचा विसर पडतो, यातूनच गैरसमज पसरतात..

आळस विविध पद्धतीने न सुचणे या विषयी मला असे वाटले की, कंटाळा येण्यासाठी आपण तीच तीच कारणे देतो..

कंटाळा येणे सहज आहे, पण त्यासाठी कारणे तरी नवीन हवी..

मग एका सत्रात भूतकाळातील प्रत्येक गोष्टीतले काही ना काही आपण मनात साठवून नव्हे तर साचवून ठेवलेले असते, ज्याचा परिणाम वर्तमान व भविष्यावर होत असतो..

हे ग्लासमध्ये पाण्या व्यातिरिक्त अनेक गोष्टी असल्यामुळे फूल कोमेजते, या रूपकात्मक उदाहरणाने मांडले..

इतरांनी बदलावे म्हणजे परिस्थिती बदलेल, यापेक्षा मी परिस्थिती नुसार बदललो तर अधिक सहज, सोपे आहे याचा अनुभव या दोन दिवसात हसत खेळत मिळवला..

उपक्रमाच्या यानंतरच्या टप्प्यांवर विद्यार्थ्यांसोबत अजून नवी सत्रे, नवे अनुभव मिळतील..

पण या दोन दिवसांनी नवीन विचार नवे दृष्टिकोन मिळाले..

या संस्थेतर्फे असे प्रशिक्षण वैयक्तिक  कुटुंबांसाठी ही घेतले जाते, त्यांच्या वेबसाइटवर त्याची माहिती मिळेल, त्याचा जरुर लाभ घ्यावा..

या दोन दिवसात प्रत्येक सत्रात असणारी, एक मुख्य गोष्ट मुद्दाम राखून ठेवली होती..

ती म्हणजे शांतता वेळ, प्रत्येक सत्रात कधी सुरुवातीला, कधी मध्यंतरात तर कधी समारोप पाच मिनिटांचा शांतता वेळ असायचा..

ज्यात आपण स्वतः चालू विषयाचा पुन्हा एकदा अनेक प्रकारे विचार करावा.. 

काय राहिले, काय बदलायला हवे, काय नव्याने करायला हवे याचा मागोवा घ्यावा व तसे करण्याचे ठरवावे असे सुचवले जायचे..

प्रत्येक प्रशिक्षकांनी सांगितले की, मी आधी वेगळा होतो, त्रस्त होतो, निराश होतो पण या शांतता वेळेने मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळवून दिली..

प्रत्येक सत्रातील शांतता वेळाने, नवीन विचार करायला संधी दिली, प्रश्न समस्या याकडे उत्तरे शोधण्यासाठी बघायला हवे हा विचार दिला..

त्यापलीकडे जाऊन शांततेचा आनंद मिळावा, शांतता ही पूर्णपणे शांत म्हणजेच शून्यावस्था असावी, असा अनुभव एकदाही आला नाही..

याचा अर्थ अजूनही अनेक अनावश्यक गोष्टी मनात खोलवर साचून राहिल्या आहेत हे जाणवले..

ज्याचा निचरा होण्यासाठी रोज जमले तर उत्तमच, पण  आठवड्यातून किमान एकदा असा शांतता वेळेचा अनुभव घ्यायचा हे या निमित्याने ठरवले आहे, इतके सांगून आतासाठी विश्रांती घेते..




Friday, October 13, 2023

पाचगणी

 शिक्षक प्रशिक्षण


आय ऑफ सी (Initiative of Change) संस्थेच्या पाचगणी येथील ग्रामपरी विभागातर्फे, ग्रामीण शहरी शैक्षणिक दुवा साधण्यासाठी अर्बन रुरल कनेक्ट नावाचा एक विशेष उपक्रम राबवला जातो. 


यात एक ग्रामीण व एक शहरी शाळा निवडून त्यातील काही निवडक विद्यार्थी साधारण दोन अडीच महिन्यांच्या कालावधीत एकमेकांच्या संपर्कात रहातात. यात काही सत्रे ऑनलाईन तर काही प्रत्यक्ष भेटीची असतात. याची सुरुवात दोन्ही शाळांच्या सहभागी शिक्षकांना उपक्रमाचे प्रशिक्षण देऊन होते.


सिटी प्राईड शाळा निगडी तर्फे वृषाली डेंगवेकर आदिती पुराणिक व सायली सोनवणे यांनी दिनांक  गुरुवार १२ व  शुक्रवार १३ ऑक्टोबर २०२३ रोजी यांनी हे प्रशिक्षण घेऊन या उपक्रमात शाळेचा सहभाग नोंदवला. प्रशिक्षणात अजून तीन शाळांचे शिक्षकही सहभागी होते. पैकी एक शाळा शहरी व दोन ग्रामीण भागातील होत्या.


प्रशिक्षण अतिशय सहज, विविध खेळातून या उपक्रमाची उद्दिष्टे, गरज मांडत पूर्ण झाले. साधारण दीड दिवसाच्या कालावधीत अर्धा ते पाऊण तासाची बारा ते पंधरा सत्रे झाली. शेवटच्या सत्रात एक ग्रामीण व एक शहरी भागातील शाळा यांची निश्चिती झाली. त्यानुसार आपली सिटी प्राईड स्कूल व न्यू इंग्लिश स्कूल बामणोली कुडाळ हे एकत्रित काम करतील असे ठरले. मग आम्ही शाळेला भेट दिली.

तिथे शाळा भेट, आमची ओळख, विद्यार्थ्यांशी गप्पा,  मुले मुली कब्बडी सामना, पोवाडा असा छोटासा पण सुंदर कार्यक्रम अनुभवला.


दोन दिवसांचा भरगच्च सत्रांच्या या नावीन्यपूर्ण प्रशिक्षणात खूप ऊर्जा मिळाली. यापुढील वाटचालही  फलदायी असेल याची मनापासून खात्री वाटते.


या उपक्रमात सहभागी करुन घेतल्याबद्दल मी वरिष्ठ, व्यवस्थापकीय आणि सहकारी सर्वांचे आभार मानते व मला दिलेले काम यथोचित पूर्ण करेन याची ग्वाही देते.

शिवराजदादा

'नावीन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोग' 

                        - श्री. शिवराज पिंपुडे 

आज मराठी विभागातर्फे आपल्या सर्व शिक्षकांसाठी 'नावीन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोग' या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. यासाठी मार्गदर्शक म्हणून ज्ञानप्रबोधिनी निगडी शाळेचे अतिशय उत्साही, प्रयोगशील शिक्षक, जे शाळेचे विस्तार प्रमुख म्हणूनही काम बघतात, असे श्री. शिवराज पिंपुडे उपस्थित होते. त्यांच्यासोबत शाळेच्या अभिरुची गटाच्या प्रमुख व संस्कृत विषय अध्यापिका श्वेतल महात्मा याही आल्या होत्या.

दोघांनी सर्वप्रथम संचालिका डॉ. अश्विनी कुलकर्णी व डॉ दिपाली सवाई यांची भेट घेतली. दोन्ही शाळांमधील विविध उपक्रम, विद्यार्थी, पालक, कामकाज त्यातील जमेच्या बाजू, अडचणी यावर सुमारे एक तासाहून अधिक काळ गप्पा रंगल्या होत्या. दोन्ही शाळेचे शिक्षक व विद्यार्थी एकत्रित येऊन काही वेगळे शैक्षणिक अनुभव घेऊ शकतील का यावर चर्चा झाली.

त्यानंतर शिवराजदादांने त्याच्या तेवीस वर्षाच्या अध्यापन प्रवासात मुलांसाठी राबवलेले अभ्यासेतर प्रयोग या विषयावर शिक्षकांशी संवाद साधला.  


सुरुवातीलाच दादाने सर्व शिक्षक प्रयोगशील असतात, त्यामुळे मी कोणताही उपदेश करणार नाही, फक्त माझे अनुभव सांगेन असे म्हणत सत्राची औपचारिकता कमी केली.


खरे तर त्याने सांगितलेले उपक्रम ही त्याच्या अभिनव उपक्रमांची फक्त झलक होती. त्यात भिंती चित्र रंगवणे, अभ्यास सहली, मातृभूमी परिचय शिबिरे, दुर्ग सहली, जम्मत घर, करोना काळातील तासिका अशा काही निवडक प्रयोगांची माहिती सांगितली. सोपी भाषा, आघोवती मांडणी यामुळे हे उपक्रम आपण प्रत्यक्ष अनुभव  आहोत असेच शिक्षकांना वाटले. हसत खेळत एक तास कधी संपला कळले नाही.


उपक्रम उत्तम असले तरी त्याची तांत्रिक घडी बसवणे, मूल्यमापन, उपयोगिता यावर शिक्षकांनी आपल्या शंकांचे दादाकडून निरसन करुन घेतले.


या सत्रास तिन्ही शाखेतील निवडक शिक्षक गट, शाळेच्या मुख्याध्यापिका माया सावंत व उपमुख्याध्यापिका नेत्रे कुलकर्णी उपस्थित होत्या. त्यांनीही काही प्रश्न विचारुन मुलांसाठी विविध उपक्रम कसे घेता येईल यावर दादाशी संवाद साधला.



सत्रानंतर शिवराजदादा व श्वेतलताई या दोघांनीही विविध कौशल्य प्रयोग शाळा (skill lab), ग्रंथालय याला भेट दिली. तेथील शिक्षकांकडून विद्यार्थ्यांच्या तासिका, त्या विषयाचा अभ्यासक्रम, स्पर्धा, बक्षिसे एकूण शिक्षणात या सगळ्याची उपयोगिता समजून घेतली.

एकूणच या सर्वाची सांगता दोन्ही शाळांनी एकत्रित काही उपक्रम घेऊ या विचारावर झाली.



या साऱ्याचे आयोजन करण्याची संधी दिल्याबद्दल मी शाळा, सर्व संचालक, वरिष्ठ, मराठी विभाग यांची ऋणी आहे.

सत्रास उपस्थित व तसेच सहाय्य केलेले सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी साऱ्यांचे मनापासून आभार.

यातून विद्यार्थ्यांसाठी निश्चित नवीन उपक्रम होतील, असलेल्या उपक्रमांना नव्याने बघण्याची प्रेरणा मिळेल अशी सदिच्छा व्यक्त करते.

Wednesday, August 16, 2023

नियम

समाप्ती की नवी सुरुवात..?

पुरुषोत्तम मास, मराठी कालगणनेत दर तीन वर्षानंतर येणारा, हा अधिक महिना..


या काळात स्वतःमध्ये प्रगती करण्यासाठी, ठरवून काही नियम केले जातात..


असे नियम करून पूर्ण महिना त्यावर अंमलबजावणी करणे, वाटते तितके सोपे नसते..


कारण त्या गोष्टी आपल्या दैनंदिन सवयीच्या नसतात, त्यामुळे अनेकदा या कृती करताना अडचणी येतात..


पण जेव्हा त्यावर मात करुन, तो नियम पूर्ण महिनाभर पाळता येतो, त्यावेळी विशेष आनंद होतो..


या वर्षी हा अनुभव घेण्याचे ठरवले होते..


त्यानुसार एक जाहीरपणे सांगून व दुसरा जमल्यास करु, असे दोन नियम केले होते..


त्यापैकी पहिला म्हणजे नियमित काहीतरी लेखन करणे..


सांगायला विशेष आनंद होतो, की २९  दिवस हे लेखन प्रयत्नपूर्वक  केले..


लेखनाचा मुख्य विषय, माझ्या दैनंदिन अध्ययन अध्यापन कामात घेतलेले अनुभव आणि माझे विविध शैक्षणिक प्रयोग असा होता..


माझे लेखन नियमित वाचणाऱ्या अनेकांना वाटेल की, यातले बरेचसे लेखन जुनेच होते, जे अगदीच योग्य आहे..


पण तरी ते पुन्हा पाठवताना, त्याचे पुनर्वाचन, पुनर्मांडणी, नव्याने काही गोष्टींची भर इ. संस्करण जाणीवपूर्वक केले..


काही विषय वेळ नाही, असे कारण पुढे केल्यामुळे, लिहायचे राहिले होते ते या निमित्ताने लिहून झाले..


एकूणच महिनाभर या अनुभवाने भरपूर समृद्ध केले..


आपण एखादी गोष्ट जेव्हा ठरवतो आणि ती पूर्ण करण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न करतो, तेव्हा ती निश्चित यशस्वी होते हा अनुभव खूप काही शिकवून गेला..


म्हणूनच कदाचित असे म्हणतात की, एखादी गोष्ट करायचे ठरवणे, म्हणजे अर्धे काम पूर्ण होण्यासारखे आहे..


यापुढे रोज लेखन चालू ठेवायचे ठरवले, तर ते जमेल असे नक्कीच वाटते..


या सोबतच दुसरी गोष्ट ठरवली होती ती म्हणजे रोज साडी नेसणे..


ही गोष्ट तर अजिबात सोपी नव्हती, कारण एकतर मला ते आवडत नाही, अतिशय बंधल्यासारखे होते..


शिवाय इतक्या साड्या माझ्याकडे नाही..


अजून भर की, सकाळी आठ आधी शाळेत असायला हवे, वेळ गाठताना सकाळी सकाळी साडी नेसणे, त्यावर साजेसा, शाळेत शिक्षिका म्हणून योग्य दिसेल असा शृंगार करणे.. (टिकली पासून ते गळ्यात, कानात, हातात छोटेसे, रंगसंगती हा एक मोठा कार्यक्रम असायचा)


दिवसभर साडीमध्ये अध्यापन करणे, माझ्या बाल मित्रांबरोबर नाचणे गाणे म्हणणे हे सारेच अवघडच विषय होते..


पण कर्मधर्म संयोगाने साऱ्या गोष्टी जुळून आल्या आणि ठरवलेले दोन्ही नियम पूर्णत्वास गेले..


आता या दोन्ही मधून काय साधले..?


हे सांगण्यापेक्षा अनुभवणे जास्त परिणामकारक आणि आनंददायी होते..


आज अधिकमास संपताना एक निश्चित सांगू इच्छिते की, आपण स्वतः एखादी गोष्ट ठरवल्यास, ती पूर्ण करणे अजिबात अशक्य नाही..


ते काय म्हणतात ना की, जेव्हा एखादी गोष्ट आपण मनापासून ठरवतो, तेव्हा ती पूर्ण करण्यास चराचरातील सर्व शक्ती आपल्याला मदत करतात..


आणि या साऱ्याचा समारोप करताना दोन ओळी आठवतात..


'नियम पाळावे, जरी म्हणशील, योगी व्हावे..'


योगी होणे ही तर खूप मोठी तपश्चर्या आहे..


पण आपल्यात चांगले बदल करायचे असले तर, त्यासाठी काही नियम करावे लागतात.. 


असे नियम यशस्वी केल्यास, नकळत त्याचे सवयीत रुपांतर होते..


आणि आपला प्रवास हळूहळू उत्तम, गुणाग्रही होण्याकडे होत जातो..


हा अनुभव जसा मी घेतला तसाच आपणही घ्यावा, याच शुभेच्छा..!

Tuesday, May 23, 2023

Leader in me



उत्तम नेतृत्व म्हणून साऱ्या विश्वात ज्या राजाला मानतात, पूजतात आणि त्यांचा अभ्यास करतात ते म्हणजे 


छत्रपती शिवाजी महाराज


एक शिक्षक म्हणून मी, त्यांना महाराष्ट्राचे, त्यातही मराठीचे आद्य दैवत म्हणत फक्त एक जयंती साजरी करुन अभिमान दाखवणार की माझ्या रोजच्या दिनक्रमात त्यांच्यातले गुण माझ्यात विकसित करणार.


माझे आळशी मन लगेच म्हणेल, पण माझ्याकडे कुठे आहे, कोणते नेतृत्व मला नाही करायचे पुढे पुढे...


पण जिथे शिक्षकी पेशा स्वीकारला तिथे या वक्तव्याला मुळात मान्यताच नाही, 


स्वामी विवेकानंद म्हणतात, 

मुलांसाठी शिक्षक हा वाटाड्या असतो.   मुलांना त्यांच्यातील स्वयंभू गुणांची ओळख करुन देत त्यांना परिपूर्ण करण्याची मोठी जबाबदारी शिक्षकाची असते. हे करताना नकळत अनेक प्रकारचे नेतृत्व करावेच लागते.


आणि दुसरे म्हणजे शिवाजी महाराज अभ्यासताना, राहून राहून वाटते की महाराज कधीच एकटे मोठे झाले नाही, त्यांचे अनुयायी, जीवाला जीव देणारे सरदार यांनी त्यांना मोठे केले.


यातून हा विचार घेता येऊ शकतो की, नसतील आपल्यात नेतृत्व गुण, मग आपण किमान चांगले अनुयायी तर होऊ शकतो का..?


हा - का.. 


जो काही आहे ना, तो नुसत्या उच्चारातून ही आपल्याला नकारात्मक बनवतो..


बघा कसे ते..वरचे वाक्य परत वाचा,


नेतृत्व नको, पण मी उत्तम अनुयायी बनू शकतो का..?


आता का चे स्थान बदलू या..


नेतृत्व तर नकोच, पण मी का उत्तम अनुयायी बनू ..? 

(नवीन प्रश्नमालिका त्यासाठी तयारच असते- त्यासाठी गरजेचे नेतृत्व कुठे आहे, मला स्वातंत्र्य कुठे आहे, त्याने मला काय मिळेल..?)


हे अनुभव थोड्याफार फरकाने प्रत्येक जण घरात, कामाच्या ठिकाणी रोज घेत असतो..


या साऱ्या, का..? ची उत्तरे 


मला एप्रिलमध्ये आमच्या सिटी प्राईड शाळेच्या तिन्ही शाखेच्या शिक्षकांसाठी झालेल्या लीडर इन मी या कार्यशाळेत मिळाली.



सुरुवातीला सक्ती म्हणून सहभाग असला तरी, नंतर मात्र कन्नन सरांच्या उत्साहवर्धक पद्धतीमुळे हसत खेळत तो पूर्ण दिवस अनुभवला.


त्यात अनेक जमेच्या आणि काही रुखरुख लावणाऱ्या गोष्टी आहेत.


शेवट नेहमी गोड असावा म्हणून, त्यातल्या जमेच्या बाजू नंतर मांडते, 


आधी काय नाही आवडले ते सांगते.


१) मराठी माध्यमात शिकलेल्या मी, अगदी आजही इंग्रजी अनेक कारणाने थोडी दुर्लक्षित केली आहे. याची प्रचंड खंत मला या कार्यशाळेत झाली. कारण पूर्ण वेळ फक्त इंग्रजी बोलले जात होते. ही अवस्था माझ्यासोबत अजूनही अनेक शिक्षकांची बघण्यात आली.


२) प्रत्येक मुद्दा पटण्यासाठी दाखवण्यात आलेल्या चल चित्रफिती सुद्धा वेगळ्या इंग्रजी उच्चार पद्धतीच्या होत्या.


२) त्यात भर, कन्नन सरांचे दाक्षिणात्य उच्चार, प्रचंड वेगात बोलणे.


एकूण परिणाम कदाचित ५०% समजले.


त्यावेळी घरात मराठी भाषेचा प्रभाव असणारी व स्वतःची इंग्रजी भाषा न वाढवलेले विद्यार्थी रोज शाळेत अशा गोष्टींना सामोरे जात असतील का याचीही चिंता वाटली.


३) सुटी पूर्वीचा एक दिवस सर्व शिक्षक रोजच्याप्रमाणे एकमेकांना भेटले असते, तर या कार्यशाळेची चर्चा त्यांच्यात झाली असती आणि त्याचा अधिक परिणाम झाला असता 



४) अजून एक आणि फार महत्वाचे या सारख्या अनेक कार्यशाळा एका उत्तम शाळेची विद्यार्थिनी म्हणून अनुभवलेली मी, 


हे सगळे विचार माझ्या मातृभूमीला सुजलाम् सुफलाम् ठेवणाऱ्या अनेक ऋषीमुनी, वेद, संस्कृती, विद्वान, पराक्रमी वीर, समाजसुधारक यांनी प्रथम मांडलेले आहेत, तसे लेखी दाखले आहेत तरीही त्यांच्या नावाचा साधा उच्चार ही कुठेच झाला नाही 


हे स्वीकारू नाही शकत.


कारण येत्या काही वर्षात माझी मातृभूमी जगज्जेती आणि सुपथदर्शी असेल असे विश्वासपूर्वक सांगणाऱ्या स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर ते अब्दुल कलाम यांच्यावर माझा फार विश्वास आहे.


पण ते पूर्ण करणारे आजची पिढी जर असे आपली संस्कृती, परंपरा, स्वत्त्व यापासून लांब गेली तर हे दिवास्वप्न  प्रत्यक्षात येईल कसे?


या साऱ्याला योग्य दाखले पुढे देईनच


आता काय आवडले..


१) अशी कार्यशाळा शाळेच्या सर्वच शिक्षकांसाठी आयोजित करणे. 

२) गिरीष कन्नन सरांचा प्रचंड उत्साह, प्रत्येक गोष्टीची चांगली बाजू बघण्याची सवय करा हे सतत सांगणे.


३) त्या सवयी अंगीभूत करण्यासाठी किंवा त्याचे महत्त्व समजण्यासाठी घेतलेल्या छोट्या छोट्या कृती, जसे

 आज हयात नसणाऱ्या प्रिय व्यक्तींचा, शरीराने जाण्याचा स्वीकार करणे, एखाद्याच्या नजरेला नजर देऊन सांगितलेल्या गोष्टी करणे, त्यातून त्याच्याविषयी अजून समजून घेणे, पत्रलेखन, एकमेकांचे गुण लिहिणे, स्वतः च्या पंच्याहत्तरी वाढदिवसाचे लेखन इत्यादी बरेच काही.


४) मुलांसाठी असे उपक्रम शाळेत राबवणे.


५) याला ७ सवयी म्हणण्यापेक्षा, प्रत्येकामध्ये असणाऱ्या या ७ गुणांची ओळख त्याला असायला हवी हा विचार. (त्या प्रत्येक सवयी विषयी अधिक सविस्तर आणि सोदाहरण लिहिणार आहे)


६) स्वतःचे गुण माहिती झाल्यावर, त्यांचा योग्यप्रकारे उपयोग आणि त्याची सवय बनल्यास होणारा व्यक्ती विकास.


असे अजूनही बरेच असेल पुन्हा विचार करताना नव्याने सापडत जाईल.


पण, या कार्यशाळेने मला नेमके काय दिले..


१) ४ मार्च २०२३ माझ्या प्रिय बाबांनी शरीराने सर्वांचा निरोप घेतला, त्याचा स्वीकार करण्याचा प्रयत्न अगदी आजही चालूच आहे, पण त्यासाठी लागणाऱ्या अनेक गोष्टी करत असताना या कार्यशाळेत काही गोष्टी नकळत घडल्या.


२) अप्रेझलच्या वेळी मी पुरेशी स्वस्थ नसल्याने अश्विनी मॅडम यांनी माझ्या अनेक नकारात्मक बाजू ऐकवल्या.


ज्या योग्य नाहीत हे मला पूर्ण माहित असले, तरी ते त्यांना पटेल यासाठी काय करायचे याचा रस्ता शोधत होते, एक नाही, अनेक रस्ते सापडले..


३) पहिल्या वर्षी अनुभवलेली CPS Family पुढच्या दोन वर्षात पुष्कळ बदलली, किंवा अनेक गोष्टी हळूहळू बाहेर येत आहेत, त्यात एक नकार बाजू तयार होत होती, त्याची दुसरी बाजू बघायचे राहून जात होते, ते बघायला हवे हे जाणवले.


४) कामाच्या ठिकाणी प्रेरणा नेमकी काय ही माझी भूमिका नक्की आहे, मी एक शिक्षक आहे, म्हणून माझ्यासाठी प्रेरणा नेहमी विद्यार्थीच असतील त्यात गेल्या दोन वर्षात अनेक अडथळे आले होते. ज्यांना पार करताना योग्य उडी घ्यायला जमत नव्हते, त्याची सुरुवात यातून झाली.


५) एकमेकांविषयी लिहा या कृतीत, आपल्या नकळत किती जण आपल्याला पॉझिटीव्ह वाईब, आशीर्वाद देत असतात हे लेखी समजले.


५) एकमेकांना त्यांच्यातले काय आवडते हे सांगा, या कृतीत खूप जणांना जे रोज सांगायला मिळत नाही ते सांगण्याची संधी मिळाली, आणि नकळत घडून गेलेल्या गोष्टींची वाईट वाटले असेल तर माफी मागता आली.


त्यांनी मला माझ्यातल्या चांगल्या गोष्टी सांगितल्या तेंव्हा छान तर वाटलेच, पण नवीन माहिती पण मिळाली.


७) सुटी घालवायची नाही तर मिळवायची हा लहानपणी शाळेत मनावर कोरलेला संस्कार.

त्यासाठी उत्तम सुरुवात या कार्यशाळेमुळे झाली.


अजून खूप काही आहे, पण सगळच लिहिले तर कंटाळा येऊन जाईल. 

(मी माझ्यासाठी नक्की लिहून ठेवले आहे)


पण असा तो शोध त्यात सहभागी प्रत्येकाने घेतला, आणि त्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये दिल्या तर खूप मस्त उजळणी होईल आणि मला छान वाचायला जरुर  आवडतील.


अजून एक यातले न पटलेल्या मुद्यांची, जर दुसरी बाजू असेल तर तीही समजून घ्यायला, ऐकायला आवडेल.


(काहींना लिहायला नाही आवडत, त्यांनी ऑडिओ पाठवून किंवा प्रत्यक्ष भेटून सांगितले तरी चालेल) 


पुन्हा एकदा..


लीडर इन मी या कार्यशाळेतून खूप काही शिकायला मिळाले, त्यासाठी सिटी प्राईड संस्थेच्या संचालिका विद्या वाचस्पती अश्विनी मॅडम, विद्या वाचस्पती दिपाली मॅडम यांचे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन नियोजन करणारी टीम यांचेही मनापासून आभार मानते.

यात सहभागी होता आले याचा आनंद व्यक्त करुन आणि वेळ घेऊन ७ सवयी यावर लेखन करेन हा शब्द देऊन थांबते.

Saturday, May 28, 2022

आईपण


 

आई, तुला काही सांगायचं आहे...

आई यावर प्रत्येक भाषेत, साहित्यप्रकारात आणि बहुतांश सिधहस्त लेखक कवींनी इतके लिहून ठेवले आहे, की त्यापुढे मी काय जाणार...

पण तरी मला आज काहीतरी वेगळेच सांगायचे आहे, कारण तुझी लेक असणे, हे माझे पूर्वसंचित आहे......

मनातलं सांगण्यासाठी आजचा दिवस खास, तुझा जन्मदिवस...

वाढदिवस मुद्दाम म्हणले नाही, कारण प्रत्येक जण शारीरिक, मानसिक, वैचारिक इतकच नाहीतर आत्मिक रोज वाढतच असतो, हे तू शब्दातून नाही तर कृतीतून माझ्यात रुजवलं आहेस...

कोणाचाही जन्मदिवस साजरा करणे म्हणजे आनंद, मजा आणि आठवणीच्या खजिन्यात भर...

त्यात तो आईचा म्हणल्यावर तर, अजूनच भारी हवा ना...!

कळायला लागल्यापासून, हा दिवस तुला विशेष लक्षात रहावा म्हणून धडपड असायची...

जेंव्हा स्वतः कमवत नव्हते, तेंव्हा बाबांकडून आर्थिक मदत आणि जास्तीत जास्त स्वतःची कला वापरण्याकडे कल होता...

नंतर आर्थिक सक्षम झाल्यावर, त्यात वेगवेगळ्या गोष्टीची भर पडत गेली...

पण अध्यात्मिक अभ्यास आणि इतर अनेक कारणांमळे तुझा या सगळ्याकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलत गेला...

आणि हेच माझ्यासाठी दिवसेंदिवस आव्हानात्मक होत आहे...

कशातच अडकायचे नाही, विरक्त होत जायचे हा तुझा प्रवास आणि तुला काहीतरी खास भेट देऊन चकित करायचे माझी धडपड यात अनेकदा तूच जिंकतेस...

संसारात राहून निर्मोही होण्याची तुझी साधना मला नेहमीच प्रेरणा देते, पण तरी पुन्हा नव्याने तुला मोहात पाडण्याची धडपड करावीशी वाटतेच कारण कदाचित मी अजून त्या टप्प्यावर आले नाही...

मग यावर्षी मी ठरवले की, नुसती मेजवानी, भेटवस्तू इतकं तांत्रिक न होता, शब्दात व्यक्त होण्याचा प्रयत्न करायचा...

मुद्दाम जुने चाऱ्हाट लावले, कारण त्याशिवाय आज का अचानक असा प्रश्न पडणार नाही...

तर तुझा जन्मदिवस साजरा करण्यामागे तुला खुश करण्यापेक्षा मला माझ्या भाग्याचा आनंद व्यक्त करायचा असतो...

तू आमच्यासाठी रोजच अन्नपूर्णा असतेस, पण ते कौशल्य मीही आत्मसात केले आहे, हे दाखवायला मेजवानीचा घाट असतो...

भेटवस्तू, ही फक्त वस्तू नाही तर  त्यातूनही काही ना काही सांगायचे असते...

जसे यावेळी आणलेली दुलई...!


(एक खंत की ही मी माझ्या हाताने बनवलेली नाही.)

(इंग्रजीत म्हणे त्याला क्वील्ट म्हणतात, म्हणो बापडे त्यात ना माझ्या भाषेचा गोडवा आहे ना ते भाव, आणि उच्चारताना बोबडी वळते ते तर अजूनच वेगळे)

दुलई, जिच्यात ती ऊब सामावली आहे, जी मी वेळोवेळी तुझ्यासोबत असताना, तसेच तुझ्या विचारात, संस्कारात, आणि कृतीत अनुभवली आहे...

ही दुलई, गोधडीसारखी तुकडे तुकडे जोडून बनवलेली आहे, त्याचे कापड जरी नवीन असेल तरी त्यांचे सांगणे तेच आहे...

प्रत्येक तुकडा प्रतीक आहे, तुझ्या माझ्यातल्या एकेका क्षणाचा, अनुभवांचा, प्रवासाचा...

त्याचे रंगही सांगतात बघ खूप काही...

गडद छटा म्हणजे तुझे रागावणे, अबोला धरणे, कधीतरीच पण शिक्षाही करणे...

तर आकर्षित - उल्हासित करणाऱ्या छटा म्हणजे तुझे प्रेम, माया काळजी, माझ्याविषयी असलेला विश्वास, माझ्या क्षमतांची जाणीव...

या तुकड्यांना जोडणारा एकेक धागा म्हणजे, आपल्याला एकमेकांशी बांधून ठेवणारी ओढ...

जरी तू आणि मी दोन वेगळ्या व्यक्ती असलो, तरी नऊ महिने तुझ्यात असण्याचे भाग्य मला मिळाले आहे...

बाळाला स्वयंपूर्ण, आत्मनिर्भर करण्यासाठी नाळ कापण्याचा, पहिला शारीरिक आघात आई आनंदाने मिरवते, म्हणूनच समान पातळीवरचे वडीलांचे नाते कांकणभर कमी रहाते...

दुलईचा प्रत्येक धागा ती नाळ आहे, जीने मला स्वत्त्व दिले, पण पांगळे केले नाही...

तो एक विश्वास आहे, जो मला कोणत्याही क्षणी एकटं वाटू देत नाही...

मला जेंव्हाही तुझी सोबत हवी असते, तू असतेच... 

कधी प्रत्यक्ष, कधी संस्कार, तर कधी विचार, कधी स्वप्न, कधी जिद्द, कधी प्रेरणा तर कधी विरक्ती बनून...

अजूनही खूप लिहिता येईल, पण सगळ्याच भावना शब्दांनी फिक्या करु नये असं म्हणतात...

मग असं करतेस...!

ती दुलई घट्ट कवटाळून घे स्वतःभोवती, आणि बघ काय जाणवते...


वयाच्या प्रत्येक टप्प्यावरची मी आतुर आहे तुला मिठी मारायला, ते सारे जुने नव्याने अनुभवायला, राहिलं असेल काही तर, आज पूर्ण करायला...

आणि अजून एक हट्ट...

ही दुलई म्हणजे, एक मागणी आहे...

मला तुझी आणि बाबांची, आई होण्याची संधी हवी आहे...

संदीप खरेच्या एका गाण्यात हे अचूक शब्दबध्द आहे, (त्यात थोडेसे बदल करते)

घट्ट मिटा डोळे, तुम्हा कुशीमध्ये घेते

पांघरायाला मऊ मऊ, पांघरूण देते

झाले मी मोठी सांग, छळेल तुम्हां कोण

आईबाबा व्हा, माझी मुले गुणी दोन

पाहू नका असे आता, नाते शोधू नवे

मायाप्रेम, काळजीचे मज आईपण हवे


आईपण...

आई होणे सोप्पे नाही, याची मला पूर्ण जाणीव आहे, पण त्यातही तुझ्या शुभेच्छा, आशीर्वाद आणि मार्गदर्शन मिळेल ही खात्री आहे...

शब्दात व्यक्त केलेले सारे, तुला दुलईच्या स्पर्शात रोज नव्याने अनुभवायला मिळो हीच परमेश्वराला प्रार्थना करते आणि खूप लांबलेले माझे सांगणे थांबवते...

तुझा जन्मदिवस तुझ्यासाठी दीर्घायू, आरोग्य, स्वास्थ्य आणि आत्मिक आनंद घेऊन येत राहो याच शुभेच्छा...

तुझी लेक...२८ मे २०२२ 

 

Tuesday, May 24, 2022

इन्व्हिजिलेशन

 इन्व्हिजिलेशन, प्रेरणा नव्या स्वप्नांची

अनुभवासारखा गुरु नाही हे वाचत असतो, अनुभवत असतोच पण...

कधीतरी हे अनुभव आपल्या समोर नवनवीन प्रश्न तयार करतात, ज्याची उत्तर आपली आपल्यालाच शोधावी लागतात, त्यातून नवे विचार, नवे शोध, नव्या संधी, नव्या वाटा तयार होतात...


असाच एक अनुभव, दहावी बोर्ड परीक्षेचे

पर्यवेक्षण, इन्व्हिजिलेशन...


(invigilation हा शब्द समजून घेताना अनेक प्रकारचे शिक्षण झाले, तरी आजही उच्चारताना बोबडी वळते, आणि अनेकदा समोरचा म्हणजे काय म्हणून बघू लागला की त्याचीही शाळा घ्यावी लागते ही एक वेगळीच गंमत...)


यावर्षी दहावी सी बी एस सी बोर्ड परीक्षा दोन सत्रात झाल्या, त्यात करोना नियमावली, उन्हाळ्याच्या सुट्ट्या कदाचित यामुळे ही संधी मिळाली...


शक्यतो कोणत्याही कामाला नाही म्हणायचे नाही आणि त्याकडे एक मजा, शिक्षण, संधी म्हणून बघायचे हे मूळातच पक्के असल्याने त्यात एक वेगळीच मजा अनुभवली...


काय करायचे, काय नाही याचे अनेक प्रकारचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष (काही नियम म्हणून, तर काही आपले काम सहज-सुरळीत करण्याच्या हेतूने) शिक्षण झालेच...


पण...


साधारण पाच तासाचा, तीन वेळा घेतलेला तो अनुभव, अनेक नवे प्रश्न मनात गोंधळ निर्माण करुन गेले...

परीक्षा नेमक्या कशासाठी व कोणासाठी असतात...? 


त्याचे वातावरण इतके भयावह का असते...?


नियम, अधिकार, हक्क, कर्तव्य ही लांबलचक यादी मी परीक्षार्थी असताना शिक्षक आणि शिक्षण केंद्री होती, ती आता विद्यार्थी केंद्री झाली यात प्रगती आहे की अधोगती..?


विद्यार्थीदशेत परीक्षा नसती तर हा विषय मी स्वतः लिहिला, वाचला तर होताच...


पण एक शिक्षक म्हणून ताण विरहित कायमस्वरुपी परीक्षण, निरीक्षण आणि त्याआधारे आवश्यक बदलांची शिक्षण पद्धती मी जगली आहे, तशी संधी देणाऱ्यांची नक्कीच ऋणी आहे, पण ही गोष्ट करणे फार काही अवघड आणि अशक्य नक्कीच नाही अशी श्रध्दा, समजूत आहे (कदाचित अंधश्रद्धा, गैरसमज असेल) मग ते सर्वत्र होण्यासाठी नेमकं काय करावे लागेल...?


थोडक्यात परीक्षण पुढे नेणारे नसेल तर ते किती उपयुक्त आहे...?


त्यात प्रगतीचा आलेख किती आणि मार्कंसाठी अनावश्यक रस्सीखेच किती..?


बरं १००% मार्क मिळूनही गुणवत्ता सिद्ध होतेच असे नाही की मार्क नाहीत म्हणून शून्यता येते असेही नाही मग ही धडपड कशासाठी...?


कमियाब नहीं काबील बनों...


हे चित्रपट बघून सोडून द्यायचे, तर मग बघायचेच कशाला...?


आज कालची पिढी कशी परीक्षार्थी होत चालली आहे, यावर फक्त वैचारिक देत राहून ही परिस्थिती बदलेल...? (वैचारिक देणारे उत्तम वक्ते बनतील, त्यावर भरपूर पैसाही कमवतील)


अशा अनेक प्रश्नांनी सध्या भंडावून सोडले आहे...

नियमित निरीक्षण, नोंदी, स्वयं मूल्यमापन, प्रकल्प पद्धती, कृतियुक्त शिक्षण, ओपन बुक असे अनेक उपयुक्त आणि अभ्यासपूर्वक पर्याय तज्ञ अभ्यासकांनी सुचवलेले आहेत...

आज ते सक्तीने शिक्षणव्यवस्थेत राबवले जातात, पण फक्त कागदोत्री...

त्यातला मूळ हेतू - उद्देश लक्षात न घेतल्याने, त्याची पूर्तता टिक मार्क इतकीच दिसते...

आधीच म्हटलं, तसे यातून नवी दिशा, नवी स्वप्न बघते आहे..

शिक्षक असणे हे अर्थाजन साधन असेल तरी, त्यासोबत येणारी जबाबदारी - कर्तव्य विसरुन चालणार नाही...

ज्या उद्याच्या पिढीला सुशिक्षित बनवण्यात आपण खारीचा वाटा उचलत आहोत, ती सक्षमही होईल, असे प्रयत्न हवे...

हे बदल मी माझ्या स्तरावर तर नक्कीच करु शकते, त्यासाठी पूर्णपणे तनमन अर्पण करुन प्रयत्न करण्याची इच्छा, जिद्द आहे...

त्यासाठी शुभेच्छा, आशीर्वाद आणि मिळेल त्यांची सोबत हवी आहे...

त्या प्रतीक्षेत...


गरज आहे, ती सर्वांच्या शुभेच्छा, सहविचार, मार्गदर्शन, सहकार्य जे जे मिळेल त्याची..


त्या साऱ्याचा प्रतिक्षेत...