Showing posts with label मन_वढाय. Show all posts
Showing posts with label मन_वढाय. Show all posts

Thursday, October 05, 2023

सन्मित्र



बाहेर दिवसभराच्या उकाड्यानंतर हलक्याशा पावसाची सुरेल रिमझिम सुरु झालेली..


आणि ती घरात प्रचंड उद्विग्न, अनेक शंका-कुशंकांनी व्यापलेली, नित्यक्रमाला कंटाळून गेलेली..


बाहेरचा नादमयी पाऊस निनादत होता आणि ती मात्र स्वतःच्या त्रासात हरवली होती..


त्यात पाऊस आणि ती म्हणजे छत्तीसचा आकडा..



तापलेल्या धरेवर कोसळणाऱ्या जलधारांनी मोहवून टाकणारा सुवास सर्वत्र पसरु लागला..


तशी तिची पावले अचानक घराबाहेर पडली, त्या पावलांना संरक्षणाचे कोणतेही आच्छादन नको होते..



सुरुवातीला नेहमीच्या परिचित मार्गावरुन जाताना, अनेकांना तीचे बिना चप्पल, छत्री शिवाय तेही एकटेच पावसात जाणे खटकले..


पण कुणी काही विचारले नाही, ती तर अजूनही स्वतः मधेच हरवलेली होती..


ना तिला रस्ता जाणवत होता, ना वाहने, ना आजूबाजूची माणसे, ना त्यांच्या विचित्र नजरा..

 

थोड्या वेळाने ती निर्जन, पण भीती नसलेल्या, वस्तीपासून काहीशा दूर असणाऱ्या भागात पोहचली..


ही तिची आवडती जागा, तेही एकटीने अनुभवण्याची, आनंद, दुःख, त्रागा सगळ्यात मूक सोबत करणारी..


आज प्रथमच तिच्यासोबत तिथे पाऊस होता.. 


तिला कधीही न आवडणारा पाऊस आज असा सोबती कसा झाला कोण जाणे..?


त्यातही आज तो फक्त सोबत नाही तर तिच्या अंतःकरणापर्यंत पोहचलेला..


ती नखशिखांत ओलीचिंब झाली होती..


जलबिंदूंचा तिच्या रंध्रारंध्राला होणारा स्पर्श, तिला अंतर्बाह्य बदलवून टाकत होता..


जे जलबिंदू खोलवर मुरले, त्यांनी तिच्या सुखाला,आनंदाला, यशाला शतगुणीत केले..


तर जे निथळले, त्यांनी सोबत तिचे प्रश्न, चिंता, काळजी, शंका, त्रागा सारे वाहून नेले..


काहीवेळाने पूर्वीच्या साऱ्याला कंटाळून गेलेल्या तिचा, जणू पुनर्जन्मच झाला..


ती चक्क लहान मुलाप्रमाणे नाचू लागली, गाऊ लागली..



बराच वेळ ती त्या रिमझिमत्या पाऊस सख्याला अनुभवत राहिली..


नंतर मग पाऊस थांबला.. की त्याच्या घरी परतला..?


माहित नाही, पण..


जाताना, तिला 'भेटू पुन्हा असेच कधीतरी' हे सांगायला नक्कीच विसरला नसणार..


हे तिच्यातला बदल सांगत होता..


परतीच्या वाटेवर ती सगळ्यांशी बोलली, खूप हसली..


कसे कोण जाणे, पण ना कुणी तिला भिजण्याचे कारण विचारले ना अनवाणी असण्याचे..


प्रत्येकाची नजर फक्त तिच्यात झालेला बदल टिपण्यात गुंगली होती..


कारणे माहित नसली तरी सगळ्यांना तो बदल सुखावणारा आणि हवाहवासा होता, हे मात्र नक्की..


आणि इतक्या दिवस नावडता असणारा पाऊस, आता तिचा  सन्मित्र झाला होता..



Wednesday, August 16, 2023

नियम

समाप्ती की नवी सुरुवात..?

पुरुषोत्तम मास, मराठी कालगणनेत दर तीन वर्षानंतर येणारा, हा अधिक महिना..


या काळात स्वतःमध्ये प्रगती करण्यासाठी, ठरवून काही नियम केले जातात..


असे नियम करून पूर्ण महिना त्यावर अंमलबजावणी करणे, वाटते तितके सोपे नसते..


कारण त्या गोष्टी आपल्या दैनंदिन सवयीच्या नसतात, त्यामुळे अनेकदा या कृती करताना अडचणी येतात..


पण जेव्हा त्यावर मात करुन, तो नियम पूर्ण महिनाभर पाळता येतो, त्यावेळी विशेष आनंद होतो..


या वर्षी हा अनुभव घेण्याचे ठरवले होते..


त्यानुसार एक जाहीरपणे सांगून व दुसरा जमल्यास करु, असे दोन नियम केले होते..


त्यापैकी पहिला म्हणजे नियमित काहीतरी लेखन करणे..


सांगायला विशेष आनंद होतो, की २९  दिवस हे लेखन प्रयत्नपूर्वक  केले..


लेखनाचा मुख्य विषय, माझ्या दैनंदिन अध्ययन अध्यापन कामात घेतलेले अनुभव आणि माझे विविध शैक्षणिक प्रयोग असा होता..


माझे लेखन नियमित वाचणाऱ्या अनेकांना वाटेल की, यातले बरेचसे लेखन जुनेच होते, जे अगदीच योग्य आहे..


पण तरी ते पुन्हा पाठवताना, त्याचे पुनर्वाचन, पुनर्मांडणी, नव्याने काही गोष्टींची भर इ. संस्करण जाणीवपूर्वक केले..


काही विषय वेळ नाही, असे कारण पुढे केल्यामुळे, लिहायचे राहिले होते ते या निमित्ताने लिहून झाले..


एकूणच महिनाभर या अनुभवाने भरपूर समृद्ध केले..


आपण एखादी गोष्ट जेव्हा ठरवतो आणि ती पूर्ण करण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न करतो, तेव्हा ती निश्चित यशस्वी होते हा अनुभव खूप काही शिकवून गेला..


म्हणूनच कदाचित असे म्हणतात की, एखादी गोष्ट करायचे ठरवणे, म्हणजे अर्धे काम पूर्ण होण्यासारखे आहे..


यापुढे रोज लेखन चालू ठेवायचे ठरवले, तर ते जमेल असे नक्कीच वाटते..


या सोबतच दुसरी गोष्ट ठरवली होती ती म्हणजे रोज साडी नेसणे..


ही गोष्ट तर अजिबात सोपी नव्हती, कारण एकतर मला ते आवडत नाही, अतिशय बंधल्यासारखे होते..


शिवाय इतक्या साड्या माझ्याकडे नाही..


अजून भर की, सकाळी आठ आधी शाळेत असायला हवे, वेळ गाठताना सकाळी सकाळी साडी नेसणे, त्यावर साजेसा, शाळेत शिक्षिका म्हणून योग्य दिसेल असा शृंगार करणे.. (टिकली पासून ते गळ्यात, कानात, हातात छोटेसे, रंगसंगती हा एक मोठा कार्यक्रम असायचा)


दिवसभर साडीमध्ये अध्यापन करणे, माझ्या बाल मित्रांबरोबर नाचणे गाणे म्हणणे हे सारेच अवघडच विषय होते..


पण कर्मधर्म संयोगाने साऱ्या गोष्टी जुळून आल्या आणि ठरवलेले दोन्ही नियम पूर्णत्वास गेले..


आता या दोन्ही मधून काय साधले..?


हे सांगण्यापेक्षा अनुभवणे जास्त परिणामकारक आणि आनंददायी होते..


आज अधिकमास संपताना एक निश्चित सांगू इच्छिते की, आपण स्वतः एखादी गोष्ट ठरवल्यास, ती पूर्ण करणे अजिबात अशक्य नाही..


ते काय म्हणतात ना की, जेव्हा एखादी गोष्ट आपण मनापासून ठरवतो, तेव्हा ती पूर्ण करण्यास चराचरातील सर्व शक्ती आपल्याला मदत करतात..


आणि या साऱ्याचा समारोप करताना दोन ओळी आठवतात..


'नियम पाळावे, जरी म्हणशील, योगी व्हावे..'


योगी होणे ही तर खूप मोठी तपश्चर्या आहे..


पण आपल्यात चांगले बदल करायचे असले तर, त्यासाठी काही नियम करावे लागतात.. 


असे नियम यशस्वी केल्यास, नकळत त्याचे सवयीत रुपांतर होते..


आणि आपला प्रवास हळूहळू उत्तम, गुणाग्रही होण्याकडे होत जातो..


हा अनुभव जसा मी घेतला तसाच आपणही घ्यावा, याच शुभेच्छा..!

Wednesday, June 28, 2023

नवे तेही हवे


मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो,  तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो  || धृ ||


याच्या शब्दा शब्दात दाटलेली सकारात्मकता, प्रचंड आकर्षित करते..


यात रोजचा झगडा आणि सोबतच त्याची उत्तरे आहेत..


कमालीचे वास्तव आहे, पण तितकीच भक्तीसुद्धा आहे..


एकाच वेळेला विज्ञान प्रमाण मानण्याची ताकद आहे, तर त्यासोबत निर्मळ आणि डोळस श्रध्दा आहे ..


कसे ते समजण्यासाठी, यातली फक्त शेवटची दोन कडवी सार्थ मांडायचा प्रयत्न करते..


धृपदात, ही कविता असे सांगते की..


आपल्या प्रत्येकाच्या अंतरंगात, दोन अस्तित्वे जगत असतात..


एक निखळ, निर्मळ, आनंदी, सहज बदल स्वीकारणारे, सगळ्या गोष्टींना उत्साहाने बघणारे..


तर दुसरे नेहमी दुःखी, वैतागलेले, सतत इतरांना नावे ठेवणारे, बदल लादले तरीसुद्धा न मानणारे..


आता ही दोन अस्तित्वे जेंव्हा देव, ईश्वर, शक्ती यावर एकमेकांसमोर झगडा करतात, तेंव्हा काय होते, यावर कवी पुढील कडवे लिहितो..


मी आस्तिक मोजत पुण्या‌ईची खोली, नवसांची ठेवून लाच लावतो बोली,


माझ्यातले वैताग, त्रागा करणारे अस्तित्व, स्वतःला आस्तिक म्हणवते,  


पण मुळात त्याचे आस्तिक असणे,  मोजमाप करण्यात अडकले आहे..


इतकी भक्ती केली तर असे व्हायला हवे , इतका जप केला असे फळ, असे दान केले तर ही फलश्रुती..


ही पूजा केली, तो नवस केला.. साऱ्या अनावश्यक नोंद ठेवण्याची धडपड..


बरं, हे सारे करताना, कर्म चांगले ठेवावे लागते याची आठवण आहे का..?


तर तो विचार, तर जणू माहितीच नाही, असा तोरा..

शिवाय सतत देवाला माझी चिंता नाही, मलाच सगळे प्रश्न, दुःख असा अनाठायी ओरडा, आवेश..


तरीही,  प्रश्न, दुःख  मात्र देवानेच सोडवायचे..


हवे तर, मी त्यासाठी अजून वेगवेगळी व्रत, उपास, इतर अनेक गोष्टी करेन, असा खुळा हट्ट..


तर दुसरीकडे..


तो मुळात येतो इच्छा अर्पून सार्‍या, अन् धन्यवाद देवाचे घेवून जातो..


दुसरे निखळ, सश्रद्ध अस्तित्व, स्वतःला ना आस्तिक म्हणते, ना नास्तिक..


ते फक्त, आहे त्या साऱ्याचा स्वीकार करुन गीतासार जगते, 


प्रश्न-दुःख असो वा उत्तर-सुख सगळे देणाराही तोच आणि भोगणाराही तोच..


जो आत्मा, तोच परमात्मा, मग चिंता का आणि कशाची असावी..


जे महत्वाचे वाटते, ते शरीर हे माध्यम आहे, याची पूर्ण जाणीव त्याला असल्याने, तो मुळातच निरिच्छ आहे.. 


आणि त्यामुळेच देव, त्याचे जास्त मनापासून स्वागत करतो, इतकेच नाही, तर इतर हट्टी लेकरांना जास्त वेळ देता येईल, म्हणून त्याला धन्यवाद देतो..


इथे ग.दी. माडगूळकरांनी मांडलेली रचना, ' कानडा राजा पंढरीचा ' ही राहून राहून आठवते..


स्वतः पलीकडे ज्याने देवत्व स्वीकारले आहे, त्याच्यासाठी ती निर्गुण, निराकार शक्ती, सस्वरुप धारण करते..


इतकेच नाही तर.. 


युगानुयुगे हात कटीवर ठेवून विटेवर उभी राहते, भक्तांचे हट्ट पुरवते, त्यांची सेवा स्वीकारते, त्यांची कामे करते, जिथे नजर जाईल, तिथे तिथे प्रचिती देत राहते..


फक्त हे सगळे अनुभव घेण्याची मनापासून तयारी हवी, आणि आपल्या दोन अस्तित्वांपैकी चांगल्याची निवड करता यायला हवी..


कवी संदीप खरे शेवटच्या कडव्यात म्हणतात.. 


माझे त्रासलेले अस्तित्व कसे आहे, तर असे..


मज अध्यात्माचा रोज नवा शृंगार, लपतो न परि चेहरा आत भेसूर,


माझे अध्यात्म सोयीने बदलत राहते, कधी देव बदलतो, तर कधी पूजेची पद्धत, दरवेळी मी त्याला वेगवेगळी नावे देतो..


आणि माझ्या या साऱ्या कर्मकांडाला, कोणत्या ना कोणत्या दाखल्यांशी बांधून ठेवतो..


हे केले, मग हे व्हायला पाहिजे, मला प्रचिती मिळालीच पाहिजे.. 


नाहीतर..


हे सगळे खोटे आहे, थोतांड आहे, असा बोभाटा करायला, ना भीती वाटते, ना काळजी.. हीच ती भेसूरता 


पण दुसरीकडे मात्र..


तो फक्‍त ओढतो शाल नभाची तरीही, त्या शाम निळ्याच्या मोरपीसा परि दिसतो


सदैव आनंदी असणारे, निखळ अस्तित्व असे असते..


कोणतीही गोष्टी ते इतक्या सहज स्वीकारते, की मला त्याच्यातच परमेश्वराचा अंश दिसतो..


मीच आत्मा नि मीच परमात्मा, ही प्रचिती मला क्षणोक्षणी मिळत रहाते..


जेंव्हा जेंव्हा मी, अशी दोन अस्तित्वे घेऊन, रोज नव्या दिवसाला, नव्या परिस्थितीला, नव्या आव्हानांना सामोरे जाते, 


तेंव्हा तेंव्हा ही कविता मला, माझ्यातले निखळ, निर्मळ, आनंदी अस्तित्व निवडण्याची प्रेरणा देते..


म्हणून ती माझ्या अत्यंत जवळची, प्रेमाची आहे..


ज्ञानोबा माऊली म्हणतात, एक तरी ओवी अनुभवावी..


मला हे काव्य एका निर्मळ ओवीसारखे वाटते..


रोजचे क्षण अनुभवताना, नव्याने घडण्याची, जगण्याची, भक्कम उभे राहण्याची ताकद देते..


अशीच ताकद, प्रेरणा, आनंद तुम्हाला, प्रत्येक गोष्टीत लाभो, हीच शुभेच्छा..!


संपूर्ण कविता संदर्भासाठी...


मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो,  तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो  || धृ ||

मी जुनाट दारापरी किरकिरा बंदी, तो सताड उघड्या खिडकीपरी स्वछंदी,

मी बिजागरीशी जीव गंजवीत बसतो, तो लंघुन चौकट पार निघाया बघतो..||

डोळ्यात माझीया सुर्याहुनी संताप, दिसतात त्वचेवर राप उन्हाचे शाप,

तो त्याच उन्हाचे झगझगीत लखलखते,घडवून दागिने सुर्यफुलांपरी झुलतो..||

मी पायी रुतल्या काचांवरती चिडतो, तो त्याच घे‌ऊनी नक्षी मांडून बसतो,

मी डाव रडीचा खात जिंकतो अंती, तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनने हरतो.

मी आस्तिक मोजत पुण्या‌ईची खोली, नवसांची ठेवून लाच लावतो बोली,

तो मुळात येतो इच्छा अर्पून सार्‍या, अन् धन्यवाद देवाचे घेवून जातो..||

मज अध्यात्माचा रोज नवा शृंगार, लपतो न परि चेहरा आत भेसूर,

तो फक्‍त ओढतो शाल नभाची तरीही,

त्या शाम निळ्याच्या मोरपीसापरि दिसतो... कवी - संदीप खरे

Saturday, April 29, 2023

एक धागा सुखाचा

मी आणि गाणी..

 

सध्या फेसबुक, इंस्टा यांच्या  रिलं प्रकाराने सर्वांना वेड लावले आहे, मलाही कधीतरी आवडतात बघायला..


असेच परवा एक बघण्यात आले, ज्यात एक मानसशास्त्रीय विचार मांडला होता..


की माणसे उदास, दुःखी, त्रस्त असताना, तशीच गाणी ऐकतात आणि अजून प्रश्नात गुरफटत जातात..


त्यातले वाक्य, ' तुमचे दुःख तुम्ही लहान बाळाप्रमाणे सांभाळता, त्याला खाऊ पिऊ घालून वाढवत रहाता' ..


आधी पटले, पण नंतर विचार केला तर जाणवले की मीही आनंदात आनंदी आणि प्रश्नात शांत, कधीतरी उदास गाणीच निवडते, पण त्यामुळे अजून दुःखी होत नाही किंवा प्रश्नात अडकत नाही..


मग मी अपवाद आहे त्याला, की त्या म्हणण्याला पक्का शास्त्रीय आधारच नाही..


त्याचा पाठपुरावा करण्याऐवजी, मी माझी पद्धत तपासली..


आणि मला काहीतरी वेगळे सापडले..


अर्थात इथे स्वानुभव इतकाच आधार आहे, आणि तो नेहमी ज्याचा त्यानेच घ्यायचा असतो..


मला समजले की 


मी गाणी ही चाल, संगीत याहीपेक्षा अर्थ, गर्भित अर्थ (वेगवेगळ्या पद्धतीने विचार करायला लावणारा), भावार्थ (शब्द, अर्थ आणि आपल्या भावना यांची एकत्रित सांगड) याने जास्त ऐकत असते, अनुभवत असते, त्याच्याशी एकरुप होत असते..

त्यामुळे शब्द, चाल, संगीत उदास असेल पण त्यांची बांधणी नेहमीच निराशा, दुःख देणारी नसतात..

त्याही पलीकडे विचार केला तर,  आपण त्यातून काय घेतो, यावरुन ती कशी आहेत हे ठरते..


उदाहरण देऊन स्पष्ट न केल्यास, काहीतरी अपूर्णता वाटते म्हणून एका गाण्याची मांडणी करते..


बघा पटते का..?


गाणे माझ्या अत्यंत जवळचे, शिवाय माय मराठीचे शिरोमणी, गदिमा आणि बाबूजी (सुधीर फडके) यांनी अजरामर केलेले आहे..


एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे

जरतारी हे वस्‍त्र माणसा तुझिया आयुष्याचे


पांघरसी जरी असला कपडा

येसी उघडा, जासी उघडा

कपड्यासाठी करिसी नाटक तीन प्रवेशांचे


मुकी अंगडी बालपणाची

रंगीत वसने तारुण्याची

जीर्ण शाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्याचे


या वस्‍त्रांते विणतो कोण?

एकसारखी नसती दोन

कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकर्‍याचे


आता माझा हे गाणे ऐकताना नकळत होणारा प्रवास..


एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे

जरतारी हे वस्‍त्र माणसा, तुझिया आयुष्याचे


वस्त्र ही आपण प्राथमिक गरज मानतो, की जी प्रत्येकाची पूर्ण झालीच पाहिजे..


मग तसे मानवी आयुष्य जे प्रत्येकाला मिळालेच पाहिजे, त्याचे उत्तम बांधणी

ही एक धागा सुखाचा आणि शंभर दुःखाचे अशाच गुणोत्तराची असते..


किंवा तशीच असली पाहिजे..


यातला जरतारी हा शब्द, सुखाला सोनं, रत्नजडीत याची उपमा देत आहे..


हे समजायला पूर्वी जेंव्हा वस्त्र बनवताना, खरोखर सोन्याचा धागा बनवून वापरला जायचा, अशी जीर्ण वस्त्र जाळण्यास ते सोनं मिळायचे हे माहीत असायला हवे..


मी बघितले नसले तरी ऐकले आहे, आजीच्या आजीला, तिच्या आजीच्या साडीतून इतकं ग्रॅम सोनं मिळालं होत वगैरे..


दुसरं म्हणजे ग्रॅम हे अत्यंत कमी परिमाण असले तरी, सोनं मोजताना नक्कीच कमी नाही..


त्याचे वजन (धागे) वाढवत गेलो तर, त्याचे दिसणे आणि ज्या शरीराने ते परिधान करायचे त्याची ते पेलण्याची, सांभाळण्याची ताकद याचा विचार असणारच, किंवा बनवणारा करणारच ना..?


आणि असे उच्चवस्त्र कोणीही, अगदी राजा असला तरी, रोज आणि दिवसाचे सगळे प्रहर घालू शकेल का..?


याचा विचार केला, तर आपले आयुष्य असेच तर आहे, रोज मी किलोभर सोनं असणारी साडी (आवडीचे कपडे) घालून चोवीस तास वावरु शकणार आहे का..? 


नाही ना..!


अगदी तसेच सतत प्रचंड आनंद, सुख असणार नाही किंवा सहन होणार नाही..


ते वस्त्र अतिशय तलम, शरीराला छान वाटणारे, हलके, मऊसूत होण्यासाठी शंभर साधे धागे आणि एकच जरीचे असे असल्यास ते उत्तम बनेल, टिकाऊ असेल आणि तरीही आकर्षकही असेल..


तसेच दुःख जास्त असली तरी आपण नेहमीच त्यात हरवून जात नाही, तर त्यातून नवे मार्ग शोधतो, स्वतःच्या शक्तीचा, गुणाचा वापर करुन त्यावर मात करतो, स्वतःला शोधत, आजमावत रहातो..


पांघरसी जरी असला कपडा, येसी उघडा, जासी उघडा


आता हा सुख दुःखाचा जरतारी कपडा पांघरला, म्हणजेच असे जीवनात सगळे अनुभव घेतलेस, तरी ते तुझ्यासोबत येणार नाहीत..


जसा रिक्त आलास, तसाच जाणार आहेस, मग कशात काय कमी, काय जास्त याचा हिशोब करुन काहीच उपयोग नाही..


कपड्यासाठी करिसी नाटक तीन प्रवेशांचे

मुकी अंगडी बालपणाची

रंगीत वसने तारुण्याची

जीर्ण शाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्याचे


मानवाने कपडे म्हणजेच सुख-दुःख वाट्याला यावे किंवा न यावे, हे आपणच ठरवू शकतो, अशी वेडी समजूत करुन घेतली आहे..


गदिमांनी जीवनास नाटकाची उपमा दिली आहे, आणि त्याचे तीन अंक म्हणजे बालपण, तारुण्य आणि वार्धक्य, ते पूर्ण करणारा मानव एक पात्र आहे, 


बालपण हे न कळते परावलंबी असल्याने त्यास मुके..


तारुण्यात धाडस, प्रेम, शौर्य, महत्वाकांक्षा एक न अनेक पदर असल्याने त्यास रंगीत..


आणि वार्धक्य अनुभवांनी समृद्ध असल्याने शालीप्रमाणे उबदार असले तरी त्यानंतर अनंताचा प्रवास करण्यासाठी निसर्गतः शारीरिक, भावनिक, आणि अनेकदा मानसिकही जीर्ण होत जाणारे असे सुरेख शब्दबद्ध केले आहे..


या वस्‍त्रांते विणतो कोण? एकसारखी नसती दोन


ही वस्त्रे कोण विणतो हे सांगायचे झाले, तर आपण त्यास सगुण वा निर्गुण देवत्व मानतो..


ती शक्ती इतकी सर्जनशील आहे की, कोणाचेही आयुष्य, त्याचे दिसणे, वागणे दुसऱ्यासारखे नाही..


एवढेच कशाला त्याची निसर्गातली  कोणतीच निर्मिती एकसारखी नाही, काही ना काही फरक आहेच..


म्हणूनच सगळ्यांना जे मिळायला हवे, ते शंभर दुःख त्यास एक सुख असे गुणोत्तर, प्रत्येकाचे गणित वेगळे मांडणारा तो अजब विणकर आहे.. 


प्रत्येकासाठी वेगळे वस्त्र विणताना कुणाचे अधिक भरजरी, कुणाचे त्यामानाने कमी  हे ओझे स्वतःला नको म्हणून, कर्मबंध रुपी धागे आपल्याकडूनच मिळतील अशी व्यवस्थाही करतो आणि ती एकाच जन्मासाठी नाही असेही सुचवतो..


चांगले कर्म अधिक जरीचे धागे, चुकीचे कर्म दुःखाच्या धाग्यात वाढ..


आणि हे असले तरी..,


कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकर्‍याचे


त्या शक्तीला आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी बघू शकतच नाही, ही आपली मर्यादा आहे..


आणि ती मर्यादा ओलांडायची असेल तर, सुख असो वा दुःख, ते आपण फक्त परिधान करतो आहे..


त्याच्या निर्मात्याने ते खास आपल्यासाठी बनवले आहे.. 


त्याचा तो क्षण, प्रसंग, परिस्थिती पुरता स्वीकार करुन, त्या अज्ञात शक्तीला अनुभवण्याचा प्रयत्न करायला नको का..?


असे चाल, संगीत, गायकी, शब्द, अर्थ, भावार्थ सगळेच गाणे एकरुप होऊन ऐकताना होते..


आणि संपता संपता मनात स्वीकार भावना येत जाऊन, उदासीनता आपोआप गळून पडते आणि स्वच्छ नजरेने आहे त्यात समाधान, मजा शोधण्याची प्रेरणा मिळते..


तेही अगदी नकळत, सहज.. 


नाही का..? 

तुमचा अनुभव, असा प्रवास सांगायला विसरु नका..





Saturday, July 30, 2022

इच्छा

 

इच्छा, एक आणि एकच...!

का जमलीयेत इतकी माणसे..? इथे ही एवढी गर्दी का केली आहे..


यातली बहुतांश माझ्या ओळखीची आहेत, काहीतर फक्त माझ्याच ओळखीची आहेत, तुम्हाला काही माहित आहे..?


काय सांगता नाही माहित..? आश्चर्य आहे....? 


जमलेल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य, भय, दुःख, गोंधळ, चिंता का बरं दिसते आहे..?

 

तुम्हाला म्हणून सांगते, आज काय माहीत कशी, पण अगदी अचानक जवळची म्हणावे, असे नातलग, मित्रमंडळ सकाळीच घरी हजर, मग काय घेतली सुटी..

दिवसभर मस्त गप्पा, दंगा, खानपान सगळ कस यथासांग झाले, दुपारी थोडा वेळ छान ब्रह्मानंदी टाळी पण लागली, त्यानंतर न आलेल्या पण खास असणाऱ्या एक दोघांना फोन लावले, नीट रेंज नव्हती म्हणून, फोनवर बोलत आता काही मिनिटापूर्वी, बोलत बोलत कोपऱ्यापर्यंत तर जाऊन आले..

परत आले तर, इथे ही गर्दी जमलेली..


काय झाले इतक्या थोडया वेळात इथे..?, जरा बाजूला होता का...? मला जाऊ द्या ना आत..!


यातले कोणीच माझ्याशी का बरं बोलत नाही..?


इथे हे कोण झोपले आहे..? भोवती जमलेली ही सगळी माझी माणसं अशी सुतकी चेहऱ्याने का बसली आहेत, नेमके काय झाले आहे..? 


अरे सांगा ना मला कोणीतरी, आता ना मला भिती वाटते आहे..


पार्थिव आहे का ते..? जाऊ का मी जवळ..?


काय म्हणता..? नको.. पण न जाता कळणार कसे..?


इथे तर एकही जण माझ्याशी बोलायला तयार नाही..


अरेच्या, हे पार्थिव अगदी माझ्यासारखे आहे..!


नव्हे, मीच आहे...!


मग मी कोण, आणि तुम्ही कोण..? 


अरे देवा, आता बघितले नीट तुम्हाला, तुम्ही देखील माझ्यासारख्या दिसता..


तिघीतली खरी कोण..? काय सांगता..! 


तिघी..! ते कसे काय..? 

खरंच असे होऊ शकते..? की, हे पार्थिव झालेले शरीर वेगळे, मी कोण तर  मन आणि तुम्ही अंर्तमन...?


पण तरी, माझा प्रश्न पुन्हा तोच, हे झालं कधी , कसे..? 


काय सांगता, काही तांसापूर्वी..? खरंच की, मी फोन बोलत बाहेर गेले, तेंव्हा बऱ्यापैकी दुपार होती, चांगलंच अंधारून आले आहे..


बर, मला सांगा, हे सारं कुठे, कसे घडले म्हणे..?


काय सांगता अंगणात, सिव्हीयर ॲटॅक आला..? पण मला तर काहीच आठवत नाही.. असो, त्याने आता काहीच फरक पडत नाही..


पण तुला म्हणून सांगते, देऊ ना तुला एकेरी हाक..? मी मन नि तू अंतर्मन..


म्हणजे माझाच एक भाग ना.. सांगत होते की मला अगदी असाच निरोप हवा होता हा जगाचा, सहज, चालता-बोलता, सगळ्यांना काही क्षण चुटपुट लागेल पण नंतर काही काळातच त्या गाण्यातील बोलाप्रमाणे, 

जन पळभर म्हणतील, 'हाय हाय!' 

मी जातां राहील कार्य काय।।

सर्वांची कामे सुरु व्हावी, रोजच्या धावपळीत एकेक गोष्टी विस्मृतीत जाव्या, आठवण झाली, तरी फक्त चांगली असावी.. 


अगदी माझ्या आजीसारखे (बाबांची आई), त्यासाठी नशीब नाही, पुण्य लागते इतक्या, सहज असे व्हायला..


काय म्हणतेस..? माझ्या काही अपुऱ्या इच्छा, स्वप्न, माझी माणसं, मागे काय काय राहिले, काय सोडून चालले..? 


खरं सांगू, वय नसेल माझे फार, अनुभव तर अगदीच थोडे आहेत, पण मी शिकले होते, आज नव्हे आत्तामध्ये जगायला..! छोटे छोटे आनंद, दुःख, यश, हार सगळं त्याच क्षणात अनुभवायला.. त्यामुळे फार काही राहिले, सुटले, हरवले असं मला वाटत नाही..


पण ऐक ना, मला एक नक्की सांगायचे आहे, माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांना..


मी काय किंवा तुम्ही काय कधी ना कधी या जगातून जाणारच आहोत, कोणता तरी श्वास शेवटचा असणार आहे, हे शरीर आहेच मुळी नाशवंत..

माझे आताचे अस्तित्व, ज्याला आत्मा म्हणतात, तेही त्या लक्ष चौऱ्याऐंशी फेऱ्यात फिरेल, किंवा ना फिरले...

पण तू म्हणजे मनाचे अंर्तमन...ते अमर आहे...!

असेल इथेच सदैव...गोड आठवणी बनून...

तू इथे जमलेल्या किंवा न आलेल्या सगळ्यांना नक्की सांग...

मी खूप आनंदात आहे, हीच तर सर्वोच्च इच्छा होती माझी...

रुखरुख लावणारा, निरोप घ्यायची, त्यात आजचा दिवस भाग्याचा...

सगळेच सोबत, काही प्रत्यक्ष काहींशी फोनवर गप्पा...

गेला, संपला तो नाशवंत देह...मी आहे, त्या सगळ्यांच्या मनात...

आठवणीत...एकत्र अनुभवलेल्या क्षणात, मजामस्तीत...

कधी भांडण करण्यात, तर कधी रुसून बसण्यात...

कधी कौतुक करण्यात, कधी लाड करुन घेण्यात...

खूप कशा-कशात...मला असंच जपा..

 

ज्या आठवणी आंनद देतील, थोडंस का होईना हसू येईल, तेच आठवा...

बाकी माझे दुर्गण, वाद, प्रश्न-समस्या, दुःख मी सोबत घेऊन जात आहे...

तुम्हा सगळ्यांनाही इतकंच सहज इथून जाता येवो, ही आणि हीच सदिच्छा...

........

.......

........

कुठे आहे मी, का इतकं गदागदा मला हलवतो आहेस...?

काय ss? अंगणात फोनवर बोलता बोलता झोपले...?

अंsssss....... हो..., हो मी बरी आहे...!

खोटे होते का ते सारे...?

की स्वप्न...? तरीही ते दिवास्वप्न होते, हे मात्र नक्की....!

होऊ दे एक दिवस पूर्ण... त्यासाठी शुभेच्छा द्या, म्हणजे झालं..

भाग्य असे मज लाभले...अजी म्या मरणं पाहिले...