इच्छा, एक आणि एकच...!
आज काय माहीत अचानक...
खूप जवळची म्हणावी, अशी सगळी मंडळी
घरी हजर, मग काय घेतली सुटी...
सकाळपासून मस्त गप्पा, दंगा, खानपान..
दुपारी थोडावेळ छान ब्रह्मानंदी समाधी, पण लागली होती...
त्यानंतर खास दोन-चार
मित्र मैत्रिणींचे फोन...
रेंज नव्हती नीट म्हणून, फोनवर बोलत बाहेर
पडले..
बोलत बोलत कोपऱ्यापर्यंत
तर जाऊन आले...
परत आले तर, इथे ही एवढी
गर्दी...
का जमलीयेत इतकी माणसे...
यातली बरीच माझ्या ओळखीची...
काहीतरी फक्त
माझ्याच...काही माहिती आहे तुम्हाला...?
नाही... आश्चर्य आहे....? अरेच्या हे तर
आमच्याच अंगणात, नव्हे घरातही...
जमलेल्या सगळ्यांच्या
चेहऱ्यावर, आश्चर्य, भय, दुःख, गोंधळ, चिंता असे विचित्र भाव का बरं...?
काय झाले इतक्या
थोडयावेळात इथे...
जरा बाजूला होता का...? मला जाऊ द्या ना
आत...!
हे कोणीच माझ्याशी का बरं
बोलत नाहीत..?
हे असे इथे गेल्यासारखे
(मृत) कोणाला ठेवले आहे...?
भोवतीने सुतकी चेहऱ्यांची
ही सगळी माझी माणसं ...
कुणाला, काय झालंय...? खूप अस्वस्थता
आलीये, भितीही वाटते आहे..
जाऊ की नको जवळ...? न जाता कळणार कसे...?
इथे तर एकही जण माझ्याशी
बोलायला तयार नाही...
अरेच्या... ही झोपलेली, गेलेली व्यक्ती
अगदी माझ्यासारखीच दिसतेय...
माझ्यासारखी कशाला, मीच आहे...!
मग मी कोण, आणि तुम्ही...? अरे देवा, तुम्हीही
माझ्यासारख्याच...
तिघीतले खरे कोण ?
काय ? तिघी ? ते कसे ?
असं होऊ शकतं की, हे
झोपलेले शरीर वेगळे, मी मन आणि तुम्ही अंर्तमन...?
पण तरी, हे सगळे झालं कधी...?
काय, काही
तांसापूर्वी....?
खरंच की, चांगलंच अंधारून
आले आहे बाहेर...
आणि कुठे, कसे घडले म्हणे
सगळं...?
अंगणात, सिव्हीयर अॅटॅक...?
पण मला तर काहीच आठवत
नाही...!
असो, त्याने काहीच फरक
पडत नाही...!
मला अगदी असाच निरोप हवा
होता...
सहज, चालता-बोलता, सगळ्यांना काही
क्षण चुटपुट लावणारा...
नंतर मग ते म्हणतात ना, जन पलभर म्हणतील
हाय हाय...
काही वेळातच ज्याची त्याची कामे सुरु होतात.. काही पर्यायच नसतो..
रोजच्या धावपळीत एकेक
करुन विसरूनही जातात...
आठवणी निघतात, पण बहुदा
चांगल्याच.. अगदी माझ्या आजीसारख्या..
नशीब लागते इतक्या, सहज हे
व्हायला...
काय...?
माझ्या काही अपुऱ्या इच्छा, माझी माणसं, स्वप्न...? खरं सांगू...
वय, अनुभव नसेल मला
फार, पण मी शिकले होते आज-आत्तामध्ये जगायला...
छोटे छोटे आनंद-दुःख, यश-हार सगळं
त्याच क्षणात अनुभवायला...
त्यामुळे फार काही
राहिलंय, सुटलंय, हरवलं असं मला अजिबात वाटत नाही...
फक्त एक सांगायचे आहे,
माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांना...
मी, माझे__हे तर कधी ना कधी
संपणारच...? शरीर आहेच नाशवंतच...
माझे आताचे अस्तित्व, ज्याला आत्मा
म्हणतात, तेही त्या लक्ष चौऱ्याऐंशी फेऱ्यात फिरेल, किंवा ना
फिरले...
पण तू म्हणजे मनाचे
अंर्तमन...ते अमर आहे...!
असेल इथेच सदैव...गोड
आठवणी बनून...
तू इथे जमलेल्या किंवा न
आलेल्या सगळ्यांना नक्की सांग...
मी खूप आनंदात आहे, हीच
तर सर्वोच्च इच्छा होती माझी...
रुखरुख लावणारा, निरोप घ्यायची, त्यात
आजचा दिवस भाग्याचा...
सगळेच सोबत, काही प्रत्यक्ष
काहींशी फोनवर गप्पा...
गेला, संपला तो नाशवंत
देह...मी आहे, त्या सगळ्यांच्या मनात...
आठवणीत...एकत्र
अनुभवलेल्या क्षणात, मजामस्तीत...
कधी भांडण करण्यात, तर कधी रुसून
बसण्यात...
कधी कौतुक करण्यात, कधी लाड करुन
घेण्यात...
खूप कशा-कशात...मला असंच
जपा..
ज्या आठवणी आंनद देतील, थोडंस का होईना
हसू येईल, तेच आठवा...
बाकी माझे दुर्गण, वाद, प्रश्न-समस्या, दुःख मी सोबत
घेऊन जात आहे...
तुम्हा सगळ्यांनाही इतकंच
सहज इथून जाता येवो, ही आणि हीच सदिच्छा...
........
.......
........
कुठे आहे मी, का इतकं गदागदा
मला हलवतो आहेस...?
काय ss? अंगणात फोनवर
बोलता बोलता झोपले...?
अंsssss....... हो..., हो मी बरी
आहे...!
खोटे होते का ते सारे...?
की स्वप्न...? तरीही ते दिवास्वप्न होते,
हे मात्र नक्की....!
होऊ
दे एक दिवस पूर्ण... त्यासाठी शुभेच्छा द्या, म्हणजे झालं..
भाग्य असे मज लाभले...अजी
म्या मरणं पाहिले...
भयंकर पण वास्तव ....चटका लावत सुख देणारं
ReplyDeleteमनापासून आभार 💞
Delete