Saturday, July 30, 2022

टोपणनाव

 

बबड्या.. टोपणनाव



ए आजीटले, नको ना गं म्हणू सोन्या...

आणि बाबा तू तर पहिले ते गाणं बंद कर, काय तर म्हणे...

बाबा म्हणतो- हाय जॉनी ! आई म्हणते- शंपू !

आजोबा म्हणती- खंडेराव ! आजी म्हणते- गणपू !!

ए आई, माहितीये गं मला, गाणं खूप छान आहे, कितीदा तरी ऐकलंय मी...

पण म्हणून तुम्ही मला असे गुंडी, बबड्या, सोन्या, चिम्या म्हणणं आधी बंद करा बरं,

अरे, का म्हणजे काय..? आता मी लहान नाही राहिलोय, टेन इयर ओल्ड आहे म्हणलं, स्टडीड इन फोर्थ स्टॅण्डर्ड...

हसतात मला सगळे अशी नावे ऐकून आणि तेवढ्यावरच नाही थांबत त्यांची गाडी, दिवसभर चिडवतात मला...

परवा ती दामलेंची चिमडी, मला दिवसभर सोनूल्याsss, सोनूल्या करत होती...

तुमचं ऐकून त्या दिवशी भर वर्गात बाई म्हणाल्या, "काय गुंडोपंत केलाय का अभ्यास..?" मला तर रडूच आलं...

पण रडलो असतो तर अजून नवं नाव दिलं असतं...

अस्सा राग आला होता, पण करतो काय..?

आणि काय हो आजोबा, परवा तुम्हीच आजीला सांगत होता, "आत्याला बेबी म्हणू नको, तिला नात झाली आता, नाहीतरी ती चिमणी आत्याला बेबी आजी म्हणेल म्हणून...

हसू येतंय सगळ्यांना, पण मला मुळीच नाही चालणार हे तुमचं, गुंडू, सोन्या, चिमू, टीमु...

आणि काय गं आई, सिरीयल बघताना त्या बबड्या आणि त्याच्या आईला तर सारखी नावं ठेवतेस ना मग आता का हसू येतंय...

इतकं छान गंधार नाव आहे माझं, तेही अगदी वेगळं...

मग छान हाक मारा ना, त्याच नावाने...

होsss होsss आलो रे...

काय ओरडता असे सगळे.. ?

हो, माझे मित्र मला गंध्या म्हणतात, आमच्यात चालत हो सगळं...

मी ही त्यांना बुट्या, रंग्या, चैत्याच असेच म्हणतो, त्याशिवाय मज्जाच नाही येत..

पण ते आमच्या आमच्यातच, तुम्ही मला गंधारच म्हणायचे...

प्लिजsss ना मोठा झालोय ना मी आता..

मी जातोय खेळायला...


2 comments:

suggestions most wlcome