Showing posts with label नाट्यछटा. Show all posts
Showing posts with label नाट्यछटा. Show all posts

Tuesday, August 02, 2022

मोठे व्हायची हौस

 


सुनंदा भाजी घे, बरं निवडायला..

काय म्हणतेस आई, आजीला कोणी नावाने हाक मारते का?

अगं आत्ताच तर ठरले ना आपले, की आपण घर घर खेळायचे अणि मी त्यात सगळ्यात मोठी होणार...

मग नावानेच बोलवणार ना..? लगेच कशी गं विसरते?

काय म्हणतेस, चुकले?

बरं बरं केले हो माफ... 

चल सीमा तू पटकन केर काढून घे, मला बाई कचकच अजिबात सहन होत नाही...

आणि हो थोडावेळ तरी तू, आई नाहीस माझी हे नको हं विसरु...

चला दोघी पटापट कामे उरका, मी जरा थोडावेळ जप करते...

तुम्हाला म्हणून सांगते मंडळी, मुद्दामच कोंडीत पकडले या दोघींना, खेळ म्हणून का होईना आता चांगली गंमत करते दोघींची, दिवसभर मला नुसते असे कर, तसे नको, हे आण,  ते दे करत असतात..

बरं काम सांगतात, तेंव्हा मी मोठी असते आणि यांना हवे तेंव्हा लहान, या मोठ्यांचे काही म्हणजे, काही समजत नाही...

अगं तुम्ही दोघी का बसल्या, चला उठा बघू आधी, सुनंदा तू झाडाला पाणी घाल, सीमा तू आपल्यासाठी छान खायला कर बघू...

तर काय सांगत होते मी, आम्ही लहान मुले आम्हाला खेळायला, नाचायला, दंगामस्ती करायला भारी आवडतो, पण घरात या आजी, आई, मावशी, आत्या यांचे अणि शाळेत त्या टीचर सारखे अभ्यास करा, पाढे, गणित, वाचन, लेखन आणि तेही केले तर काहीतरी काम सांगतात..

बरं स्वतः मात्र सारखे मोबाईल, टिव्ही बघत रहातात, ना आमच्याशी खेळतात, ना बोलतात..

उगाच फक्त आम्ही लहान होतो ना... असे काहीतरी, सारखे ऐकवत रहातात..

कंटाळा येतो अगदी, म्हणून आज ठरवले खेळ खेळत, त्यांना दाखवायचे किती त्रास देतात दिवसभर...

तुमच्याशी काय बोलत बसले, आमच्या खेळाचा वेळ संपून, अभ्यासाची वेळ होईल ना माझ्या...

अगं सुनंदा, ए सीमा कुठे गं गेला दोघीच्या दोघी, इथला हा खेळण्यांचा पसारा कोण बरे आवरेल...

काय म्हणतेस, बाबा आला अणि माझ्यासाठी खाऊ अणि फुगा घेऊन आलाय? दे की मग कुठे आहे?

काय म्हणतेस, मी मोठी आहे, आत्ता मला कशाला हवा, फुगा... कशाला हवा खाऊ...

कळते बरे मला सगळे, त्रास झाला ना कामाचा, सारख्या कटकटीचा, मलाही ही अगदी तसाच होतो बरे...

बरं जाऊ दे, माफ केले तुम्हाला, पुन्हा होईन कधीतरी मोठी..

आतासाठी मी लहानच, तुमची छकुली, चिमणी, सोनू आहे बर का ...

द्या बरे आधी माझा खाऊ नि फुगा...

Saturday, July 30, 2022

बालभक्त

 

बाल विठ्ठल भक्त



सावळ्या हरीला, कळू द्या तरी की, 

काय झालं रुसायला, रखुमाई रुसली

कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला, 

चला जाऊ पुसायला,

अहो मी काही गाणं म्हणत नाहीये, खरोखरच रुसली आहे हो, आपुली रखुमाई...

म्हणून तिला विचारते आहे, की आई अगं का रुसली आहेस...

तुम्ही येता का माझ्या मदतीला...? हो ना, मग या लवकर...

आता काय झालं...? मंदिर तर बंद जायचं कुठे...?

अहो, रखुमाई रुसून इथेच आहे बसलेली...

या तुम्ही, आपण मिळून तिला साकडं घालू...

तिचा रुसवा दूर करू...

आई, रखुमाई तुला आमचा साष्टांग नमस्कार...!

तू अशी का रुसली आहेस... आम्हा छोट्या भक्तांवर का रागावली आहेस..

अगं काय म्हणतेस तरी काय...?

तू आमच्यावर नाही, तर मोठ्या माणसांवर रागावली आहेस...!

आणि ते का म्हणे ... ? काय केले त्यांनी...?

काय म्हणतेस.... त्यांना विठोबाची काळजीच नाही... वारीची परवानगी द्या... वारीच्या परवानगी द्या असे म्हणून विठ्ठालाची कामे ते वाढवत आहेत...

आई म्हणजे ग काय ... आम्ही समजलो नाही ...?

कायs s s सांगतेस तरी काय...?

वारी करुन पंढरीला आलेल्या भक्तांना विठोबा भेटणारच नाही...

का गं, तो ही रुसला आहे की रागावला आहे...?

नाही ना... मग ...मग का नाही भेटणार?

अग सांगते तरी काय...? फक्त विठोबाच नाही, तर कुठलाच देवबाप्पा सध्या कोणत्याच मंदिरात नाही...

मग कुठे गेले आहेत सगळे...?

खरंच की माझ्या तर हे लक्षातच आले नाही...की

सध्या सगळे देव करोना नावाच्या व्हायरस राक्षसाला संपवून टाकण्यासाठी डॉक्टर , पोलीस, सफाई कामगार आणि असे चांगले काम करणाऱ्या सगळ्यांच्या मदतीला गेले आहेत... म्हणूनच तर सगळी मंदिरे बंद आहेत... जसे आपण घरातून बाहेर जाताना घर बंद करून कुलूप जाऊन जातो अगदी तसंच .... हो ना...!

आई, रखुमाई तू काळजीही नको करू, आणि आमच्यावर रुसूही नको ?

काय म्हणालीस, मी चिमुरडी, मी करणार तरी काय...?

आता तू गंमत बघ...

तर, मंडळी तुम्ही तर ऐकलेच आहे आत्ता रुखुमाईने काय सांगितले ते...

तिला फक्त विठोबाची नाही तर सगळ्याच देवांची काळजी वाटते आहे...

देव मंदिरात नाही,  देव नाही मंदिरात...करोनाशी लढायला, सारे लागले कामाला

कुणी डॉक्टरांच्या,कुणी पोलिसांच्या, तर कुणी सफाई कामगारांच्या गेले आहेत मदतीला...

थोडक्यात काय, तर मंदिरे उघडा, मंदिरे उघडा असे म्हणून , तिथे जाऊन गर्दी करून, आपण करोना वाढवून त्यांची कामे वाढवून त्यांना त्रास द्यायचा नाही...त्यांचे चांगले विचार घरात बसून समजून घ्यायचे... आणि उत्तम माणूस बनायचे...

राहील ना लक्षात, या बालभक्ताची विनंती...?

हेच मी, माझ्या मित्र मैत्रिणींना व्हिडीओ कॉल करून सांगते...

आपण नंतर भेटू...

छान रहा,काळजी घ्या, मास्क घाला...

कमीत कमी घराबाहेर पडा आणि गर्दी टाळा...

टोपणनाव

 

बबड्या.. टोपणनाव



ए आजीटले, नको ना गं म्हणू सोन्या...

आणि बाबा तू तर पहिले ते गाणं बंद कर, काय तर म्हणे...

बाबा म्हणतो- हाय जॉनी ! आई म्हणते- शंपू !

आजोबा म्हणती- खंडेराव ! आजी म्हणते- गणपू !!

ए आई, माहितीये गं मला, गाणं खूप छान आहे, कितीदा तरी ऐकलंय मी...

पण म्हणून तुम्ही मला असे गुंडी, बबड्या, सोन्या, चिम्या म्हणणं आधी बंद करा बरं,

अरे, का म्हणजे काय..? आता मी लहान नाही राहिलोय, टेन इयर ओल्ड आहे म्हणलं, स्टडीड इन फोर्थ स्टॅण्डर्ड...

हसतात मला सगळे अशी नावे ऐकून आणि तेवढ्यावरच नाही थांबत त्यांची गाडी, दिवसभर चिडवतात मला...

परवा ती दामलेंची चिमडी, मला दिवसभर सोनूल्याsss, सोनूल्या करत होती...

तुमचं ऐकून त्या दिवशी भर वर्गात बाई म्हणाल्या, "काय गुंडोपंत केलाय का अभ्यास..?" मला तर रडूच आलं...

पण रडलो असतो तर अजून नवं नाव दिलं असतं...

अस्सा राग आला होता, पण करतो काय..?

आणि काय हो आजोबा, परवा तुम्हीच आजीला सांगत होता, "आत्याला बेबी म्हणू नको, तिला नात झाली आता, नाहीतरी ती चिमणी आत्याला बेबी आजी म्हणेल म्हणून...

हसू येतंय सगळ्यांना, पण मला मुळीच नाही चालणार हे तुमचं, गुंडू, सोन्या, चिमू, टीमु...

आणि काय गं आई, सिरीयल बघताना त्या बबड्या आणि त्याच्या आईला तर सारखी नावं ठेवतेस ना मग आता का हसू येतंय...

इतकं छान गंधार नाव आहे माझं, तेही अगदी वेगळं...

मग छान हाक मारा ना, त्याच नावाने...

होsss होsss आलो रे...

काय ओरडता असे सगळे.. ?

हो, माझे मित्र मला गंध्या म्हणतात, आमच्यात चालत हो सगळं...

मी ही त्यांना बुट्या, रंग्या, चैत्याच असेच म्हणतो, त्याशिवाय मज्जाच नाही येत..

पण ते आमच्या आमच्यातच, तुम्ही मला गंधारच म्हणायचे...

प्लिजsss ना मोठा झालोय ना मी आता..

मी जातोय खेळायला...


इच्छा

 

इच्छा, एक आणि एकच...!

का जमलीयेत इतकी माणसे..? इथे ही एवढी गर्दी का केली आहे..


यातली बहुतांश माझ्या ओळखीची आहेत, काहीतर फक्त माझ्याच ओळखीची आहेत, तुम्हाला काही माहित आहे..?


काय सांगता नाही माहित..? आश्चर्य आहे....? 


जमलेल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य, भय, दुःख, गोंधळ, चिंता का बरं दिसते आहे..?

 

तुम्हाला म्हणून सांगते, आज काय माहीत कशी, पण अगदी अचानक जवळची म्हणावे, असे नातलग, मित्रमंडळ सकाळीच घरी हजर, मग काय घेतली सुटी..

दिवसभर मस्त गप्पा, दंगा, खानपान सगळ कस यथासांग झाले, दुपारी थोडा वेळ छान ब्रह्मानंदी टाळी पण लागली, त्यानंतर न आलेल्या पण खास असणाऱ्या एक दोघांना फोन लावले, नीट रेंज नव्हती म्हणून, फोनवर बोलत आता काही मिनिटापूर्वी, बोलत बोलत कोपऱ्यापर्यंत तर जाऊन आले..

परत आले तर, इथे ही गर्दी जमलेली..


काय झाले इतक्या थोडया वेळात इथे..?, जरा बाजूला होता का...? मला जाऊ द्या ना आत..!


यातले कोणीच माझ्याशी का बरं बोलत नाही..?


इथे हे कोण झोपले आहे..? भोवती जमलेली ही सगळी माझी माणसं अशी सुतकी चेहऱ्याने का बसली आहेत, नेमके काय झाले आहे..? 


अरे सांगा ना मला कोणीतरी, आता ना मला भिती वाटते आहे..


पार्थिव आहे का ते..? जाऊ का मी जवळ..?


काय म्हणता..? नको.. पण न जाता कळणार कसे..?


इथे तर एकही जण माझ्याशी बोलायला तयार नाही..


अरेच्या, हे पार्थिव अगदी माझ्यासारखे आहे..!


नव्हे, मीच आहे...!


मग मी कोण, आणि तुम्ही कोण..? 


अरे देवा, आता बघितले नीट तुम्हाला, तुम्ही देखील माझ्यासारख्या दिसता..


तिघीतली खरी कोण..? काय सांगता..! 


तिघी..! ते कसे काय..? 

खरंच असे होऊ शकते..? की, हे पार्थिव झालेले शरीर वेगळे, मी कोण तर  मन आणि तुम्ही अंर्तमन...?


पण तरी, माझा प्रश्न पुन्हा तोच, हे झालं कधी , कसे..? 


काय सांगता, काही तांसापूर्वी..? खरंच की, मी फोन बोलत बाहेर गेले, तेंव्हा बऱ्यापैकी दुपार होती, चांगलंच अंधारून आले आहे..


बर, मला सांगा, हे सारं कुठे, कसे घडले म्हणे..?


काय सांगता अंगणात, सिव्हीयर ॲटॅक आला..? पण मला तर काहीच आठवत नाही.. असो, त्याने आता काहीच फरक पडत नाही..


पण तुला म्हणून सांगते, देऊ ना तुला एकेरी हाक..? मी मन नि तू अंतर्मन..


म्हणजे माझाच एक भाग ना.. सांगत होते की मला अगदी असाच निरोप हवा होता हा जगाचा, सहज, चालता-बोलता, सगळ्यांना काही क्षण चुटपुट लागेल पण नंतर काही काळातच त्या गाण्यातील बोलाप्रमाणे, 

जन पळभर म्हणतील, 'हाय हाय!' 

मी जातां राहील कार्य काय।।

सर्वांची कामे सुरु व्हावी, रोजच्या धावपळीत एकेक गोष्टी विस्मृतीत जाव्या, आठवण झाली, तरी फक्त चांगली असावी.. 


अगदी माझ्या आजीसारखे (बाबांची आई), त्यासाठी नशीब नाही, पुण्य लागते इतक्या, सहज असे व्हायला..


काय म्हणतेस..? माझ्या काही अपुऱ्या इच्छा, स्वप्न, माझी माणसं, मागे काय काय राहिले, काय सोडून चालले..? 


खरं सांगू, वय नसेल माझे फार, अनुभव तर अगदीच थोडे आहेत, पण मी शिकले होते, आज नव्हे आत्तामध्ये जगायला..! छोटे छोटे आनंद, दुःख, यश, हार सगळं त्याच क्षणात अनुभवायला.. त्यामुळे फार काही राहिले, सुटले, हरवले असं मला वाटत नाही..


पण ऐक ना, मला एक नक्की सांगायचे आहे, माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांना..


मी काय किंवा तुम्ही काय कधी ना कधी या जगातून जाणारच आहोत, कोणता तरी श्वास शेवटचा असणार आहे, हे शरीर आहेच मुळी नाशवंत..

माझे आताचे अस्तित्व, ज्याला आत्मा म्हणतात, तेही त्या लक्ष चौऱ्याऐंशी फेऱ्यात फिरेल, किंवा ना फिरले...

पण तू म्हणजे मनाचे अंर्तमन...ते अमर आहे...!

असेल इथेच सदैव...गोड आठवणी बनून...

तू इथे जमलेल्या किंवा न आलेल्या सगळ्यांना नक्की सांग...

मी खूप आनंदात आहे, हीच तर सर्वोच्च इच्छा होती माझी...

रुखरुख लावणारा, निरोप घ्यायची, त्यात आजचा दिवस भाग्याचा...

सगळेच सोबत, काही प्रत्यक्ष काहींशी फोनवर गप्पा...

गेला, संपला तो नाशवंत देह...मी आहे, त्या सगळ्यांच्या मनात...

आठवणीत...एकत्र अनुभवलेल्या क्षणात, मजामस्तीत...

कधी भांडण करण्यात, तर कधी रुसून बसण्यात...

कधी कौतुक करण्यात, कधी लाड करुन घेण्यात...

खूप कशा-कशात...मला असंच जपा..

 

ज्या आठवणी आंनद देतील, थोडंस का होईना हसू येईल, तेच आठवा...

बाकी माझे दुर्गण, वाद, प्रश्न-समस्या, दुःख मी सोबत घेऊन जात आहे...

तुम्हा सगळ्यांनाही इतकंच सहज इथून जाता येवो, ही आणि हीच सदिच्छा...

........

.......

........

कुठे आहे मी, का इतकं गदागदा मला हलवतो आहेस...?

काय ss? अंगणात फोनवर बोलता बोलता झोपले...?

अंsssss....... हो..., हो मी बरी आहे...!

खोटे होते का ते सारे...?

की स्वप्न...? तरीही ते दिवास्वप्न होते, हे मात्र नक्की....!

होऊ दे एक दिवस पूर्ण... त्यासाठी शुभेच्छा द्या, म्हणजे झालं..

भाग्य असे मज लाभले...अजी म्या मरणं पाहिले...