सुनंदा भाजी घे, बरं निवडायला..
काय म्हणतेस आई, आजीला कोणी नावाने हाक मारते का?
अगं आत्ताच तर ठरले ना आपले, की आपण घर घर खेळायचे अणि मी त्यात सगळ्यात मोठी होणार...
मग नावानेच बोलवणार ना..? लगेच कशी गं विसरते?
काय म्हणतेस, चुकले?
बरं बरं केले हो माफ...
चल सीमा तू पटकन केर काढून घे, मला बाई कचकच अजिबात सहन होत नाही...
आणि हो थोडावेळ तरी तू, आई नाहीस माझी हे नको हं विसरु...
चला दोघी पटापट कामे उरका, मी जरा थोडावेळ जप करते...
तुम्हाला म्हणून सांगते मंडळी, मुद्दामच कोंडीत पकडले या दोघींना, खेळ म्हणून का होईना आता चांगली गंमत करते दोघींची, दिवसभर मला नुसते असे कर, तसे नको, हे आण, ते दे करत असतात..
बरं काम सांगतात, तेंव्हा मी मोठी असते आणि यांना हवे तेंव्हा लहान, या मोठ्यांचे काही म्हणजे, काही समजत नाही...
अगं तुम्ही दोघी का बसल्या, चला उठा बघू आधी, सुनंदा तू झाडाला पाणी घाल, सीमा तू आपल्यासाठी छान खायला कर बघू...
तर काय सांगत होते मी, आम्ही लहान मुले आम्हाला खेळायला, नाचायला, दंगामस्ती करायला भारी आवडतो, पण घरात या आजी, आई, मावशी, आत्या यांचे अणि शाळेत त्या टीचर सारखे अभ्यास करा, पाढे, गणित, वाचन, लेखन आणि तेही केले तर काहीतरी काम सांगतात..
बरं स्वतः मात्र सारखे मोबाईल, टिव्ही बघत रहातात, ना आमच्याशी खेळतात, ना बोलतात..
उगाच फक्त आम्ही लहान होतो ना... असे काहीतरी, सारखे ऐकवत रहातात..
कंटाळा येतो अगदी, म्हणून आज ठरवले खेळ खेळत, त्यांना दाखवायचे किती त्रास देतात दिवसभर...
तुमच्याशी काय बोलत बसले, आमच्या खेळाचा वेळ संपून, अभ्यासाची वेळ होईल ना माझ्या...
अगं सुनंदा, ए सीमा कुठे गं गेला दोघीच्या दोघी, इथला हा खेळण्यांचा पसारा कोण बरे आवरेल...
काय म्हणतेस, बाबा आला अणि माझ्यासाठी खाऊ अणि फुगा घेऊन आलाय? दे की मग कुठे आहे?
काय म्हणतेस, मी मोठी आहे, आत्ता मला कशाला हवा, फुगा... कशाला हवा खाऊ...
कळते बरे मला सगळे, त्रास झाला ना कामाचा, सारख्या कटकटीचा, मलाही ही अगदी तसाच होतो बरे...
बरं जाऊ दे, माफ केले तुम्हाला, पुन्हा होईन कधीतरी मोठी..
आतासाठी मी लहानच, तुमची छकुली, चिमणी, सोनू आहे बर का ...
द्या बरे आधी माझा खाऊ नि फुगा...
~3.jpeg)
No comments:
Post a Comment
suggestions most wlcome