Friday, July 08, 2022

शेजवान तडका

    तडका नवा, पदार्थ जुनाच..

मूग शेजवान मिसळ 


तर त्याचे झाले असे की, तीच चव, तेच पदार्थ याचा भारी म्हणजे भारीच कंटाळा आला..

रोज काहीतरी नवीन बनवायला, आपल्याला ना वेळ, ना ताकद, ना उत्साह..

मग इसकी टोपी, उसके सर..

थोडक्यात पदार्थ जुनाच, फक्त त्याला साज नवा..

सध्याचा काय तो म्हणे ट्रेंड आहे, दोन वेगळ्या देशाचे, प्रांताचे किंवा चवीचे पदार्थ एकत्र करुन नवीन पदार्थ तयार करायचा,

अगदी तसाच प्रयत्न केला बरे..

अणि पसंतीस उतरला..

नव्याचे कौतुकही झाले, आणि रसना देवी तृप्त झाली..

तर पदार्थाचे नाव..

शेजवान मूग मिसळ

मूग निवडून, भिजवून छान मोड आणून, कुकुरला एक शिटी घेऊन शिजवून घेतले..

कुकर पडेपर्यंत मिसळण्यासाठी, काही पदार्थ बनवले..

पहिला अगदीच वाटीभर पण भरपूर बटाटा घालून चविष्ट बिना शेंगदाण्याचे पोहे..

दुसरा बटाट्याचा उन्हाळी किसाचा झणझणीत चिवडा..

तीन तळलेले शेंगदाणे..

आता मुख्य पदार्थ शेजवान मूग उसळ, त्यासाठी बारीक-नीटस कांदा, टोमॅटो, कोथिंबीर चिरली, ओल्या खोबऱ्याचे वाटण बनवले..

फोडणीला तेल तापवले, मोहरी - जीरे तडतडल्यावर नेहमीप्रमणेच कांदा खरपूस करुन घेतला..

उसळीला तेलाचा तवंग येण्यासाठी त्यात लिंबू पिळले, मग चिमूटभर साखर, हळद, हिंग, चमचाभर तिखट घालून तेल सुटेपर्यंत परतले..

मग टोमॅटो, खोबऱ्याचे वाटण घालून छान परतून घेतले, आणि आता हटके कृती..

एरवी कांदा-लसूण किंवा मिसळ मसाला वापरते त्याऐवजी..

शेजवान मसाला घालून पुन्हा छान परतले, मग त्यात शिजवलेले मूग व पाणी घालून मस्त तर्रीवाली उसळ बनवली..

इतके दमल्यावर पुन्हा सजावट वैगेरे अजिबात न करता, ज्याने त्याने आपल्या आवडीने चवीने मिसळ बनवून खावे म्हणून सगळे पदार्थ ताटात वेगवेगळे वाढले..

नाही म्हणायला, नेहमीपेक्षा वेगळी दिसणारी, वेगळ्या ढंगाची मूग शेजवान मिसळ संध्याकाळ चविष्ट बनवून गेली..

पाककृती आवडली असेलच, बनवायलाही हरकत नाही..

अट एकच, मला आमंत्रण हवे..

No comments:

Post a Comment

suggestions most wlcome