Showing posts with label पाककृती. Show all posts
Showing posts with label पाककृती. Show all posts

Thursday, July 27, 2023

तिखट शेवया

 

👦🏻 बाळकोबाला प्यारी, शेवयाची मॅगी


परवा संध्याकाळी, तिरंगी मिसळ केली..
मिटक्या मारत खाताना, बाळकोबांची विकेट घेतली,

"ए आयो..., हे असे मस्त पदार्थ, डब्याला का ग देत नाही ?"

"सकाळी सातच्या आधी असले पदार्थ करायला, मी नाही हो टीव्हीतली, सुपर मॉमी."

त्यावर त्याची तक्रार, "सगळे चिडवतात ना नेहमी मला, तू डब्यात काहीतरी भारी, आणत नाही."
आज यावर थोडी फुंकर घालायची संधी मिळाली..

त्याच्या मित्राची स्वारी, अभ्यासाला घरी आली..

"खायला करु का काहीतरी छान...!",
विचारलं थोडं घाबरतच, कारण काहीही फर्माईश होण्याची शक्यता..

"शेवयाची मॅगी... दणक्यात झाली डिमांड..!"

🍝

"यावर आहे आपली कमांड" त्यामुळे ऐकून हुश्श झाले..
सरसावून बाह्या, लागले मग कामाला,
आवडीची गाणी लावली, ऐकायला..

तापायला ठेवली लोखंडी कढई...,

टाकलं साजूक तूप, बारीक चिरुन कांदा, लसूण..,

गाजराला दिले, नाजूक रुप..

मस्त तापलं तूप जेंव्हा, कांदा, लसूण, गाजर, मटार, अन् शेवटी शेवया अशी, दिली एकेकाची आहुती,

तशी..

भारी घमघमाट येतोय ग... आयो !, हळूच मिळाली बाळकोबाची पावती..

सगळं खमंग भाजून झाल्यावर, चवीला मीठ आणि कांदालसूण मसाला टाकला..

पाणी शिंपडून जरासे, झाकण लावून, पाच मिनिट, ठेवले शिजायला.

भरल्या मग डिश, वरुन भुरsभूरsली खोबरं कोथिंबीर..

आवाज दिला, बालसेनेला, मग बसलो सगळे, मस्त ताव मारायला..

मुखी घास घेता पहिला, म्हणाला जेंव्हा बाळकोबा, "दो मिनिट पेक्षा हीच मॅगी भारी..." 🍝

भरुन पावले मी, वाटली गंमत न्यारी.... !




*****************************

Friday, July 08, 2022

शेजवान तडका

    तडका नवा, पदार्थ जुनाच..

मूग शेजवान मिसळ 


तर त्याचे झाले असे की, तीच चव, तेच पदार्थ याचा भारी म्हणजे भारीच कंटाळा आला..

रोज काहीतरी नवीन बनवायला, आपल्याला ना वेळ, ना ताकद, ना उत्साह..

मग इसकी टोपी, उसके सर..

थोडक्यात पदार्थ जुनाच, फक्त त्याला साज नवा..

सध्याचा काय तो म्हणे ट्रेंड आहे, दोन वेगळ्या देशाचे, प्रांताचे किंवा चवीचे पदार्थ एकत्र करुन नवीन पदार्थ तयार करायचा,

अगदी तसाच प्रयत्न केला बरे..

अणि पसंतीस उतरला..

नव्याचे कौतुकही झाले, आणि रसना देवी तृप्त झाली..

तर पदार्थाचे नाव..

शेजवान मूग मिसळ

मूग निवडून, भिजवून छान मोड आणून, कुकुरला एक शिटी घेऊन शिजवून घेतले..

कुकर पडेपर्यंत मिसळण्यासाठी, काही पदार्थ बनवले..

पहिला अगदीच वाटीभर पण भरपूर बटाटा घालून चविष्ट बिना शेंगदाण्याचे पोहे..

दुसरा बटाट्याचा उन्हाळी किसाचा झणझणीत चिवडा..

तीन तळलेले शेंगदाणे..

आता मुख्य पदार्थ शेजवान मूग उसळ, त्यासाठी बारीक-नीटस कांदा, टोमॅटो, कोथिंबीर चिरली, ओल्या खोबऱ्याचे वाटण बनवले..

फोडणीला तेल तापवले, मोहरी - जीरे तडतडल्यावर नेहमीप्रमणेच कांदा खरपूस करुन घेतला..

उसळीला तेलाचा तवंग येण्यासाठी त्यात लिंबू पिळले, मग चिमूटभर साखर, हळद, हिंग, चमचाभर तिखट घालून तेल सुटेपर्यंत परतले..

मग टोमॅटो, खोबऱ्याचे वाटण घालून छान परतून घेतले, आणि आता हटके कृती..

एरवी कांदा-लसूण किंवा मिसळ मसाला वापरते त्याऐवजी..

शेजवान मसाला घालून पुन्हा छान परतले, मग त्यात शिजवलेले मूग व पाणी घालून मस्त तर्रीवाली उसळ बनवली..

इतके दमल्यावर पुन्हा सजावट वैगेरे अजिबात न करता, ज्याने त्याने आपल्या आवडीने चवीने मिसळ बनवून खावे म्हणून सगळे पदार्थ ताटात वेगवेगळे वाढले..

नाही म्हणायला, नेहमीपेक्षा वेगळी दिसणारी, वेगळ्या ढंगाची मूग शेजवान मिसळ संध्याकाळ चविष्ट बनवून गेली..

पाककृती आवडली असेलच, बनवायलाही हरकत नाही..

अट एकच, मला आमंत्रण हवे..

Tuesday, May 04, 2021

रावणपोहे

 बाळकोबाच्या भूकेला.... 😋  रावण पोह्यांचा तडका.... 🍚




बाळकोबांची स्वारी शाळेतून परतली,  

तेच मुळी आरडाओरडा करत....

😲सायकलवरुन टांग उडवत,  खाली उतरतानाच, गजर सुरु झाला.

"आई ss  ए आई ss भुक्क लागलीए खुप्प."

प्रेमळ आईला आलं गलबलून, त्याला गोंजारत म्हणाली,

"ओ गं माझं पिल्लु, कित्ती सक्काळी शाळेत जात, तेही शायकलीवर...


रोज असतेच पोळीभाजी, आज वेगळ काहीतरी करते, तू हातपाय धुवून ये, मी खाऊ तयार ठेवते ... "


"दो मिनीट मॅगी करणार ...?" विस्फारुन डोळे बाळकोबाने प्रश्न विचारला.


"नाही रे माझ्या राजा, त्याहूनही भारी... पाच मिनिटात रावण पोहे करणार  !", झटक्यात त्याला उत्तर मिळालं. 

हे काय नवीन, बाळकोबाला प्रश्न पडला...

आधी स्वच्छ होऊन ये, आईने गोड फर्मान काढला... 


आधी बाळकोबा आवरुन येणार, की आईचा खाऊ बनणार...

याची न ठरवताही स्पर्धा चालू झाली...

बघतानाही साऱ्यांना मजा  फर्मास आली...

हळद-मिरचीचं लोणचं, मेतकूट, मीठ.. 

सगळं काही आवडीनुसार घेतल...  

तापलेल्या तेलात शेंगदाणे, काजू, बेदाणे मस्त तळले अन्, 

कांदा-कोथिंबीर बारीक चिरुन, कढईत पुन्हा तेल तापत ठेवले ...

दोन-तीन वाट्या जाडे पोहे, घेतले खरपूस तळून ...

आता सगळं पातेल्यात छान मिसळून, वरुन किंचित लिंबू पिळले ...

भरपूर खोबरं, कोथिंबीरीने डिश सजवताना, 

आवाज दिला बाळकोबाला,  

"पाच मिनिटातच झाले बरं का तयार

बाळा, तुला ही गंमत आवडेल फार"

आवरुन झटपट धावत येत, बाळकोबा त्यावर तुटून पडला...


पोह्यांची टेश्ट, वाटली भारीच बेश्ट...

लव यू आई फॉर धिस ट्रीट !  

रावण पोहे रेसिपी, एकदम हिट !


खुशीत येत स्वारीने, मनमुराद पावती दिली ...

आनंद त्याचा बघून माताही हरखून गेली  ...