Saturday, July 30, 2022

इच्छा

 

इच्छा, एक आणि एकच...!

का जमलीयेत इतकी माणसे..? इथे ही एवढी गर्दी का केली आहे..


यातली बहुतांश माझ्या ओळखीची आहेत, काहीतर फक्त माझ्याच ओळखीची आहेत, तुम्हाला काही माहित आहे..?


काय सांगता नाही माहित..? आश्चर्य आहे....? 


जमलेल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य, भय, दुःख, गोंधळ, चिंता का बरं दिसते आहे..?

 

तुम्हाला म्हणून सांगते, आज काय माहीत कशी, पण अगदी अचानक जवळची म्हणावे, असे नातलग, मित्रमंडळ सकाळीच घरी हजर, मग काय घेतली सुटी..

दिवसभर मस्त गप्पा, दंगा, खानपान सगळ कस यथासांग झाले, दुपारी थोडा वेळ छान ब्रह्मानंदी टाळी पण लागली, त्यानंतर न आलेल्या पण खास असणाऱ्या एक दोघांना फोन लावले, नीट रेंज नव्हती म्हणून, फोनवर बोलत आता काही मिनिटापूर्वी, बोलत बोलत कोपऱ्यापर्यंत तर जाऊन आले..

परत आले तर, इथे ही गर्दी जमलेली..


काय झाले इतक्या थोडया वेळात इथे..?, जरा बाजूला होता का...? मला जाऊ द्या ना आत..!


यातले कोणीच माझ्याशी का बरं बोलत नाही..?


इथे हे कोण झोपले आहे..भोवती जमलेली ही सगळी माझी माणसं अशी सुतकी चेहऱ्याने का बसली आहेत, नेमके काय झाले आहे..? 


अरे सांगा ना मला कोणीतरी, आता ना मला भिती वाटते आहे..


पार्थिव आहे का ते..? जाऊ का मी जवळ..?


काय म्हणता..? नको.. पण न जाता कळणार कसे..?


इथे तर एकही जण माझ्याशी बोलायला तयार नाही..


अरेच्या, हे पार्थिव अगदी माझ्यासारखे आहे..!


नव्हे, मीच आहे...!


मग मी कोण, आणि तुम्ही कोण..? 


अरे देवा, आता बघितले नीट तुम्हाला, तुम्ही देखील माझ्यासारख्या दिसता..


तिघीतली खरी कोण..काय सांगता..! 


तिघी..! ते कसे काय..

खरंच असे होऊ शकते..? की, हे पार्थिव झालेले शरीर वेगळे, मी कोण तर  मन आणि तुम्ही अंर्तमन...?


पण तरी, माझा प्रश्न पुन्हा तोच, हे झालं कधी , कसे..? 


काय सांगता, काही तांसापूर्वी..? खरंच कीमी फोन बोलत बाहेर गेले, तेंव्हा बऱ्यापैकी दुपार होती, चांगलंच अंधारून आले आहे..


बर, मला सांगा, हे सारं कुठे, कसे घडले म्हणे..?


काय सांगता अंगणात, सिव्हीयर ॲटॅक आला..पण मला तर काहीच आठवत नाही.. असो, त्याने आता काहीच फरक पडत नाही..


पण तुला म्हणून सांगते, देऊ ना तुला एकेरी हाक..? मी मन नि तू अंतर्मन..


म्हणजे माझाच एक भाग ना.. सांगत होते की मला अगदी असाच निरोप हवा होता हा जगाचा, सहज, चालता-बोलता, सगळ्यांना काही क्षण चुटपुट लागेल पण नंतर काही काळातच त्या गाण्यातील बोलाप्रमाणे, 

जन पळभर म्हणतील, 'हाय हाय!' 

मी जातां राहील कार्य काय।।

सर्वांची कामे सुरु व्हावी, रोजच्या धावपळीत एकेक गोष्टी विस्मृतीत जाव्या, आठवण झाली, तरी फक्त चांगली असावी.. 


अगदी माझ्या आजीसारखे (बाबांची आई), त्यासाठी नशीब नाही, पुण्य लागते इतक्या, सहज असे व्हायला..


काय म्हणतेस..माझ्या काही अपुऱ्या इच्छा, स्वप्न, माझी माणसमागे काय काय राहिले, काय सोडून चालले..? 


खरं सांगू, वय नसेल माझे फार, अनुभव तर अगदीच थोडे आहेत, पण मी शिकले होते, आज नव्हे आत्तामध्ये जगायला..! छोटे छोटे आनंद, दुःख, यश, हार सगळं त्याच क्षणात अनुभवायला.. त्यामुळे फार काही राहिले, सुटले, हरवले असं मला वाटत नाही..


पण ऐक ना, मला एक नक्की सांगायचे आहे, माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांना..


मी काय किंवा तुम्ही काय कधी ना कधी या जगातून जाणारच आहोत, कोणता तरी श्वास शेवटचा असणार आहे, हे शरीर आहेच मुळी नाशवंत..

माझे आताचे अस्तित्व, ज्याला आत्मा म्हणतात, तेही त्या लक्ष चौऱ्याऐंशी फेऱ्यात फिरेल, किंवा ना फिरले...

पण तू म्हणजे मनाचे अंर्तमन...ते अमर आहे...!

असेल इथेच सदैव...गोड आठवणी बनून...

तू इथे जमलेल्या किंवा न आलेल्या सगळ्यांना नक्की सांग...

मी खूप आनंदात आहे, हीच तर सर्वोच्च इच्छा होती माझी...

रुखरुख लावणारा, निरोप घ्यायची, त्यात आजचा दिवस भाग्याचा...

सगळेच सोबत, काही प्रत्यक्ष काहींशी फोनवर गप्पा...

गेला, संपला तो नाशवंत देह...मी आहे, त्या सगळ्यांच्या मनात...

आठवणीत...एकत्र अनुभवलेल्या क्षणात, मजामस्तीत...

कधी भांडण करण्यात, तर कधी रुसून बसण्यात...

कधी कौतुक करण्यात, कधी लाड करुन घेण्यात...

खूप कशा-कशात...मला असंच जपा..

 

ज्या आठवणी आंनद देतील, थोडंस का होईना हसू येईल, तेच आठवा...

बाकी माझे दुर्गण, वाद, प्रश्न-समस्या, दुःख मी सोबत घेऊन जात आहे...

तुम्हा सगळ्यांनाही इतकंच सहज इथून जाता येवो, ही आणि हीच सदिच्छा...

........

.......

........

कुठे आहे मी, का इतकं गदागदा मला हलवतो आहेस...?

काय ss? अंगणात फोनवर बोलता बोलता झोपले...?

अंsssss....... हो..., हो मी बरी आहे...!

खोटे होते का ते सारे...?

की स्वप्न...? तरीही ते दिवास्वप्न होते, हे मात्र नक्की....!

होऊ दे एक दिवस पूर्ण... त्यासाठी शुभेच्छा द्या, म्हणजे झालं..

भाग्य असे मज लाभले...अजी म्या मरणं पाहिले...

 

 

 

 


2 comments:

  1. भयंकर पण वास्तव ....चटका लावत सुख देणारं

    ReplyDelete

suggestions most wlcome