Showing posts with label मनातली_गाणी. Show all posts
Showing posts with label मनातली_गाणी. Show all posts

Wednesday, June 28, 2023

नवे तेही हवे


मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो,  तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो  || धृ ||


याच्या शब्दा शब्दात दाटलेली सकारात्मकता, प्रचंड आकर्षित करते..


यात रोजचा झगडा आणि सोबतच त्याची उत्तरे आहेत..


कमालीचे वास्तव आहे, पण तितकीच भक्तीसुद्धा आहे..


एकाच वेळेला विज्ञान प्रमाण मानण्याची ताकद आहे, तर त्यासोबत निर्मळ आणि डोळस श्रध्दा आहे ..


कसे ते समजण्यासाठी, यातली फक्त शेवटची दोन कडवी सार्थ मांडायचा प्रयत्न करते..


धृपदात, ही कविता असे सांगते की..


आपल्या प्रत्येकाच्या अंतरंगात, दोन अस्तित्वे जगत असतात..


एक निखळ, निर्मळ, आनंदी, सहज बदल स्वीकारणारे, सगळ्या गोष्टींना उत्साहाने बघणारे..


तर दुसरे नेहमी दुःखी, वैतागलेले, सतत इतरांना नावे ठेवणारे, बदल लादले तरीसुद्धा न मानणारे..


आता ही दोन अस्तित्वे जेंव्हा देव, ईश्वर, शक्ती यावर एकमेकांसमोर झगडा करतात, तेंव्हा काय होते, यावर कवी पुढील कडवे लिहितो..


मी आस्तिक मोजत पुण्या‌ईची खोली, नवसांची ठेवून लाच लावतो बोली,


माझ्यातले वैताग, त्रागा करणारे अस्तित्व, स्वतःला आस्तिक म्हणवते,  


पण मुळात त्याचे आस्तिक असणे,  मोजमाप करण्यात अडकले आहे..


इतकी भक्ती केली तर असे व्हायला हवे , इतका जप केला असे फळ, असे दान केले तर ही फलश्रुती..


ही पूजा केली, तो नवस केला.. साऱ्या अनावश्यक नोंद ठेवण्याची धडपड..


बरं, हे सारे करताना, कर्म चांगले ठेवावे लागते याची आठवण आहे का..?


तर तो विचार, तर जणू माहितीच नाही, असा तोरा..

शिवाय सतत देवाला माझी चिंता नाही, मलाच सगळे प्रश्न, दुःख असा अनाठायी ओरडा, आवेश..


तरीही,  प्रश्न, दुःख  मात्र देवानेच सोडवायचे..


हवे तर, मी त्यासाठी अजून वेगवेगळी व्रत, उपास, इतर अनेक गोष्टी करेन, असा खुळा हट्ट..


तर दुसरीकडे..


तो मुळात येतो इच्छा अर्पून सार्‍या, अन् धन्यवाद देवाचे घेवून जातो..


दुसरे निखळ, सश्रद्ध अस्तित्व, स्वतःला ना आस्तिक म्हणते, ना नास्तिक..


ते फक्त, आहे त्या साऱ्याचा स्वीकार करुन गीतासार जगते, 


प्रश्न-दुःख असो वा उत्तर-सुख सगळे देणाराही तोच आणि भोगणाराही तोच..


जो आत्मा, तोच परमात्मा, मग चिंता का आणि कशाची असावी..


जे महत्वाचे वाटते, ते शरीर हे माध्यम आहे, याची पूर्ण जाणीव त्याला असल्याने, तो मुळातच निरिच्छ आहे.. 


आणि त्यामुळेच देव, त्याचे जास्त मनापासून स्वागत करतो, इतकेच नाही, तर इतर हट्टी लेकरांना जास्त वेळ देता येईल, म्हणून त्याला धन्यवाद देतो..


इथे ग.दी. माडगूळकरांनी मांडलेली रचना, ' कानडा राजा पंढरीचा ' ही राहून राहून आठवते..


स्वतः पलीकडे ज्याने देवत्व स्वीकारले आहे, त्याच्यासाठी ती निर्गुण, निराकार शक्ती, सस्वरुप धारण करते..


इतकेच नाही तर.. 


युगानुयुगे हात कटीवर ठेवून विटेवर उभी राहते, भक्तांचे हट्ट पुरवते, त्यांची सेवा स्वीकारते, त्यांची कामे करते, जिथे नजर जाईल, तिथे तिथे प्रचिती देत राहते..


फक्त हे सगळे अनुभव घेण्याची मनापासून तयारी हवी, आणि आपल्या दोन अस्तित्वांपैकी चांगल्याची निवड करता यायला हवी..


कवी संदीप खरे शेवटच्या कडव्यात म्हणतात.. 


माझे त्रासलेले अस्तित्व कसे आहे, तर असे..


मज अध्यात्माचा रोज नवा शृंगार, लपतो न परि चेहरा आत भेसूर,


माझे अध्यात्म सोयीने बदलत राहते, कधी देव बदलतो, तर कधी पूजेची पद्धत, दरवेळी मी त्याला वेगवेगळी नावे देतो..


आणि माझ्या या साऱ्या कर्मकांडाला, कोणत्या ना कोणत्या दाखल्यांशी बांधून ठेवतो..


हे केले, मग हे व्हायला पाहिजे, मला प्रचिती मिळालीच पाहिजे.. 


नाहीतर..


हे सगळे खोटे आहे, थोतांड आहे, असा बोभाटा करायला, ना भीती वाटते, ना काळजी.. हीच ती भेसूरता 


पण दुसरीकडे मात्र..


तो फक्‍त ओढतो शाल नभाची तरीही, त्या शाम निळ्याच्या मोरपीसा परि दिसतो


सदैव आनंदी असणारे, निखळ अस्तित्व असे असते..


कोणतीही गोष्टी ते इतक्या सहज स्वीकारते, की मला त्याच्यातच परमेश्वराचा अंश दिसतो..


मीच आत्मा नि मीच परमात्मा, ही प्रचिती मला क्षणोक्षणी मिळत रहाते..


जेंव्हा जेंव्हा मी, अशी दोन अस्तित्वे घेऊन, रोज नव्या दिवसाला, नव्या परिस्थितीला, नव्या आव्हानांना सामोरे जाते, 


तेंव्हा तेंव्हा ही कविता मला, माझ्यातले निखळ, निर्मळ, आनंदी अस्तित्व निवडण्याची प्रेरणा देते..


म्हणून ती माझ्या अत्यंत जवळची, प्रेमाची आहे..


ज्ञानोबा माऊली म्हणतात, एक तरी ओवी अनुभवावी..


मला हे काव्य एका निर्मळ ओवीसारखे वाटते..


रोजचे क्षण अनुभवताना, नव्याने घडण्याची, जगण्याची, भक्कम उभे राहण्याची ताकद देते..


अशीच ताकद, प्रेरणा, आनंद तुम्हाला, प्रत्येक गोष्टीत लाभो, हीच शुभेच्छा..!


संपूर्ण कविता संदर्भासाठी...


मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो,  तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो  || धृ ||

मी जुनाट दारापरी किरकिरा बंदी, तो सताड उघड्या खिडकीपरी स्वछंदी,

मी बिजागरीशी जीव गंजवीत बसतो, तो लंघुन चौकट पार निघाया बघतो..||

डोळ्यात माझीया सुर्याहुनी संताप, दिसतात त्वचेवर राप उन्हाचे शाप,

तो त्याच उन्हाचे झगझगीत लखलखते,घडवून दागिने सुर्यफुलांपरी झुलतो..||

मी पायी रुतल्या काचांवरती चिडतो, तो त्याच घे‌ऊनी नक्षी मांडून बसतो,

मी डाव रडीचा खात जिंकतो अंती, तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनने हरतो.

मी आस्तिक मोजत पुण्या‌ईची खोली, नवसांची ठेवून लाच लावतो बोली,

तो मुळात येतो इच्छा अर्पून सार्‍या, अन् धन्यवाद देवाचे घेवून जातो..||

मज अध्यात्माचा रोज नवा शृंगार, लपतो न परि चेहरा आत भेसूर,

तो फक्‍त ओढतो शाल नभाची तरीही,

त्या शाम निळ्याच्या मोरपीसापरि दिसतो... कवी - संदीप खरे

Thursday, May 18, 2023

कोमळ वाचा दे रे राम - भावार्थ

कोमळ वाचा दे रे राम। विमळ करणी दे रे राम।।धृ।।

विश्व कल्याणासाठी निघालेले रामदास स्वामी, 

रामाला कोमल वाचा का बरे मागतात, ..?

त्यांची वाचा कोमल नव्हती..?

मला वाटते, ते सामाजिक कामाची पाया बांधणी मांडतात..

समाजात वावरताना, वाणी ही कोमलच असली पाहिजे..

उत्तम पुरुष लक्षणे सांगताना ते म्हणतात, 

बोलण्यासारखे उत्तर येते, 

तरी मग कर्कश बोलावे ते काय निमित्ते..

थोडक्यात जे योग्य असते, पटण्यासारखे असते, त्याला ओरडायची, वादाची गरजच नसते..

मग तरीही ही आर्त मागणी का..?

कारण दैनंदिन व्यवहार राग न येणे, स्वतःवर संपूर्ण संयम असणे, हे सहज शक्य नाही..

कदाचित रामदास स्वामींकडे तो संयम असेल, पण नंतर त्यांचे कार्य पुढे चालवणाऱ्या शिष्यांकडे असेलच असे नाही..

आणि त्यांचे शिष्य तरी कोण..?

ते सर्व, जे राम मानतात, रामाला पूजतात, राम हे ज्यांचे दैवत आहे..

त्या साऱ्यांसाठी, स्वामी ही मागणी करतात..

तुमच्या, माझ्यासाठी करतात..

प्रसंग ओळखी दे रे राम। धूर्तकळा मज दे रे राम।।

वाणी कोमल असल्याने सर्व कामे सिद्धीस जातातच असे नाही, असा वाद कुणी केला तर अगदी योग्य आहे..

त्यासाठी स्वामी पुढे म्हणतात, 

माझा वाणीवर ताबा रहाणार नाही, ओरडवेसे, भांडवेसे प्रसंग येतील, तेंव्हा त्याची ओळख तू मला दे..

प्रसंग ओळखून पुरतील का..?

नाही ना, तर त्यावेळी नेमके कसे वागावे, याचे ज्ञान मला दे..

म्हणजेच धूर्तकळा..

प्रत्येक वेळी छान राहून चालत नाही, 

संत तुकारामांनी  सांगितले आहे, की

भले तर देऊ कासेची लंगोटी| नाठाळाचे माथी हाणू काठी ||

याचे उत्तम उदाहरण म्हणजे शिवाजी महाराजांचे राजकारण, समाजकारण..

रामदास स्वामी प्रसंगानुरुप कृती करण्याची क्षमता, स्वतःसाठीच नाही, तर रामरायाच्या भक्तांसाठी मागतात..

हितकारक दे रे राम। जन सुखकारक दे रे राम।।

कृती प्रसंगानुरूप असली तरी, ती स्वतःचे आणि समाजाचे कल्याण करणारी असली पाहिजे, हे सांगायला रामदास स्वामी विसरत नाही..

मला राग आला, त्रास झाला मग मी माझ्या मनाला येईल ते करेन, स्वतःची हानी करेन, इतरांचा छळ करेन, ही जर नैसर्गिक भावना असेल, तर त्यावर विजय मिळवण्याची शक्ती रामस्वामी मागतात..

नकारात्मक विचार येणे, हे अनैसर्गिक नाही, फक्त ते तात्पुरते असावे, त्यावर मात करता येते, याची जाणीव या शब्दातून होते..

यासाठी मला दोन उदाहरणे आठवतात..

पहिले टॉम आणि जेरी कार्टून मधे दोघांच्या मनात येणाऱ्या चांगल्या वाईट विचारांचे प्रतिक एक योग्य दुसरा अयोग्य.. त्यातल्या एकाची त्यावेळी त्यांनी केलेली निवड व त्यामुळे घडलेली गंमत..

दुसरे.. स्वदेश चित्रपटातील एका गाण्याच्या दोन ओळी

देख तजके पाप रावण, राम तेरे मन हैं..

असा राम रावणाचा झगडा आपल्या विचारात सारखाच होत असतो, रामराया तुझे भक्त नेहमी रामाचीच निवड करोत, अशी आळवणी स्वामी करतात..


अंतर पारखी दे रे राम। बहुजन मैत्री दे रे राम।। 

योग्य अयोग्यतेची निवड केली, तरी समाजात वावरताना सर्वांसोबत रहावे लागेल, त्यांना समजून घ्यावे लागेल..

सर्वांशी मैत्री करावी लागेल, त्यांच्यामधील चांगले माझ्यात येण्यासाठी, आणि जर काही चुकीचे असेल तर दूर करण्यासाठी त्यांना मदतही करण्याची बुद्धी तू मला दे..

मैत्र भाव हा फायद्यासाठी, स्वार्थासाठी न येता विश्व कल्याणासाठी असू दे..

विद्यावैभव दे रे राम। उदासीनता दे रे राम।।

समाजासाठी, बदलांसाठी जर कृती करायची तर आधी माझा व्यक्तिमत्त्व विकास झाला पाहिजे..

त्यासाठी विद्या वैभव दे..

आजच्या शिक्षणात माहितीचा प्रचंड आदान प्रदान होत असताना बघायला मिळते, परंतु ती माहिती प्रत्यक्षात उपयोजनात येणे म्हणजे त्याचे ज्ञानात रुपांतर होणे..

ज्ञानामुळे जनहित साधणे जमले, तर त्याची विद्या बनते, असे दान समर्थ रामरायास मागतात..

मागो नेणे दे रे राम। मज न कळे ते दे रे राम।।

समर्थांना वाटते की आपली मागणी कदाचित संपणारच नाही, आणि तरीही काहीतरी राहूनच जाईल..

ही मागणी स्वतःसाठी नाही, समाजहितासाठी आहे..

त्यामुळे कदाचित मला सगळेच समजेल असे नाही, त्यामुळे रामा तूच माझा माता पिता बनून मला न समजणारे, लक्षात न आलेले द्यायलाही विसरु नकोस..

तुझी आवडी दे रे राम। दास म्हणे मज दे रे राम।।

इतके सगळे मिळाल्यावर अर्थातच माझा मी सुखावेल, त्याचे अहंकारात रुपांतर होईल..

आणि ही मी ची बाधा साऱ्याचा नाशाला आमंत्रण देईल, म्हणूनच या सगळ्या सोबत तुझी आवड माझ्यात सतत असू दे..

जे माझ्यात आहे, ते सारे तू आहे, त्याचा कर्ता करविता तू आहेस, ही जाणीव मला नेहमी असू दे..

समर्थांची ही आर्तता एक प्रकारची ऊर्जा त्यासोबत आत्यंतिक स्वस्थता देते..

साऱ्यात असूनही, कशातच नसण्याचे अलित्पतपण देते..

पुढचे लवकरच..

Wednesday, May 17, 2023

स्तोत्र पाठांतर

लहानपणी जबरदस्तीने आरत्या, गीतेचे श्लोक, मनाचे श्लोक, एक ना अनेक स्तोत्र म्हणायचे..

कधी शाळेत सांगितले म्हणून, आईबाबा सांगतात म्हणून, तर कधी पद्धत म्हणून..

नंतर अनेक वर्षे कोणीही, कशाचीच जबरदस्ती केली नाही..

पण दैनंदिन गोष्टीत त्रास झाला, वैताग आला किंवा नकारात्मक विचार येऊ लागले की खोलवर राहिलेल्या,निद्रिस्त वाटणाऱ्या या गोष्टी नव्याने जाग्या होतात..

चुकीच्या विचारांशी लढा देतात, आपल्याला पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीने विचार करायला भाग पाडतात..

अर्थात हा माझा अनुभव, सगळ्यांना यायला हवाच असे नाही..

आजच्या पिढीला काहीही करताना, त्यामागची कारणे हवी असतात, तीही तर्कशुद्ध (लॉजिकल)..

सांगितले म्हणून करावे, असे शिकलेली माझी पिढी अनेकदा यात कमी पडते, कारण जी कारणे विचारली नाहीत, प्रसंगाने अनुभवली ती सांगणार कशी..

ज्ञानेश्वर माऊली म्हणातत, एक तरी ओवी अनुभवावी..

करोना काळात स्तोत्र पठण, दीप प्रज्वलन, थाळी वादन एक ना अनेक गोष्टी सर्वांनीच केल्या..

त्याने करोना गेला..?

इतके अवैज्ञानिक विचार नक्कीच नाही..

त्यातून मानसिक ऊर्जा तयार झाली, तीने शरीराला अधिक सक्षम केले..

अनुभवाने हे ज्याचे त्याला सापडते, पण सार्थ गोष्टी जास्त परिणामकारक असतात, म्हणून आज एका आवडत्या रचनेचा मला भावलेला अर्थ मांडण्याचा प्रयत्न करणार आहे,

रचना स्वामी रामदासांची..

वैयक्तिक संसार न करता, विश्वाला आनंदी संसाराची गुरुकिल्ली देणारे, रामदास स्वामी मला नेहमीच प्रभावित करतात..

त्यांच्या अनेक रचनांपैकी करुणाष्टके ही त्यांनी स्वतःसाठी प्रभू रामरायाकडे केलेली आळवणी आहे..

त्यातला भाव करुण असला तरी त्यात दुःख, वेदना नसून, प्रचंड ऊर्जा आणि गोडवा आहे..

रचना मोठी असल्याने एकत्रित कंटाळवाणी होऊ नये म्हणून, तीन भागात ही मांडणी करणार आहे..

फक्त रचना..

पुढे वाचण्यासाठी..

https://abhigandhashali.blogspot.com/2023/05/blog-post_18.html 

Tuesday, May 04, 2021

येग येग रखुमाई..

गाणे मनातले     

भावर्थासह.. 

येग येग रखुमाई..

या आधी, ताण नावच्या बागुलबुवाला पळवून लावायला, 

मी माझा पहिला उपाय सांगितला..

स्वतःला शोधा... स्वतःवर प्रेम करा... तरच इतरांशी मैत्री जमेल..

आजूबाजूच्या गोष्टीमधल्या चांगल्या गोष्टी बघता येतील..

चला मग, आज पुढच्या उपायाकडे जाऊ या..

जसं आपलं मन दिसत नाही ना.. 

तसाच हा ताण, नावचा बागुलबुवाला दिसत नाही..

तुम्ही म्हणालं, हे बागुलबुवा, काय बरं सारखं सारखं..

तर बागुलबुवाची आणि आपली ओळख आपल्या लहानपणीची..

आपण हट्ट केला.. ऐकलं नाही की.. 

आई, बाबा, आजी, आजोबाच काय..

अगदी ताई, दादा सुद्धा याचे नाव घ्यायचे..

थोडक्यात सांगायचे तर सारी मोठी मंडळी, मिळून भीती दाखवायचे..

काय तर म्हणे, ऐकलं नाहीस ना, तर बागुलबुवा येईल, पकडून नेईल..

मग हळूहळू, मोठ होताना... 

अनुभव आले...  कळायला लागलं... 

असा कोणी बागुलबुवा, नसतोच मुळी... 

आणि तो काही कुठे, पळवून नेत नाही...

आपण स्वतःहून, आपल्या भीतीवर मात करायला शिकतो..

अर्थात एरवी घाबरवणारे, आपले सगळे असतात आपल्याबरोबर... 

कधी आधाराला.. तर कधी सोबतीला..

तसाच काहीसा हा ताणं आहे, म्हणून, मी त्याला बागुलबुवा म्हणते..

त्याला आधी शोधून दूर पळवावे लागते..

मग अशावेळी मी काय करते माहितीये..

मस्त मोठ्या आवाजात, माझी आवडती गाणी लावते..


 

आणि त्या बागुलबुवाला म्हणते, तू ही ऐक...

बघा हं, आपल्याला कोणी चिडवत असेल, त्रास देत असेल..

तर काय करतो आपण..?

तर त्याच्याकडे दुर्लक्ष.. 

मग त्रास देणाऱ्याला मजाच येत नाही..  

त्याला समजते, की आता इथे थांबून काही उपयोग नाही..

मग तो निघून जातो..

तसेच दुर्लक्ष करायचे, स्वतःला वेगळ्याच कामात गुंतवायचे..

आणि हाच सगळ्यात मस्त उपाय असतो..

तसे जमते, जेंव्हा मी गाणी ऐकत रहाते..



ताण नावाच्या बागुलबुवा कळते की..

मी त्याच्याकडे लक्ष देत नाहीये.. 

आधी तो त्रास द्यायचा अजून थोडा प्रयत्न करतो..


मग स्वतः चिडचिड करतो (गाणी ऐकतानाही डोकं दुखते, उदास वाटते)..

पण अंती त्याला काहीच महत्त्व नाही बघून.. 

आपले गाठोडं बांधून आल्या पावली, निघून जातो..

आवडती गाणी म्हणताना, मी गाणीही प्रसंगानुरुप लावते..

सुरुवातीला श्लोक, प्रार्थना... 

मग थोडी नकारातून, स्वीकार शिकवणारी.. 

मग आनंदाची, प्रेमाची, उत्साहाची..

आधीच अस्वस्थ असताना खूप धांगडधिंगा असणारी,अति कलकलाट होणारी, गाणी मी ऐकत नाही..

पण हे ज्याने, त्याने ठरवायचे की..

आपल्याला काय ऐकायचे आहे..

गाणी ऐकताना..

त्यातले संगीत नकळत माझ्या मनाला जोजवते..

शब्द बुद्धीला बजावतात.. 

पुन्हा एकदा परिस्थितीकडे बघ.. 

सगळंच कसं चुकीचे असेल.. 

काहीतरी तर चांगलेही असेल.. 

तुझे असेल, आनंदाचे असेल..

आणि असे, संगीत आणि शब्द हे दोन्ही, जेंव्हा हातात हात घालून, माझ्या मदतीला येतात ना.. 

बागुलबुवाला पळवायचे, माझे काम एकदम सोपे होते..

माझी आवडती गाणी तर खूप  आहेत.. 

पण त्यातले एक आज, तुमच्यासाठी..
तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालना...
एकल्या विठुरायाला हो संसार पेलना

ये ग.. ये ग.. रखुमाई, ये भक्तांच्या माहेरी...
सावलीच्या पावलांनी, विठूच्या गाभारी...!

ये ग.. ये ग.. रखुमाई ये भक्तांच्या माहेरी
सावलीच्या पावलांनी, विठूच्या गाभारी...!

रखुमाई, रखुमाई, रखुमाई, रखुमाई...!

तू सकलांची आई, साताजन्माची पुण्याई...
घेई पदरात आम्हावरी, छाया धर बाई...!

तुझी थोरवी महान, तीन्ही लोकी तुला मान...
देई वरदान होऊ तुझ्या पालखीचे भोई...!

रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई...!

तू कृपेचा कळस, आम्ही पायरीचे दास
तरी युगे-युगे उपेक्षाच, केली तुझी बाई

तू मायेचा सागर, आम्ही उपडी घागर
आता करू दे, जागर होऊ दे ग उतराई

रखुमाई, रखुमाई,  रखुमाई,  रखुमाई
रखुमाई, रखुमाई,  रखुमाई,  रखुमाई


आता यातल्या प्रत्येक ओळीचा अनुभव.... 

तेही मला भावलेल्या, सापडलेल्या शब्दात ...

हेच गाणं का... ? 



तर हे कधीही, कितीही वेळा ऐकले तरी..

प्रत्येक वेळी मला खूप भरुन येतं..

नंतर वाटते, निराश होण्याची ही वेळ नाही..

आणि गरज तर त्याहून नाही..

सगळा ताण, निराशा निघून जाऊन हलके हलके वाटते..

असे सारे वाटून, शांत-स्वस्थ वाटते.. 

मग हळूहळू वेगळ्या गोष्टी कराव्याशा वाटतात..

नवे विचार, नव्या कल्पना रुंजी घालू लागतात..

मी नव्याने माझी मलाच सापडते..

जास्त प्रस्तावना न करता..

गाण्याची एकेक ओळ मला सापडलेल्या भावार्थसह मांडते..

तुझ्याविना वैकुंठाचा, कारभार चालना..

तुझ्याविना म्हणताना एकटेपण दाटून आलेले जाणवते..

वैकुंठ तर परमेश्वराची, निर्गुण-निराकार शक्तीची, निवासाची जागा..

दुसरे नाव स्वर्ग,जी एक कवी कल्पना आहे.. 

देवांचे घर म्हणजे स्वर्ग आणि कर्मभूमी म्हणजे भूलोक..

तर असे हे, देवांचे घर.. 

ही जागा मायेची, प्रेमाची, आधाराची.. 

कामासाठी भूलोकी गेले, तरी जिथे परतून यायचे आहे अशी..

आपल्या संस्कृतीत, जेंव्हा ही निराकार शक्ती, आकार धारण करते..

तेंव्हा एक नाही, तर नानाविध रुपात प्रकटते.. 

किती..? तेहेतीस कोटी.. 

प्रत्येकाचे रुप वेगळे..

सौंदर्य वेगळे, गुण, शक्ती, ताकद, शस्त्रे  वेगवेगळी..

कारण ही तसेच, कारभार काही थोडा नाही.. 

अनंताची पोकळी, त्यात असणारे ग्रह-गोल.. 

त्यावरील पंचतत्वे, त्यांनी बनलेले सजीव-निर्जीव..

कमी का आहे, हा पसारा..? 

पण, हा सारा प्रपंच सांभाळताना, संसार करताना.. 

विश्वाचा गाडा ओढताना, त्या शक्तीही कधीतरी थकत असतीलच ना..

त्यांनाही विश्रांती हवी.. 

त्यासाठी हा वैकुंठ, स्वर्ग..

हेच किती सूचक आहे नाही..?

जिथे सगळ्या, तेहेतीस कोटी शक्ती एकत्र जमत असतील..

कधी आनंद-यश साजरे होत असेल..

तर कधी दुःख-अपयश पचवण्यासाठी, एकमेकांना आधार दिला जात असेल..

कर्मभूमी फुलवण्याची, सजवण्याची, सांभाळण्याची स्वप्ने बघितली जात असतील..

मग किती छान असेल ना, ते वैकुंठ..

तो स्वर्ग..

सुख, समृद्धी, शांती, स्वास्थ्य, जिद्द, उमेद, उत्साह आणि समाधान देणारे..

तेही चराचराच्या कल्याणासाठी..

इथे विश्रांतीनंतर साऱ्या शक्ती, पुन्हा नव्या जोमाने, कर्मभूमीत म्हणजेच भूलोकी येत असतील.. 

पण सध्या इथेच अस्वस्थता आहे.. 

का बरं इथला कारभार नीट चालत नाहीये..? 

जी शांतता इथे मिळायला हवी, ती मिळत नाहीये का.. ?

कदाचित कर्मभूमी जास्तच संकटात, प्रश्नात सापडली आहे का..?

एकल्या विठुरायाला हो, संसार पेलना..

एकल्या विठुरायाला म्हणताना..

तेहेतीस कोटीमधून हा विठोबाच का..?

तर हीच ती शक्ती, जी पुरुष रुपात प्रकटली असली तरी, नेहमी स्त्री रुपाचे मातृत्वाचे गुण घेऊन वावरली..

त्रिशक्तीमधल्या, विष्णु रुपाचा.. 

हा एक गोजिरवाणा, अतीव मायेने भारलेला अवतार..

ज्याची थोरवी, संत मंडळींनी आपल्या अभंगातून..

गीताकारातून आपल्या गीतातून नेहमीच गायली आहे..

हा गरीब-श्रीमंत, उच्च-नीच, जाती-धर्म या सगळ्यापलीकडे जाऊन, भक्तांसाठी, आपल्या लेकरांसाठी नेहमीच धावला आहे..

कधी नामदेवाच्या हट्टासाठी खीर खायला.. 

कधी जनाबाईचे दळण दळायला..

चोखाबांची गुरे हाकायला..

कुणाची वेणी, कुणाची धुणी.. 

सांगावे तितके कमीच...

मग, अजून एक कवी कल्पना.. 

विठोबा जेंव्हा हे सारं करतो, तेंव्हा त्याच्यासाठी राबणारी, रांधणारी, त्याची अर्धांगिनी रुक्मिणी एकटी पडते..

एकटी राहून मग ती कंटाळते, रागावते... 

आणि मग ती चक्क, रुसते त्याच्यावर..

आणि त्याला सोडून दुसरीकडे निघून जाते..

विठ्ठल बिचारा एकटा होतो.. 
     
आपल्या देवतांमध्ये, बहुतांश सगळे देव किंवा देवी यांची मंदिरे एकेकट्याचीच आहेत.. 

मला उगाच भाबडा प्रश्न पडतो.. 

त्यांना तिथे एकटे वाटत नसेल का..?

एकमेकांची साथ असावी, असे वाटत नसेल का..? 

आठवण येत नसेल,असे वाटल्यावर..?

या ओळीत मला विठोबा-रखुमाई हे पती पत्नी वाटतच नाहीत..

खरे म्हणजे, त्यांच्यात कोणते नाते पाहवेसेही वाटत नाही..

ऐकू येते ती फक्त हाक.. 

आर्त विनवणी.. 

आईला, मातेला बोलवण्याची..

तिला बोलावताना, सोबत सगळ्या शक्तींना, घेऊन यायची विनंतीही त्यात आहे..

पण का बरं, यायला हवे आहे, सगळ्यांनी एकत्र..?

कारण, प्रश्न-समस्या, त्रास खूप वाढत आहे..

त्यावर एकेकाने उपाय करुन फायदा होत नाहीये..

म्हणून सगळे एकत्र या.. एकटेच लढू नका..

यातला एकटेपणा.. (गाण्यातील शब्दात) 

तुझ्याविना म्हणताना, तो तीव्रतेने जाणवतो...

विठोबाला एकटेपणाने उद्विग्नता आलेली आहे, दाटून आले आहे..

असे त्याला नाही तर, आम्हा भक्तांना वाटत आहे..

तू रुसून गेल्यामुळे, विठोबा एकटाच लढतो आहे..

माते रखुमाई तू तर येच, पण सोबत इतर शक्तींनाही घेऊन ये.. 

सगळे एकत्र याल.. 

तेंव्हा सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटतील, चिंता दूर होतील.. 

आणि मग विजयाचे, यशाचे आनंदोत्सव साजरे होतील..

ही आमची श्रद्धा आहे, हाच  विश्वास आहे, आणि त्यासाठी हे आमंत्रण...

ये ग.. ये ग.. रखुमाई,  

एका दिव्य शक्तीसाठी, दुसऱ्या तितक्याच दिव्य (ना कमी, ना जास्त) शक्तीला केलेले बोलावणे..

तेही कोणी माहितीये..?

तर, या साऱ्या शक्तींवर प्रचंड श्रद्धा, विश्वास, प्रेम, माया असलेल्या भक्तांनी.. 

त्या शक्तींच्या, लेकरांनी हा मनापासून केलला आर्जव आहे..

का माहितीये..? 

कारण एकटेपणाला मोठी करणारी, आपली संस्कृतीत नाही..

तेहतीस कोटी देवता, यातही मला... 

सत्कार्याला अनेकांची साथ लागते हाच विचार दिसतो..


ये भक्तांच्या माहेरी म्हणताना..

माहेर म्हणजे, अतीव प्रेमाचा झरा..

अशी जागा जिथे, कितीही मोठे झालो तरी, पुन्हा बालपण अनुभवता येते..

आईबाबांकडे हट्ट करता येतो..

रुसून बसता येत, मनमोकळ्या गप्पा रंगतात..

दुःख,त्रास यावर मायेची फुंकर घातली जाते..

हे सगळे कोणासाठी..?

तर आम्हा भक्त मंडळींसाठी..

इथले आईबाबा, म्हणजे तू आणि आमचा विठुराया..

आमचा बाप विठोबा, साऱ्या शक्ती, युक्तीनिशी सगळ्या परिस्थितीशी दोन हात करतोच आहे..


पण तरी, तुझी उणीव आम्हाला जाणवते आहे, सतावते आहे..

सावलीच्या पावलांनी, 

सावलीच्या पावलांनी म्हणताना, एकदम गौरी-गणपतीच्या दिवसांची आठवण होते..

न कळत्या वयापासून आई-आजी-काकू यांच्यासोबत, गौर घरात आणताना.. 

घरभर काढलेली देवीची पावले..

माप ओलांडून घरात आणताना.. 

प्रत्येक पावलावर काही सेकंद गौर  ठेवून.. 

म्हणायचे, “गौराई आली”  “कशाच्या पावलाने..?” 

“सोन्या-रुप्याच्या पावलांनी, सुखाच्या पावलांनी, समृद्धीच्या पावलांनी, मातृत्वाच्या पावलांनी...” 

तसाच, अजून एक श्लोकही आठवतो... 

या देवी सर्व भूतेषु, लक्ष्मीरुपेण संस्थिता.. 

नवरात्रात देवीचे आवाहन, तेही वेगवेगळ्या रुपात..

हे देवी, तू या भू लोकात लक्ष्मी, सरस्वती, बुद्धीरुपात ये... 

शांती, विद्या, शक्ती, मातृरुप, भगिनी, सखी रुपात ये..

विविध रुपात ये आणि या सगळ्या चराचरात तू आणि तूच भरुन रहा..

तुझी शक्ती,माया,ममता, आम्हा लेकरांवर अशीच अखंड राहू दे..

संकटाना सामोरे जाण्यासाठी, धैर्य दे..

तुझ्या शक्तीरुपी, पावलांच्या स्पर्शाने.. 

आमच्या विश्रांतीसाठी हक्काची जागा तयार होऊ दे..

समस्यांना तोंड देताना थकलो, तर ती छाया आमचे सारे श्रम क्षणात दूर होऊ दे..

या साऱ्यासाठी तू ये,आम्ही तुझी आतुरतेने वाट बघत आहोत..

विठूच्या गाभारी...

बरं, ये म्हणताना, हेही सांगणे आहेच की...

तुला विठुच्या गाभारी यायचे आहे..

थोडक्यात जे तुझेच आहे, प्रेमाचे, मायेचे आहे.. 

तिथेच आम्ही तुला बोलवत आहोत..

जिथे तुझी काजळी घ्यायला, आमचा, तुझा..

अगं, आपल्या साऱ्यांचा विठुराया आहेच ना.. 

तो घेतोच आहे सगळ्यांची काळजी.. 

पण तू त्याच्यासाठी ये, त्याच्या साथीला ये, त्याच्या सहाय्याला ये..

रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई..

पुन्हा एकदा, ही आहे फक्त आणि फक्त.. 

आर्त विनवणी.. 

तीही करत आहेत, तुझी विठूची...

आम्ही भक्तमंडळी, लेकरे तेही अगदी मनापासून..

तू सकलांची आई, 

तुझी स्थापना आम्ही केली आहे, तीच मुळी या साऱ्या चराचराची माता, जननी म्हणून..

तुझ्या मातृत्वामुळेच तर, सृष्टीची निर्मिती झाली आहे..

तुझे प्रेम, माया आम्हाला हवी आहे..

कौसल्या म्हणून हवी आहेस, तशीच कैकयी म्हणूनही हवी आहेस..

देवकी बनून, गरज म्हणून कृष्णाला स्वतःपासून दूर करुन यशोदेकडे सोपवणारी तू..

आणि यशोदा बनून स्वप्राणापलीकडे जपणारीही तूच..

कुंती, गांधारी पासून ते राणी लक्ष्मीबाई, जिजाऊ, हिरकणी ही तूच..

प्रत्येक रुपाला, अवताराला काहीतरी अर्थ आहे.. 

त्यातून नेहमीच एक शिकवण देण्याचा प्रयत्न तू केला आहेस..

तुझे आईपण हे फक्त रुप नाही, तर तो एक विचार, संस्कार आहे..

म्हणूनच साऱ्या विश्व कल्याणाचे दान मागणाऱ्या ज्ञानोबांना आम्ही माऊलीच म्हणतो..

साताजन्माची पुण्याई.. 

आजपर्यंत तू जेंव्हा जेंव्हा, कोण ते ना कोणते रुप घेऊन प्रकटलीस.. 

त्यावेळी अनेकांनी, आपली सारी शक्ती पणाला लावली होती..

मनापासून तुझे आवाहन केले होते..

यज्ञ-याग, पूजा करुन तुला बोलावले होते... 

प्रार्थना केली होती..

साहजिकच त्यांची हाक ऐकून, तू प्रत्येकवेळी धावून आली  होतीस..

आज पुन्हा एकदा, या भूतलावरील सारे पुण्यवंत.. 

आपले सत्कर्म तुला अर्पण करत आहेत..

आणि मनापासून आळवणी करत आहेत, की तू पुन्हा नवा अवतार घे..

घेई पदरात, आम्हावरी छाया धर बाई..

आईचा पदर ही तिच्या लेकराच्या हक्काची मालमत्ता..

ओला हात-तोंड पुसण्यासाठी.. 

अंगावर पांघरुण, म्हणून घेण्यासाठी..

खेळताना हळूच येऊन लपण्यासाठी..

भीती वाटल्यास, आधारासाठी..

कुणी रागवत असेल, तर आडोसा म्हणून वापरण्यासाठी..

हे सगळ करायला आम्ही आसुसले आहोत.. 

तू ये, स्वतः आम्हाला, त्या पदराची छाया दे .. 

आधार दे, ती ऊब दे.. 

तुझी थोरवी महान, 
तिन्ही लोकी तुला मान... 

तुझी थोरवी.. गुण.. कर्तुत्व..

प्रत्येक रुप वेगळा अर्थ, विचारही प्रचंड मोठा, महान आहे..

आणि म्हणूनच फक्त आमच्या भूतलावरच नाही..

तर आकाश म्हणजेच स्वर्ग, देवांचे घर आणि पाताळ दानवांचे निवासस्थान..

अशा तीन्ही लोकांत तुला मान आहे...

पण हे म्हणून, आता थांबून चालणार नाही.. 


देई वरदान, होऊ तुझ्या, पालखीचे भोई...

तर तुझ्या या कामाचा, विचारांचा वारसा आम्ही पुढे चालवावा..

असे वरदान, आशीर्वाद आता तू आम्हाला दे..

तू एक वेगळी शक्ती म्हणून जन्म घेण्याऐवजी..

आमच्या प्रत्येकाच्या देहामध्ये सूक्ष्मरुपात राहायला ये..असे झाल्यास.. 

आमचा देह, तू विराजमान झालेली पालखी होईल..

आणि आम्ही ती आनंदाने, अभिमानाने उचलणारे भोई..

मग, तुझ्या सर्व चांगल्या गोष्टी, विचार आमच्या कृतीतून पाझरतील.. 

अन् नकळत सर्व समस्या, प्रश्न, चिंता दूर होतील.. 

आपल्या विठुरायाला सहकार्य लाभेल..

रखुमाई रखुमाई रखुमाई रखुमाई

पुन्हा एकदा, ही आहे फक्त आणि फक्त आर्त विनवणी..

तीही करत आहेत.. तुझी, विठूची..

आम्ही भक्तमंडळी, लेकरे..

तेही अगदी मनापासून..

तू कृपेचा कळस, आम्ही पायरीचे दास.. 
तरी युगे-युगे उपेक्षाच, केली तुझी बाई..
तू मायेचा सागर, आम्ही उपडी घागर.. 

युगे अठ्ठावीस, विटेवरी उभा, वामांगी रुखुमाई, दिसे दिव्य शोभा.. 

अशी आरती आम्ही, टाळ-घंटा वाजवत अगदी मनोभावे करतो..

पण इतकी युगं लोटली तरी, त्याच चुका, पुन्हा रोज नव्याने करतो..

तुझी उपेक्षाच आमच्याकडून होत असते..

पण तू काय किंवा विठुराया काय.. 

अपार माया, प्रेमाचा सागर..

कधी समजावता, कधी रागे भरता... 

लहान-सहान गोष्टीतून शिक्षाही करुन बघता..

जसं कधी खूप पाऊस पडतो, तर ठणठण गोपाळ..

कधी खूप ऊन, तर कधी सूर्य दर्शनच नाही..

यातून तुम्ही, काहीतरी सूचवत असता, सांगत असता..

पण आम्ही, खट्याळ बाळाप्रमाणे त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करतो..

कळतं सगळं, पण कृतीत वळतच नाही.. 

उमजलं बुद्धीला, मन अजिबात करत नाही..

तरी, तुम्ही दरवेळी जाऊ दे, आपलेच लेकरु म्हणून माफ करता, सुधारणा करायला नवी संधी देता..

आम्ही मात्र उपडी, पालथी करुन ठेवलेल्या घागरीसारखे वागतो.. 

आता करु दे जागर, होऊ दे ग उतराई..

पण आता आम्हाला, आमुची चूक लक्षात येत आहे.. 

आणि ती सुधारायला आता आम्ही सज्ज झालो आहोत..

करु दे जागर म्हणताना, आम्ही चांगल्या कृती करण्याचे वचन तुला देतो..

तुझ्या, म्हणजेच निराकार शक्तींच्या, सर्व रचनांचा आदर करु हे विश्वासाने सांगतो..

ज्या सृष्टीचा आम्ही एक अंश आहोत, तिचा सांभाळ करण्याची जबाबदारी घेतो..

हे सगळे आमच्याकडून होऊ दे..

हाच आशीर्वाद, आज आम्हाला दे.. 

त्यासाठी ये, तुझ्या शक्तीचे वारस होऊन, त्या सत्कार्याची धुरा सांभाळून, उतराई होण्याची संधी पुन्हा एकदा दे..

रखुमाई, रखुमाई, रखुमाई, रखुमाई..
रखुमाई, रखुमाई, रखुमाई, रखुमाई..

पुन्हा एकदा.. तीच हाक.. 

तीच आर्त विनवणी..

तेही अगदी मनापासून.. 

तुझी, विठूची, आम्ही भक्तमंडळी, तुमची लेकरे..

आई.., तूच सकलांची, माय-माऊली, तूच जननी, जन्मदात्री..

तू येना, धावत ये, साऱ्या शक्तींना सोबत घेऊन ये...   

विठुरायाच्या मदतीला ये..

आमच्या संरक्षणाला ये..

समृद्धीसाठी ये..

सामर्थ्यासाठी ये..

उन्मत्त कलीला वेसण घालायला ये..

संकट, समस्या, काळजी दूर करायला ये.. 

साऱ्या चराचरात भरुन जायला ये..

पुन्हा एकदा, हा भूलोक, सुजलाम सुफलाम करायला ये..

ये गं आई.. ये ना गं बाई.. ये, वेगे आता..


रखुमाई.. रखुमाई.. रखुमाई..
रखुमाई, रखुमाई.. रखुमाई ...!
अशीच अजून काही गाणी... त्यांच्या youtube link


https://www.youtube.com/watch?v=RDfVJZ7PqEg  -  प्रिये ये निघोनी ....

https://www.youtube.com/watch?v=W03a-8eFHdQ - टूटा टूटा एक परिंदा ....


https://www.youtube.com/watch?v=eEeX2QMlSlo - युंही चला चल राही ...

https://www.youtube.com/watch?v=w9GPUKjGrkY  - मी हजार चिंतांनी हे ...

https://www.youtube.com/watch?v=69pPYkGiEAQ - किसी के मुस्काराहटो पें...

https://www.youtube.com/watch?v=XeDp1oz1u4s - तू तेंव्हा तशी

https://www.youtube.com/watch?v=vzlXfZlH5dk - मै कोई ऐसा गीत गाऊं


***********************************************