मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो, तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो || धृ ||
याच्या शब्दा शब्दात दाटलेली सकारात्मकता, प्रचंड आकर्षित करते..
यात रोजचा झगडा आणि सोबतच त्याची उत्तरे आहेत..
कमालीचे वास्तव आहे, पण तितकीच भक्तीसुद्धा आहे..
एकाच वेळेला विज्ञान प्रमाण मानण्याची ताकद आहे, तर त्यासोबत निर्मळ आणि डोळस श्रध्दा आहे ..
कसे ते समजण्यासाठी, यातली फक्त शेवटची दोन कडवी सार्थ मांडायचा प्रयत्न करते..
धृपदात, ही कविता असे सांगते की..
आपल्या प्रत्येकाच्या अंतरंगात, दोन अस्तित्वे जगत असतात..
एक निखळ, निर्मळ, आनंदी, सहज बदल स्वीकारणारे, सगळ्या गोष्टींना उत्साहाने बघणारे..
तर दुसरे नेहमी दुःखी, वैतागलेले, सतत इतरांना नावे ठेवणारे, बदल लादले तरीसुद्धा न मानणारे..
आता ही दोन अस्तित्वे जेंव्हा देव, ईश्वर, शक्ती यावर एकमेकांसमोर झगडा करतात, तेंव्हा काय होते, यावर कवी पुढील कडवे लिहितो..
मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली, नवसांची ठेवून लाच लावतो बोली,
माझ्यातले वैताग, त्रागा करणारे अस्तित्व, स्वतःला आस्तिक म्हणवते,
पण मुळात त्याचे आस्तिक असणे, मोजमाप करण्यात अडकले आहे..
इतकी भक्ती केली तर असे व्हायला हवे , इतका जप केला असे फळ, असे दान केले तर ही फलश्रुती..
ही पूजा केली, तो नवस केला.. साऱ्या अनावश्यक नोंद ठेवण्याची धडपड..
बरं, हे सारे करताना, कर्म चांगले ठेवावे लागते याची आठवण आहे का..?
तर तो विचार, तर जणू माहितीच नाही, असा तोरा..
शिवाय सतत देवाला माझी चिंता नाही, मलाच सगळे प्रश्न, दुःख असा अनाठायी ओरडा, आवेश..
तरीही, प्रश्न, दुःख मात्र देवानेच सोडवायचे..
हवे तर, मी त्यासाठी अजून वेगवेगळी व्रत, उपास, इतर अनेक गोष्टी करेन, असा खुळा हट्ट..
तर दुसरीकडे..
तो मुळात येतो इच्छा अर्पून सार्या, अन् धन्यवाद देवाचे घेवून जातो..
दुसरे निखळ, सश्रद्ध अस्तित्व, स्वतःला ना आस्तिक म्हणते, ना नास्तिक..
ते फक्त, आहे त्या साऱ्याचा स्वीकार करुन गीतासार जगते,
प्रश्न-दुःख असो वा उत्तर-सुख सगळे देणाराही तोच आणि भोगणाराही तोच..
जो आत्मा, तोच परमात्मा, मग चिंता का आणि कशाची असावी..
जे महत्वाचे वाटते, ते शरीर हे माध्यम आहे, याची पूर्ण जाणीव त्याला असल्याने, तो मुळातच निरिच्छ आहे..
आणि त्यामुळेच देव, त्याचे जास्त मनापासून स्वागत करतो, इतकेच नाही, तर इतर हट्टी लेकरांना जास्त वेळ देता येईल, म्हणून त्याला धन्यवाद देतो..
इथे ग.दी. माडगूळकरांनी मांडलेली रचना, ' कानडा राजा पंढरीचा ' ही राहून राहून आठवते..
स्वतः पलीकडे ज्याने देवत्व स्वीकारले आहे, त्याच्यासाठी ती निर्गुण, निराकार शक्ती, सस्वरुप धारण करते..
इतकेच नाही तर..
युगानुयुगे हात कटीवर ठेवून विटेवर उभी राहते, भक्तांचे हट्ट पुरवते, त्यांची सेवा स्वीकारते, त्यांची कामे करते, जिथे नजर जाईल, तिथे तिथे प्रचिती देत राहते..
फक्त हे सगळे अनुभव घेण्याची मनापासून तयारी हवी, आणि आपल्या दोन अस्तित्वांपैकी चांगल्याची निवड करता यायला हवी..
कवी संदीप खरे शेवटच्या कडव्यात म्हणतात..
माझे त्रासलेले अस्तित्व कसे आहे, तर असे..
मज अध्यात्माचा रोज नवा शृंगार, लपतो न परि चेहरा आत भेसूर,
माझे अध्यात्म सोयीने बदलत राहते, कधी देव बदलतो, तर कधी पूजेची पद्धत, दरवेळी मी त्याला वेगवेगळी नावे देतो..
आणि माझ्या या साऱ्या कर्मकांडाला, कोणत्या ना कोणत्या दाखल्यांशी बांधून ठेवतो..
हे केले, मग हे व्हायला पाहिजे, मला प्रचिती मिळालीच पाहिजे..
नाहीतर..
हे सगळे खोटे आहे, थोतांड आहे, असा बोभाटा करायला, ना भीती वाटते, ना काळजी.. हीच ती भेसूरता
पण दुसरीकडे मात्र..
तो फक्त ओढतो शाल नभाची तरीही, त्या शाम निळ्याच्या मोरपीसा परि दिसतो
सदैव आनंदी असणारे, निखळ अस्तित्व असे असते..
कोणतीही गोष्टी ते इतक्या सहज स्वीकारते, की मला त्याच्यातच परमेश्वराचा अंश दिसतो..
मीच आत्मा नि मीच परमात्मा, ही प्रचिती मला क्षणोक्षणी मिळत रहाते..
जेंव्हा जेंव्हा मी, अशी दोन अस्तित्वे घेऊन, रोज नव्या दिवसाला, नव्या परिस्थितीला, नव्या आव्हानांना सामोरे जाते,
तेंव्हा तेंव्हा ही कविता मला, माझ्यातले निखळ, निर्मळ, आनंदी अस्तित्व निवडण्याची प्रेरणा देते..
म्हणून ती माझ्या अत्यंत जवळची, प्रेमाची आहे..
ज्ञानोबा माऊली म्हणतात, एक तरी ओवी अनुभवावी..
मला हे काव्य एका निर्मळ ओवीसारखे वाटते..
रोजचे क्षण अनुभवताना, नव्याने घडण्याची, जगण्याची, भक्कम उभे राहण्याची ताकद देते..
अशीच ताकद, प्रेरणा, आनंद तुम्हाला, प्रत्येक गोष्टीत लाभो, हीच शुभेच्छा..!
संपूर्ण कविता संदर्भासाठी...
मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो, तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो || धृ ||
मी जुनाट दारापरी किरकिरा बंदी, तो सताड उघड्या खिडकीपरी स्वछंदी,
मी बिजागरीशी जीव गंजवीत बसतो, तो लंघुन चौकट पार निघाया बघतो..||
डोळ्यात माझीया सुर्याहुनी संताप, दिसतात त्वचेवर राप उन्हाचे शाप,
तो त्याच उन्हाचे झगझगीत लखलखते,घडवून दागिने सुर्यफुलांपरी झुलतो..||
मी पायी रुतल्या काचांवरती चिडतो, तो त्याच घेऊनी नक्षी मांडून बसतो,
मी डाव रडीचा खात जिंकतो अंती, तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनने हरतो.
मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली, नवसांची ठेवून लाच लावतो बोली,
तो मुळात येतो इच्छा अर्पून सार्या, अन् धन्यवाद देवाचे घेवून जातो..||
मज अध्यात्माचा रोज नवा शृंगार, लपतो न परि चेहरा आत भेसूर,
तो फक्त ओढतो शाल नभाची तरीही,
त्या शाम निळ्याच्या मोरपीसापरि दिसतो... कवी - संदीप खरे

No comments:
Post a Comment
suggestions most wlcome