सध्या आखाड (आषाढ) महिना सुरु आहे..
हा पूर्ण आषाढ महिना नववधूने सासू-सासऱ्यांचे तोंड बघू नये, माहेरी जावे अशी पद्धत असते..
आज धावपळीच्या दिनक्रमात रीत म्हणून नववधू एखादा दिवस माहेरी जाते..
या पद्धतींच्या निमित्ताने मराठी भाषेत अनेक म्हणी, शब्दप्रयोग समाविष्ट झाले आहेत..
त्यातले काही ससंदर्भ मांडण्याचा प्रयत्न करते..
आषाढ सासरा
पूर्वी ही आषाढ प्रथा सांभाळताना जेंव्हा सूनबाई, पूर्ण महिना माहेरी जात असे..
तेंव्हा तिचे सासरे ज्याप्रमाणे तिच्याशी वागत, तसे कोणी माहेरी भेटले, तर सूनबाई नकळत त्यांना आषाढ सासरा हाक मारत असे..
कारण शरीराने व्यक्ती वेगळी असली, तरी विचार, सवयी तशाच..
मग जिचा सासरा प्रेमळ असे, स्वतःच्या मुलीप्रमाणे तिचा सांभाळ करे, तसाच अनुभव देणारा पुरुष तिच्यासाठी आषाढ सासरा होई..
तर दुसरीकडे जिचा सासरा विनाकारण त्रास देणारा, हे असेच हवे, ते नको अशा अनावश्क सांगणारा असे, तशी व्यक्ती दिसली की सूनबाई त्यांना आषाढ सासरा हाक देई..
आता दुसरी म्हण..
खरी सासू धरते कान, तर आखाड सासू मागते मान..
इथे खरी सासू ही आईप्रमाणे असल्याने, ती गरजेनुसार चुका दाखवणारी, पण मनातून माया असणारी अशी अपेक्षित आहे..
तर आषाढ सासू म्हणजे सतत मानपानाची अपेक्षा ठेवून, दुसऱ्यावर विनाकारण हुकूमत गाजविणारी असते असे म्हटले आहे..
वरील दोन्हींमध्ये सुचवायचे हेच की, नववधू ही सासर माहेर दोन्ही कुटुंब व्यवस्थेचा मुख्य घटक आहे..
तीच दोन घरांना जोडणार आहे, दोघांचे नाव लावणाऱ्या बाळांची ती जन्मदात्री होणार आहे..
तीला जपणे, तिचा सन्मान करणे ही सासर-माहेर दोघांची समसमान जबाबदारी आहे..
तसे झाले तरच, ती उत्तम समाज निर्माण करेल, कुळाला योग्य उत्तराधिकारी देऊ शकेल, त्यांचे संगोपन करु शकेल..
तिच्या स्त्रीत्वाचा, मातृत्वाचा मान सन्मान कराल, तरच उज्वल भविष्य उदयास येईल..
आता इथे एक प्रश्न येतो की,
जर वेद अभ्यास सांगतो की, आपली संस्कृती अर्धनारी नटेश्वर पूजनीय असणारी, स्त्री पुरुष समानता मानणारी होती..
मग त्यात हे सण, साजरे करण्याच्या या प्रथा परंपरा का आहेत, याची सुरुवात कोणी, केंव्हा केली असेल..?
तर त्यावर केलेले वाचन, सांगोपांगोच्या कानगोष्टी यातून असलेली माहिती, याद्वारे असे वाटते की..
फार फार पूर्वीच्या काळात,
(हा काळ कदाचित पारतंत्र्य पूर्व असेल..)
लग्न बाळ पाळण्यात असतानाच होत असे, नंतर मुलगी वयात आल्यावर सासरी जात असे..
वय लहान असल्यामुळे, फक्त सासूसासरेच नाही (नवऱ्याची आई वडील), तर घरातील अनेक मंडळी सूनबाईंच्या आई वडिलांची, भाऊ बहिणींची जागा नकळत घेत असतं..
सगळे मिळून त्या छोट्या नववधूला नव्या घरात, संसारात, नव्या माणसात अधिक सहज आपलेसे करत..
पण मधल्या कोणत्या तरी काळात,
अनेक परकीय आक्रमणे झाली..
वंश परंपरेचा प्रमुख घटक असणाऱ्या स्त्रीला सांभाळण्यासाठी, जपण्यासाठी चार भिंतींच्या आत संरक्षण दिले गेले..
आणि याचाच काही समाजकंटकांनी गैरफायदा करुन घेतला..
ज्यातून चुकीच्या समाज बंधनांनी जन्म घेतला..
स्त्रीत्वाचा सन्मान करणारी, आमची मातृसत्ताक संस्कृती, कुठेतरी मागे पडली..
अहंकारी पुरुषप्रधान विचारधारेने जन्म घेतला..
स्त्री.. माता.. जी उद्याच्या पिढीची जननी होती, समाज घडवणारी, कुटुंबाला एक हाती सांभाळणारी होती, तीच घरात बंदिस्त झाली..
तीचे शिक्षण, स्वातंत्र्य, स्वाभिमान सगळ्याचे खच्चीकरण सुरु झाले..
तिला समाज, रुढी, परंपरा यांच्या जाचक कडी-कुलूपात कोंडले गेले..
(अर्थात त्याही काळात सासरी-माहेरी या सूनबाईला सांभाळणारी, जपणारी अनेक नातेवाईक मंडळी होती, हे विसरुन चालणार नाही)
स्त्रीचे माहेर, समाज तोडला होता, अत्याचार मानहानी याने तिची ससेहोलपट सुरु होती..
यात फक्त पुरुष सहभागी होते असे नाही, तर घर, कुटुंब यांवर सत्ता हवी असणारी सासू, आजेसासू, मोठी जाऊ, नणंद याही तितक्याच वाटेकरी होत्या..
यासोबतच अनेकदा माहेरीसुद्धा परक्याचे धन म्हणून बघितले जाई, जाच, अत्याचार, बंधने याने तिचे स्वत्व हरवून गेले होते..
कदाचित यावर उपाय म्हणून सामाजिक परिवर्तन गरजेचे झाले..
मग त्या काळातील समंजस, विचारी आणि समाजसुधारक मंडळींनी आपले सारे सण विचारपूर्वक पुन्हा नव्याने मांडले..
(यांची नावे आज उपलब्ध नाहीत..)
पण त्यांनी परिस्थितीला तोंड देण्यासाठी, प्रत्येक सण पुरुषी अहंकाराला खतपाणी घालणारे बनवले..
व्रत करायचे स्त्रीने, पण फलप्राप्ती मिळणार पुरुषांना..
जसे वटसावित्री, हरतालिका पती दीर्घायुषी होण्यासाठी..
आषाढ सासू-सासऱ्यांसाठी..
नागपंचमी, रक्षाबंधन बंधू राजांसाठी..असे एक ना अनेक..
एकूणच देव, दैव याची सतत भीती वाटणाऱ्या समाजाने, हे सण व त्यासोबत आलेली नवीन पद्धती याचा सहज स्वीकार केला..
बंधनात अडकलेली आमची माता, या सण समारंभांच्या निमित्ताने घराबाहेर पडे, समाजात मोकळेपणाने जाऊ लागली, तीला माहेरी जाण्याची संधी मिळू लागली..
मग तिच्यावर होणारे अत्याचार, तिची व्यथा, ती असा म्हणींचा आधार घेत सांगू लागली..
अर्थात त्यातूनच मग माहेर आणि सासरच्या अनेकांना तिचे प्रश्न, व्यथा कळू लागल्या, तिला आवश्यक मदत मिळू लागली..
खेदाने सांगावेसे वाटते की, अजूनही ही परिस्थिती पूर्णतः बदलली नाही..
आजही अनेक कुटुंबात स्त्री बंधन, अत्याचार, व्यभिचार, मानहानी यांनी जखडलेली आहे..
त्यावर तर काम व्हायलाच हवे..
पण त्यासोबतच, भाषेचा अलंकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या म्हणी सांभाळल्या पाहिजे..
कारण मराठी भाषेत अशा अनेक म्हणी आहेत, ज्याआधारे इतिहास, शब्दव्युप्ती यावर संशोधन करता येईल..
म्हणूनच अशा प्रथांच्या निमित्ताने त्याबद्दल असलेली माहिती इतरांना करुन देण्याचा प्रयत्न व्हायला हवा..
तसेच या म्हणींमधील गर्भितार्थ लक्षात घेण्याची, शोधण्याचीही गरज आहे..
तरच या म्हणी टिकतील, व काही नव्याने तयार होतील, भाषेत लीलया वापरल्या जातील..
अभ्यासक्रमात म्हणी नुसत्या पाठ करुन, त्या नव्या पिढीत रुजणार नाहीत..
न जाणो, काही दशकांनंतर म्हणी हा शब्दही काळाआड लुप्त होईल..
असे होऊ नये असे मनापासून वाटले म्हणूनच...
आषाढ महिन्यात आलेल्या या भाषा अलंकारांची मांडणी करण्याचा छोटासा प्रयत्न केला..
यावर अधिक माहिती असल्यास समजून घ्यायला नक्की आवडेल..
प्रतिसाद व अधिक माहितीच्या प्रतिक्षेत आहे..
No comments:
Post a Comment
suggestions most wlcome