Tuesday, July 18, 2023

ध्यास

 


मराठी काल गणनेनुसार आजपासून अधिक मास सुरु झाला आहे, यास पुरुषोत्तम मास असेही म्हणतात..

याविषयी कोणाला काही विशेष माहिती असेल तर जरुर पाठवा, आपली संस्कृती, परंपरा याविषयी माहिती मिळवत रहायला फार आवडते..

रोज सकाळी प्रतिज्ञा म्हणताना, विविधतेने नटलेल्या परंपरांचा अभिमान व एकमेकांविषयी आदर, स्वातंत्र्य याची जाणीव संविधान करुन देत असते..

पण आपले सण त्याचा शब्दशः अनुभव देतात..

सकाळी जागृती मिस, रजनी मिस यांच्यासोबत बोलताना त्यांच्याकडच्या गणनेत थोडा फरक, चाली रीतीत फरक जाणवला पण उद्देश व हेतू एकच (मूळ विचार, पाया भक्कम) चांगले वागणे, दान करणे, नियम पाळणे..

माझ्याजवळ फार माहिती नाही पण इतकेच आहे, की चंद्र आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरत सूर्याभोवती फिरत असतात त्यावरुन हे गणन ठरते, अमावस्या - पौर्णिमा संबंधित दोन पक्ष (१५-१५ दिवस) यानुसार मराठी महिने ३० दिवसांचे असतात, त्यातील काही फरकामुळे हा अधिक मास दर तीन वर्षांनी येतो..

 

यामुळेच त्याला विशेष महत्त्व आहे..

या महिन्यात जाणीवपूर्वक उपवास, दान, पाठांतर, वाचन, प्रवास करतात..

त्यामागील कालानुरुप विचार कोणतीही गोष्ट रोज केल्यास त्याचे हळूहळू सवयीत रुपांतर होते..

गणित आणि मानसशास्त्र यांनी चाचण्यांच्या आधारे सिद्ध केलेला विचार असा आहे की २१ दिवस नियमित केलेली गोष्ट सवय बनते..

तीन वर्षांनी आशीर्वाद रूपात देणारा हा अधिकमास उत्तम सवयी स्वतःमध्ये रुजवण्यासाठी चांगला मानला जातो म्हणूनच या काळात ठरवून काहीतरी नवीन करायचे असते..

एकदा का ती आपली सवय बनली की तीन वर्ष त्यावर सातत्याने काम करून त्यात पारंगत व्हायचे असते..

पुन्हा तीन वर्षांनी येणाऱ्या अधिकमासात नवीन नियम करायचा असतो..

असाच एक नियम आजपासून सुरु केला आहे, व त्यावर सातत्य टिकवण्यासाठी सर्वांचे आशीर्वाद व शुभेच्छा मिळाव्या, म्हणून हे लेखन केले आहे..

नियम आहे, शिक्षण क्षेत्रात काम करताना, स्वतःच्या आणि विद्यार्थांच्या वाढीसाठी केलेले वेगवेगळे प्रयोग, उपक्रम शब्दबद्ध करणे..

लेखन ही माझी आवड असली तरी त्याचा फायदा इतरांना झाला नाही तर ते हळूहळू स्वार्थी होत जाईल..

माझ्या या लेखनामुळे इतरांना प्रेरणा मिळून त्यांनीही असे लेखन सुरु करावे ही एक इच्छा आहेच.. 

कारण माझ्यापेक्षाही अधिक अनुभव आणि उपक्रमशील असणारे अनेक जण आता हे वाचत आहेत..

पुरुषोत्तम मास त्या साऱ्यांना आशीर्वाद देवो, आणि


लावियेला दीप तो हा तेवता ठेवू चला..,

बालकांच्या उन्नतीचा मार्ग हा चालू चला..


ही प्रार्थना सार्थ होवो, हेच दिवास्वप्न..


माझे लेखन फारच रंगीबेरंगी आहे, कथा, कविता, प्रवासवर्णन, अनुभव लेखन इ. अनेक प्रकार हाताळून बघितले आहेत, स्वान्त सुखात असल्याने त्याची योग्यायोग्यता तपासली नाही..


आज शैक्षणिक प्रयोग हा विषय निवडला कारण अनेकदा याची गरज वाटत नाही, उपयुक्तता लक्षात येत नाही..


आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे..


आपल्या साऱ्यांवर परमेश्वराचे अतिशय प्रेम आहे म्हणून आज आपण शिक्षण क्षेत्रात काम करत आहोत..


भगवंत बघायचा असेल, तर तो निसर्गाच्या कोणत्याही प्राण्याच्या  बाल्य अवस्थेत अनुभवता येतो..


या बाल रुपात सगळेच खूप गोंडस, निष्पाप, निस्वार्थ असतात..


त्यात आपले हे बालगोपाल तर अजूनच निराळे..


प्रत्येक जण एक वेगळी ओळख, वेगळी शक्ती, वेगळी ऊर्जा, वेगळे स्वत्व घेऊन आलेले..


ती मुलगी असो वा मुलगा, त्या प्रत्येकात बाललीला करणारा गुणी पण तितकाच खट्याळ बाळकृष्ण अनुभवता येतो..


असे हे चिमुकले, घराची माया, ऊब, सुरक्षित वातावरण सोडून रोज शाळेत येतात..


घराहून पूर्णपणे वेगळ्या जागेस, वातावरणात अगदी दोन चार दिवसात रमतात..


पहिल्या दिवशी मला नाही जायचे म्हणून टाहो ऐकवलेली ही सेना, आठवड्याच्या आत शाळा, शाळेतील शिक्षक, सेविका सगळ्यांनाच आपलेसे करतात..


अनेकदा फक्त मुलेच नाही तर त्यांचे कुटूंबीय (आईबाबा, भावंडं, आजीआजोबा) हेही आपल्याशी जोडले जातात..


या साऱ्याने आपली जबाबदारी वाढत असते..


वर्गशिक्षक तर सर्वात आवडता, प्रेमाचा आणि प्रचंड विश्वासाचा

होऊन जातो, इतका की तो सांगेल तीच पूर्व दिशा, तेच प्रमाण..


बरं इतकचं नाही तर  शाळेचा ८०% अधिक वेळ ते आपण शिक्षक सांगू तसे वागण्याचा मनापासून प्रयत्न करत असतात..


आणि खरे तर त्यातूनच त्यांची खरी जडण घडण होत असते..


बाकी दैनंदिन अभ्यासक्रम, एकेक विषय, उपक्रम हे फक्त साधन म्हणून काम करतात..


स्वामी विवेकानंद म्हणतात, शिक्षण म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी जे पूर्णत्व आधीपासून विद्यमान आहे, त्याचे प्रकटीकरण..


थोडक्यात या प्रत्येकात एक वेगळे शिल्प (मूर्ती) आधीपासून आहे..


फक्त ते ठळकपणे दिसण्यासाठी त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या अनावश्यक गोष्टी काढून टाकण्याचे काम ज्याचे त्याने करायचे आहे..


आणि आपण शिक्षक यात मदत करत असतो, ते एक शिल्पकार म्हणून..


प्रत्येकाचे स्वरुप, गुण वेगळे मग त्याची छाननी एकाच साधनाने होईल कशी..


पण सध्याच्या शिक्षण प्रणालीत या साऱ्या विविधतेला, आधी हवे तसे उमलाण्याची आणि नंतर पुरेसा वेळ घेऊन उमलण्याची संधीच मिळत नाही..


विचार, बुद्धी, नीतिमूल्ये, करुणा असे अनेक गुणांचा खजिना असणारे, उद्याचे उज्वल भविष्य, दैत्यासम भासणाऱ्या विविध विषयांच्या ओझ्याखली दाबले जात आहेत..

 

(विषयांना असे म्हणले कारण दैत्य हे देवांपेक्षा शक्तिशाली होते, फक्त अविचाराने त्यांची ओळख बदलली.. अगदी तसेच मूलतः माहितीचा भांडार असणारे प्रत्येक विषय, शिक्षणाच्या चुकीच्या प्रणालीमुळे दैत्य बनत चालले आहेत..)  


याची अचूक शब्दात मांडणी करताना, संदीप खरे म्हणतात,

ही कविता आपल्याला नुसते समजते, मनापासून आवडते, पटते पण तंत्रज्ञान आणि स्पर्धेच्या युगात आपण पुरते हतबल होऊन जातो..


स्वतःला सारखे समजावत असतो,  आज असे करु, तसे करु, मुलांना अशाप्रकारे शिकवू, पण वेळेचा ताळेबंद सांभाळताना अभ्यासक्रम, उद्दिष्ट, घटक नियोजन,  या आणि अशाच चौकटीत बांधले जातो..


पण आवश्यक त्या सर्व ठिकाणी चौकटी मोडून, धोपट मार्ग सोडून, प्रवाहाच्या विरुद्ध वाहण्याची सवय आईबाबा, शाळा, माझ्या साऱ्या आजवर भेटलेल्या गुरुंनी, माझ्या अंगी रुजवली आहे, त्यामुळे मी सतत काही ना काही प्रयोग करत असते..


असे हे प्रयोग अधिक मासाच्या निमित्ताने सर्वांपुढे मांडणार आहे..


यामागे एकच भूमिका आहे की, या प्रयोगांमध्ये कदाचित काही त्रुटी असतील, नव्याने काही भर घालता येणे शक्य असेल तर, ते माहिती व्हावे..


काहीही राहून गेले असेल तर ते स्वीकारुन त्याची भर घालावी व हे प्रयोग अधिक परिपूर्ण व्हावेत..


यासाठी आपल्या प्रतिक्रिया, प्रतिसाद आणि शुभेच्छा मिळाव्यात, हीच त्या निर्गुण, निराकार शक्तीकडे मनापासून प्रार्थना..

No comments:

Post a Comment

suggestions most wlcome