Showing posts with label कालानुरुप. Show all posts
Showing posts with label कालानुरुप. Show all posts

Friday, July 07, 2023

म्हणी.. Proverb


सध्या आखाड (आषाढ) महिना सुरु आहे..


हा पूर्ण आषाढ महिना नववधूने सासू-सासऱ्यांचे तोंड बघू नये, माहेरी जावे अशी पद्धत असते.. 


आज धावपळीच्या दिनक्रमात रीत म्हणून नववधू एखादा दिवस माहेरी जाते..


या पद्धतींच्या निमित्ताने मराठी भाषेत अनेक म्हणी, शब्दप्रयोग समाविष्ट झाले आहेत..


त्यातले काही ससंदर्भ मांडण्याचा प्रयत्न करते..


आषाढ सासरा 


पूर्वी ही आषाढ प्रथा सांभाळताना जेंव्हा सूनबाई, पूर्ण महिना माहेरी जात असे.. 


तेंव्हा तिचे सासरे ज्याप्रमाणे तिच्याशी वागत, तसे कोणी माहेरी भेटले, तर सूनबाई नकळत त्यांना आषाढ सासरा हाक मारत असे.. 


कारण शरीराने व्यक्ती वेगळी असली, तरी विचार, सवयी तशाच..


मग जिचा सासरा प्रेमळ असे, स्वतःच्या मुलीप्रमाणे तिचा सांभाळ करे, तसाच अनुभव देणारा पुरुष तिच्यासाठी आषाढ सासरा होई..


तर दुसरीकडे जिचा सासरा विनाकारण त्रास देणारा, हे असेच हवे, ते नको अशा अनावश्क सांगणारा असे, तशी व्यक्ती दिसली की सूनबाई त्यांना आषाढ सासरा हाक देई..


आता दुसरी म्हण..


खरी सासू धरते कान, तर आखाड सासू मागते मान..


इथे खरी सासू ही आईप्रमाणे असल्याने, ती गरजेनुसार चुका दाखवणारी, पण मनातून माया असणारी अशी अपेक्षित आहे..


तर आषाढ सासू म्हणजे सतत मानपानाची अपेक्षा ठेवून, दुसऱ्यावर विनाकारण हुकूमत गाजविणारी असते असे म्हटले आहे..


वरील दोन्हींमध्ये सुचवायचे हेच की, नववधू ही सासर माहेर दोन्ही कुटुंब व्यवस्थेचा मुख्य घटक आहे..


तीच दोन घरांना जोडणार आहे, दोघांचे नाव लावणाऱ्या बाळांची ती जन्मदात्री होणार आहे..


तीला जपणे, तिचा सन्मान करणे ही सासर-माहेर दोघांची समसमान जबाबदारी आहे..


तसे झाले तरच, ती उत्तम समाज निर्माण करेल, कुळाला योग्य उत्तराधिकारी देऊ शकेल, त्यांचे संगोपन करु शकेल..


तिच्या स्त्रीत्वाचा, मातृत्वाचा मान सन्मान कराल, तरच उज्वल भविष्य उदयास येईल..


आता इथे एक प्रश्न येतो की, 


जर वेद अभ्यास सांगतो की, आपली संस्कृती अर्धनारी नटेश्वर पूजनीय असणारी, स्त्री पुरुष समानता मानणारी  होती..


मग त्यात हे सण, साजरे करण्याच्या या प्रथा परंपरा का आहेत, याची सुरुवात कोणी, केंव्हा केली असेल..?


तर त्यावर केलेले वाचन, सांगोपांगोच्या कानगोष्टी यातून असलेली माहिती, याद्वारे असे वाटते की..


फार फार पूर्वीच्या काळात,


(हा काळ कदाचित पारतंत्र्य पूर्व असेल..)


लग्न बाळ पाळण्यात असतानाच होत असे, नंतर मुलगी वयात आल्यावर सासरी जात असे..


वय लहान असल्यामुळे, फक्त सासूसासरेच नाही (नवऱ्याची आई वडील), तर घरातील अनेक मंडळी सूनबाईंच्या आई वडिलांची, भाऊ बहिणींची जागा नकळत घेत असतं..


सगळे मिळून त्या छोट्या नववधूला नव्या घरात, संसारात, नव्या माणसात अधिक सहज आपलेसे करत..


पण मधल्या कोणत्या तरी काळात,

अनेक परकीय आक्रमणे झाली..


वंश परंपरेचा प्रमुख घटक असणाऱ्या स्त्रीला सांभाळण्यासाठी, जपण्यासाठी चार भिंतींच्या आत संरक्षण दिले गेले..

 

आणि याचाच काही समाजकंटकांनी  गैरफायदा करुन घेतला..


ज्यातून चुकीच्या समाज बंधनांनी जन्म घेतला..


स्त्रीत्वाचा सन्मान करणारी, आमची मातृसत्ताक संस्कृती, कुठेतरी मागे पडली..


अहंकारी पुरुषप्रधान विचारधारेने जन्म घेतला..


स्त्री.. माता.. जी उद्याच्या पिढीची जननी होती, समाज घडवणारी, कुटुंबाला एक हाती सांभाळणारी होती, तीच घरात बंदिस्त झाली..


तीचे शिक्षण, स्वातंत्र्य, स्वाभिमान सगळ्याचे खच्चीकरण सुरु झाले..


तिला समाज, रुढी, परंपरा यांच्या जाचक कडी-कुलूपात कोंडले गेले..


(अर्थात त्याही काळात सासरी-माहेरी या सूनबाईला सांभाळणारी, जपणारी अनेक नातेवाईक मंडळी होती, हे विसरुन चालणार नाही)


स्त्रीचे माहेर, समाज तोडला होता, अत्याचार मानहानी याने तिची ससेहोलपट सुरु होती..


यात फक्त पुरुष सहभागी होते असे नाही, तर घर, कुटुंब यांवर सत्ता हवी असणारी सासू, आजेसासू, मोठी जाऊ, नणंद याही तितक्याच वाटेकरी होत्या..


यासोबतच अनेकदा माहेरीसुद्धा परक्याचे धन म्हणून बघितले जाई, जाच, अत्याचार, बंधने याने तिचे स्वत्व हरवून गेले होते.. 


कदाचित यावर उपाय म्हणून सामाजिक परिवर्तन गरजेचे झाले..


मग त्या काळातील समंजस, विचारी आणि समाजसुधारक मंडळींनी आपले सारे सण विचारपूर्वक पुन्हा नव्याने मांडले.. 


(यांची नावे आज उपलब्ध नाहीत..)


पण त्यांनी परिस्थितीला तोंड देण्यासाठी, प्रत्येक सण पुरुषी अहंकाराला खतपाणी घालणारे बनवले..


व्रत करायचे स्त्रीने, पण फलप्राप्ती मिळणार पुरुषांना..


जसे वटसावित्री, हरतालिका पती दीर्घायुषी होण्यासाठी..


आषाढ सासू-सासऱ्यांसाठी..


नागपंचमी, रक्षाबंधन बंधू राजांसाठी..असे एक ना अनेक..


एकूणच देव, दैव याची सतत भीती वाटणाऱ्या समाजाने, हे सण व त्यासोबत आलेली नवीन पद्धती याचा सहज स्वीकार केला..


बंधनात अडकलेली आमची माता, या सण समारंभांच्या निमित्ताने घराबाहेर पडे, समाजात मोकळेपणाने जाऊ लागली, तीला माहेरी जाण्याची संधी मिळू लागली..


मग तिच्यावर होणारे अत्याचार, तिची व्यथा, ती असा म्हणींचा आधार घेत सांगू लागली..


अर्थात त्यातूनच मग माहेर आणि सासरच्या अनेकांना तिचे प्रश्न, व्यथा कळू लागल्या, तिला आवश्यक मदत मिळू लागली..


खेदाने सांगावेसे वाटते की, अजूनही ही परिस्थिती पूर्णतः बदलली नाही..


आजही अनेक कुटुंबात स्त्री बंधन, अत्याचार, व्यभिचार, मानहानी यांनी जखडलेली आहे..


त्यावर तर काम व्हायलाच हवे..


पण त्यासोबतच, भाषेचा अलंकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या म्हणी सांभाळल्या पाहिजे..


कारण मराठी भाषेत अशा अनेक म्हणी आहेत, ज्याआधारे इतिहास, शब्दव्युप्ती यावर संशोधन करता येईल..


म्हणूनच अशा प्रथांच्या निमित्ताने त्याबद्दल असलेली माहिती इतरांना करुन देण्याचा प्रयत्न व्हायला हवा..


तसेच या म्हणींमधील गर्भितार्थ लक्षात घेण्याची, शोधण्याचीही गरज आहे..


तरच या म्हणी टिकतील, व काही नव्याने तयार होतील, भाषेत लीलया वापरल्या जातील..


अभ्यासक्रमात म्हणी नुसत्या पाठ करुन, त्या नव्या पिढीत रुजणार नाहीत..


न जाणो, काही दशकांनंतर म्हणी हा शब्दही काळाआड लुप्त होईल..


असे होऊ नये असे मनापासून वाटले म्हणूनच... 


आषाढ महिन्यात आलेल्या या भाषा अलंकारांची मांडणी करण्याचा छोटासा प्रयत्न केला..


यावर अधिक माहिती असल्यास समजून घ्यायला नक्की आवडेल..


प्रतिसाद व अधिक माहितीच्या प्रतिक्षेत आहे..

Sunday, May 01, 2022

ध्रुवबाळ


 जिद्द की विरक्ती

आमच्या लहानपणी काही गोष्टी-कथा सांगितल्या जायच्या, त्यातून शिकवण काय मिळाली हेही वदवून, नंतर घटवून घेतलं जायचे...

त्यामागे नेमकी उद्दिष्टे काय होती माहीत नाही...

पण...

अनुभवाने आलेली प्रगल्भता, आज त्या गोष्टींचा नव्याने विचार करायला लावते...

त्यापैकी एक ध्रुवबाळाची गोष्ट,

विष्णू पुराण आणि भागवत पुराणातंतील कथेनुसार ध्रुव हा उत्तानपाद राजा व सुनीती यांचा मुलगा होता. पाच वर्षाचा ध्रुव हा वडिलांच्या मांडीवर बसला असताना त्याला त्याच्या सावत्र आईने-सुरूचीने ढकलले. त्यामुळे जेथून आपल्याला कोणीही ढकलणार नाही, अशा जागेच्या शोधार्थ ध्रुवाने राजवाडा सोडून मधुवन नावाच्या अरण्याची वाट धरली. तेथून तो परत आला नाही. काही कालानंतर लोकांना आकाशात उत्तरेला एक न उगवणारा, न मावळणारा, न हालणारा तारा दिसला. लोकांना हा तारा म्हणजे ध्रुवच आहे असे वाटू लागले. ते अढळ स्थान प्राप्त करण्यासाठी, त्याने प्रचंड तपोसाधना केली...(संदर्भासाठी)

बोध - स्वतःचे अढळस्थान निर्माण करा, त्यासाठी जिद्द ठेवा इ.

या गोष्टीत आजतागायत कोणतेही बदल करण्याचे धाडस, कुण्या लेखकाने केल्याचे ऐकीवात नाही..

की त्या जागेची कुणाला असूया, ईर्षा निर्माण झाली, त्यासाठी स्पर्धा, लढाया झाल्या, अप्सरा पाठवल्या किंवा ध्रुवाला त्याचा गर्व झाला वगैरे वगैरे..

असेही नाही...

त्यामुळेच मनात विचार आला, कदाचित आपण त्या वयात जे शिकलो तेवढंच या गोष्टीतून सांगायचे नाही तर...

मोक्ष-मुक्ती याकडे नेणारी आपली संस्कृती, कृतीयुक्त अध्यात्म अशा कथेतून रुजवू बघते...

अढळ स्थानासाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागतील, तप करणे म्हणजे कोणत्यातरी गोष्टीचा, ध्यास घ्यावा लागेल आणि हे सगळं करुन मिळणारे अढळ अस्तित्व हे सर्वांपासून खूप, दूर, एकाकी असेल...

मग पुन्हा प्रश्नांचा काहूर उठतो...

समाजशील माणूस असा एकटा आनंदी राहू शकेल का, असे स्थान मिळाले तरी त्यातून साध्य काय होईल...?

की अवकाशातील ती दिशादर्शक जागा प्रतिकात्मक आहे..?

ध्रुव नसेलही तिथे गेला, पण सगळ्यात असूनही इच्छा, अपेक्षा, सुख, दुःख, वेदना यातून अलिप्त झाला असेल, जे आपोआप इतरांना मार्गदर्शक ठरले असेल म्हणून अवकाशातील आपले स्थान (म्हणजेच विचार, मत परिस्थितीनुसार )न बदलणाऱ्या ताऱ्याला ध्रुवाचे नाव दिले गेले असेल...

भावभावनातून आधी अलिप्तता, मग विरक्ती हाच अढळ स्थान मिळण्याचा मार्ग असेल...?

आणि ते मिळवण्यासाठी ना असूया, ना ईर्षा असेल, ना स्पर्धा, ना स्थान गमावण्याची भिती...?

मग नवा प्रश्न ही कथा मुलांना लहानपणी सांगावी की नाही...?

मला तर वाटतं, जरूर सांगावी...

त्यातून जिद्द, अपार कष्ट हे तरी नक्कीच रुजेल...

कालांतराने कदाचित परिस्थिती, अनुभव, संत-संस्कृती- जेष्ठ-श्रेष्ठ यांच्या विचारांची गाठोडी आणि सर्वात महत्वाचे आजूबाजूचे पोषक वातावरण यातून मोक्ष मार्गही गवसेल...

असा मार्ग सर्वांना लाभावा हीच सदिच्छा आणि ईश्वर चरणी प्रार्थना.

Sunday, May 10, 2020

रंगपंचमीची

 
 
एक असतं रंगीत गाव त्या गावात सगळे रंग राहत असतात. निळा, हिरवा, पांढरा, काळा, लाल, पिवळा, नारंगी,गुलाबी, आकाशी,जांभळा, मोरपंखी, तपकीरी, सोनेरी,चंदेरी असे खूप सारे रंग होते. प्रत्येकजण आपले काम मनापासून करत असतात .सगळे एकमेकांना मदत करत, खेळ खेळत आनंदानी राहत होते.

एकदा असेच सगळे खेळत होते इतक्यात निळ्या रंगाच लक्ष गेलं काळ्या रंगावर तो एकटाच कोपऱ्यात बसला होता. खूप उदास होता,रडून रडून डोळे सुजले होते.

निळू त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला,

निळू :- काळू काय रे झालं , असा का बसला आहेस ? चल ना खेळायला ?

काळू :- नको , मला नाही यायच तुम्ही खेळा.

निळू :- बरं येऊ नकोस, पण काय झालं ते तरी सांग.

काळू :- काही नाही झालं, मी बरा आहे.

निळू :- मी तुझा मित्र आहे ना मग सांग बरं काय झालं , तुझे डोळे किती सुजले आहेत, तू नक्की रडला आहेस . तू जर सांगितलं नाहीस तर मी पण इथेच बसेन , खेळणार नाही.

काळू :- तू जा बरं खेळायला , मी इथेच बरा असही मी कुणाला आवडत नाही.

निळू :- कोण म्हणलं तुला की तू कुणाला आवडत नाहीस?

काळू :- मला माहिती आहे. मी खूपदा बघितले आहे, काळा रंग कुणालाच नको असतो.
(निळू सगळ्यांना बोलावून काळ्या रंगाचे म्हणणे सांगतो. प्रत्येकजण त्याची समजूत काढू लागतात.)

पिवळा :- आम्हाला तर तू खूप आवडतोस, हे बघ आपल्या सगळ्यांना देव बाप्पानी बनवलं त्यात आवड-नावड कशाला आपलं काम आपण करायचं, मी नाही का फुलांना फळांना,सूर्याला रंग देतो.

हिरवा :- आणि काळू डोळे तर काळेच असतात त्यामुळे तर सगळ्यांना आधी दिसते मग रंग ओळखता येतात.

लाल :- ऐ, रात्रपण काळीच असते. रात्र होते म्हणून चांदोबा, चांदण्या दिसतात, आपल्याला झोप मिळते आराम करता येतो.

केशरी :- कोणत्याही रंगाला बाजूने काळी कडा (बॉर्डर)केली की तो रंग अधिक उठून दिसतो.

पांढरा :- काळ्या रंगाचा दगड ,कातळ खूप दणकट असतो त्यापासून बनवलेले किल्ले अजूनही छान आहेत.

काळा रंग जरा विचारात पडतो पण अजूनही थोडा उदासच असतो .

गुलाबी रंगला एक युक्ती सुचते तो एका बादलीत पाणी घेऊन येतो आणि म्हणतो

गुलाबी :- हे सगळं राहू दे , मी तुला दाखवतो की तुझा हा काळा रंग कसा तयार झाला, चला रे सगळ्यांनी आपला थोडा थोडा रंग या बादलीत टाका .
गुलाबी,लाल, पिवळा,निळा, हिरवा, केशरी, जांभळा, पोपटी, पांढरा, तपकिरी, शेवाळी ... सगळ्यांनी आपला थोडा रंग बादलीत टाकला. गुलाबी रंगाने पाणी छान हलवून एकत्र केलं आणि गंमत पाणी काळ्या रंगाचं झालं.

गुलाबी :- हे बघ आम्हा सगळ्यांना तू तुझ्यात सामावून घेतलं आहेस म्हणून तुझा रंग असा आहेस आणि म्हणूनच तू आमचा लाडका आहेस.

काळा रंग मनापासून हसला . ते बघून सगळ्यांनी आपला थोडा रंग त्याला आणि एकमेकांना लावला. जरा वेळाने सगळेच काळे काळे झाले आणि आनंदाने नाचू लागले .

आपण सगळेच आवडते आहोत याची आठवण राहावी म्हणून मग सारे रंग अधूनमधून हा खेळ खेळू लागले व एकमेकांच्या रंगाने रंगू लागले.

चला तर मग आपणही रंगांचा खेळ खेळूया आणि सगळ्या रंगात रंगून जाऊ या .



ही गोष्ट तुम्ही बघू ही शकता...

  




Thursday, April 30, 2020

मकरसंक्रांत


तिळगूळ घ्या गोड बोला




बरं का मित्रांनो मी आज तुम्हाला गंमत सांगणार आहे. ती आहे आमच्या एका मैत्रिणीची. तिचं नाव ऋचा.

तर एकदा काय ..... चला ऐकण्यापेक्षा आपण बघू या.

(एक सुंदर खोली. तिथे पाच-सहा चिमुकले एकेक करुन वेगवेगळी वाद्य वाजवत आहेत आणि त्यांच्या शिक्षिकाताई त्यांना शिकवत आहेत.)

ताई :- काय मग सगळ्यांची तयारी झाली आहे ना, उद्याच्या स्पर्धेची?  सगळ्यांना खूप शुभेच्छा ! आता आपण एकदा शेवटचा सराव करु या. प्रत्येक जोडीने येऊन आपलं सादरीकरण करायच. चला कोण करणार सुरुवात.... सुश्रुता तुमची जोडी  करणार का?

(सुश्रुता आणि आर्याची जोडी पुढे येते.)

सुश्रुता :- हो चालेल, नमस्कार मी सुश्रुता.

आर्या :- मी आर्या.

दोघी :- आम्ही टाळ वाजवून, एक छान भजन म्हणणार आहोत,

वाजवा हो टाळ म्हणा, गोविंद गोपाळ

गोविंद गोपाळ घालू, तुळशीची माळ

तुळशीच्या माळेमध्ये, भक्तीची मंजिरी

गरजा हो जय जय जय जय हरी

(सगळे टाळ्या वाजवतात.)

ताई :- आता कोण ?

आयुष :- मी आयुष

स्वंयम :- मी स्वंयम

दोघे :- आम्ही ताशा वाजवून गाणं म्हणणार आहे. 

(दोघे थोडासा ताशा वाजवतात.)

पार्वतीच्या बाळा...तुझ्या पायात वाळा 

ताश्याच्या आवाज, तारारारा झाला नी

गणपती माझा नाचत आला  ......

(पुन्हा टाळ्या)

कौशिकी :- मी कौशिकी. मी आणली आहे ही खंजिरी, ती वाजवून मी छान गाणं म्हणणार आहे.

छम छम छम, 

आई गं छडी लागे, छम छम छम...

विद्या येई घम घम,छम छम छम

(प्रत्येकाच्या गाण्यानंतर टाळ्या वाजतात. वर्गातले एकेक जण पुढे येऊन एखादे वाद्य वाजवून गाणे म्हणून दाखवत असतात.)

अंजली :- मी अंजली.

त्रिषा :- मी त्रिषा.

दोघी :- आम्ही पेटी वाजवून गाणे म्हणणार आहोत. 

(सुरु करतात.)

बाहुली आमची छान आहे, गोरी गोरी पान आहे ...

वेणीमध्ये फूल आहे, कानामध्ये डूल आहे, 

लॉकेटची साखळी , खड्याची टिकली

छुम छुम तोरड्या, सोनेरी या बांगड्या , 


ताई :- आता शेवटची जोडी ऋचा आणि अपूर्वा.

अपूर्वा :- मी अपूर्वा.

ऋचा :- मी नाही म्हणणार हिच्या बरोबर गाणं.

ताई :- का काय झालं ?

ऋचा :-  ताई, हीला नीट म्हणताच येत नाही. सारखी चुकते. हीचा आवाज छान नाही. उलट खूप मोठा आहे. मला नाही आवडत हिच्यासोबत गाणे म्हणायला.

(अपूर्वाला खूप वाईट वाटते आणि ती रडू लागते.)

ताई :- अपूर्वा रडू नको. तू सांग तुला काय करायच आहे?

अपूर्वा :- (रडतच) ताई मी खूप प्रयत्न करते, पण ही मला सारखी चिडवत रहाते. तुला येणारच नाही म्हणते मग आमचे गाणे अजूनच कसेतरी होते.

सगळे :- हो ताई. ऋचा असेच करते. ती आम्हालाही चिडवत असते. सगळ्यांच्याच गाण्याला नाव ठेवते. तुम्ही तिलाच घेऊ नका.

ताई :- बरं, अपूर्वा मला सांग, तू एकटी म्हणू शकतेस का? जा छान तोंड धुऊन ये.

(अपूर्वा तोंड धुवायला जाते. मग ताई ऋचाला जवळ बोलावतात.)

ताई :- ऋचा तू असं का बरं करतेस ?

ऋचा :- ताई मला सगळे सांगतात, की मी छान गाणं म्हणते. माझा आवाज गोड आहे, चालही कधी चुकत नाही. नेहमी बक्षीसही मिळते.

ताई :- हो पण त्याच इथे काय?

ऋचा :- त्या अपूर्वाला काहीच नाही येत.

ताई :- हे बघ रुचा, आपण जी स्पर्धा घेणार आहोत ना, ती कुणाचा आवाज कसा याची नाही, तर तुम्ही एकमेकांसोबत किती छान गाणं म्हणू शकता याची आहे. 

अपूर्वाला गाणं येत नाही तर, तू तिला शिकवायला हवं. चिडवायला नाही. 

नाहीतर तू एकटी राहशील. कोणी तुझ्याबरोबर गाणं तर नाहीच म्हणणार, पण बोलणार नाही की खेळणारही नाही.

तू गाणं शिकते ना मग, सा रे ग म हे सगळे स्वर वेगवेगळे आहेत हे तुला माहितच असेल. त्यातला एकच छान बाकी वाईट अस नाही ना.

त्या सगळ्यांचे मिळून गाणं तयार होत. समजते आहे का मी काय सांगते?

नुसता आवाज गोड, चाल बरोबर असून चालत नाही तर आपल्याला सगळ्यांशी जमवून पण घेता यायला हवं, हो की नाही?

(इतक्यात अपूर्वा छान तोंड धुवून परत आली.)

अपूर्वा :- ताई मी गाणं म्हणून दाखवू?

ताई :- अगं हो आम्ही सगळे तुझीच वाट बघत होतो. ऋचा तूही ऐक हं. तीचे काही चुकत असेल तर आपण तिला सांगू पण उगाच नावं नाही ठेवायची बरं का. चल तिला शुभेच्छा दे बरं.

(काहीशा नाराजीने ऋचा अपूर्वाला हात मिळवून छान म्हण असे म्हणते. अपूर्वा खूष होते आणि घुंगुर्रकाठी वाजवत सुरु करते.)

टाळ वाजे वीणा वाजे 
वाजे घुंगुर्रकाठी
घुंगराच्या तालावर 
नाचे जगजेठी

(आवाज गोड नसला तरी खूप छान म्हणते. ऋचाला तिची चूक समजते. ती धावत जाऊन तिला मिठी मारुन माफी मागते.)

ताई :- किती छान ऋचा, तू स्वतःहून चूक मान्य केलीस. आता बघ तुमच्या दोघींचे गाणे कसे मस्त होईल.

मकर संक्रांतीला स्पर्धा होते. सगळ्यांचीची गाणी खूप छान होतात. स्वरांपेक्षाही सूर जुळल्यामुळे अपूर्वा आणि ऋचाला दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीसही मिळते.

मग ताई सगळ्यांना बोलावतात आणि तिळगूळ देऊन सांगतात, की फक्त गाणं नाही तर बोलणेही सुरेल हवे. 

आपण गोड बोललो, सगळ्यांशी छान वागलो तर खूप मित्रमैत्रिणी मिळवता येतात. आपल्या मित्रांची एखादी गोष्ट आवडली नाही, चुकली तर ती त्याला मोकळेपणाने सांगायची, पण म्हणून त्याचाशी मैत्री तोडायची नाही, त्याला नावे ठेवायची नाही,  हेच सांगायला हा संक्रातीचा सण येतो.
चला सगळ्यांनी एकमेकांना तिळगूळ द्या आणि म्हणा,

तिळगूळ आमचा सांडू नका, 
सांडला चुकून तरी भांडू नका !
वाद मतभेद असले तरी, 
मैत्री मात्र तोडू नका
तिळगूळ घ्या गोड बोला !
तिळगूळ घ्या गोड बोला !


 

******************************************

दिवाळी



ही गोष्ट आहे मागच्या वर्षीची बरं का ......

ऋग्वेद खूप आनंदात होता. शाळेला दिवाळीची सुटी लागली, त्याच दिवशी त्याने आजोबांसोबत मस्त किल्ला बनवला होता. मावळे सजवले. 

मग आला, दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारस. जो खूप मजेत गेला. सगळ्यांनी छान छान कपडे घातले होते. लवकर उठून सडा रांगोळी झाली होती. मित्र मैत्रिणी, नातेवाईक एकत्र जमून फराळावर ताव मारला होता. 

मग आईबाबा कामावर गेले, त्यांना सुटी नव्हती.    

ऋग्वेद आजीआजोबांसोबत जवळच्या दत्त मंदिरात जाऊन गाय-वासराची पूजा करुन आला. गोड पुरणपोळीचा घास भरवला.

दुपारी  सगळी बच्चेकंपनी सोसायटीच्या आवारात फटाके उडवण्यासाठी जमली. सोबत मोठे कोणी नव्हते कारण त्यांना अजून सुटी लागली नव्हती. आधी टिकल्या वाजवून झाल्या. मग छोटे लवंगीबार लावले.
आवाज ऐकून आजीने एकदा हाक देऊन बजावले की आत्ता एकटे फटाके फोडू नका तेंव्हा सगळ्यांनी तिला, 'हो नाही फोडणार सांगितले' आणि मग लपाछपी, शर्यत असे खेळ सुरु झाले. 

दमून घरी जाताना मात्र संध्याकाळी खूप फटाके वाजवायचे नक्की ठरले.  
         
ठरल्याप्रमाणे संध्याकाळी सगळे जमलेच. राज तसा धीट होता. त्याने लक्ष्मी, सुतळीबॉम्ब असे मोठे फटाके आणले होते. 

बाबा थोडं आवरुन येतो म्हणाले, पण मुलांना दम कुठे होता. 

राजने चार-पाच बॉम्ब लावलेच. बाकी मुले लवंगीबार वाजवत होती. मुली फुलबाज्या, अनार लावत होत्या.               

इतक्यात खूप मोठा आवाज झाला आणि मनवा गोजिरी, मनवा जोराने रडू लागल्या. मोठी मंडळी धावत बाहेर आले.

त्याचे झाले असे की मनवाने एक अनार लावला. कसा माहिती नाही पण तो उडाला नाहीच आणि फुटला त्याचा मोठा आवाज झाला होता. 

त्याच्या जवळची  बारीक रेती उडाली होती. गोजिरी, मनवा लांब नसल्याने त्यांच्या अंगावर   रेती उडाली....डोळ्यात गेली.

घाबरुन पळताना गोजीरीचा पाय जळत्या फुलबाजीवर पडला.

बाबांनी तिला लगेच डॉक्टरांकडे नेले. औषध लावले. इंजक्शनही द्यावे लागले.  
झाला प्रकार इतका अनपेक्षित होता की सगळीच बच्चेकंपनी घाबरली होती. 

त्यांच्या आईबाबांनी सगळ्यांना घरी नेले. शांत केले.    

 
                                  
जेवण झाल्यावर आजी ऋग्वेदला म्हणाली, "चल, गोजीरीला भेटून येऊ. सोसायटीमधल्या सगळ्या  मुलांना तिथे बोलवून आण, मी छान गोष्ट सांगते."       

गोष्ट म्हणल्यावर, ऋग्वेदसाहेब खूष. धावत जाऊन सगळ्यांना जमा केले. सगळे आलेले बघून गोजिरीलाही बरं वाटलं.

द्युती :- खूप दुखतं आहे का गं?

गोजिरी :- हो ना ... आता मी अजिबात फटाके नाही वाजवणार. 

राज :- भित्री.... भागूबाई. इतकं काहीच नाही झालं.

 

(सगळी मुले त्याच्या बरोबर मुलींना चिडवू लागले. मग आजी रागावली, आणि गोष्ट सांगणार नाही म्हणाली.)

ऋग्वेद :- सॉरी आजी, परत नाही चिडवणार... पण तू गोष्ट सांग.

(आजीची गोष्ट म्हणजे दुसरी मेजवानीच, ती एकेका पात्राचे असे हुबेहूब आवाज  काढायची की नुसती धमाल. लहानच नाही तर मोठेही तिच्याभोवती जमा झाले, आणि गोष्टीला सुरुवात झाली.)



तेही दिवस दिवाळीचे होते. 

सगळीकडे रोषणाई केली होती, आकाशकंदील, पणत्या, रांगोळी, फराळ, नवीन कपडे नुसती धमाल.

एक भू भू मात्र घाबरुन, रडत बसले होते. तिथून मनीमाऊ चालली होती. तिने विचारले,

माऊ :- काय रे भूभूदादा काय झाले?

भूभू :- अगं काय सांगू, या दिवाळीची ना मला खूप भिती वाटते. फटाक्यांच्या आवाजाचा कानांना त्रास होतो. माझे कान बारीक आवाजही टिपतात. त्यामुळे या मोठ्या आवाजाने कानाला दडे बसतात.
माऊ :- अगदी खरं रे, नुसते आवाज नाही, तर ही मुलं गंमत म्हणून खोड्यापण काढतात. काल मला पकडून माझ्या शेपटीला फटाक्यांची माळ लावली. बघ ना भाजले आहे मला. मी धन्वंतरी बाप्पाकडे चालले आहे. तूही येतोस का? कानांसाठी औषध घे.

(आजीची गोष्ट मधेच थांबवत.)

मैत्रयी :- आजी धन्वंतरी बाप्पा म्हणजे कोण?

रोहन :- इतकं पण नाही माहिती... तो म्हणजे डॉक्टर बाप्पा. हो ना आजी?

रेवा :- आणि मग तो धन्वंतरी बाप्पा काय करतो? 

आजी :- सगळ्यांना बरं करतो. सगळ्या डॉक्टरकाकांकडे त्याची मूर्ती असते.

ऋग्वेद :- आजी पुढे काय झालं? गोष्ट सांग ना.....

(तर झालं असं.... दोघ निघाले बाप्पाकडे.  वाटेत पोपट, चिमणी, खारोटी, हम्मागाई असे एकेक जण भेटले.)

पोपट :- मी पण येतो तुमच्याबरोबर. रॉकेटमुळे माझे पंख जखमी झाले आहेत.

खारोटी :- मला त्या धुराने घशात कसेतरी होत आहे, खाताना त्रास पण होतो आहे.

चिऊताई :- मला बॉम्ब सोबत  उडालेला दगड लागला आहे.

हम्मा गाई :- माझी तर छान पूजा झाली, गोड खाऊ मिळाला पण चालताना माझा पाय गरम फुलबाजीने भाजला.

(सगळेच प्राणीपक्षी घाबरलेले होते. रडत, चिडचिड करत धन्वंतरी बाप्पाकडे गेले. त्यांची अवस्था बघून बाप्पाला खूप वाईट वाटले. त्याने सगळ्यांना औषध लावले.)


सगळे :- बाप्पा आता आम्ही परत जातच नाही. इथेच राहतो.

बाप्पा :- तुम्हीच कशाला, आता मीही पृथ्वीवर जाणार नाही. उद्या धनत्रयोदशी आहे पण मी नाहीच जाणार.

( पुन्हा आजीला थांबवत..)

आराध्या :- आजी पण असा बाप्पा रागावला आणि आलाच नाही तर आपण पूजा कोणाची करणार?

रुचिर :- आणि आपण आजारी पडलो तर आपल्याला बरं कोण करणार? 

अनन्या :- नाही नाही असं नको व्हायला. नाही ना होणार आजी?

आजी :- का नाही होणार, जसं भू भू, माऊ, खारोटी, चिमणी, पोपट, गाय यांना भाजले, लागले. ते घाबरले तसेच मगाशी गोजिरीला पण लागलंच ना?

मनवा :- आम्ही खूप घाबरलो सुद्धा.

राज :- मी नाही घाबरत पण असं कुणाला लागायला नको, भाजायला नको आणि बाप्पा रुसायला पण नको.

आजी :- मग त्यासाठी काय करायला हवं?

सुमेध, जान्हवी, स्वरा ( काहीजण)  :- आजी आम्ही आता कधी कधी नाही उडवणार फटाके.....

प्रियांषु, समर्थ, अर्हम (उरलेले काही) :-  आणि उडवले तरी आम्ही खूप आवाज, धूर होणारे फटाके नाही उडवणार. 

आद्या :- उडवताना मोठे कुणीतरी असल्याशिवाय उडवणार नाही. 

मुग्धा :- मोकळ्या मैदानावर जाऊ. 

अर्पिता :- स्वतःची, इतरांची काळजी घेऊ, प्राणी-पक्षी यांना गंमत म्हणून त्रास देणार नाही.


आजी :- कित्ती शहाणी बाळं आहेत सगळी. नक्की देता वचन की हे सगळं नक्की ऐकणार !...... नाहीतरी बाप्पा खरचं रुसून बसेल बरं का.

सगळे (मोठेही ) :- वचन.... वचन... वचन.

आजी :- मग येईल हो बाप्पा आपल्याकडे. नाही रुसणार... रागावणार. गोष्ट तर तुम्हीच पूर्ण केली.

आजीची गोष्ट पूर्ण झाली आणि सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे ऐकलंसुद्धा.

मित्रानो तुमच काय?

बघा विचार करा.. 

नाहीतर......
********************