एक असतं रंगीत गाव त्या गावात सगळे
रंग राहत असतात. निळा, हिरवा, पांढरा, काळा, लाल, पिवळा, नारंगी,गुलाबी, आकाशी,जांभळा, मोरपंखी, तपकीरी, सोनेरी,चंदेरी असे खूप सारे रंग होते. प्रत्येकजण आपले काम मनापासून करत
असतात .सगळे एकमेकांना मदत करत, खेळ खेळत आनंदानी राहत होते.
एकदा असेच सगळे खेळत होते इतक्यात
निळ्या रंगाच लक्ष गेलं काळ्या रंगावर तो एकटाच कोपऱ्यात बसला होता. खूप उदास होता,रडून रडून डोळे सुजले होते.
निळू त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला,
निळू :- काळू काय रे झालं , असा का बसला आहेस ? चल ना खेळायला ?
काळू :- नको , मला नाही यायच तुम्ही खेळा.
निळू :- बरं येऊ नकोस, पण काय झालं ते तरी सांग.
काळू :- काही नाही झालं, मी बरा आहे.
निळू :- मी तुझा मित्र आहे ना मग
सांग बरं काय झालं , तुझे डोळे किती सुजले आहेत, तू नक्की रडला आहेस . तू जर सांगितलं
नाहीस तर मी पण इथेच बसेन , खेळणार नाही.
काळू :- तू जा बरं खेळायला , मी इथेच बरा असही मी कुणाला आवडत
नाही.
निळू :- कोण म्हणलं तुला की तू
कुणाला आवडत नाहीस?
काळू :- मला माहिती आहे. मी खूपदा
बघितले आहे, काळा रंग कुणालाच नको असतो.
(निळू सगळ्यांना बोलावून काळ्या
रंगाचे म्हणणे सांगतो. प्रत्येकजण त्याची समजूत काढू लागतात.)
पिवळा :- आम्हाला तर तू खूप आवडतोस, हे बघ आपल्या सगळ्यांना देव बाप्पानी
बनवलं त्यात आवड-नावड कशाला आपलं काम आपण करायचं, मी नाही का फुलांना फळांना,सूर्याला रंग देतो.
हिरवा :- आणि काळू डोळे तर काळेच
असतात त्यामुळे तर सगळ्यांना आधी दिसते मग रंग ओळखता येतात.
लाल :- ऐ, रात्रपण काळीच असते. रात्र होते
म्हणून चांदोबा, चांदण्या दिसतात, आपल्याला झोप मिळते आराम करता येतो.
केशरी :- कोणत्याही रंगाला बाजूने
काळी कडा (बॉर्डर)केली की तो रंग अधिक उठून दिसतो.
पांढरा :- काळ्या रंगाचा दगड ,कातळ खूप दणकट असतो त्यापासून
बनवलेले किल्ले अजूनही छान आहेत.
काळा रंग जरा विचारात पडतो पण अजूनही
थोडा उदासच असतो .
गुलाबी रंगला एक युक्ती सुचते तो एका
बादलीत पाणी घेऊन येतो आणि म्हणतो
गुलाबी :- हे सगळं राहू दे , मी तुला दाखवतो की तुझा हा काळा रंग
कसा तयार झाला, चला रे सगळ्यांनी आपला थोडा थोडा रंग या बादलीत टाका .
गुलाबी,लाल, पिवळा,निळा, हिरवा, केशरी, जांभळा, पोपटी, पांढरा, तपकिरी, शेवाळी ... सगळ्यांनी आपला थोडा रंग
बादलीत टाकला. गुलाबी रंगाने पाणी छान हलवून एकत्र केलं आणि गंमत पाणी काळ्या
रंगाचं झालं.
गुलाबी :- हे बघ आम्हा सगळ्यांना तू
तुझ्यात सामावून घेतलं आहेस म्हणून तुझा रंग असा आहेस आणि म्हणूनच तू आमचा लाडका
आहेस.
काळा रंग मनापासून हसला . ते बघून
सगळ्यांनी आपला थोडा रंग त्याला आणि एकमेकांना लावला. जरा वेळाने सगळेच काळे काळे
झाले आणि आनंदाने नाचू लागले .
आपण सगळेच आवडते आहोत याची आठवण
राहावी म्हणून मग सारे रंग अधूनमधून हा खेळ खेळू लागले व एकमेकांच्या रंगाने रंगू
लागले.
चला तर मग आपणही रंगांचा खेळ खेळूया
आणि सगळ्या रंगात रंगून जाऊ या .
ही गोष्ट तुम्ही बघू ही शकता...


No comments:
Post a Comment
suggestions most wlcome