Sunday, May 01, 2022

ध्रुवबाळ


 जिद्द की विरक्ती

आमच्या लहानपणी काही गोष्टी-कथा सांगितल्या जायच्या, त्यातून शिकवण काय मिळाली हेही वदवून, नंतर घटवून घेतलं जायचे...

त्यामागे नेमकी उद्दिष्टे काय होती माहीत नाही...

पण...

अनुभवाने आलेली प्रगल्भता, आज त्या गोष्टींचा नव्याने विचार करायला लावते...

त्यापैकी एक ध्रुवबाळाची गोष्ट,

विष्णू पुराण आणि भागवत पुराणातंतील कथेनुसार ध्रुव हा उत्तानपाद राजा व सुनीती यांचा मुलगा होता. पाच वर्षाचा ध्रुव हा वडिलांच्या मांडीवर बसला असताना त्याला त्याच्या सावत्र आईने-सुरूचीने ढकलले. त्यामुळे जेथून आपल्याला कोणीही ढकलणार नाही, अशा जागेच्या शोधार्थ ध्रुवाने राजवाडा सोडून मधुवन नावाच्या अरण्याची वाट धरली. तेथून तो परत आला नाही. काही कालानंतर लोकांना आकाशात उत्तरेला एक न उगवणारा, न मावळणारा, न हालणारा तारा दिसला. लोकांना हा तारा म्हणजे ध्रुवच आहे असे वाटू लागले. ते अढळ स्थान प्राप्त करण्यासाठी, त्याने प्रचंड तपोसाधना केली...(संदर्भासाठी)

बोध - स्वतःचे अढळस्थान निर्माण करा, त्यासाठी जिद्द ठेवा इ.

या गोष्टीत आजतागायत कोणतेही बदल करण्याचे धाडस, कुण्या लेखकाने केल्याचे ऐकीवात नाही..

की त्या जागेची कुणाला असूया, ईर्षा निर्माण झाली, त्यासाठी स्पर्धा, लढाया झाल्या, अप्सरा पाठवल्या किंवा ध्रुवाला त्याचा गर्व झाला वगैरे वगैरे..

असेही नाही...

त्यामुळेच मनात विचार आला, कदाचित आपण त्या वयात जे शिकलो तेवढंच या गोष्टीतून सांगायचे नाही तर...

मोक्ष-मुक्ती याकडे नेणारी आपली संस्कृती, कृतीयुक्त अध्यात्म अशा कथेतून रुजवू बघते...

अढळ स्थानासाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागतील, तप करणे म्हणजे कोणत्यातरी गोष्टीचा, ध्यास घ्यावा लागेल आणि हे सगळं करुन मिळणारे अढळ अस्तित्व हे सर्वांपासून खूप, दूर, एकाकी असेल...

मग पुन्हा प्रश्नांचा काहूर उठतो...

समाजशील माणूस असा एकटा आनंदी राहू शकेल का, असे स्थान मिळाले तरी त्यातून साध्य काय होईल...?

की अवकाशातील ती दिशादर्शक जागा प्रतिकात्मक आहे..?

ध्रुव नसेलही तिथे गेला, पण सगळ्यात असूनही इच्छा, अपेक्षा, सुख, दुःख, वेदना यातून अलिप्त झाला असेल, जे आपोआप इतरांना मार्गदर्शक ठरले असेल म्हणून अवकाशातील आपले स्थान (म्हणजेच विचार, मत परिस्थितीनुसार )न बदलणाऱ्या ताऱ्याला ध्रुवाचे नाव दिले गेले असेल...

भावभावनातून आधी अलिप्तता, मग विरक्ती हाच अढळ स्थान मिळण्याचा मार्ग असेल...?

आणि ते मिळवण्यासाठी ना असूया, ना ईर्षा असेल, ना स्पर्धा, ना स्थान गमावण्याची भिती...?

मग नवा प्रश्न ही कथा मुलांना लहानपणी सांगावी की नाही...?

मला तर वाटतं, जरूर सांगावी...

त्यातून जिद्द, अपार कष्ट हे तरी नक्कीच रुजेल...

कालांतराने कदाचित परिस्थिती, अनुभव, संत-संस्कृती- जेष्ठ-श्रेष्ठ यांच्या विचारांची गाठोडी आणि सर्वात महत्वाचे आजूबाजूचे पोषक वातावरण यातून मोक्ष मार्गही गवसेल...

असा मार्ग सर्वांना लाभावा हीच सदिच्छा आणि ईश्वर चरणी प्रार्थना.

1 comment:

  1. अजून मोक्षाचा नाही पण अलिप्त राहण्याचा मार्ग दिसला , आणि त्या दिशेने प्रवास करायला आवडेल ...गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन छान दिलास, धन्यवाद सखी👍

    ReplyDelete

suggestions most wlcome