ही गोष्ट आहे मागच्या वर्षीची बरं का ......
ऋग्वेद खूप आनंदात होता. शाळेला दिवाळीची सुटी लागली, त्याच दिवशी त्याने आजोबांसोबत मस्त किल्ला बनवला होता. मावळे सजवले.
मग आला, दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारस. जो खूप मजेत गेला. सगळ्यांनी छान छान कपडे घातले होते. लवकर उठून सडा रांगोळी झाली होती. मित्र मैत्रिणी, नातेवाईक एकत्र जमून फराळावर ताव मारला होता.
मग आईबाबा कामावर गेले, त्यांना सुटी नव्हती.
दुपारी सगळी बच्चेकंपनी सोसायटीच्या आवारात फटाके उडवण्यासाठी जमली. सोबत मोठे कोणी नव्हते कारण त्यांना अजून सुटी लागली नव्हती. आधी टिकल्या वाजवून झाल्या. मग छोटे लवंगीबार लावले.
आवाज ऐकून आजीने एकदा हाक देऊन बजावले की आत्ता एकटे फटाके फोडू नका तेंव्हा सगळ्यांनी तिला, 'हो नाही फोडणार सांगितले' आणि मग लपाछपी, शर्यत असे खेळ सुरु झाले.
दमून घरी जाताना मात्र संध्याकाळी खूप फटाके वाजवायचे नक्की ठरले.
ठरल्याप्रमाणे संध्याकाळी सगळे जमलेच. राज तसा धीट होता. त्याने लक्ष्मी, सुतळीबॉम्ब असे मोठे फटाके आणले होते.
बाबा थोडं आवरुन येतो म्हणाले, पण मुलांना दम कुठे होता.
राजने चार-पाच बॉम्ब लावलेच. बाकी मुले लवंगीबार वाजवत होती. मुली फुलबाज्या, अनार लावत होत्या.
इतक्यात खूप मोठा आवाज झाला आणि मनवा गोजिरी, मनवा जोराने रडू लागल्या. मोठी मंडळी धावत बाहेर आले.
त्याचे झाले असे की मनवाने एक अनार लावला. कसा माहिती नाही पण तो उडाला नाहीच आणि फुटला त्याचा मोठा आवाज झाला होता.
त्याच्या जवळची बारीक रेती उडाली होती. गोजिरी, मनवा लांब नसल्याने त्यांच्या अंगावर रेती उडाली....डोळ्यात गेली.
घाबरुन पळताना गोजीरीचा पाय जळत्या फुलबाजीवर पडला.
बाबांनी तिला लगेच डॉक्टरांकडे नेले. औषध लावले. इंजक्शनही द्यावे लागले.
झाला प्रकार इतका अनपेक्षित होता की सगळीच बच्चेकंपनी घाबरली होती.
त्यांच्या आईबाबांनी सगळ्यांना घरी नेले. शांत केले.
जेवण झाल्यावर आजी ऋग्वेदला म्हणाली, "चल, गोजीरीला भेटून येऊ. सोसायटीमधल्या सगळ्या मुलांना तिथे बोलवून आण, मी छान गोष्ट सांगते."
गोष्ट म्हणल्यावर, ऋग्वेदसाहेब खूष. धावत जाऊन सगळ्यांना जमा केले. सगळे आलेले बघून गोजिरीलाही बरं वाटलं.
द्युती :- खूप दुखतं आहे का गं?
गोजिरी :- हो ना ... आता मी अजिबात फटाके नाही वाजवणार.
राज :- भित्री.... भागूबाई. इतकं काहीच नाही झालं.
(सगळी मुले त्याच्या बरोबर मुलींना चिडवू लागले. मग आजी रागावली, आणि गोष्ट सांगणार नाही म्हणाली.)
ऋग्वेद :- सॉरी आजी, परत नाही चिडवणार... पण तू गोष्ट सांग.
(आजीची गोष्ट म्हणजे दुसरी मेजवानीच, ती एकेका पात्राचे असे हुबेहूब आवाज काढायची की नुसती धमाल. लहानच नाही तर मोठेही तिच्याभोवती जमा झाले, आणि गोष्टीला सुरुवात झाली.)
तेही दिवस दिवाळीचे होते.
सगळीकडे रोषणाई केली होती, आकाशकंदील, पणत्या, रांगोळी, फराळ, नवीन कपडे नुसती धमाल.
एक भू भू मात्र घाबरुन, रडत बसले होते. तिथून मनीमाऊ चालली होती. तिने विचारले,
माऊ :- काय रे भूभूदादा काय झाले?
भूभू :- अगं काय सांगू, या दिवाळीची ना मला खूप भिती वाटते. फटाक्यांच्या आवाजाचा कानांना त्रास होतो. माझे कान बारीक आवाजही टिपतात. त्यामुळे या मोठ्या आवाजाने कानाला दडे बसतात.
माऊ :- अगदी खरं रे, नुसते आवाज नाही, तर ही मुलं गंमत म्हणून खोड्यापण काढतात. काल मला पकडून माझ्या शेपटीला फटाक्यांची माळ लावली. बघ ना भाजले आहे मला. मी धन्वंतरी बाप्पाकडे चालले आहे. तूही येतोस का? कानांसाठी औषध घे.
(आजीची गोष्ट मधेच थांबवत.)
मैत्रयी :- आजी धन्वंतरी बाप्पा म्हणजे कोण?
रोहन :- इतकं पण नाही माहिती... तो म्हणजे डॉक्टर बाप्पा. हो ना आजी?
रेवा :- आणि मग तो धन्वंतरी बाप्पा काय करतो?
आजी :- सगळ्यांना बरं करतो. सगळ्या डॉक्टरकाकांकडे त्याची मूर्ती असते.
ऋग्वेद :- आजी पुढे काय झालं? गोष्ट सांग ना.....
(तर झालं असं.... दोघ निघाले बाप्पाकडे. वाटेत पोपट, चिमणी, खारोटी, हम्मागाई असे एकेक जण भेटले.)
पोपट :- मी पण येतो तुमच्याबरोबर. रॉकेटमुळे माझे पंख जखमी झाले आहेत.
खारोटी :- मला त्या धुराने घशात कसेतरी होत आहे, खाताना त्रास पण होतो आहे.
चिऊताई :- मला बॉम्ब सोबत उडालेला दगड लागला आहे.
हम्मा गाई :- माझी तर छान पूजा झाली, गोड खाऊ मिळाला पण चालताना माझा पाय गरम फुलबाजीने भाजला.
(सगळेच प्राणीपक्षी घाबरलेले होते. रडत, चिडचिड करत धन्वंतरी बाप्पाकडे गेले. त्यांची अवस्था बघून बाप्पाला खूप वाईट वाटले. त्याने सगळ्यांना औषध लावले.)
सगळे :- बाप्पा आता आम्ही परत जातच नाही. इथेच राहतो.
बाप्पा :- तुम्हीच कशाला, आता मीही पृथ्वीवर जाणार नाही. उद्या धनत्रयोदशी आहे पण मी नाहीच जाणार.
( पुन्हा आजीला थांबवत..)
आराध्या :- आजी पण असा बाप्पा रागावला आणि आलाच नाही तर आपण पूजा कोणाची करणार?
रुचिर :- आणि आपण आजारी पडलो तर आपल्याला बरं कोण करणार?
अनन्या :- नाही नाही असं नको व्हायला. नाही ना होणार आजी?
आजी :- का नाही होणार, जसं भू भू, माऊ, खारोटी, चिमणी, पोपट, गाय यांना भाजले, लागले. ते घाबरले तसेच मगाशी गोजिरीला पण लागलंच ना?
मनवा :- आम्ही खूप घाबरलो सुद्धा.
राज :- मी नाही घाबरत पण असं कुणाला लागायला नको, भाजायला नको आणि बाप्पा रुसायला पण नको.
आजी :- मग त्यासाठी काय करायला हवं?
सुमेध, जान्हवी, स्वरा ( काहीजण) :- आजी आम्ही आता कधी कधी नाही उडवणार फटाके.....
प्रियांषु, समर्थ, अर्हम (उरलेले काही) :- आणि उडवले तरी आम्ही खूप आवाज, धूर होणारे फटाके नाही उडवणार.
आद्या :- उडवताना मोठे कुणीतरी असल्याशिवाय उडवणार नाही.
मुग्धा :- मोकळ्या मैदानावर जाऊ.
अर्पिता :- स्वतःची, इतरांची काळजी घेऊ, प्राणी-पक्षी यांना गंमत म्हणून त्रास देणार नाही.
आजी :- कित्ती शहाणी बाळं आहेत सगळी. नक्की देता वचन की हे सगळं नक्की ऐकणार !...... नाहीतरी बाप्पा खरचं रुसून बसेल बरं का.
सगळे (मोठेही ) :- वचन.... वचन... वचन.
आजी :- मग येईल हो बाप्पा आपल्याकडे. नाही रुसणार... रागावणार. गोष्ट तर तुम्हीच पूर्ण केली.
आजीची गोष्ट पूर्ण झाली आणि सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे ऐकलंसुद्धा.
मित्रानो तुमच काय?
बघा विचार करा..
नाहीतर......
********************













No comments:
Post a Comment
suggestions most wlcome