तिळगूळ घ्या गोड बोला
बरं का मित्रांनो मी आज तुम्हाला गंमत सांगणार आहे. ती आहे आमच्या एका मैत्रिणीची. तिचं नाव ऋचा.
तर एकदा काय ..... चला ऐकण्यापेक्षा आपण बघू या.
(एक सुंदर खोली. तिथे पाच-सहा चिमुकले एकेक करुन वेगवेगळी वाद्य वाजवत आहेत आणि त्यांच्या शिक्षिकाताई त्यांना शिकवत आहेत.)
ताई :- काय मग सगळ्यांची तयारी झाली आहे ना, उद्याच्या स्पर्धेची? सगळ्यांना खूप शुभेच्छा ! आता आपण एकदा शेवटचा सराव करु या. प्रत्येक जोडीने येऊन आपलं सादरीकरण करायच. चला कोण करणार सुरुवात.... सुश्रुता तुमची जोडी करणार का?
(सुश्रुता आणि आर्याची जोडी पुढे येते.)
सुश्रुता :- हो चालेल, नमस्कार मी सुश्रुता.
आर्या :- मी आर्या.
दोघी :- आम्ही टाळ वाजवून, एक छान भजन म्हणणार आहोत,
वाजवा हो टाळ म्हणा, गोविंद गोपाळ
गोविंद गोपाळ घालू, तुळशीची माळ
तुळशीच्या माळेमध्ये, भक्तीची मंजिरी
गरजा हो जय जय जय जय हरी
(सगळे टाळ्या वाजवतात.)
ताई :- आता कोण ?
आयुष :- मी आयुष
स्वंयम :- मी स्वंयम
दोघे :- आम्ही ताशा वाजवून गाणं म्हणणार आहे.
(दोघे थोडासा ताशा वाजवतात.)
पार्वतीच्या बाळा...तुझ्या पायात वाळा
ताश्याच्या आवाज, तारारारा झाला नी
गणपती माझा नाचत आला ......
(पुन्हा टाळ्या)
कौशिकी :- मी कौशिकी. मी आणली आहे ही खंजिरी, ती वाजवून मी छान गाणं म्हणणार आहे.
छम छम छम,
आई गं छडी लागे, छम छम छम...
विद्या येई घम घम,छम छम छम
(प्रत्येकाच्या गाण्यानंतर टाळ्या वाजतात. वर्गातले एकेक जण पुढे येऊन एखादे वाद्य वाजवून गाणे म्हणून दाखवत असतात.)
अंजली :- मी अंजली.
त्रिषा :- मी त्रिषा.
दोघी :- आम्ही पेटी वाजवून गाणे म्हणणार आहोत.
(सुरु करतात.)
बाहुली आमची छान आहे, गोरी गोरी पान आहे ...
वेणीमध्ये फूल आहे, कानामध्ये डूल आहे,
लॉकेटची साखळी , खड्याची टिकली
छुम छुम तोरड्या, सोनेरी या बांगड्या ,
ताई :- आता शेवटची जोडी ऋचा आणि अपूर्वा.
अपूर्वा :- मी अपूर्वा.
ऋचा :- मी नाही म्हणणार हिच्या बरोबर गाणं.
ताई :- का काय झालं ?
ऋचा :- ताई, हीला नीट म्हणताच येत नाही. सारखी चुकते. हीचा आवाज छान नाही. उलट खूप मोठा आहे. मला नाही आवडत हिच्यासोबत गाणे म्हणायला.
(अपूर्वाला खूप वाईट वाटते आणि ती रडू लागते.)
ताई :- अपूर्वा रडू नको. तू सांग तुला काय करायच आहे?
अपूर्वा :- (रडतच) ताई मी खूप प्रयत्न करते, पण ही मला सारखी चिडवत रहाते. तुला येणारच नाही म्हणते मग आमचे गाणे अजूनच कसेतरी होते.
सगळे :- हो ताई. ऋचा असेच करते. ती आम्हालाही चिडवत असते. सगळ्यांच्याच गाण्याला नाव ठेवते. तुम्ही तिलाच घेऊ नका.
ताई :- बरं, अपूर्वा मला सांग, तू एकटी म्हणू शकतेस का? जा छान तोंड धुऊन ये.
(अपूर्वा तोंड धुवायला जाते. मग ताई ऋचाला जवळ बोलावतात.)
ताई :- ऋचा तू असं का बरं करतेस ?
ऋचा :- ताई मला सगळे सांगतात, की मी छान गाणं म्हणते. माझा आवाज गोड आहे, चालही कधी चुकत नाही. नेहमी बक्षीसही मिळते.
ताई :- हो पण त्याच इथे काय?
ऋचा :- त्या अपूर्वाला काहीच नाही येत.
ताई :- हे बघ रुचा, आपण जी स्पर्धा घेणार आहोत ना, ती कुणाचा आवाज कसा याची नाही, तर तुम्ही एकमेकांसोबत किती छान गाणं म्हणू शकता याची आहे.
अपूर्वाला गाणं येत नाही तर, तू तिला शिकवायला हवं. चिडवायला नाही.
नाहीतर तू एकटी राहशील. कोणी तुझ्याबरोबर गाणं तर नाहीच म्हणणार, पण बोलणार नाही की खेळणारही नाही.
तू गाणं शिकते ना मग, सा रे ग म हे सगळे स्वर वेगवेगळे आहेत हे तुला माहितच असेल. त्यातला एकच छान बाकी वाईट अस नाही ना.
त्या सगळ्यांचे मिळून गाणं तयार होत. समजते आहे का मी काय सांगते?
नुसता आवाज गोड, चाल बरोबर असून चालत नाही तर आपल्याला सगळ्यांशी जमवून पण घेता यायला हवं, हो की नाही?
(इतक्यात अपूर्वा छान तोंड धुवून परत आली.)
अपूर्वा :- ताई मी गाणं म्हणून दाखवू?
ताई :- अगं हो आम्ही सगळे तुझीच वाट बघत होतो. ऋचा तूही ऐक हं. तीचे काही चुकत असेल तर आपण तिला सांगू पण उगाच नावं नाही ठेवायची बरं का. चल तिला शुभेच्छा दे बरं.
(काहीशा नाराजीने ऋचा अपूर्वाला हात मिळवून छान म्हण असे म्हणते. अपूर्वा खूष होते आणि घुंगुर्रकाठी वाजवत सुरु करते.)
टाळ वाजे वीणा वाजे
वाजे घुंगुर्रकाठी
घुंगराच्या तालावर
नाचे जगजेठी
(आवाज गोड नसला तरी खूप छान म्हणते. ऋचाला तिची चूक समजते. ती धावत जाऊन तिला मिठी मारुन माफी मागते.)
ताई :- किती छान ऋचा, तू स्वतःहून चूक मान्य केलीस. आता बघ तुमच्या दोघींचे गाणे कसे मस्त होईल.
मकर संक्रांतीला स्पर्धा होते. सगळ्यांचीची गाणी खूप छान होतात. स्वरांपेक्षाही सूर जुळल्यामुळे अपूर्वा आणि ऋचाला दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीसही मिळते.
मग ताई सगळ्यांना बोलावतात आणि तिळगूळ देऊन सांगतात, की फक्त गाणं नाही तर बोलणेही सुरेल हवे.
आपण गोड बोललो, सगळ्यांशी छान वागलो तर खूप मित्रमैत्रिणी मिळवता येतात. आपल्या मित्रांची एखादी गोष्ट आवडली नाही, चुकली तर ती त्याला मोकळेपणाने सांगायची, पण म्हणून त्याचाशी मैत्री तोडायची नाही, त्याला नावे ठेवायची नाही, हेच सांगायला हा संक्रातीचा सण येतो.
चला सगळ्यांनी एकमेकांना तिळगूळ द्या आणि म्हणा,
तिळगूळ आमचा सांडू नका,
सांडला चुकून तरी भांडू नका !
वाद मतभेद असले तरी,
मैत्री मात्र तोडू नका
तिळगूळ घ्या गोड बोला !
तिळगूळ घ्या गोड बोला !
******************************************
No comments:
Post a Comment
suggestions most wlcome