आनंदवनात
सगळं कसं छान होत.हिरवीगार घनदाट झाडी, किलबिल करणारे पक्षी, खूप सारे प्राणी आणि झुळझुळ वाहणारी सावी नदी
म्हणजे आनंदवनाची खरी ओळख. सगळे मिळून मिसळून राहायचे. काही कमी नव्हती
पण
एकदा काय झालं माहितीये ?
सावी नदीच पाणी कमी
होऊ लागलं. ते दिवस होते उन्हाळ्याचे . उन्हाचा तडाखा जसजसा वाढू लागला, तसे नदीच पाणी अधिकच कमी होऊ लागले तिचा प्रवाह कमी कमी होऊ लागला .
असं का होत आहे
ह्याचा छडा लावलाच पाहिजे म्हणून आनंदवनात एक बैठक भरली. सोनू घार जाऊन शोध घेणार
असं ठरलं .
सोनू लगेच कामाला
लागली. सावी नदीच्या प्रवाहाचा माग काढत उडू लागली. उडत उडत आनंदवनाच्या बाहेर
आली. तिथून शहर चालू झालं जे माणसांनी गजबजलेलं होतं. सोनूने
बघितलं तिथे सावी नदीला बांध घालून तीच पाणी अडवलं होत .
सोनूने नीट पहाणी
केली. सावीच पाणी शहरातील माणसं वापरायची पण वायाही खूप घालवायची शिवाय त्या पाण्यापासून
वीजपण तयार करायची त्याचाही वापर कसाही करायची उगाच दिवे,मशीन,पंखे
चालू ठेवायची. शिवाय सगळीकडे नुसती घर, इमारती,रस्ते त्यामुळे झाडही खूप कमी झाली होती. तिथल्या
पावसाचे प्रमाणही कमी झाले होते.
सोनूने आनंदवनात
येऊन सगळा प्रकार सांगितला. सगळे मिळून विचार करु लागले. गजू हत्ती खूप हुशार आणि
अनुभवी होता. त्याने एक योजना तयार केली आणि सगळ्याना सांगितली. सगळे आनंदानी तयार
झाले.
इकडे शहरात नुसता
गोंधळ सुरु झाला. सावी नदीचे सगळे पाणीच कुठेतरी गायब झाले.त्यामुळे वीज तयार होणे
थांबले. सगळीकडे अंधार पसरला. हळूहळू साठवलेले पाणी पण संपू लागले. पिण्याचे पाणी
थोडेच राहिले. आता हे काय होतंय याचा शोध माणसांनी सुरु केला.
तेव्हा त्यांच्या
लक्षात आलं की नदीच पाणी शहरात येण्याआधी एका जंगल लागतं तिथे लाकडाचे बांध घालून
अडवलं आहे. हे असं का विचारायला माणसे त्या जंगलात गेली.
ते होत चंपकवन जे
भल्या मोठ्या डोंगराच्या पायथ्याशी होतं.
याच डोंगरातच सावी नदीचा उगम होता.
माणसे जेव्हा चंपक
वनात जाऊन पाणी अडवल्याबद्दल आरडाओरडा करु लागली तेव्हा सिंह महाराजांनी जोरात
गर्जना केली आणि सांगितले की आम्ही सगळे प्राणी मिळून एका मिनिटात तुम्हा माणसांना
मारु शकतो पण कुणालाही उगाच त्रास देऊ नये हा निसर्गाचा नियम आम्ही पाळतो त्यामुळे
शांत रहा. या सगळ्याचे कारण शहर जिथे संपत तिथे असलेल्या आनंदवनात जाऊन तिथल्या
प्राण्यांना विचारा.
खर तर सिंहाच्या
गर्जनेमुळे आणि इतके सारे जंगली प्राणी बघून माणसे घाबरली होती पण त्यांनी काहीच न केल्यामुळे रागरागात आनंदवनात जाऊन आरडाओरडा
करु लागली .
त्यांचा आरडाओरडा
बघून गजू हत्ती खूप चिडला आणि त्याने एका माणसाला सोंडेत धरुन गरागरा फिरवले आणि
तसेच वर धरले.
ते बघून सगळी माणसे
घाबरुन शांत झाली.
गजूने त्या माणसाला
खाली सोडले व ओरडूनच बोलू लागला,"तुम्ही
माणसं खरचं देवानी बनवलेला प्राणी आहात का राक्षस ? एकतर स्वतः चुका करता आणि वर गोंधळही घालता?"
"आम्ही काय चुका केल्या?",एकाने घाबरत विचारलं.
गजू :- देवबाप्पाने
आपल्या सगळ्यांना बनवले.आपल्यासाठी झाड, नदी,तलाव,सूर्य,वारा हा सुंदर निसर्ग बनवला.पण तुम्ही माणसं फक्त
गरजेसाठी त्याचा वाटेल तसा वापर करता.नीट काळजीही घेत नाही.
तुमच्या फायद्यासाठी
सावी नदीच पाणी अडवलं.त्यामुळे इथे आनंदवनात प्यायलाही पाणी कमी पडू लागलं .तुम्ही
पाणी वाया घालवता.त्यापासून बनणारी वीज वाया घालवता.शिवाय झाड तोडता, नवीन लावत नाही,त्यामुळे पुरेसा पाऊसही पडत नाही म्हणूनच आम्ही सावीच पाणी अडवलं आहे.आता ते पाणी
असं सोडू की त्या प्रवाहात सगळं शहर वाहून जाईल.सगळीकडे पाणीच पाणी होईल.
गजूच म्हणणं
माणसांना समजलं आणि चूकही लक्षात आली.सावी नदीचा खरचं जर मोठा प्रवाह आला तर काय
होईल या कल्पनेने सगळे घाबरले आणि हात जोडून गजूला म्हणाले," हे गजराज तुझे म्हणणे अगदी योग्य आहे.आम्ही
आमच्या सगळ्या चूका मान्य करतो आणि तुला वचन देतो की यापुढे असं होणार नाही."
"आम्ही पाणी,वीज जपून वापरु.निसर्गाची काळजी घेऊ. भरपूर झाडे
लावू त्यांची काळजी घेऊ."
"सावी नदीवर घातलेल्या बांधातून तुमच्यासाठी भरपूर
पाणी सोडू पण तुम्ही पाणी अडवू नका आणि एकदम सोडूही नका ."
माणसांना आपली चूक
समजलेली पाहून सर्व प्राण्यांनी त्यांना माफ केले आणि त्यांच्याकडून निसर्गाची
काळजी घेण्याचे पक्के वचन घेतले.
पुन्हा एकदा सगळीकडे
आनंदीआनंद झाला.
आणि बरं का
मित्रांनो तेव्हापासून याची आठवण म्हणून गजराजची हत्तीची पूजा सुरु झाली.आजही
भोंडल्याला पूजा करुन पाण्याचा प्रलय होऊ नये, ओला वा कोरडा दुष्काळ पडू नये म्हणून त्याची
प्रार्थना केली जाते.हस्त नक्षत्रातील पाऊस तुझ्या सोंडेतून छान पडू दे अशी विनवणी
केली जाते .
मग घेणार ना काळजी? नीट वापरणार ना वीज,पाणी.
ठेवणार ना निसर्ग
छान?
तरच गजराज खूष राहील
नाहीतर आपलं काही खरं नाही बरं का !















No comments:
Post a Comment
suggestions most wlcome