Thursday, April 30, 2020

हरतालिकापूजन

सोनूची पार्वतीदेवीला (हरतालिका देवीला) प्रार्थना


मित्रांनो ही मागच्या वर्षीची गोष्ट आहे बर का...
आपला सोनू तसा गोड मुलगा पण जरासा आळशी. स्वतःच्या मनाप्रमाणे करणारा...कामात चालढकल करणारा...सांगितलं की लगेच ऐकायचं नाही...उगाच ओरडा खायचा मग ऐकायचं.

त्यात दोन दिवसांनी बाप्पा येणार म्हणून स्वारी इतकी खूष होती की नुसती घरभर बाप्पा मोरया बाप्पा...मोरया करत नाचत होती. आईने अभ्यास करुन घे म्हणून सांगितले, आजीने दूध प्यायला बोलावलं पण सोनूसाहेब आपल्याच नादात. बाबा आल्यावर त्याने हाक मारली, आजोबांचेही काहीतरी काम होते पण कुणाच्याही हाकेला त्याने ओ दिली नाही की सांगितलेले ऐकलेही नाही. सगळे सांगून दमले शेवटी सगळ्यांनी मिळून ठरवले की आता त्याला काहीही सांगायचे नाही.

गंमत म्हणजे कैलास पर्वतावरुन हे सगळ पार्वतीदेवी आणि गणपती बाप्पा दोघेही बघत होते. त्यांना हे अजिबात आवडले नाही पण हे सोनूला सांगायचे कसे याचा ते विचार करु लागला. इतक्यात बाप्पाला एक युक्ती सुचली त्याने मातेला कानात काहीतरी सांगितले.

इकडे दिवसभर दमून सोनू आपला आपणच झोपून गेला आणि काय झालं माहितीये गणपती बाप्पा तिथे आला आणि म्हणाला.....

बाप्पा :- सोनू मी दोन दिवसांनी येणार म्हणून तू इतका आनंदात आहे पण मी तुझ्या घरी येणार नाही.

सोनू :- ( आश्चर्याने ) का बर नाही येणार ?

बाप्पा :- मला माझ्या मातेने सांगितले आहे, की सोनूकडे जायचं नाही. तू तिलाच का नाही विचारात ? चल मी तुला तिच्याकडे घेऊन जातो.

( असं म्हणून गणपती बाप्पा सोनूला पार्वती मातेकडे घेऊन गेला )
   
बाप्पा :- माते बघ कोण आले आहे.

पार्वतीदेवी :- अरे हा तोच ना सोनू. जो सगळ्या गोष्टींचा कंटाळा करतो. कोणतेही काम सांगितले की लगेच ऐकत नाही, सारख ओरडायला लावतो....

बाप्पा :- अगं हो तोच हा सोनू. तुला भेटायला आला आहे.

पार्वतीदेवी :- पण का आला आहे ?  मला त्याच्याशी बोलायचे नाही आणि हो तू त्याच्या घरी जायचेही नाही.

सोनू :- पार्वतीदेवी पण का? का नाही येणार बाप्पा आमच्याकडे ?

पार्वतीमाता :- अरे आत्ताच तर सांगितले नाही कातू सगळ्याचा कंटाळा करतो. सांगितलेले काम लगेच करत नाही. उगाच ओरडायला लावतो. गणपती माझेशंकर देवांचे एवढेच काय पण कार्तिकदादाचे पण ऐकतो. 
तुझ्याकडे आल आणि तुझ्यासारखं वागायला लागला तर ... ? नकोच ना त्यापेक्षा तो तुझ्याकडे येणार नाही.

सोनू :- देवी मला माझ चूकल. मी यापुढे असे करणार नाही. सगळ्यांचे ऐकेन. कंटाळा करणार नाही.

पार्वती देवी :- हो का..म्हणजे नक्की काय करणार ?

सोनू :- अभ्यास वेळेवर करेन.  माझी खेळणीकपडे वह्या-पुस्तके जागेवर ठेवेन. खूप टीव्ही बघणार नाही. सगळ्यांचे ऐकेन.

पार्वती देवी :- हम्मम. पण हे फक्त गणपती तिकडे आहे तोपर्यंतच करशील.

सोनू :- नाही नाही यापुढे नेहमी करेन. प्रॉमिस. पण पाठव ना तू बाप्पाला ...
( सोनू हात जोडून पार्वती देवीला विनवू लागला. गणपती बाप्पा देवीकडे हळूच बघून गालातल्या गालात हसत होता. )

सोनूची आई :- अरे सोनू ऊठ... काय करतो आहेस? कुणाला जोडले आहेत हातआणि काय प्रॉमिस करतो आहेस?

सोनू :- (मनात) अरेच्या बाप्पा आणि पार्वतीदेवी कुठे गेले? हे खरं नव्हतं का नाही...नाही हे खरच असणार कारण देवी म्हणाली तसा मी खरचं आळशीपणा करतो. ऐकत नाही....खरचं नाही आला गणपती बाप्पा तर...

काहीतरी विचार करत सोनू धावत बाथरुम मध्ये गेला. छान दात घासले तोंड धुतले आणि देवाजवळ गेला. तिथे आईने हरतालिका म्हणजेच पार्वतीदेवीची पूजा केली होती. मग त्यानेही हात जोडून पार्वती देवीची प्रार्थना केली.

सोनू :- पार्वती देवी मी तुला केलेले प्रॉमिस नक्की पूर्ण करणार. छान वागणार. पण तू माझ्या लाडक्या गणपती बाप्पाला नक्की पाठव !


आणि बरं का मित्रांनो मग पार्वतीदेवीने गणपती बाप्पाला सोनूकडे पाठवले आणि तीही चार दिवसांनी सोनूला भेटायला, त्याच्याकडे दोन दिवस राहायला आली.

तेव्हापासून सोनू छान वागायला लागला. सगळ्यांचे ऐकायला लागला. आळशीपणा सोडून सगळी कामे पटापट करायला लागला.

त्याने ठरवले आता दरवर्षी पार्वती देवीची म्हणजेच हरतालिकेची आईबरोबर प्रार्थना करायची आणि तिला सांगायचं की मी नेहमी छान वागेन. सगळ्यांचे ऐकेन. कुणालाही त्रास देणार नाही. तू माझ्या मित्राला म्हणजेच लाडक्या गणपती बाप्पाला माझ्या घरी पाठव आणि तूही नक्की ये.

यावर्षी तर सोनूने छान श्लोक, गणपती स्तोत्र, अथर्वशीर्ष आणि बाप्पाची खूप गाणीही पाठ केली आहेत तो ती बाप्पाला आणि देवीलाही म्हणून दाखवणार आहे.

काय मग तुम्हीही पार्वती देवी म्हणजेच हरतालिकेची प्रार्थना करणार ना? आणि सांगणार ना की आम्ही  छान वागणार, सगळ्यांचे ऐकणार. आमची सगळी कामे पटापट करणार आणि हो गणपती बाप्पाची काळजी घेणार त्याला त्रास होईल असे वागणार नाही.

तरच पार्वती देवी गणपती बाप्पाला तुमच्याकडे पाठवेल बर का !


No comments:

Post a Comment

suggestions most wlcome