सोनू
आज खूपच आनंदात होता. उद्या गणेश चतुर्थी.
लाडका
गणपती बाप्पा घरी येणार म्हणून सगळेच आनंदात होते.
प्रत्येकजण काही ना काही काम करत होते. ताई दादाने मिळून काल बाबांबरोबर जाऊन आणलेले थर्माकॉलचे मखर छान मांडून बाजूने खूप रंगीबेरंगी लाईटच्या माळांनी रोषणाई केली. त्यांना निनाद जमेल तशी मदत करत होता.
बाबा
आणि आजोबा उद्याच्या पूजेची तयारी करत होते. तर आई आणि आजी दर्शनाला येणाऱ्यांना
द्यायला विकत आणलेले पंचखाद्य, करंज्या, लाडू-चिवडा असे प्रसादाचे पदार्थ डब्यात काढून ठेवण्यात रमल्या
होत्या. सगळं आवरुन झोपायला थोडा उशीरच झाला, तरी सगळी मंडळी सकाळी लवकर उठून तय्यार !
कॉलनीतले
सगळेच एकत्र घरचा आणि मंडळाचा बाप्पा आणायला निघाले. प्रत्येकाच्या कार पार्किंग
मधून धूम्म धावून दहा मिनिटात
बाप्पांची
स्वारी घोषणांच्या जल्लोषात घेऊनही आल्या.
कॅसेट
लावून घरची आणि मंडळ दोन्ही पूजा पटकन आटोपल्या. आरती, अथर्वशीर्ष पण cd वरच लावले. भरपूर फोटो, सेल्फी काढून व्हाट्स अँप, फेसबुक वर सगळ्यांना
पाठवून छान, मस्त असे कौतुकही झाले.
मग नेहमीच्या काकांकडून आणलेल्या सामोसे आणि कचोरीचा भरपेट नाष्टा झाला.
आताशी
दहाच वाजलेत जेवायला वेळ आहे आणि उकडीचे मोदक आणि जेवण बाहेरुनच येणार होते. सगळं
लवकर आवरलं आहे तर जरा खरेदी करुन येऊ म्हणून आईबाबांचे नवीन मॉलमध्ये गेले.
आजीआजोबा काल काहीच बघायला मिळाले नाही म्हणून झी मराठी लावून रिपीट सिरियल बघायला
बसले. ताईच मैत्रिणीबरोबर
व्हिडिओ कॉलवर गप्पा रंगल्या आणि दादा मित्रांबरोबर कुठेतरी बाहेर गेला, तर सोनूची साहेब व्हिडिओ गेम
खेळात गुंगला.
हे
फक्त सोनूच्या घरचे नाही तर सगळीकडे काहीसे असेच दृश्य होते. घरात गणपती
बाप्पापुढे स्तोत्र, भजन टेपवर तर मंडळात खूप
मोठ्या आवाजात पिक्चरची गाणी लावून ठेवली होती. अगदीच रिकामटेकडी मुले त्यावर
वेडीवाकडी नाचत होती.
काही
वेळाने जेवणापूर्वी आरती करण्यासाठी सगळी मंडळी एकत्र जमली आणि बघतात तर काय?
मखरात बाप्पाच नाही.
बाप्पा
कुठे गेला म्हणून एकच गोंधळ, गडबड आणि शोधाशोध सुरु झाली. सोनूने घरी जाऊन बघितलं तर
घरातल्या मखरात बाप्पा नव्हता. कुणाच्याच घरी नव्हता. सगळेच जण रडकुंडीला आले.
शोधत इकडेतिकडे फिरत होते.
इतक्यात
सोनूला बाप्पा एका जीन्याखाली कोपऱ्यात बसलेला दिसला. सोनू धावतच त्याच्याजवळ गेला
आणि ......
सोनू
:- बाप्पा तू इथे काय करतो आहेस? काय झालं काय तूला? आम्ही सगळे केंव्हापासून तुला शोधतोय.
बाप्पा
:- म्हणलं बघावं मी नाही हे कळतंय तरी का तुम्हाला....
सोनू
:- ( थोड्या रागातच ) का रे असे म्हणतोस? इतकं काय काय केलं आहे आम्ही. हे सुंदर मखर, लाईटच्या माळा, डेकोरेशन, छान छान प्रसाद तुझ्यासाठीच
तर आहे ना.
बाप्पा :- अरे सोनू या
सगळ्यासाठी मी इथे येतो का रे? तुम्ही मला चौदा विद्या चौसष्ट कलांचा दाता
म्हणता ना मग हे मला तुमच्याकडून हवं असेल क? मी जरी देव असलो तरी मलाही खूप काम असतात. मी
माझ्या आईबाबांना, दादाला, मित्रांना सोडून इतक्या लांबून इथे येतो ते फक्त
तुझ्यासारख्या लाडक्या बोलगोपाळांना, भक्तांना भेटायला. थोडावेळ तुमच्याबरोबर मजा
करायला, गप्पा मारायला. हवं तर ध
ऐवजी दोनच दिवस येईन मी पण तुम्ही सगळे जर तुमच्या तुमच्यात रमला आहात मग मला
बोलवताच कशाला ?
(इतक्या वेळात सगळे तिथे
जमा झाले. सगळयांना बाप्पाचे म्हणणे पटत होते. सार ऐकून सोनूला खूप भरुन आल आणी तो
रडत म्हणाला )
सोनू :- अरे पण बाप्पा
........
बाप्पा :- थांब माझे
बोलणे अजून पूर्ण झालेले नाही. आणि रडायला मी पाहिजे तुम्ही नाही. तुम्हाला
माझ्यासाठी वेळ नाही. पूजा, श्लोक, स्तोत्र, आरती यातला काहीही शिकण्याची , म्हणण्याची तयारी नाही टेप, सीडी लावली की झाले तुमचे काम. गाणी म्हणजे तर सगळ्यात मोठी शिक्षा.. शांताबाई
काय लुंगी डान्स काय...काय ते शब्द आणि आवाज म्हणजे माझ्या कानांत शिश्याचा गरम
रसच ओतलाय असे काहीतरी होत असते.
माझ्या मोठ्या मोठ्या आणि
ते सुद्धा पीओपीच्या मूर्ती, प्लास्टिक, थर्मोकोलची आरास सजावट हे सगळ म्हणजे सुंदर
निसर्गाला त्रास. पाणी घाण होणार. मूर्ती पूर्ण विरघळणार नाही. तोडक्या मोडक्या
कशाही कुठेही पडून राहणार.
माझ्या नावाखाली गर्दी , धक्काबुक्की केली की मलाच वाईट वाटते, त्रास होतो, रागवावे, रडावेसे वाटते मग हे सुंदर मखर, सजावट, नैवेद्य बघून मला सोन्याच्या पिंजऱ्यात
बसवल्यासारखे वाटते.
सगळे :- बास ना रे बाप्पा, आम्हाला आता कळल आहे की आमचं काय काय चुकले आहे.
बाबा :- यापुढे प्लास्टिक, थर्मोकोल आणि उगाचच खूप लाईटची रोषणाई एकदम बंद.
उलट आमच्या लहानपणीसारखे घरातले सगळे मिळून नवनवीन कल्पना वापरुन कागद, कापड यापासूनच छान आरास बनवू.
आई :- मी पण घरीच मला
जमतील तो छान छान खाऊ बनवेन.
ताई :- मी पण मदत करेन
तुला आणि माझ्या मैत्रिणींनाही बोलावेन.
दादा :- मी पण माझ्या मित्रांना
बोलवेन. आम्ही छान गाण्याचा, वादनाचा कार्यक्रम करु.
आजी :- मीही छान छान
गोष्टी सांगेन.
आजोबा :- मी सगळ्यांना
श्लोक, स्तोत्र, आरती शिकवेन. या बच्चेकंपनीची नाटुकली बसवून
घेईन. सगळे मिळून तुझ्यासोबत राहू आणि तुला जे आवडते तेच करु, पण तू असा रागवू नकोस, न येण्याची भाषा करु नकोस आणि आम्हाला सोडून जाऊ
नकोस.
बाप्पा :- अरे वा खूप
छान. आता कसे मला आवडेल असे ठरवले. मलाही तुम्हाला असे बोलायला आवडत नाही.
रागवायला आवडत नाही पण या सगळ्याचा मला खूप त्रास झाला म्हणून मी शेवटी असे केले.
सगळे :- बाप्पा पक्का promise
यापुढे असे कधीही होणार. बाप्पा छान हसला. सगळ्यांनी मिळून त्याला परत
वाजत-गाजत मखरात बसवले. पुढचे सगळे दिवस खूप आनंदात गेले.
सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे
केले आणि मग बाप्पाही खूप खूष झाला आणि असेच छान वागा म्हणाला.....................................







No comments:
Post a Comment
suggestions most wlcome